11-lp-mahabharatभारतीय मनोविश्वाचा अविभाज्य भाग असलेल्या महाभारताचा नेमका काळ काय, याविषयी मतमतांतरे आहेत. पण आता हा काळ नेमकेपणाने सांगणारे एक महत्त्वाचे संशोधन आकार घेते आहे.

आपला पारंपरिक इतिहास अतिप्राचीन काळापर्यंत मागे जातो. हा इतिहास वैदिक वाङ्मय, पुराणे, महाभारत, संस्कृत वाङ्मय यात विखुरलेला आहे. तो शोधून काढावा लागतो. पुराणांत वंशानुचरित असा एक भाग असतो, त्यात राजांच्या वंशावळी आणि त्यांनी किती वष्रे राज्य केले हे दिलेले असते. मात्र त्यातील एक मोठा दोष म्हणजे नेमक्या कोणत्या वर्षांत कोणी राज्य केले, हे दिलेले नाही. परिणामी त्या इतिहासाकडे सर्वाचेच दुर्लक्ष झाले. ब्रिटिशांनी तर या सर्व इतिहासाकडे दंतकथा, भाकडगोष्टी, कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षच केले. परंतु पार्जीटर नावाच्या ब्रिटिश संशोधकाने पुराणांचा अत्यंत सखोल असा अभ्यास केला आणि असे दाखवून दिले की हे सर्वच खोटे नाही. पुराणांचा सखोल अभ्यास केला तर यातला इतिहास नक्कीच आपल्याला जाणून घेता येईल.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Did Marathas renamed Ramgarh as Aligarh
मराठ्यांनी रामगढचे अलिगढ असे नामांतर केले? इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णींनी मांडलं सत्य
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?

पुराणांत असे लिहिले आहे की आपला इतिहास सुरू होतो तो मनु वैवस्वत याच्यापासून. मात्र मनु हा कधी होऊन गेला, याबद्दल कोणतीही निश्चित माहिती आपल्याकडे नाही. निश्चित कालखंडाचा उल्लेख नसणे हा पुराणांचा एक मोठा दोष आहे. साधारणपणे प्राचीन कालखंड ठरवण्यासाठी महाभारत युद्ध ही मुख्य खुंटी मानली जाते. त्यावरून असे सांगतात की, महाभारत युद्धापूर्वी ९५ पिढय़ा आधी मनु होऊन गेला, महाभारत युद्धानंतर २४ पिढय़ांनी उदयन राजाचे राज्य होते. मात्र महाभारत युद्ध कधी झाले हे काही कोणी सांगत नाही.

महाभारत युद्धाचा काळ ठरवण्याचे प्रयत्न अनेक इतिहासकारांनी केले आहेत. पार्जीटरने इसवी सन पूर्व ९५० असा महाभारताचा काळ सांगितला. काही इतिहासकारांनी महाभारत युद्धकाळात असलेल्या ग्रहांच्या स्थितीवरून काळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचा प्रत्येकाचा काळ वेगवेगळा आहे. मात्र खगोलशास्त्र हे गणितासारखे पक्के शास्त्र असेल तर त्यावरून काढल्या जाणाऱ्या काळात फरक का यावा, हा एक मोठा प्रश्न आहे.

पुराणात काळ काढताना अनेक वेळा गोंधळ होतो. पुराणात असे सांगितले आहे की, कलियुगानंतर मनुचे राज्य सुरू झाले. मात्र कलियुग नेमके कधी सुरू झाले, हे निश्चित कळत नाही. पंचांगांचा आधार घेतला तर इसवी सन पूर्व १८ एप्रिल ३१०२ या दिवशी कलियुग सुरू झाले. काही वेळा असे सांगतात की, महाभारत युद्धानंतर कलियुग सुरू झाले. मात्र असा गोंधळ होणारच, त्याला आता इलाज नाही.

कलियुग होते म्हणजे नेमके काय, तर त्याबद्दलची परंपरा आपल्याकडे फार मोठी आहे. सातव्या शतकातील पुलकेशी दुसरा याच्या शिलालेखात असे लिहिले आहे ‘हा शिलालेख कलियुगानंतरच्या अमुक वर्षी लिहिला गेला आहे.’ त्या शिलालेखावरून कलियुगाचे नेमके साल हे इसवी सन पूर्व ३१०२ असे येते. कलियुगात मनु झाला असे मानले तर इसवी सन ३१०२ या काळात केव्हातरी मनुचे राज्य सुरू झाले असणार. आपल्याकडे अशी समजूत आहे की, महाभारत युद्ध हे फार प्राचीन काळी म्हणजे पाच हजार किंवा दहा हजार वर्षांपूर्वी झाले आहे. मात्र इसवी सन पूर्व ९५० अथवा १०५० हा फार प्राचीन कालखंड नाही. त्याचा काळ त्याहूनही प्राचीन होता, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्याला कोणतेही प्रमाण नाही.

