कोकणातल्या तरुणाने उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई-ठाण्याकडे जायचे हे ठरून गेलेले होते. आजही जवळपास तीच अवस्था आहे.

गरीब घरातला वडिलांचे छत्र गमावलेला जितेश (खरे नाव वेगळे) बारावी होताच माझ्याकडून थोडे उसने पैसे घेऊन मुंबईकडे गेला. बहीण आसरा देईल अशी त्याला खात्री होती. ती तसे म्हणालीही होती. प्रत्यक्षात वेगळे घडले. बहिणीच्या नवऱ्याने कामावरून आल्याआल्या भांडण काढले. ‘तुला कुणी बोलावले आहे? इथे आमची एकच खोली आहे. त्यात तुझे कसे जमेल? बाहेर गॅलरीत झोपलास तर त्या पोरांची संगत तुला नडेल. तू आल्या पावली परत जा. जितू घाबरला. रात्रीची वेळ. बहिणीच्या नवऱ्याने त्याला घराबाहेर काढले. अक्षरश: ढकलून दिले. मी जितेशला दिलेले पैसे संपत आले होते. कोकणात येण्यासाठी त्याच्याकडे पुरोशी रक्कम नव्हती. वडापाव खाल्ल्यावर तो रात्रभर ‘गरबा’ बघत बसला. दुसरा दिवसही असाच कुणी उसने पैसे देतो का ते बघण्यात गेला, पण अनोळखी मुलाला कोण कशासाठी पैसे देणार? पुन्हा रात्र झाली. थंडी वाजू लागली. त्यात उपास घडलेला. डोळ्यांत अश्रू आले. त्या मजबूर, रडवेल्या अवस्थेत जितूला मला फोन करायची बुद्धी झाली. तेव्हा मोबाइलही नव्हते. रात्री अकराच्या सुमारास माझा फोन वाजला. ‘सर, मी आत्महत्या करायला जातोय.. मला बहिणीच्या नवऱ्याने आसरा दिला नाही. मला जगायचे नाही. आईने सांगितले आहे, गावी परत यायचे नाही. मी तुला कसे पोसू? मुंबईतच काय करायचे ते कर.. मी आत्महत्या करतोय.. जितेशला मी अशा पद्धतीने गोड भाषेत समजावले, धीर दिला की, त्याच्या जळत्या काळजावर फुंकर पडली! मी एक सामान्य माणूस आहे, पण मूळचा मुंबईकर असल्याने शहरात ओळखी आहेत. मी त्याला आमच्या ओळखीच्या एका मुंबईकराला भेटायला सांगितले व त्या मुंबईवाल्याला फोन करून जितूला परतीच्या तिकिटाचे पैसे द्यायला कळकळीची विनंती केली. ‘जितेशने पैसे परत केले नाहीत, तर मी तुम्हाला मनीऑर्डर करीन, पण पोराला वाचवा,’ असे सांगितले. त्यांनी ऐकले बुवा! तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीही तिकिटाचे पुरेसे पैसे जितूकडे शिल्लक नव्हते. त्यानं अंधेरीपर्यंतचेच रेल्वे तिकीट काढले व टी.सी.ने पकडले. सगळी कर्मकहाणी सांगत जितेशने त्याचे घडय़ाळ टी.सी.कडे ठेवले व आमच्या माणसाने पैसे दिल्यावर सोडवूनही घेतले.
कोकण रेल्वेतून परतीचा प्रवास करताना जितूच्या पोटात कावळे ओरडत होते. एक फार दारू प्यायलेला प्रवासी बेशुद्ध पडल्यागत झोपी गेला होता. त्याचा डबा उघडून जित्याने त्याची भाकरी भाजी फस्त करून टाकली आणि खेड स्टेशनला पटकन उतरून गेला आणि दापोलीला आधी माझ्याकडे आला!
आता ही घटना आठवताना वाटते, माझा फोन ‘त्या’ रात्री लागलाच नसता तर? मला माणुसकी सुचली नसती किंवा मला त्या घटनेची गंभीरता लक्षात आली नसती तर? मी जितेशला सावरले, मरणाच्या विचारापासून मागे खेचले, दिलासा दिला. ‘मै हू ना’ म्हटले, त्याला तुम्ही ‘समुपदेशन’ नका म्हणू, पण लाख मोलाचा जीव तर वाचला! मी स्वर्ग, पुण्यकर्म असले काही मानत नाही. माणसाने माणसाची हाक ऐकली पाहिजे. ती माणुसकी मोलाची आहे. एवढे मात्र मानतो. जितून मला दिलेली मदतीची हाक तर कदाचित ‘शेवटची’ ठरली असती. आता जितूला सेटल होताना मी इथेच पाहतो तेव्हा बरे वाटते! खूप बरे वाटले!
माधव गवाणकर