एखाद्या पदार्थाच्या तयार मसाल्यांपासून झटपट तो पदार्थ तयार करणं, जेवण घरी मागवणं, आवडीच्या पदार्थाची जवळपासची ठिकाणं शोधणं, घरातच विशिष्ट प्रकारचं जेवण बनवायचं असेल तर थेट शेफलाच घरी आमंत्रित करणं, असा फूड ट्रेण्ड झपाटय़ाने बदलतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्मार्ट’ या शब्दाला हल्ली वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. कारण आपणा सर्वाचं आयुष्यच हाताच्या तळव्यावर मावणाऱ्या स्मार्टफोनभोवती फिरतंय. सध्या असा कुठलाही विषय नाही जो या स्मार्टफोनला वज्र्य आहे. उलट याला जितकं खाद्य द्याल तितकं कमीच आहे. जगात जे जे काही अस्तित्वात आहे ते या स्मार्टफोनमुळे एका क्लिकवर तुमच्यापर्यंत पोहोचतंय. मग यामध्ये माणसाच्या मूलभूत गरजांपकी एक असलेलं अन्न (फूड) कसं काय मागे राहील? तुम्ही फक्त तुमच्या स्मार्टफोनला आदेश देण्याची खोटी, की लागलीच तुम्हाला जगातील कुठल्याही पद्धतीचं फूड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हजारो-लाखो हात (अ‍ॅप्स) पुढे सरसावतात. तयार जेवण घरी मागवा, एखाद्या डिशचे तयार मसाले आणून घरी फक्त ते मिक्स करा, आवडीचे पदार्थ जवळपास कुठे उपलब्ध आहेत ते शोधा, एवढंच काय तर तुम्हाला घरातच विशिष्ट प्रकारचं जेवण बनवायचं असेल तर थेट शेफलाच घरी आमंत्रित करा असं सगळं या स्मार्टफोनवर होतं. जगभर पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमध्ये नेहमीच बदल होत राहिले आहेत आणि यापुढेही होतील; पण फूड ट्रेण्ड खऱ्या अर्थाने बदलत असेल तर तो असा बदलतोय, हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे.

भारतीय माणूस हा पूर्वीपासूनच आपल्या खर्चातील सर्वाधिक भाग हा किराणा मालावर खर्च करतो. त्याची ही सवय आजही मोडलेली नाही आणि म्हणूनच सर्वाधिक भारतीय हे मॉलमध्येही गेल्यावर रिटेल शॉपमध्येच घुटमळताना दिसतात. दुसरीकडे भारतातील ५० टक्के खवय्ये हे तिशीच्या आतले आहेत. त्यातही सर्वात मोठा वर्ग हा १९९० सालानंतर जन्माला आलेला आहे. जागतिकीकरणाचा पुरेपूर फायदा घेणाऱ्या या वर्गाचं सर्वाधिक उत्पन्न हे सध्यातरी भविष्यासाठी वाचवून ठेवण्यापेक्षा हातोहात खर्च होतंय. फूड हा यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच की काय आज जगात भारतीय फूड मार्केट हे सहाव्या क्रमांकावर आहे. फूडचं भारतातील विस्तारणारं जग पाहता येत्या काळात या क्रमवारीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक परदेशी पदार्थाचे ब्रॅण्ड भारतात दाखल होत असून भारतीय फूड बाजारही आपल्या कक्षा रुंदावण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहेत. स्टारबक्स आणि टाटाचं एकत्र येणं हे त्याचं चपखल उदाहरण ठरावं. जगभरात पदार्थाच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. पण फक्त पदार्थ बदलत नसून खाण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. भारतातही तरुण मंडळी हॉटेलमध्ये खाण्याला प्राधान्य देत असून टेकअवे आऊटलेट्सही वाढतायत. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये तर शनिवार-रविवार घरात जेवण बनवणंच बंद झालंय की काय अशी शंका यावी, असं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळतं. पण हॉटेलच्या बाहेर लागणाऱ्या या रांगादेखील बदलत्या फूड ट्रेण्डचाच एक भाग आहेत.

