लहानपणी शाळेत असताना बऱ्याच वेळा ‘मी पंतप्रधान झालो तर..’ किंवा ‘मी लक्षाधीश झालो तर..’ या विषयांवर कल्पना-विस्तार करून निबंध लिहायला सांगायचे. अशा विषयांवर मग आम्ही सर्व मुले बरेच काही लिहायचो. आता पंतप्रधान म्हटले की पाठीपुढे मोटारींचा मोठ्ठा ताफा, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांची हीऽऽ तोबा गर्दी. त्या काळी पंतप्रधान उघडय़ा गाडीतून सर्वाना हात करत पुढे जायचे. कधी कधी गर्दीमुळे गाडी थांबायची व हारतुऱ्यांची देवघेव व्हायची. अमाप उत्साहात लोकांचे ‘जय हो’, ‘झिंदाबाद’ वगैरे नारे सगळीकडे घुमायचे. पंतप्रधान जवाहरलालजी व इंदिराजी यांची भेट काही वेगळीच असायची. पंतप्रधानांचे आगमन अगदी जोशपूर्ण व उमद्या वातावरणात व्हायचे. पंतप्रधानाच्या त्या गाडीची वाट पाहत लोक तासन् तास रस्त्यावर उभे असायचे. पंतप्रधान म्हटले की हमखास डोळ्यासमोर येते ते १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेले आवेशपूर्ण भाषण, २६ जानेवारीची ती अभुतपूर्व परेड, अधूनमधून रेडिओवरून साऱ्या जनतेला दिलेला अमूल्य संदेश आणि आपल्या देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी केलेली विविध आवाहने. मी पंतप्रधान झालो तर काय मज्जाच मज्जा असे वाटायचे. मी लक्षाधीश झालो तर.. हा विषयसुद्धा सर्वाच्या आवडीचा असायचा. त्या काळी बहुतेक हिशेब शेकडय़ातच चालायचे. त्यामुळे हजार हा आकडाही मोठ्ठाच वाटायचा. त्यामुळे लक्षाधीश असणे किंवा होणे ही सर्वसामान्य गोष्ट नव्हतीच. लक्षाधीशाचे राहणीमान फारच उच्च दर्जाचे म्हणजे भला मोठ्ठा बंगला, भरपूर नोकरचाकर, मोठ्ठी बाग व त्यात सुंदरसे कारंजे, चार-पाच लांबलचक गाडय़ा वगैरे वगैरे. आम्ही आपले कल्पनेनेच जगायचो आणि हे सर्व स्वप्नवत असल्याची जाणीव व्हायची. दहापैकी पाच गुण मिळाले की समाधान मानून ते सर्व विसरून जायचो. शाळा झाली अन् कॉलेजचे शिक्षणही संपले. सर्वसाधारणपणे सर्व जण लागतात तसा मी नोकरी करू लागलो. सकाळी उठून देवाची पूजा, चहा व न्याहारी झाल्यावर जेवणाचा डबा बॅगेत भरून बसच्या क्यूमध्ये उभे राहायचे, बसने, स्टेशनवर गेल्यावर खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये शिरकाव करायचा, ग्रुपमधल्या मित्रांबरोबर गप्पा मारत ऑफिसला जायचे अन् संध्याकाळी परत त्या किंवा वेगळ्या मित्रांबरोबर पेपरात आलेल्या बातम्यांचा समाचार घेत घरी परतायचो. हा नित्यनेम ठरलेला असायचा. कधी खूप कंटाळा आला तर एखादा सिनेमा किंवा नाटक बघायचे. तेवढाच एक विरंगुळा. देवाकडे कधी कधी मी उभा राहून विचारायचो की काय हे जीवन आहे? अथांग सागरातला मी एक बिंदू अशा माझे अस्तित्व ते काय? या जीवनाला काय अर्थ आहे? आणि अशाच प्रकारचे विचार करत झोपी जायचो. कधी कधी वाटायचे, पंतप्रधान, मुख्यमंत्री नाही, मंत्रीही नाही पण निदान नगरसेवक जरी झालो असतो तरी पाठी-पुढे लोकांची ‘साहेब साहेब’ म्हणून गर्दी, काम करण्याची आश्वासने, लोकांना हात करत करत लांबलचक गाडीत शिरायचे.. रुबाबातले ते जीवन.. किंवा हिंदी सिनेमाचा नसेन तर निदान मराठी