सोयरीक किंवा लग्न जुळवणे ही प्रत्येक कुटुंबातली खूप रोचक आणि कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते. पूर्वी तर लग्न कसे ठरले, मध्यस्थ कोण, कुणाच्या ओळखीनं हे स्थळ मिळालं, बैठक कधी झाली, लग्नाच्या याद्या झाल्या का? आणि शेवटी आम्हाला हे सगळं अजून कसं काय कळलं नाही? असे अनेक मुद्दे लग्नाबाबत मोठय़ा हौसेनं मोकळ्या वेळात चर्चिले जात असत. लग्न ठरण्याच्या प्रक्रियेतही कालानुक्रमे खूप बदल झालेला आहे. त्याची सहज तुलना केली तर खूप मनोरंजक माहिती समोर येते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात एका लग्न ठरविण्याचा वधुपित्याचा विचार होता. मुलगा माहितीतलाच पण सरकारी नोकरी करणारा होता. सरकारी नोकरीतला मुलगा म्हणजे त्या काळी त्याला खूप डिमांड होते. कारण सरकारी नोकरी म्हणजे हक्काची भाकरी, अशी ठाम समजूत होती व आजही आहे.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?

मुला-मुलीचे वडील एकमेकांना जुजबी ओळखत होते. प्राथमिक चौकशी झाली. मुला-मुलीच्या पत्रिकांची पडताळणी झाली. पत्रिका जुळत होत्या. मुलीच्या वडलांना लग्न ठरविण्याबाबत खूप उत्सुकता होती, कारण या मुलीच्या पाठीवर आणखी एक कन्यारत्न होते. सहज बोलताना मुलाच्या वडलांना त्यांनी सांगितले. आम्ही लग्न करून देऊ व ७०० रुपये हुंडा  (वरदक्षिणा) देऊ. मुलाचे वडील म्हणाले ठीक आहे, आणि पुढे रीतसर बैठक घेण्याचे ठरले.

त्या काळी लग्नाची बैठक म्हणजे एक लांबलचक चर्चेचा सोहळा असे. मुला-मुलीचे आईवडील, जवळचे नातलग, इतर प्रतिष्ठित मंडळी, मध्यस्थ अशी निदान दहा-पंधरा पुरुष मंडळी लग्नाच्या बैठकीत सहभागी होत असत. ही बैठक होण्यापूर्वी मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मोठय़ा मेहुण्यांना (बहिणीच्या नवऱ्याला) आवर्जून बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी ते सहज बोलून गेले, मी ७०० रुपये हुंडा देण्याचं कबूल केलंय. त्यावर ते मेहुणे खवळलेच. ते म्हणाले, ‘असं कसं कबूल करून बसलास. जे काही व्हायचे ते रीतसर बैठकीतच होईल. अन् आता तर तू पोस्टातून निवृत्त झालेला आहेस. कसं परवडेल तुला एवढा मोठ्ठा हुंडा द्यायला.’ (त्या वेळी १ रुपयाला ४ शेर दूध किंवा दीड पायली गहू म्हणजे ८ किलो गहू मिळायचे) ते पुढे म्हणाले, ‘आता तू एक कर बैठकीत तू शांत राहा. मी पुढचं बघतो काय करायचं ते.’ हे मेहुणे म्हणजे गावातले एक प्रतिष्ठित व्यापारी, सावकार, अन देण्याघेण्याच्या व्यवहारातले दर्दी होते.

यथाकाल लग्नाची बैठक भरली. प्राथमिक ओळखीपाळखींची विचारणा झाली. अनेक जुने संदर्भ निघाले, वातावरण जरा सैल झालं. त्यावर मुलाकडचे प्रतिष्ठित गृहस्थ म्हणाले, ‘ठीक आहे. आता आपण मुख्य मुद्दय़ाकडं वळायला हरकत नाही. मुला-मुलीची पत्रिका जुळलीय. पत्रिका जुळतायत, तर आता तुम्ही देण्या-घेण्याचं बोला.’