गेल्या काही काळात भारतात येणाऱ्या पर्यटकांचा ओघही वाढलाय. त्यामुळे पारंपरिक पदार्थाना मागणी वाढली आहे. त्याचाच परिणाम पारंपरिक पदार्थ वेगळ्या पद्धतीने मोठय़ा रेस्टॉरंटमध्ये सादर केले जात आहेत. त्यासाठी असे पदार्थ बनवता येणाऱ्या लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडून ते शिकून घेतले जातायत. असे पारंपरिक पदार्थ बनविणाऱ्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न फूड ट्रॅव्हलच्या माध्यमातून सुरू असून अशा कार्यक्रमांना मोठा प्रेक्षकवर्ग आहे. विशेष म्हणजे पंचतारांकित हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या बल्लवाचार्याच्या त्यानित्ताने शोध मोहिमा सुरू असतात आणि आता तर याला स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झालंय. या कार्यक्रमांतून प्रेरणा घेत अनेक गृहिणी आणि तरुण मंडळींनी यूट्यूब चॅनल सुरू केलं असून त्याद्वारे ते लोकांना आपल्या किचनमध्ये घेऊन जात असतात. मुळात लोकांनाही त्यानिमित्ताने जगभरातील गृहिणींच्या किचनमध्ये डोकवायला मिळतं. हा ट्रेण्ड आता इतका वाढला आहे की मोठमोठी हॉटेल्स या गृहिणींना हाताशी धरून लोकांना आपल्याकडे खेचू पाहत आहेत. गृहिणींच्या पदार्थाचा आपल्या मेन्यूमध्ये समावेश करत आहेत.

पदार्थामध्ये तर प्रयोग होत आहेतच पण सर्वात मोठा बदल हा आहे की लोक मोठय़ा प्रमाणात गॅजेट्स वापरायला लागलेत. कॉफी मशीन, ज्युसर, ब्लेंडर, इलेक्ट्रिक कुकर, ओव्हन, माइक्रोवेव, टोस्टर या आणि अशा अनेक आकर्षक उपकरणांनी लोकांच्या स्वयंपाकघरात शिरकाव केला आहे आणि हा ट्रेण्ड वाढतच जाणार आहे. याशिवाय डिजिटल फ्रंटवर फूडसंबंधी अनेक अ‍ॅप्सही बाजारात आहेत आणि येऊ घातली आहेत. अनेक अ‍ॅप आपल्याला खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करायला मदत करत असतात. पण यूटय़ूबशिवायही अनेक अ‍ॅप खाद्यपदार्थ कसा तयार करायचा याचंही मार्गदर्शन करतात. त्याहीपुढे जाऊन, तुम्हाला हॉटेलच्याच किंवा पारंपरिक चवीचा पदार्थ घरीच तयार करायचा असेल तर त्याची सर्व सामग्री एका बॉक्समध्ये मिळते आणि ती सामग्री फक्त दिलेल्या सूचनांनुसार एकत्रित करायची आणि तुमचा पदार्थ तयार. तुम्ही कुठे आणि काय खा हे सांगणारा ट्रेण्ड दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट गुगलला विचारायची सवय झालेली आहे. त्यामुळे खाण्याच्या बाबतीतही आपण स्वत:हून जाऊन एखादी गोष्ट शोधण्याचा रस संपत जाताना दिसतोय. पण कोणीतरी तुम्हाला ते शोधून तुमच्या हाताता दिलं तर मात्र तुम्ही पुन्हा गुगल मॅपच्या साहाय्यानेच त्याच्यापर्यंत पोहोचाल. याचीही सवय लोकांना लागलेली आहे आणि लावलीही जात आहे. युरोप आणि अमेरिकेत प्रसिद्ध असलेली फूड ट्रक ही संकल्पना भारतातही रुजू होऊ पाहतेय. त्यामुळे तुम्ही पदार्थाकडे जाण्यापेक्षा तेच तुमच्या दारी येतायत.

पूर्वी बार अँण्ड रेस्टॉरंटमध्ये फॅमिली जायच्या नाहीत. पण हल्ली लोकांचा दारूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे तो ट्रेण्ड बदललेला पाहायला मिळतो. जिथे फाइन डाइनही आहे आणि स्वस्तात दारूही प्यायला मिळते असे गॅस्ट्रो पबही वाढताना दिसत आहेत. शिवाय अगदीच दारू प्यायची नसेल तर कॉकटेल्स किंवा मॉकटेल्सचे असंख्य पर्याय उपलब्ध असतातच. या अशा नव्या सेटपमध्ये पदार्थ तयार करण्यासाठी कोळशाचा वापर दिवसेंदिवस वाढतोय. हा ट्रेण्ड फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगभरात पाहायला मिळतोय. तंदुरीसारख्या पदार्थासाठी तो सहजी वापरला जातोच, पण आता व्हेजफूड तयार करण्यासाठी आणि विशेषत: िड्रक्स तयार करण्यासाठीही मोठय़ा रेस्टॉरंटमध्ये कोळशाचा वापर वाढलेला आहे.