12-lp-mahabharatहा सर्व प्रश्न सुटणार कसा याबाबत पुरातत्त्ववेत्त्यांत चर्चा सुरू झाली. मी जेव्हा याबाबत अभ्यास करत होते तेव्हा असा विचार केला की पन्नास वर्षांपूर्वीची कादंबरी कोणाला वाचायला दिली तर ती जुन्या काळातील आहे हे लगेच समजेल. कारण त्यात मोबाइल, स्कूटर असे कोणतेच उल्लेख सापडणार नाहीत. तीच आजच्या काळातील कादंबरी स्कूटर आणि मोबाइलच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. अशा गोष्टींना ‘मार्कर्स’ असे म्हणता येते. म्हणजे त्यांचा उपयोग काळ ठरवण्यासाठी होत असतो. अशा काही गोष्टी महाभारतात सापडतात का, हा विचार करून मी त्याच्या मागे लागलो.

अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर मला वैदिक काळातील दोन गोष्टी सापडल्या. एक म्हणजे अगदी प्राचीन काळी आपल्याकडे घोडा माहिती नव्हता, मात्र उत्खननात तसा पुरावा आपल्याला मिळतो. सिंधू संस्कृतीच्या लोकांना घोडा माहिती नव्हता. यावरून असे सांगता येते की ऋग्वेद हा, घोडा आपल्याकडे आल्यानंतरचाच असावा. कारण ऋग्वेदात अश्वमेध वगरे यज्ञाचा उल्लेख आहे. घोडा हा आर्याचा अत्यंत लाडका प्राणी. दुसरा भाग म्हणजे ऋग्वेदात लोखंडाचा उल्लेख नाही. हे संस्कृततज्ज्ञांनी दाखवून दिले आहे. मग आपल्याकडे लोखंड केव्हा आले याचा अगदी अलीकडचा पुरावा म्हणजे इसवी सन पूर्व १५०० च्या सुमारास भारतात लोखंड सापडते. अलाहाबाद, बिहार या भागात तशा खाणीही सापडल्या आहेत. त्यावरून हा काळ काढता येतो. म्हणजे ऋग्वेद हा इसवी सन पूर्व १५००च्या आधीचा आहे, हे सांगता येते. घोडा आपल्याकडे कधी आला, याचे उत्तर इसवी सन पूर्व २००० असे सांगता येते, कारण त्यापूर्वी त्याचा उल्लेख कुठेही सापडत नाही. त्यावरून इसवी सन पूर्व २००० ते १५०० याच्या मधला काळ साधारणपणे ऋग्वेदाचा सांगता येईल.

महाभारताच्या बाबतीत असे करता येत नाही. कारण महाभारतामध्ये वेळोवेळी भर घातली गेली आहे. आधी लिहिलेले महाभारत हे आठ हजार श्लोकांचे होते, त्यात नंतर चोवीस हजार श्लोकांची भर पडली, अशी भर पडत पडत अखेर ते एक लाख श्लोक एवढे मोठे झाले आहे.

त्यात काही अतिप्राचीन गोष्टी आहेत तर अगदी अलीकडच्या काळातील गोष्टी आहेत. म्हणजे त्यात असे म्हटले आहे की युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाला रोमन लोक आले होते. असे असल्यावर नेमकी तारीख कशी काय काढणार ?

13-lp-mahabharatमहाभारताचा काळ काढण्यासाठी अभ्यास करत असताना मला त्यात एक अशी व्यक्ती सापडली की ती नक्की होऊन गेली असावी. ती म्हणजे उदयन हा राजा. महाभारत युद्धानंतर २४ व्या पिढीत उदयन राज्यावर आला. उदयन मूळचा हस्तिनापूरचा राजा. हस्तिनापुरात गंगेला पूर आल्यामुळे त्याने आपली राजधानी कौशाम्बी येथे हलविली, असे प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे. मात्र उदयनचे ऐतिहासिकत्व कसे सिद्ध करायचे?

