आजच्या मुलांना खरोखरच बालपण अनुभवता येतंय का? ही मुलं पुढे विमानाने फिरतील. हजारो रुपयांचे बूट घालतील. पण लाल मातीतून अनवाणी पायांनी धावत घरी येण्याची मजा त्यांना मिळेल का?

आज प्रत्येकाच्या हातात आणि कानाशी भ्रमणभाष (मोबाइल फोन) दिसतो. जणू प्राणवायूला पर्याय नसतो तसा. कर्णबधिर वाटावेत असे काही जण कानात हेडफोन कोंबून रस्त्यावरून चालतानाही बोलत असतात तेव्हा तर ते ‘भ्रमिष्ट’ दिसतात. मोटारसायकलवरून तीरकमान करून जाणारा दिसला की त्याच्याजवळून जाऊच नये. मोबाइलवर बोलता बोलता केव्हा आपल्या वाहनाशी सलगी करायला येईल त्याचा नेम नाही. जेवढे नवनवीन मोबाइल संच, तेवढय़ाच मजेशीर त्यांच्यावर येणारी फोनची ‘संगीतधून (िरगटोन्स)..

आमच्या गप्पांच्या टोळक्यामध्ये कोणाच्या बायकोचा फोन आला हे ताबडतोब कळतं आणि मग त्याला ‘तकलिया’ म्हणून ‘एकांत’ दिला जातो.

डॉक्टर पोटफोडेच्या फोनवर धून वाजते- ‘सख्या रे, घायाळ मी हरणी..’

प्लिम्बग कॉन्ट्रॅक्टर नळलावेच्या बायकोचा फोन आला की ऐकू येते ती धून म्हणजे ‘..पाणी थेंब थेंब गळं..’

पंकज डोळे फोटोग्राफर आहे. त्याच्या मोबाइलवर तर ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी..’ हे गाणं वाजतं.

मोरू मानकापेचं ‘चिकनशॉप’ आहे. त्याच्या फोनवर ‘कोंबडी पळाली तंगडी धरून..’ याशिवाय काय असणार!

मधू मोरे विमा एजंट आहे. त्याच्या नकळत मन्या मानेनं एकदा मधूच्या मोबाइलवर कायमचा िरगटोन सेट केला ‘.मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है..’

एकदा आम्हा मित्रांचं सहलीला जायचं घाटत होतं. बेत ठरत असतानाच शेखर धडफळेचा मोबाइल गाऊ लागला ‘पंख होती तो उडम् आती रे..’ म्हणजे वहिनींचा फोन होता तो. त्यानं उत्साहानं आमचा बेत सांगितला असावा, कारण त्याचा उल्हसित चेहरा खर्रकन उतरल्याचं लगेचच दिसलं अन् आमच्या लक्षात आलं की त्याचे पंख छाटले गेलेत. त्यानंही आडपडदा न ठेवता वहिनींचे बोल सांगितले, ‘माझ्याबरोबर चला म्हटलं की आढेवेढे अन् त्या तुमच्या उडाणटप्पूंबरोबर..!’

एकदा आमच्या गप्पांचा अड्डा हॉटेलमध्ये जमलेला असताना संभाजी औरंगेच्या फोनवर संजय खानच्या ‘टिपू सुलतान’ दूरदर्शन मालिकेच्या शीर्षकगीताची धून वाजू लागली. मोबाइल कनवटीला वाजत ठेवून तो वैतागून म्हणाला, ‘‘माझा बॉस काही मला स्वस्थ बसू देणार नाही.’’

आम्ही ती टय़ून एन्जॉय केली. थोडय़ा वेळानं एखादा हमरस्त्यावरचा मालट्रक लांबून भोंगा वाजवत जवळ येऊन पुन्हा लांब जावा तसा आवाज आला. आम्ही चपापून हॉटेलकडेच्या गजबजलेल्या रस्त्यावर पाहू लागलो. तेवढय़ात संभाजी औरंगेनं कनवटीचा मोबाइल काढला आणि त्यावरचा संदेश वाचू लागला. हं. म्हणजे त्या गाडीनं ‘एसएमएस’ आणला होता तर.!

‘बस.. या बसला मी.. म्हणून समजा. फोन घेतला नाही तर मेसेज पाठवून आताच्या आता बोलावतो आहे..’ तरीही तो चडफडत निघून गेला. बाकीच्यांचा हॉटेलच्या बिलासाठी त्याला कापायचा बेत ढासळून पडला. किंबहुना, त्यानं आपलं बिल फाडलं जाऊ नये म्हणून बसचाच संदेश आहे असं सांगून तिथून काढता पाय घेतला असाही अर्थ काढला गेला.

‘वळू’ सिनेमाची टायटल धून वाजली की सर्जा बलपांडे कपाळावर आठय़ा घालत मोबाइल कानाला लावतो. ‘हा माझा दिवटा सिनेमाला नाहीतर मॉलला चालला असणार. या वळूची अभ्यासाच्या नावानं बोंबच आहे.’ हे त्याचं वाक्य एव्हांना पाठ झालं आहे आम्हाला. ‘कुहु कुहुऽऽऽ कुहु कु.कु. हु ऽऽऽऽ.’ आवाज आला की राजू कोकीळ फोन घेऊन उडत उडत आमच्यापासून लांब जातो. म्हणजे त्याच्या कोकिळेची तिच्याच झाडावरून आलेली साद आहे हे लगेच कळतं.