त्यावर मुलीच्या काकांनी (वडिलांचे थोरले मेहुणे) यांनी सुरुवात केली. ते म्हणाले, ‘असं बघा. माझा मेहुणा आता पोस्टाच्या नोकरीतून रिटायर्ड झालेला आहे. तेव्हा तो काही फार खर्च करू शकणार नाही. आम्ही फक्त मुलगी अन् नारळ देऊ.’ हे ऐकताच मुलाकडची मंडळी हादरलीच. मुलाकडचे पुरुष बसल्या जागेवरच चुळबुळ करू लागले. एकमेकांत कुजबुज सुरू झाली. भांडंभर पाणी प्यायल्यावर मुलाचे वडील म्हणाले, ‘अहो, आम्ही या विषयावर थोडक्यात बोललो होतो अन् वरदक्षिणा म्हणून त्यांनी काही रक्कम देण्याचं कबूल केलेलं आहे.’ असं म्हणून त्यांनी मुलीच्या वडलांकडे प्रस्ताव ठेवला व म्हणाले, ‘आता तुम्हीच बोला. मुलीच्या वडिलांना त्यांच्या मेहुण्याने हातानेच इशारा करून गप्प बसण्याचे सुचवले व ते म्हणाले, ‘अहो, पोस्टातून निवृत्त व्यक्तीकडून हुंडय़ाची कशी काय अपेक्षा ठेवता. मुलगी पसंत पडलेली आहेच, मग देण्या-घेण्याचं काय घेऊन बसलात. मुलीकडचे व्यवस्थित कार्य करून देतील, तेवढे पुरे.’

आणि मग बराच काळ चर्चा रंगली. त्या वेळी ठरलेल्या इतर लग्नांचे वधू-वरांचे संदर्भ घेतले गेले. मध्येच इतर गप्पा सुरू होत्या आणि अखेर लग्न ठरले २५१ रुपये हुंडा देऊन लग्न करून देणे या अटीवर.

पुढे अनेक वर्षे तो नवरा मुलगा म्हणजे आमचे दूरचे मेहुणे, गमतीनं आम्हाला म्हणायचे, तुमच्या काकामुळं आमचा अर्धा हुंडा बुडाला.

x x x

काळ पुढं सरकत राहिला. दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईच्या उपनगरात माझे एक मित्र राहतात. एका जुन्या सोसायटीत बंगल्यांच्या कॉलनीत ते राहतात. मुंबईला गेल्यावर ते मला आवर्जून बोलावतात. ते उच्चविद्याविभूषित दाक्षिणात्य शास्त्रज्ञ असून, एका सरकारी प्रकल्पात खूप मोठय़ा हुद्दय़ावर त्या वेळी कार्यरत होते. त्यांची कन्या एम.बी.बी.एस. होऊन एम.डी.चा अभ्यास करत होती. काळीसावळीच पण ठेंगणी मुलगी अतिशय लाघवी होती. ती नुकतीच कार ड्रायव्हिंग शिकलेली होती. एके दिवशी सकाळी वडलांची कार घेऊन ती प्रॅक्टिससाठी बाहेर पडली. कॉलनीला दोन उलटसुलट चकरा मारल्यावर तिसरी चक्कर मारण्यासाठी तिने गाडी उतारावरून वळणावर नेली, अन कसा काय कोणास ठाऊक एक माणूस गाडीसमोर आला. तो रस्ता ओलांडून समोरच्या बंगल्यात जात होता. या कन्येचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि त्याला गाडीची धडक बसली, तो जोरात खाली पडला. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर फारशी रहदारी नव्हतीच. तिने बाजूला उतारावरच कशीतरी गाडी उभी केली. ती गाडीतून बाहेर येऊन पाहाते तर त्या माणसाला मार लागून डोक्यास जखम झालेली होती. त्याची शुद्ध हरपलेली होती. तिने आजूबाजूला मदतीसाठी पाहिले तर सगळीकडे सुनसान होते.

तिने स्वत:ला सावरले व आपल्या मोबाइलवर दोन-तीन फोन केले. ती शिकत असलेल्या हॉस्पिटलकडून अ‍ॅम्ब्युलन्स मागवली. तेवढय़ात आजूबाजूचे लोक जमा झाले. तो समोरच्या बंगल्यात राहणारा तरुण होता व दुधाची पिशवी घेऊन घरी जात होता. दहा मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स आली. त्यात त्या जखमी माणसाला घातले व त्याच्या नातलगांसमवेत हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील कॅज्युअल्टी डिपार्टमेंटमध्ये झटपट अ‍ॅडमिट करण्याची व्यवस्था करून तिने तपासणाऱ्या डॉक्टरांशी उचित संपर्क साधला. रुग्णाची इमर्जन्सी विभागात व्यवस्था लावणे तिला सहजशक्य झाले, कारण ती स्वत: तेथील डॉक्टर होती.

