मुलीला क्लासला सोडायला चालले होते, तर दारातच मोघे काकू पारिजातकाचं झाड हलवून हलवून फुलं पाडत होत्या. सहजच्या संवादावरून कळलं, त्या लक्ष घालत होत्या म्हणे पारिजातकाच्या फुलांचा! आता हे कुणी करत असेल असं वाटलंच नव्हतं मला. लेकीनं विचारलं ‘आई, लक्ष घालायचा म्हणजे काय?’ तिला सांगता सांगता तो फुलांचा सुगंध मला कितीतरी वर्षे मागे घेऊन गेला.

माझी आई देवभक्त होती. सगळी गृहकृत्ये पार पाडता पाडता ती शक्य तेवढे म्हणण्यापेक्षा धार्मिक पुस्तकांतून माहिती मिळेल तेवढी सगळी व्रतवैकल्ये आनंदानं, आवडीनं करायची. त्यातलाच एक भाग म्हणजे लक्ष घालणे. म्हणजे काय, तर त्या त्या सीझनमध्ये मिळणारी फुलं गोळा करायची, ती मोजून घ्यायची. आंघोळ करून सोवळं नेसून देवपूजा करून ती फुलं देवाच्या पायी वाहायची. प्रत्येक फूल वाहताना देवाचे नाव घ्यायचे. अशा प्रकारे रोज जेवढी जमतील तेवढी फुलं गोळा करून ती देवाला वाहायची. एकूण एक लाख फुलं वाहून पूर्ण झाली की तो लक्ष पूर्ण झाला. त्या काळी प्रत्येक घराण्याचा पुरोहित म्हणून एक ब्राह्मण घराणं असायचं. आमचे पुरोहित होते गोगटे गुरुजी. शक्यतो त्या घरातीलच ब्राह्मण बोलवायचा. मग यथासांग ब्राह्मणभोजन, पूजन करून ज्या फुलांचा लक्ष घातला असेल त्याची सोन्याची प्रतिमा म्हणजे पारिजातकाच्या फुलांचा लक्ष असेल तर सोन्याचे पारिजातकाचे फूल ब्राह्मणाला दान द्यायचे. असा हा व्रतप्रकार.

आमच्या ब्राह्मणआळीत दहा घरं होती, पण फक्त माझी आईच (इतर बायकांच्या मते) असे सगळे उपद्व्याप करायची. ती आम्हा सगळ्या मुलामुलींना (शेजारच्यासुद्धा) एकत्र करायची आणि ती कोणत्या फुलांचा लक्ष घालणार आहे तो सांगायची. मग आमच्या सगळ्यांच्या चच्रेतून कुठे कुठे ती फुलं उपलब्ध होणार याचा विचार व्हायचा, कुठे कोणी जायचं हे ठरायचं आणि मग मोहिमेवर आम्ही सगळे रुजू. एकदा तर तिनं कमळांचा लक्ष घालायचं ठरवलं. मग आम्हाला आनंदच. कारण काय, तर दररोज पाण्यात डुंबायला मिळणार. आमच्या घराच्या खालच्या शेतवाडीत पावसाळ्यानंतर पाणी साठायचं आणि त्यात सुंदर कमळाची फुलं उमलायची. आम्ही सगळी मुलं-मुली एकत्र पाण्यात उतरून कमळं काढायचो. तसंच ओलेते घरी यायचो. बागेतूनच वाट होती. जसे उडय़ा टाकून खाली जायचो, तसेच पटापट चढून वर यायचो. घरी येईस्तोवर आई काहीतरी छानसा नाश्ता म्हणजे गुळाचे (कोळाचे) पोहे, घावन, बिडाच्या तव्यावरची आंबोळी करून ठेवायची. मी तर त्याचसाठी दादा-भाईपाठोपाठ जायचे. कमळं किती काढायची कोण जाणे. मग आम्ही अंघोळी करून फुलं मोजायचो. तोवर आईचा स्वयंपाक आवरायचा. मग ती देवपूजेला बसायची. आम्हा मुलांना ती म्हणायची, यातलं निम्मं पुण्य तुम्हालाच आहे रे बाळांनो. तेव्हा तर मला भारी वाटायचं. पुण्य म्हणजे नेमकं काय मिळणार हे कळत नव्हतं. पण काहीतरी भारी आहे असा विश्वास वाटायचा.

परवा त्याच शेतवाडीत वाकून पाहिलं, आता म्हणे तिथे कमळं उगवतच नाहीत. लक्ष घालायला कोण नाही म्हणून कमळांनी संपच केला की काय कोण जाणे! मला मात्र तीव्रतेने आई आठवली. गोरीपान, लाल कुंकू, सोवळं नेसलेली, नथ घातलेली, देवपूजा करतानाची सात्त्विक स्त्री.

असे अनेक लक्ष तिनं घातले. बकुळीच्या फुलांचा, दूर्वाचा, सुरंगीचा.. मला एवढेच आठवतात, पण तिनं अनेक घातले. संसारातली दु:खं चार बायकांमध्ये चघळण्यापेक्षा ती विसरण्यासाठी तिनं हा व्यासंग लावून घेतला होता हे आता कळतंय मला. ते काहीही असलं तरी तिच्या प्रत्येक व्रतवैकल्यात आम्हा मुलांचा सहभाग असायचा. आम्हीही तेव्हा शाळेत जात होतो. अभ्यास करत होतो. पहिला नंबरही पटकावत होतो, पण त्याबरोबर या सगळ्याचा आनंद घेत आम्ही मोठे झालो. आताचं हे घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर पळणारं आपलं जीवन, घर, ऑफीस, मुलं, त्यांचे क्लास यांमध्ये कधीतरी विसावा म्हणून आठवायला आमच्याकडे त्या आठवणी तरी आहेत.

आताच्या मुलांना दिवसभर क्लास आणि अभ्यास या व्यस्त शेडय़ुलमध्ये बिझी पाहिलं की खरंतर कीव येते त्यांची. आमच्यापेक्षा मुलं जास्त हजरजबाबी आहेत. ज्ञानाची कवाडं त्यांच्यासाठी विविध प्रकारे खुली आहेत, करियरभिमुख शिक्षण ती घेऊ शकतात. त्याचमुळे की काय, त्यांना समजही जरा लवकरच येतेय. असं जरी असलं तरी खरोखरच त्यांना बालपण अनुभवता येतंय का? आमची मुलं पुढे विमानाने फिरतील. हजारो रुपयांचे बूट घालतील. पण लाल मातीतून अनवाणी पायांनी धावत घरी येण्याची मजा त्यांना मिळेल का? माहीत नाही.