सिनेमाचा हिरो झालो असतो तर.. निदान मराठी नाटकातला हिरो झालो असतो तरी मागेपुढे सह्यांसाठी लोकांची तोबा गर्दी.. एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलो की लक्ससारख्या सुगंधी साबणच्या जाहिरातीत नसू दे पण निदान भांडी घासण्याच्या साबणाच्या जाहिरातीत फोटो.. टुथपेस्ट सोडून हा पण निदान टुथपावडरच्या जाहिरातीत तरी आपला फोटो झळकला असता.. एकदा असाच खूप कंटाळा आला. वाटायला लागले की काय हे आपले सामान्य माणसाचे जीवन? फिरायला म्हणून दादर चौपाटीवर रेतीत जाऊन बसलो. सूर्य अजून बराच वर होता. समुद्राला भरतीची वेळ होती. लाटा उंच उंच उडय़ा मारत मारत एकमेकांना स्पर्श करून किनाऱ्यावर तुटून पडत होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात गेले की मन प्रसन्न होते. ऊन कमी कमी होत चालल्याने हवेत मध्येच गारवा येत होता. रेतीत बसून समुद्राचे ते विशाल रूप न्याहाळण्यात एक वेगळीच मजा असते. काही लहान मुले समोरच रेतीत खेळत होती. कोणी किल्ले बनवत होती तर कोणी देऊळ, घर असे देखावे करत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे मनमोकळे हास्य व चेहऱ्यावरचा निरागसपणा मनाला मोहून टाकत होता. म्हणतात ना मुले म्हणजे देवाघरची फुले. त्यांच्याकडे पाहून जो आनंद मिळतो तो विरळाच. ‘लहानपण देगा देवा’ असे म्हटले आहे ते उगीच नाही. सूर्य आता बऱ्यापैकी खाली आला होता. आकाशात काळसर पांढऱ्या ढगातून रंगांची सुरेख उधळण होत होती. वातावरण खूपच प्रसन्न व मनमोहक होऊ लागले होते. इतक्यात एक भेळवाला जवळ येऊन भेळ घेण्यासाठी आग्रह करू लागला. वेळ घालवण्यासाठी एक सुकी भेळ मी घेतली. भेळ खाता खाता त्या वातावरणात मी रमून गेलो. भेळ संपत आली अन् माझे लक्ष सहजच त्या भेळीच्या पेपरात गेले. उमद्या अन् मनमोहक शैलीत सुपरस्टार राजेश खन्नाचा मोठा फोटो होता. माझा सर्वात आवडता हिरो. काय त्याची स्टाईल काय त्याची अदा. एखाद्या ठिकाणी चार थिएटर्स असतील तर त्यातल्या तीन थिएटर्समध्ये राजेश खन्नाचेच सिनेमे असायचे असा तो जमाना. हिंदी सिनेमातला पहिला सुपरस्टार. त्याचा फोटो अन् त्याखालीच त्याची मुलाखत छापलेली होती. त्याच्या आवडीनिवडीबद्दल प्रश्न विचारले होते अन् खास राजेश खन्ना स्टाईलमध्ये त्याने त्यांची उत्तरे दिली होती. मुलाखत वाचता वाचता एका प्रश्नाच्या उत्तराने मी अवाक् च झालो आणि परत परत ते उत्तर वाचतच राहिलो. त्यात त्याने म्हटले होते की समुद्रकिनाराऱ्यावर वाळूत बसून भेळ खायला, तसेच कट्टय़ावर बसून चहा प्यायला मला खूप आवडते. पण या जास्तीत जास्त आनंद देणाऱ्या गोष्टी माझ्यापासून दुरावल्या आहेत. आता प्रसिद्धीमुळे जिकडे जावे तिकडे पाठीमागे तोबा गर्दीच गर्दी लागते. सुपरस्टार होऊन मी एक बंदिस्त जीवन जगत आहे. उघडय़ा गाडीतून फिरणे शक्य नाही. कुठे श्रीगणपतीच्या दर्शनाला जायचे तरी पाठीमागे एवढी गर्दी की निवांतपणे श्रीगजाननाचे दर्शनही घेता येत नाही. त्यापेक्षा तुमचे आपले बरे. मनात आले की केव्हाही, कुठेही अन् कितीही वेळ काढू शकता. हे त्याचे उत्तर माझ्या मनात