त्याबद्दल काही बौद्ध ग्रंथात असे सांगितले आहे की उदयन आणि गौतम बुद्ध यांचा जन्म एकाच दिवशी झाला आहे. इसवी सन पूर्व ५६८ हे त्याचे साल. दोघेही खूप वष्रे म्हणजे बुद्ध ८० वर्ष तर उदयन त्यानंतर पाच ते दहा वर्ष जगला.

घोषित नावाच्या बुद्धाच्या एका भक्ताने बुद्धासाठी कौशाम्बी येथे मठ बांधला होता. तसे शिलालेखही सापडले आहेत. याचा अर्थ घोषित होऊन गेला हे नक्की. घोषित हा उदयन या राजाच्या दरबारात त्याचा अर्थ सल्लागार म्हणून नोकरीस होता. घोषिताच्या एका मुलीशी त्याचे लग्नही झाले होते. यावरून उदयन होऊन गेला हे आपल्याला सिद्ध करता येते.

उदयन, गौतम बुद्ध आणि घोषित हे तिघेही होऊन गेले, त्यांचा काळही ठरवता येतो मग महाभारताचा काळ का ठरवता येऊ नये ?

महाभारतात उदयन याने त्याची राजधानी पुरामुळे कौशाम्बी येथे हलवली असल्याचे लिहिले आहे. पूर वगरे गोष्टी आपल्याला उत्खननाद्वारे सिद्ध करता येतात. हस्तिनापूरचे उत्खनन करण्यात आले तेव्हा उत्खननात नदीने आपले पात्र बदलले असल्याचा पुरावा मिळाला. त्यामध्ये सापडलेली खापरे आणि कौशाम्बी येथे सापडलेली खापरे ही एकाच प्रकारची म्हणजे राखी रंगाची (पेंटेड ग्रेवेअर – पीजीडब्लू) असल्याचे दिसले. यावरून या गोष्टीचे ऐतिहासिकत्व सिद्ध करता येते. असे सर्व असताना महाभारत युद्धाचा काळ काढता यायलाच हवा.

काही लोकांनी पिढीनुसार महाभारताचा काळ ठरवला आहे. मात्र पिढी हे मानक ठरवताना किती वर्षांची एक पिढी मानायची हा प्रश्न आहे. आता साधारणपणे वीस वर्षांची एक पिढी असे आपण ठरवतो. मात्र पुराणातल्या राजवंशांच्या याद्या बघितल्या तर त्यात मनू वगरे सोडले तर चंद्रगुप्त मौर्यापासून अशोक आणि त्यापुढे अशी सर्व यादी आहे. त्या वेळच्या पिढीची सरासरी ही साधारणपणे साडेचौदा वष्रे एवढी होती. ती पिढी साडेचौदा वष्रे असेल तर वीस वर्षांची पिढी मानून चालणार नाही. फार फार तर ती पंधरा वष्रे एवढी मानता येईल. त्यानुसार आपण उदयनपासून चोवीस पिढय़ा मागे गेलो तर महाभारताचा काळ आपल्याला मिळतो, तो म्हणजे इसवी सन पूर्व ८६०. अर्थात त्यात काही वष्रे मागेपुढे होऊ शकतात, कारण एवढय़ा जुन्या काळाचा विचार करता ते साहजिकच आहे. अन्य संशोधकांनी वीस वर्षांची एक पिढी धरून संशोधन केल्यामुळे महाभारताचा काळ इसवी सनपूर्व चौदाशे हा काढला होता. मात्र या काळात हस्तिनापूर येथे वस्तीच नव्हती, तिथली वस्तीच इसवी सनपूर्व अकराशेच्या सुमारास सुरू झाली. त्यापूर्वी वस्ती असली तरी संपूर्ण दलदल त्या ठिकाणी होती, कारण महापूर आलेला होता. जर साडेचौदाचीच पिढी धरली तर महाभारताचा काळ इसवी सनपूर्व ८४० ते ८३० एवढा येतो. मात्र या ठिकाणची वस्ती इसवी सनपूर्व ८०० ला हस्तिनापूरहून कौशाम्बी येथे निघून गेली होती. त्यामुळे सगळे संदर्भ जुळण्यासारखे आहेत.