मेन कोर्सच्या तुलनेत जर का कोणत्या पदार्थाची क्रेझ वाढताना दिसत असेल तर ते म्हणजे चॉकलेट. भारतात चॉकलेट खाणाऱ्यांची संख्या ही गेल्या काही वर्षांत वाढली असून पूर्वी फक्त लहान मुलांसाठी असलेलं चॉकलेट आता मोठय़ांच्याही आवडीचं झालंय. चॉकलेट हे मुख्य जेवणाचाही भाग होतंय. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये चॉकलेट बाजारात आल्याने चॉकलेटची मागणी सर्व वर्ग आणि स्तरामध्ये वाढलेली दिसते. तसंच भेटवस्तू म्हणून चॉकलेटला पसंती देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या असंख्य सणांना तयार केल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये चॉकलेटचा वापर करून अनेक पदार्थ तयार केले जाऊ लागलेत. चॉकलेटसोबतच चीजची मागणीही वाढताना दिसतेय. जगभरात चीजच्या ३००० व्हरायटी आहेत त्यापकी केवळ ४५-५० व्हरायटीच भारतात मिळतात अथवा वापरल्या जातात. त्यामुळे जागतिक बाजारपेठेचं लक्ष्य भारतीय बाजारपेठेवर असून मोठय़ा शहरांमध्ये चिझी पदार्थाना मागणी वाढताना दिसत आहे. पारंपरिक भारतीय पदार्थामध्येही चीजचा वापर वाढलेला दिसतो. पराठा, उतप्पा, डोसा यांसारख्या पदार्थामध्ये चीज हा आता महत्त्वाचा घटक होतोय. शिवाय पिझ्झा, सँडविच, रोल, बर्गर, फ्रँकी या पदार्थाद्वारे आहारातील चीजचं एकूणच प्रमाण वाढतंय.

जगातील आणखी एक मोठा ट्रेण्ड सध्या सुरू आहे तो म्हणजे अन्न वाया न घालविणे. हा ट्रेण्ड याच्यासाठी आहे कारण यानिमित्ताने फूडमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. मुळा, ब्रोकोली किंवा फ्लॉवरसारख्या फळभाज्यांची पानं वाया न घालवता त्यापासून काही तयार करता येईल का असा प्रयत्न सुरू आहे. तसंच व्हेज स्ट्रार्टरमध्ये पनीर आणि मशरूमच्या पुढे जाऊन गोल्डन बीटसारख्या फळभाज्यांपासून काही नवीन करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. जगभर अनेक शेफ आपल्या किचनमध्येही याचा मोठय़ा प्रमाणात अवलंब करताना दिसतात. मांस आणि भाजीची प्रत्येक गोष्ट वापरण्याचा  प्रयत्न असतो. शक्यतो कोणतीच गोष्ट ते टाकत नाहीत. आणि यातून फूड इंडस्ट्रीमध्ये एक नवीन पायंडा पाडला जातोय, जो पुढील काळात पुन्हा एकदा घरगुती पातळीवर अवलंबला जाईल अथवा पाळावाच लागेल.

बदललेल्या जीवनपद्धतीमुळे शाकाहारी पदार्थाकडे लोकांचा ओढा वाढला आहे आणि त्यानुसार मोच्रेबांधणीदेखील सुरू आहे. कष्टाची कामं कमी झाल्यामुळे पचायला जड असणारे नॉनव्हेज पदार्थ खाणं लोकं टाळायला लागली आहेत. पण असं असलं तरी भूतलावरील खूप मोठा वर्ग हा आजही मांसाहारावरच जगतो. त्यामुळे मांस हे वेगळ्या फॉर्ममध्ये खाण्यात येऊ लागलं आहे. माशातील घटक पदार्थापासून तयार केलेले सुरिमीसारखे प्रकार यातूनच जन्माला आले असून लोकांची हे पदार्थ खाण्याला पसंती वाढत आहे.

कुठलीही गोष्ट खाण्याआधी मोबाइलवरून फोटो घेऊन ते सोशल मीडियावर अपलोड करणं, हे आता नवीन राहिलेलं नाही. पण भविष्यात येऊ घातलेल्या गुगल ग्लाससारख्या उपकरणांमुळे आता तोंडाला पाणी आणणारे पदार्थ लोकांच्या तोंडचं पाणी पळवू शकतात. कारण कोणत्या पदार्थामध्ये किती कॅलरी आहेत, तो आरोग्याला चांगला की वाईट याची वैज्ञानिक आकडेवारीच पदार्थाकडे नुसतं पाहिल्यावर तुमच्या स्क्रिनवर सादर होणार आहे. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. उपकरणं वापरणं न वापरणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे बदलत्या फूड ट्रेंडकडे लक्ष जरूर ठेवा, पण तुम्हाला जे मनापासून खावंसं वाटतंय त्यावर मनसोक्त ताव मारा.
प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com
@nprashant

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food trend is changing
First published on: 19-05-2017 at 01:03 IST