‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आली संक्रांत. तिळगूळ म्हणजे तीळ आणि गूळ यांचे मिश्रण. थंडीच्या दिवसांत स्निग्धपणासाठी तीळ आणि उष्णतेसाठी गूळ खायची पूर्वापार परंपरा; पण याचे प्रकार तर किती? 

तिळगुळाची वडी : पश्चिम महाराष्ट्रात वरच्या पट्टय़ात तिळगुळाची वडी करायची पद्धत आहे.
तीळ स्वच्छ निवडून वाळवून जरासे गरम करून घ्यायचे. मग थोडे कुटून घ्यायचे. शेंगदाणे भाजून कुटून घ्यायचे.
थोडे वाळलेले खोबरे. वेलदोडा, जायफळ पूड करून घ्यावी. ताटाला किंवा ट्रेला तूप लावून घ्यावे. वडय़ा पाडण्यासाठी सुरीलाही तूप लावून घ्यावे. तीळ, शेंगदाणे एक एक वाटी, गूळ दीड वाटी घ्यावा.
गुळाचा घट्ट पाक करून त्यात तीळ, शेंगदाण्याचे कूट घालून ढवळावे आणि घट्ट होण्यापूर्वी ताटात पसरावे. lp39लगेच वर खोबरे पसरावे आणि वडय़ा पाडाव्या.
काहींना या वडय़ा खुसखुशीत हव्या असतात. त्यासाठी पाक थोडासा कच्चा करून घ्यावा; पण फारच कच्चा करू नये. वडी पडत नाही.
काहींना वडीऐवजी छोटे लाडू आवडतात. त्यासाठी इतर साहित्य तसेच शेंगदाण्याच्या कुटाऐवजी थोडेसे दुखवून अर्धबोबडे शेंगदाणे घ्यावे.
काही जण रेडीमेड रेवडय़ा किंवा तिळगूळ म्हणजे नुसते साखरेचे गोळेच जणू देतात. काही जण तर कच्चाच गूळ आणि तीळ एकत्र करून कुटतात आणि देतात. ज्याला जसे जमेल तसे.
पण या सगळ्यापेक्षा वेगळा प्रकार म्हणजे आमची आई करायची तो तिळगूळ. खूप कष्टाचा, पण तेवढाच रुचकर.
पूर्वी दिवाळीपासून थंडी सुरू व्हायची. अगदी अभ्यंगस्नानाला उठायचेही जिवावर यायचे. नंतर जवळजवळ फेब्रुवारीपर्यंत थंडी असायची. तर तेव्हा दिवाळी झाली की, थोडय़ाच दिवसांत तिळगूळ करायला सुरुवात करायची.
स्वच्छ पांढरे तीळ घ्यायचे. साखरेचा पाक करायचा, पाक होत आला की, त्यात थोडे दूध घालायचे, की त्या पाकातील साखरेत असलेली मळी निघते आणि अगदी स्वच्छ पाक तयार होतो.
त्या काळी घराच्या मागच्या ओसरीत न्हाणीची चूल असायची. चुलीवर आंघोळीच्या पाण्याचा हंडा असायचा. आई पहाटे उठून या चुलीत विस्तव घालायची. निखारे तयार होत आले की, तीन दगड ठेवून तिळगुळांसाठी तात्पुरती तयार केलेली चूल असायची, त्यात निखारे घालायचे. तिळगूळ करायला सुरुवात करायची.
या नवीन चुलीत निखारे घालून वर परात ठेवायची. त्यात तीळ घालायचे आणि थोडासा पाक घालायचा आणि ढवळत राहायचे; चमच्याने नव्हे, हाताने. चटके बसले तरी तसेच ते तीळ इकडून तिकडे करत बसायचे. पाक खालच्या निखाऱ्यांच्या उष्णतेने वाळायचा. मग पुन्हा घालायचा; पण अगदी थोडा थोडा म्हणजे जेमतेम तिळांना लागेल एवढाच. जास्त घातला तर परातीला लागतो. त्यामुळे परात खरबरीत होऊन येणारा काटा मोडतो. तिळाबरोबर भोपळय़ाच्या बिया सोलून घ्यायच्या, त्याही घालायच्या. आकार छान दिसतो तिळगूळ तयार झाल्यावर. असे करत करत पाक तिळांना लावत लावत त्यावर छान काटा येईर्प्यत करायचे. वाटीभर पाक संपायला चांगले दोन-दोन तास लागत. बाहेर थंडी एवढी असायची की, आम्हाला अंथरूण सोडवत नसे. थंडीत काटा चांगला येतो म्हणून आई मात्र ही सगळी उसाभर पहाटे करायची, तेही आंघोळ करून मागच्या पडवीत बसून. सोवळे असायचे ना! अर्धी वाटी तिळाचे परातभर तिळगूळ तयार व्हायचे आणि तेही मस्त काटेरी, खमंग वा! अशी चव असायची त्याला. मग पांढरे शुभ्र तिळगूळ, त्यातले थोडे घेऊन थोडय़ा पाकात रंग घालून तो पाक लावायचा आणि ते केशरी रंगाचे तिळगूळ त्यात मिसळायचे. मग मस्त पांढरे आणि केशरी रंगाचे काटेरी तिळगूळ तयार. महिनाभर एवढे कष्ट घ्यावे तेव्हा पितळीचा डबाभर तिळगूळ तयार व्हायचे. आमच्या घरच्या संक्रांतीच्या हळदीकुंकवाला सगळ्या बायका आवर्जून यायच्या हे काटेरी तिळगूळ खायला. आईनंतर मी तरी असे तिळगूळ पुन्हा नाही खाल्ले. आईबरोबरच अशा अनेक दुर्मीळ गोष्टींना आम्ही पारखे झालो.
बट शो मस्ट गो ऑन! तिळगूळ घ्या, गोड बोला.
मेघना फडके