14-lp-mahabharatयाचा उपयोग करून आपण मनूकडे जाऊ शकतो. पुराणे सांगतात की, मनू हा पहिला राजा. मनूची राजवट महाभारत युद्धाच्या पंचाण्णव पिढय़ा आधी होती. त्याचा हिशेब असा करता येईल- महाभारताचा काळ इसवी सनपूर्व ८६०. मनूची राजवट पंचाण्णव पिढय़ा आधी म्हणजे त्याला पंधराने गुणायचे, म्हणजे चौदाशे पंचवीस वष्रे. त्यात महाभारत युद्धाचे ८६० वष्रे मिळवायचे म्हणजे इसवी सन २२८५ हा मनूचा काळ आपल्याला मिळतो. आता पुराणात मनूचा काळ इसवी सनपूर्व ३१०२ एवढा सांगितला आहे. कलियुग सुरू झाल्यानंतरचा मनूचा काळ आहे, तेव्हा सर्व कसे जुळवायचे? याला काही उत्खननात पुरावा मिळतो का?

महाभारत, वैदिक वाङ्मय आणि पुराणात मनूची गोष्ट आली आहे. ती म्हणजे सकाळी सूर्याला अघ्र्य देत असताना त्याच्या ओंजळीत एक छोटा मासा आला. त्या माशाला सोडून देत असताना तो मनूशी बोलायला लागला की, तू माझा सांभाळ कर, मी योग्य वेळ येताच त्याची परतफेड करेल. त्यानुसार मनू त्याचा सांभाळ करतो आणि प्रलय आल्यावर तो मासा मनूला वाचवतो.

ही प्रलयाची गोष्ट फक्त आपल्याकडेच नाही तर बायबलमध्येही आहे. सुमेरियन लोकांकडून ती त्यांनी घेतली आहे. मेसोपोटेमिया म्हणजे आजच्या इराकमध्ये उत्खननात प्रलयाचे पुरावे सापडले आहेत. या सर्व गोष्टींत समानता आहे. त्यावरून एक निश्चित सांगता येते की, एकाच काळात सबंध जगात काही तरी उलथापालथ झालेली आहे, कारण प्रलयाची गोष्ट ‘ओल्ड वर्ल्ड’ म्हणजे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सोडता सगळीकडे समान आहे.

आपल्याकडे प्रलय आला होता का, आला असल्यास त्याचा पुरावा उत्खननात मिळायला हवा, नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तर आपल्याकडे प्रलयाचा पुरावा आहे. उत्तर भारतात असे दिसते की, देहरादून ते अलाहाबादपर्यंत प्रवास करत गेल्यास लहान लहान तळी दिसतात. या भागात उत्खनन करत असताना आम्हाला असे दिसले की, ही नुसतीच तळी नाहीत. उत्खनन करताना ते सबंध चिखलातच करावे लागते. त्यामध्ये एक प्रकारची खापरे सापडतात. ती खापरे चांगली असली तरी त्यावरची नक्षी, रंग वगरे निघून गेलेली आहेत. मात्र ही खापरे सिंधू संस्कृतीत सापडणाऱ्या खापरांसारखीच आहेत. अशीच खापरं आपल्या राजस्थान, हरयाणा या ठिकाणीही सापडतात. देहरादून आणि अलाहाबाद ही तर दोन टोकेच आहेत. राजस्थानमध्ये सापडलेल्या खापरांचं कार्बन डेटिंग केलं असता इसवी सनपूर्व २२०० या काळातली ती निघाली आणि त्यानंतर तिथे महापूर, प्रलय वगरे आला आणि लोक तिथून निघून गेलेले आहेत. या सर्व भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पुरलेली तांब्याची हत्यारे सापडतात. एका ठिकाणी तर ४६५ पुरलेली हत्यारे सापडली. यावरून ही गोष्ट सिद्ध होते की, कोणतं तरी संकट आलं आणि या लोकांना हत्यारे पुरून तिथून निघून जावं लागलं. देहरादून ते अलाहाबाद या परिसरात खापरं सापडतात, तांब्याची हत्यारं सापडतात. दोन-तीन ठिकाणी ही खापरं आणि हत्यारं एकमेकांसोबतच सापडली आहेत. म्हणजे ही खापरं वापरणारे लोक सिंधू संस्कृतीपकीच कोणी तरी होते. हा सर्व प्रदेश ३०० किमी लांब आणि २०० किमी रुंद म्हणजे सुमारे ६०,००० चौरस किमीचा हा प्रदेश आहे.