सारखे घोळतच राहिले. सूर्य अस्ताला जायला लागला होता अन् मला क्षणातच साक्षात्कार झाला. मनातले सारे धुके निघून गेले. इतक्या वर्षांत जे मला समजले नव्हते ते त्या क्षणात उमजले. जीवनातल्या खऱ्या सुखाची जाणीव झाली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, नगरसेवक, सिनेमातले सुपरस्टार्स यांची मोठमोठी सुखे आपण पाहतो. पण जे आपल्यापाशी आहे त्याने मी सुखावून गेलो. पंतप्रधान काय किंवा मुख्यमंत्री काय, देशाचे केवढे मोठे मोठे प्रश्न सतत त्यांच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. पंतप्रधान असताना जवाहरलालजी अन् इंदिराजी फक्त तीन ते चारच तास झोप घ्यायचे असे मी ऐकले होते. बरोबरच आहे कारण दुसऱ्या दिवशी संसदेत त्यांना किती तरी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करायची असायची. काश्मीर प्रश्न म्हणा किंवा कुठे तरी जातीय दंगल, नद्यांच्या पाणीवाटपाचे प्रश्न किंवा अन्य काही जागतिक स्तरांवरील समस्या यावर योग्य तो तोडगा अमलात आणण्याची जबाबदारी इतरांना काय कळणार? आपले सामान्य माणसाचे बरे. असले काहीच डोक्याला ताप नाहीत. ताजमहाल पाहत असताना कोणी आपल्याला ‘साहेब, उद्या संसदेत.. विषयावर विधान मांडायचे आहे’ म्हणून कोण सांगणार नाही. ताजमहाल पाहण्यासाठी मनसोक्त पाच-सहा तास घालविले तरी रुपयाचे अवमूल्यन होणार नाही किंवा बजेट कोसळणार नाही. आपण आपल्या मनाचे बादशाह. मुख्यमंत्री नसल्याने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अग्रपूजेचा मान मिळणार नसला तरी पायी चालत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तो प्रसन्न भाव मला त्या दिंडीत शिरून अनुभवता येतो. विठ्ठलाचे खरे रूप त्या गाभाऱ्यातल्या मूर्तीपेक्षा या वारकऱ्यांच्या बरोबर अनुभवण्यातच खरे सुख आहे. आज माझ्या पाठीमागे गर्दीचा ससेमिरा नाही. मला कोणालाही खरी-खोटी आश्वासने द्यायची नाहीत. त्यामुळे माझ्या मनावर कोणतेही दडपण नाही. मनात आले तर मी केव्हाही प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचे, मुंबईच्या श्री महालक्ष्मीचे, शिर्डीच्या श्री साईबाबांचे किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाचे मनसोक्त दर्शन घेऊ शकतो. काश्मीर ते कन्याकुमारी कधीही, केव्हाही जाऊ शकतो. कोणताही सिनेमा किंवा कुठलेही नाटक पाहू शकतो. सुपरस्टार होऊन बंदिस्त गाडीत किंवा बंगल्यात राहण्यापेक्षा निसर्गाने नटलेल्या विविध ठिकाणी मी बिनधास्तपणे जाऊन आनंद उपभोगू शकतो. सर्वसामान्य माणसांवर परमेश्वराचे हे अनंत उपकार असून त्याची जाणीव आपल्याला इतकी वर्षे कशी झाली नाही याचेच मला आश्चर्य वाटायला लागले. सूर्य अस्ताला चालला होता. हळूहळू काळोखाचे साम्राज्य पसरू लागले होते, परंतु माझ्या मनातील किल्मिष, अंधकार नाहीसा होऊ लागला होता. त्या संध्याकाळी सामान्य माणसातील असामान्य सुखाचा साक्षात्कार मला झाला आणि परमेश्वराचे अनंत उपकार स्मरून एका वेगळ्याच आनंदात मी घरी परतण्यास निघालो. गुरुप्रसाद एस. शिरसाट - response.lokprabha@expressindia.com