सदा नवरंगेच्या मोबाइलवर तर सारखे िरगटोन बदलत असत. त्यावरून आम्ही ओळखत असू की त्याचं प्रेमपात्र बदललं आहे. कधी ‘नवरंग’मधलं ‘जा रे हट नटखट..’ तर कधी ‘आजा रे, परदेसी.. कबसे खडी..’, तर कधी चक्क ‘विकल मन आज..’ नाहीतर ‘येतील कधी यदुवर..’ अशी नाटय़गीतंसुद्धा. ज्या दिवशी त्याचं लग्न ठरल्याचं कळलं तेव्हा त्याच्या मोबाइलच्या िरगटोनचं गाणं होतं.. ‘.अखेरचा हा तुला दंडवत..’ हा दंडवत होता त्याच्या बॅचलर लाइफला.

एका आय.टी. कंपनीत गलेलठ्ठ पगारावर नोकरी करणारा गण्या गोंधळे एका हेल्थ क्लबला मुलाला पोहणं शिकायला नेतो. एकदा असाच तो गेला असताना पोहण्याच्या तलावाकाठी ठेवलेल्या बाकांवर मुलांना घेऊन आलेले बापलोक बसलेले. त्यांची लगबग चाललेली. आपापल्या पाल्याचे कपडे आणि जामानिमा सांभाळत त्याला प्रोत्साहन देण्याची. त्यासाठी हातातल्या गोष्टी बाकावर बसल्या ठिकाणी सोडून मुलाला चिअिरग देत तलावाच्या या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत जाणे, कुणी पोहून आलेल्या मुलाला शॉवरखाली घेऊन जाणे असेही चालू होते. या साऱ्या उत्साही वातावरणात एका बाकडय़ावरचा मोबाइल फोन वाजला.

कपडय़ांखाली लपलेला तो फोन गण्यानं तत्परतेने उचलून कानाला लावला. पलीकडून बायकी आवाज.

पलीकडून सौ. : कोण? (स्वत: कोण न सांगता, ‘हॅलो’ न म्हणता ‘सुरू’ होण्याची फॅशनच झालीय.)

इकडून गण्या : मी बोलतोय.

सौ. : हाय! तू टँकमध्ये आहेस ना?

गण्या : अंहं! टँकच्या कडेला..

सौ. : म्हणजे हेल्थ क्लबमध्ये. असं म्हणायचं होतं मला. ओ.के. मी किनई आत्ता एका मॉलमध्ये आले आहे मत्रिणींबरोबर. इतक्या मस्त मस्त वस्तू आहेत इथे, सगळं घ्यावंसं वाटतंय.

गण्या : मग तो मॉल आज केव्हा बंद होणार आहे?.. म्हणजे.. तुमचं ‘शॉिपग’ संपल्यावर..?

सौ. : (न कळून) मला नं एक सुंदर ड्रेस पसंत पडलाय. घेऊ का?

गण्या : केवढय़ाला आहे?

सौ. : फक्त दहा हजाराला.

गण्या : घे नं आवडलाय तर.

सौ. : ..थँक्यू.. अन् किनई, इथे इतका छान सोफासेट आहे, आहे पन्नास हजारांचा, पण आजच्यापुरता चाळीस हजाराला मिळतोय. तू बघतच बसशील. सांग ना देऊ का ऑर्डर.? आपला आताचा सोफासेट एकदम जुना दिसतो, मी तो काढूनच टाकणार आहे.

गण्या : तशा बऱ्याच गोष्टी जुन्या झाल्यात.. पण तुला आवडला असेल तर घे तो नवीन.

सौ. : कित्ती चांगला आहेस रे! आय.टी. कंपनीत आहे म्हटलं माझा नवरा. आपल्याला पशाची काही अडचण नाही.. खरं ना?

गण्या : त्याची अडचण होते असं वाटूनच तर आपण तो असा उधळून दूर करत असतो ना!

सौ. : आता एक गंमत सांगू?

गण्या : आत्तापर्यंतच्या साऱ्या गमतीजमतीच तर होत्या ना..?

सौ. : (दुर्लक्ष करून) मी एक हिऱ्यांचा हार पण बघून ठेवलाय. मला तो इतका शोभून दिसेल ना!

गण्या : किंमत बोला. ती एकदा मोजली की डोळे विस्फारून सगळ्या गोष्टी शोभिवंतच दिसतात.

सौ. : फक्त पंच्याऐंशी हजार रुपये. मला त्या शेजारच्या शर्मिलाचा तोरा उतरवायचाय.

गण्या : त्यासाठी आपला मोहरा कामी आणताय त्याचं काय?

सौ. : मी कधीतरी हट्ट केलाय का कुठल्या गोष्टीसाठी? पण हा लाखाचा हार सवलतीत मिळतोय म्हणून.

गण्या : ठीक आहे.. पण पंच्याहत्तर हजाराला सौदा तुटतोय का बघा.

सौ. : सो स्वीट ऑफ यू. आय लव्ह यू! बाय बाय.

गण्या : बाय.

फोन बंद करून इकडे तिकडे पाहतो तर सारे बापलोक आपापल्या मुलाचं पोहणं पाहण्याचं थांबवून आपल्याकडेच टवकारून बघत आहेत हे गण्याच्या एव्हाना लक्षात आलं होतं. आता त्याचं लक्ष मोबाइल संचाकडं गेलं आणि लगेच त्यानं तो मोबाइल उंच धरून मोठय़ांदा प्रश्न केला,

‘‘अरे, कुणाला माहीत आहे का, हा मोबाइल कुणाचा आहे ते?’’

कारण योगायोगानं या मोबाइलचा रिंगटोन त्याच्या घरीच राहिलेल्या मोबाइलसारखाच होता हे त्याला फोन बंद करताना मोबाइल नीट बघितल्यावर उमगलं होतं.

गण्याचा हा किस्सा ऐकून ही एक बतावणी असल्याचं मत सगळ्यांनी व्यक्त केलं आणि आपापला मोबाइल स्वत:जवळ आहे ना याची लगोलग चाचपणीही केली.