एवढय़ा मोठय़ा परिसरात हा प्रलय पसरलेला होता, तो झाला कसा असावा? अलीकडेच काही वर्षांपूर्वी हडप्पा येथे अमेरिकन लोकांनी काही संशोधन केले. त्यात अगदी बारीक बारीक गोष्टींचे कार्बन डेटिंग त्यांनी केलं, त्यामुळे आता थापा मारायला काही जागाच उरली नाही. त्यांना असं आढळलं की, इसवी सनपूर्व २२०० मध्ये काही तरी घोटाळा झालेला आहे. या काळात त्या संस्कृतीचा अध:पात सुरू झालेला आहे. लोक नियम पाळेनासे झाले, रस्त्यावर घरं बांधायला लागले, पक्क्या विटांऐवजी कच्च्या विटांची घरं बांधायला लागली, आíथक स्थिती हलाखीची झाली. हे सर्व का झाले याचे संशोधन करण्यात आले.

लिंबाई इन्स्टिटय़ूट ऑफ जिओलॉजीच्या संचालकांनी परीक्षण सुरू केले. त्यांनी सांगितले की, याचे कारण म्हणजे काही तरी मोठा उत्पात म्हणजे भूकंप झाला असावा. हे सर्व एरियल फोटोग्राफीमधूनही स्पष्ट झालं आहे. हिमालयात झालेल्या भूकंपामुळे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांवर म्हणजे यमुना, सतलज, राजस्थानातील घग्गर (पूर्वीची सरस्वती) विपरीत परिणाम झाला. यमुनेने आपले पात्र बदलले आणि ती गंगेची उपनदी म्हणून वाहू लागली, ती पूर्वी सरस्वतीची उपनदी होती. त्यामुळे सरस्वतीला मिळणारं पाणी कमी व्हायला लागलं आणि राजस्थानात वाळवंट निर्माण झालं. आज तिथे असणारी तळी म्हणजे पुष्कर वगरे हे सर्व सरस्वती नदीचे उरलेले अवशेष आहेत. हे इसवी सनपूर्व २२०० च्या सुमारास कधी तरी झाले असावे, असा वैज्ञानिकांचा कयास आहे.

बायबलमध्ये सांगितलं आहे की, इसवी सनपूर्व ३१०० मध्ये नवीन जगाची निर्मिती झाली, आपल्याकडेही त्याच वेळी कलियुग सुरू झाले, असा समज आहे. त्याचं शास्त्रीय कारण एका बेल्जियन पॅलीओबॉटनिस्टने सांगितलं आहे, ते म्हणजे इसवी सनपूर्व २२०० च्या सुमारास हा प्रकार झाला असावा. अर्थात स्थलांतरं अशाच ठिकाणी होतात जिथे काही तरी मिळण्याची शक्यता असते. सिंधू संस्कृतीची स्थलांतरं सुरू झाली आहेत, सोबतच आर्याचीही सुरू झाली आहेत. ऋग्वेदात याचा उल्लेख आहे. जिथे जिथे सिंधू संस्कृतचे लोक गेले तिथे तिथे आर्यही गेले, असा वैदिक वाङ्मयात उल्लेख आहेत. याबद्दल शतपथ ब्राह्मणात विदेघ माथव नावाच्या राजाचा उल्लेख होता, त्याचं राज्य कुरुक्षेत्रात होतं. सरस्वती नदी कोरडी पडल्याने नवीन भूमी शोधण्यासाठी तो आपल्या पुरोहिताला सोबत घेऊन निघाला आणि त्याने गंगेच्या दोन्ही काठांवरची सर्व वने जाळली आणि आर्यासाठी नवी जागा मिळवली. तो बिहापर्यंत जातो. हा ऋग्वेदातला पुरावा. ऋग्वेद सिंधू संस्कृतीबद्दल काहीच बोलत नाही. मात्र त्यांचीही स्थलांतरं सुरू झाली आहेत. मात्र ते लोकही तिथपर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे बिहारमध्येही सिंधू संस्कृतीची खापरं सापडतात. या भागात सापडणाऱ्या गव्हाची जात ही पंजाबात सापडणाऱ्या जातीसारखीच आहे. त्यामुळे उत्तरसिंधू संस्कृतीचे आणि वैदिक हे एकच लोक असावेत का, असंही अनुमान काढता येते.