अपघाताची गंभीर घटना झाली, तरी गोंधळून न जाता पटापट योग्य पावले उचलणाऱ्या त्या एवढय़ाशा मुलीचे इतरांना खूप कौतुक वाटले.

पुढे त्या अपघातग्रस्त रुग्णाचे योग्य निदान झाले. त्यावर उपचार सुरू झाले. त्याच्या डोक्याला व खांद्याला जबर मार लागलेला होता. त्याला पुढे महिनाभर हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते.

अपघातात जखमी झालेला उंचापुरा, गोरागोमटा पंजाबी तरुण हा एक उद्योजक आहे. त्याची मुंबईच्या इतर भागात दोन मोठी रेस्टॉरंट्स आहेत.

या दक्षिणात्य डॉक्टर कन्येला मनातून खूप भीती वाटली. स्वत:ला ती अपराधी समजू लागली व त्यामुळे ती दररोज त्याच्या शुश्रूषेकडे व उपचारांकडे जातीने लक्ष पुरवू लागली. पुढे दीड महिन्यांनी तो बरा होऊन घरी गेला. तरी त्याच्या पुढील उपचार; फिजिओथेरपीकडे ती जातीने लक्ष देत असे. घरी जाऊन त्याची विचारपूस करत असे. या संपर्कामुळे त्या दोघांना एकमेकांबद्दल अनुकंपा, प्रेम, जिव्हाळा निर्माण झाला आणि वर्षभराने तिचे लग्न त्या तरुणाबरोबर संपन्न झाले. दक्षिण भारतातील करुणा स्वामिनाथन् नावाची कन्या सौ. भल्ला या नावाने आपल्या मूळ सासरच्या गावी फिरोजपूरला पंजाबात जाऊन आली. अपघात हे लग्नाचे निमित्त झाले. नियतीचा हा अजब अकल्पित न्याय असावा.

x x x

गेल्या वर्षांतली गोष्ट. मे महिन्यात एका सकाळी मला माझ्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला- हॅलो, अरे गुड न्यूज आहे.

काय? -मी

अरे माझ्या मुलीचं लग्न ठरलं, साखरपुडा महिन्याभरात होईल व लग्न पुढे डिसेंबर महिन्यात करण्याचा विचार आहे. साखरपुडय़ाचा दिवस ठरला की मी फोन करतो. तू अवश्य ये!

अभिनंदन- मी म्हणालो.

एक महिन्याने त्याचा पुन्हा फोन आला, त्याने मला साखरपुडय़ाचे निमंत्रण दिले. दिवस, वेळ व हॉलचा पत्ता सांगितला. मला अवश्य येण्याचा आग्रह केला आणि तो म्हणाला, यात फक्त एक बदल आहे.

कसला बदल- मी

यांत बदल म्हटला तर मोठा आहे, पण इतरांच्या दृष्टीने अगदी किरकोळ बदल आहे.

मी म्हणालो- माझ्या काही लक्षात येत नाही रे! तू काय म्हणतो आहेस ते?

तो म्हणाला बदल हाच की- नवरा मुलगाच बदललाय. पूर्वी मी म्हणालो होतो त्यापेक्षा वेगळ्याच मुलाबरोबर साखरपुडा होणार आहे. बाकी तपशील नंतर बोलू.

पुढे भेटल्यावर त्याने सांगितलं. इतकंच नव्हे तर नवऱ्या मुलीनंही सांगितलं. तिच्या कंपनीतील एक मुलगा तिला जास्त योग्य वाटला. तो पूर्वी तिच्याच कॉलेजात होता. त्यामुळे तिचा परिचय होताच. अन् त्या मुलीने आपली निवड बदलली; अगदी वेळेत.

सज्ञान, उच्चविद्याविभूषित कन्येची स्वत:चीच निवड असल्यामुळे सगळ्यांनी मान्यता दिली. या लग्नात मुलीची निवड हाच सर्वात महत्त्वाचा, ऐनवेळी डिसायडिंग फॅक्टर ठरला. आणि भावी काळात काय घडणार, याची चुणूक या घटनेत दिसून येते.
मनोहर बोरगांवकर – response.lokprabha@expressindia.com