माझा एक मित्र आहे ‘अजित.’ आता मित्र म्हटला की रोज नाही तरी आठवडय़ातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, निदान सहा-आठ महिन्यांतून एकदातरी आम्ही बोलत असू किंवा कधीमधी काही कारणास्तव भेटत असू तर असे बिलकुल नाही. हा माझा मित्र वर्षांतून एकदाच माझ्या वाढदिवसानिमित्त फोन करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी नोकरीत असताना माझी बदली पश्चिम उपनगरातील एका शाखेत झाली. तिथे माझ्या इतर सहकाऱ्यांमध्ये अजित होता. तसा तो मला वाटते माझ्यापेक्षा नऊ-दहा वर्षांनी ज्युनियर असावा. त्याच्या बॅचमधील आधी त्याची मैत्रीण, नंतर प्रेयसी आणि नंतर पत्नी झालेली मुलगी माझी खास मैत्रीण झाली. ऑफिसमध्ये असताना ही माझी मैत्रीण आणि दुसरी एक मैत्रीण असे आमचे त्रिकुट दुपारी लंचला एकत्र जात असू. क्वचित कधी तरी सिनेमा पाहणे झाले असेल. कारण त्यावेळेस नोकरी, घरी मुले लहान त्यामुळे माझे फारसे मैत्रिणींबरोबर एकत्र फिरणे होत नसे. अजित माझ्याच ऑफिसमध्ये आणि माझ्या मैत्रिणीचा प्रिय सखा असला तरी आमचे बोलणे क्वचितच होत असे. म्हणजे मी त्याच्या टेबलाकडून जाताना हाय प्रिया! एवढेच बोलणे किंवा एखाद्दुसऱ्या विनोदी संभाषणाची देवाणघेवाण बस इतकेच. ३-४ वर्षांत प्रथम अजितची बदली झाली आणि कालांतराने माझीही दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली झाली. मी आणि माझी मैत्रीण त्यानंतर बऱ्याचदा भेटलो असू परंतु अजितशी एकदाही भेट झाली नाही. मात्र माझ्या प्रत्येक वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अजितचा नियमित न चुकता फोन येऊ लागला.

म्हणजे आज २४-२५ वर्षे झाली पण अजितचा फोन आला नाही असे झाले नाही. आता वर्षभर भेटणे नाही, बोलणे नाही तरी पाच-दहा मिनिटांत आम्ही रोज भेटत असल्यासारखे बोलतो. जुन्या मित्रांच्या सहवासात आपण कसेही बोलू, वागू शकतो या वचनाला जागून आमचे संभाषण होत असते. पण गंमत अशी की त्याच्या पत्नीने म्हणजे माझ्या मैत्रिणीने मला स्वत:हून कधी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. अजितच्या जवळपास असलीच तर तिचे माझे वाढदिवसानिमित्त बोलणे होते, परंतु असे फार तर तीन-चार वेळाच झाले असेल.

तर असा हा माझा मित्र खूप चांगला आहे. सदैव आनंदी, हसरा, थट्टेखोर, कोणाबद्दलही जजमेंटल नाही. कोणाचीही निंदानालस्ती नाही. त्याला विनोदबुद्धीही खूप चांगली आहे. मुख्य म्हणजे त्याच्यावर केलेल्या विनोदावरही दिलखुलास हसण्याची खिलाडूवृत्ती त्याच्याकडे आहे.

मी आणि हा मित्र ह्य २४-२५ वर्षांच्या काळात फक्त दोनदाच भेटलो. एकदा माझ्या मोठय़ा मुलाच्या लग्नात आणि त्यानंतर १५ वर्षांनी त्याच्या मुलाच्या लग्नात म्हणजे गेल्यावर्षी, अधेमधे भेटणे नाही. तर हा मित्र आहे तसाच आहे. दिसायला आणि वागायलाही तसाच आहे. इतकी वर्षे तो मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, पण मी मात्र त्याला आठवणीने एकदाही वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फोन केला नाही ही माझ्यासाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे. पण हा माझा ‘दिलदार’ मित्र तसं मनातसुद्धा न आणता, माझ्या फोनची अपेक्षा न करता मनाच्या मोठेपणाने मला फोन करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मुळात आपल्या माणसांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा देण्याची चांगली सवय नाही मला. या गोष्टीची खंत, लाज आहे परंतु खूप ठरवूनही काही जमत नाही.

मला वाटले मैत्रीला बंधन नसते. मैत्रीला जात, पात, धर्म, लिंग, वय कशाचेच बंधन नसते. ती कुणातही होऊ शकते. ही मैत्री नेहमीच निर्मळ असते असेही नाही तर कधीतरी, काहीतरी हेतू ठेवून काही अपेक्षा ठेवूनही मैत्री केली जाते. कधी कधी मैत्रीत दगाबाजीही संभावते. पण म्हणून साध्या सुंदर निर्मळ मैत्रीचे मोल कमी होत नाही तर अजितची आणि माझी मैत्रीसुद्धा अशीच साधी, सुंदर, निरपेक्ष नि:स्वार्थी आहे या मैत्रीला कोणते निकष लावायचे किंवा लागतात ते मला माहीत नाही, पण अशी ही मैत्री आहे खरी!

जगात सगळेच काही सुंदर, छान छान नसते. इथे चांगुलपणाबरोबर असूया, हेवा, दुष्टपणा, मत्सर, वाईटपणा आहेच. परंतु म्हणूनच अशा निरपेक्ष, निष्पाप मैत्रीचे मोल आणि अप्रूप! माझ्यासाठी ही मैत्री वर्षांतून एकदाच येणाऱ्या एखाद्या सणासारखी आनंदाचे दोन क्षण देणारी निर्मळ निखळ मैत्री!

प्रिया देसाई – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship
First published on: 27-11-2015 at 01:08 IST