हे सर्व एकाच ठिकाणी घडलं आहे असे नाही. बंगालमध्येही सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. पश्चिम पंजाबात आर्याची एक शाखा गेली. त्यांनी सोबत पर्शव: म्हणजे इराणी आणि गांधार म्हणजे आताचा अफगाणिस्तान हे लोक घेतले. त्या काळात एवढी वाईट परिस्थिती होती की ‘तिकडे अन्न आहे’ असं आर्याना म्हणावं लागलं. दक्षिणेकडेही आर्य लोक गेले आहेत. माळव्यात काही अवशेष सापडले आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रातही आले आहेत. महाराष्ट्रात नंदुरबार आणि अहमदनगर जिल्हय़ातील दायमाबाद या ठिकाणी आर्याचे अवशेष सापडले आहेत. वैदिक वाङ्मयात हे सारं आलेलं आहे. युरोपिअन प्रदेशातही ग्रीसपर्यंत आर्य पोहोचले होते, कारण परिस्थितीच इतकी वाईट होती.

या सर्व स्थलांतराला पुरावा काय? तर जर्मनीत १९०६ सालामध्ये एक जर्मन शास्त्रज्ञ उत्खनन करत होता. त्याला एका ठिकाणी अवशेष सापडले. त्यात एक कोरीव लेख होता. त्यावर लिहिलेलं होतं की, दोन राजे या भागात होते. एक म्हणजे हिटाइट आणि दुसरे म्हणजे मिटानी. त्यांची भाषा इंडो आर्यन गटातील. त्यांची नावे म्हणजे दशरथ, राम, शत्रुघ्न. त्यांनी असं ठरवलं की, आपण कायमच लढाई करत असतो. त्यावर तोडगा हवा. त्यामुळे त्या लोकांनी त्यांच्या देवतांना आवाहन केलं. त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, नासत्य. या शिलालेखाचा काळ इसवी सनपूर्व १३६०. इजिप्तमध्ये राजे लोक पिरॅमिड बांधत असत. अशाच एका राजाला त्यासाठी खोदकाम करत असताना अनेक शिलालेख सापडले ज्यातली नावं सुबंधू, सुग्रत अशी नावं होती. त्यांनी पाठवलेल्या पत्रात असे स्पष्ट उल्लेख आहेत की, ‘गहू पाठवा, गहू शिल्लक नाही.’ हे लोक आले कुठून? मात्र अजूनही त्यांना मान्य करायचे नाही की, भारतातून हे लोक आले आहेत.

याचा पुरावा म्हणजे या इंडो आर्यन भाषा बोलणाऱ्या गटाने आपल्यासोबत मोर नेला आणि इसवी सनपूर्व १८०० पासून त्यांच्याकडच्या खापरावर मोठय़ा प्रमाणात मोराची चित्रे यायला लागली. सिंधू संस्कृतीच्या खापरांवरही अतिशय सुंदर अशी मोराची चित्रे सापडली आहेत. हे सर्व त्यांच्या लिपीतही कोरलेले आहे. यामुळे हे लोक इंडो आर्यन होते हे सिद्ध होते. जिथे जिथे सिंधू संस्कृतीचे लोक गेले तिथे तिथे आर्य जाऊन पोहोचले आहेत. अर्थात हा काही पाठशिवणीचा खेळ नव्हता, मात्र यावरून हे दोन्ही लोक एकच असावेत असे सिद्ध होते.

इसवी सनपूर्व ३१०२ ला नेमके काय महत्त्व? त्याबद्दल बेल्जियन शास्त्रज्ञाने सांगितले आहे. झाड कापल्यावर त्याच्या खोडावर असलेल्या वर्तुळावरून तत्कालीन हवामानाचा अंदाज काढता येतो. वर्तुळ अगदी गोल गरगरीत असेल तर हवामान उत्तम होते, वर्तुळ जर वेडेवाकडे असेल तर काही तरी गडबड आहे, असा अंदाज लागतो. इसवी सनपूर्व ३१०२ मध्ये मात्र झाडावर वर्तुळेच सापडत नाहीत. म्हणजे त्या काळात काही तरी प्रलय आला होता हे नक्की.

महाभारताचा काळ ठरवताना पाच हजार, दहा हजार वष्रे मागे जाऊन काहीही उपयोग नाही. त्या काळात माणसांच्या अंगावर साधी चिंधीही नव्हती. पुरातत्त्वाचा पुरावाच त्यासाठी प्रमाण मानला पाहिजे.
डॉ. मधुकर केशव ढवळीकर
शब्दांकन : पार्थ कपोले – response.lokprabha@expressindia.com