-सुनिता कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरांमधल्या परिस्थितीने दिलेली असहायता नाकारून आपापल्या गावी जाऊ पाहणाऱ्यांच्या वाट्याला आलेली हतबलता मांडणारी आजच्याच वर्तमानपत्र आणि टीव्ही या प्रसारमाध्यमांमधून पुढे आलेली दोन उदाहरणं आहेत.
एक आहे इंडियन एक्स्प्रेसमधली बातमी. ३५ वर्षांचा राजन यादव गेली १३ वर्षे मुंबईत भाड्याची रिक्षा चालवत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने स्वतची रिक्षा घेतली. टाळेबंदीनंतर जवळजवळ दीड महिन्यांनी, जवळचे पैसे संपल्यावर, सगळ्यांचीच परिस्थिती वाईट आहे, आता कुणाकडून मिळू शकत नाही हे पाहिल्यावर बायको आणि दोन मुलींना घेऊन त्याने त्याच रिक्षाने आपल्या गावी जायचा निर्णय घेतला. अवघे तीन हजार रुपये खिशात ठेवून त्याने मुंबई सोडली. तीन दिवसात १५०० त्याने किलोमीटरचा प्रवास केला. हे कुटुंब  गावापासून २०० किलोमीटर अंतरावर होतं. तेवढ्यात फतेहपूर जिल्ह्यात खागा गावाजवळ त्याच्या रिक्षाला ट्रकने धडक  दिली. त्यात त्याच्या बायकोचा आणि सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. दोन हसत्याखेळत्या जिवांचे मृतदेह घेऊन तो घरी पोहोचला आहे. चक्काचूर झालेली रिक्षा पोलीस स्टेशनच्या आवारात उभी आहे.

दुसरी बातमी आहे एनडीटीव्हीच्या बातमीदाराने दाखवलेली. भिवंडीजवळ त्याला वीसेक माणसांनी भरलेला छोटा टेम्पो दिसला. वर फळी टाकून या माणसांच्या पिशव्या ठेवलेल्या होत्या. पुढच्या बाजूला ड्रायव्हर, त्याची बायको आणि दोन लहान मुलं. हा टेम्पो मुंबईहून उत्तर प्रदेशात निघाला होता. वाटेत बिघडल्यामुळे त्याची दुरूस्ती सुरू होती. बातमीदाराने मुंबईत न थांबता परत का चाललात विचारल्यावर ड्रायव्हरने सांगितलं, मुंबईत आता उत्पन्न मिळत नाही. घराचं भाडं, विजेचं बील भरणं शक्य नाही. म्हणून गावाकडे चाललो आहोत. तेवढ्यात टेम्पो दुरूस्त झाला आणि मार्गस्थ झाला. बातमीदारही आपल्या कामाला लागला. दुपारनंतर त्याला त्याच महामार्गावर एका हॉस्पिटलसमोर तो टेम्पो दिसला. म्हणून थांबून त्याने चौकशी केली तर कळालं की मागून वेगाने येणाऱ्या मोटारीने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. त्यात टेम्पो ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला होता. लहान पुढे बसलेल्या लहान मुलांना फ्रॅक्चर झालं होतं. मागे बसलेली काही माणसं जखमी झाली होती. टेम्पोचा चक्काचूर झाला होता. हतबलांची आत्मनिर्भरता अशी त्यांच्या जीवावर उठणारी ठरली आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helplesss self reliance msr
First published on: 13-05-2020 at 19:53 IST