सुनिता कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारने करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर क्षमतेच्या ३३ टक्के भागाच्याच वापराची अट घालून निवासी व्यवस्था असलेली हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज सुरू करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात हॉटेल्स सुरू होतील.

हॉटेलमध्ये म्हणजे घराबाहेर खाणं या गोष्टीला आपल्याकडे एकेकाळी नाकं मुरडून बघितलं जायचं. एखाद्या कुटुंबातल्या मुलाबाळांना, बाकीच्यांना सारखं हॉटेलात जाऊन चमचमीत खावंसं वाटतं म्हणजे त्या घरातल्या बाईला चांगला स्वयंपाक येत नाही असा अर्थ काढला जायचा.
पण कोणत्याही गोष्टी ३६० अंशातून बदलू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॉटेलिंग. आता याच हॉटेलिंगला एकदम प्रतिष्ठा आली आहे. कोणताही आनंद साजरा करायचा असेल तर हॉटेलमध्ये जेवायला जाणं ही अपरिहार्य गोष्ट असते.

अर्थात काही माणसांना गरज म्हणून बाहेर जेवावं लागतं. त्यांच्यासाठी घरगुती खानावळी असतात. पण घरच्या चवीचं खायचं नाहीये ते खाण्याचा आनंद घेण्यासाठी दर काही काळाने हॉटेलमध्ये जातातच. असे ग्राहक वाढल्यावर त्यांना वैविध्य हवं म्हणून वेगवेगळ्या थीमची हॉटेल्स सुरू झाली. त्याशिवाय साऊथ इंडियन, पंजाबी, मालवणी, गुजराती, मारवाडी, चायनीज, थायी, इटालिटन, मेक्सिकन असं सगळ्या प्रकारचं जेवण हॉटेलमध्ये मिळू शकतं. खास मराठी पदार्थ मिळणाऱ्या हॉटेलमध्ये जाऊन मेतकूट भात, थालीपीठ, श्रीखंडपुरी, पिठलंभाकरी असं खाणारे आणि अगदी घरच्यासारखं आहे असं म्हणणारे आहेतच.

टाळेबंदीमुळे तीन महिने घरात बसल्यावर, आजारपणाच्या भीतीने सतत आरोग्यदायी आहार घेतल्यावर आता बहुतेकांना हॉटेलचे वेध लागले आहेत. कोपऱ्यावरचा वडापाववाला असो, ऑफिसजवळचा मसाला दोसावाला असो की चायनीजसाठीचं, चिकन-फिशसाठीचं नेहमीचं ठरलेलं हॉटेल असो त्यांच्या चमचमीत चवी आता मेंदू कुरतडायला लागल्या आहेत. ते हॉटेलिंगचे पण काय दिवस होते, ‘कहाँ गये वो दिन?’ असं सगळ्यांनाच वाटायला लागलं आहे.

या, या म्हणून बोलवत असल्यासारखं ते हॉटेलचं वातावरण. आपलीच वाट बघत असलेल्या टेबलखुर्च्या. आपण गेल्या गेल्या अदबीने पाणी आणून दिलं जातं. मेन्यू कार्ड समोर ठेवून ‘हव्वं ते मागा, मागाल ते देऊ’ असं सांगितलं जातं. समजा आपण मसाला दोसाची ऑर्डर दिली तर साताठ मिनिटात डिशमध्ये सफाईदार गुंडाळी केलेला तो गरमगरम मसाला डोसा आपल्या पुढ्यात येतो. त्याच्याबरोबर ती खोबऱ्याची चटणी आणि चविष्ट सांबार. काटेचमचे बाजूला ठेवून आपण हळूच मसाला दोश्याच्या बाजूच्या दोन टोकांपैकी एका टोकाने खायला सुरूवात करतो.

गरमगरम कुरकुरीत मसाला डोश्याचा तुकडा मोडून चटणीमध्ये बुडवून खाताना भुकेल्या पोटाला स्वर्गसुख मिळतं. मध्येच डोसा उघडून आतल्या भाजीसह फस्त केला जातो. आपल्या बरोबर आणखी कुणी असतील आणि त्यांनी वेगळे पदार्थ घेतले असतील तर त्यांचीही चव बघितली जाते. मसाला डोसा खाल्ल्यावर गरमागरम फिल्टर कॉफी प्यायल्याशिवाय आत्मा तृप्त होत नाही.

आपण ऑर्डर करून वाट बघत बसल्यावर आजूबाजूच्या लोकांच्या टेबलवर जे पदार्थ येतात, ते बघितल्यावर ‘अर्रर्र, आपण ते का नाही ऑर्डर केलं’ असं वाटल्याशिवाय रहावत नाही. अर्थात आपला मसाला डोसा आल्यावर त्यांनाही तसंच वाटत असणार म्हणा…

बिल देऊन बाहेर पडताना समोर आलेली बडीशेप जास्तीतजास्त घेण्याचं बालपण कुणाचंही सरलेलं नसतं.

करोन्या, आम्हाला आमचे हॉटेलिंगचे ते दिवस परत दे…

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everyone has remembering those days of hotelling during this covid period aau
First published on: 09-07-2020 at 11:23 IST