सायरा बानू – response.lokprabha@expressindia.com
लतादीदी जगासाठी ‘इंडियन नाइटिंगेल’ होत्या, गानकोकिळा लता मंगेशकर होत्या. त्यांचं आणि माझं नातं अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण होतं. माझे शौहर (दिलीप कुमार) ज्यांना मी ‘साहेब’ म्हणते, ते आणि लता मंगेशकर एकमेकांचे मानलेले भाऊ-बहीण होते. हे नातं रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळचं होतं. भाऊबीज आणि रक्षाबंधन अशा दोन्ही दिवशी लतादीदी घरी येत, कधी साहेब त्यांच्या घरी जात. बहीण-भावाचं नि:स्वार्थ प्रेमाचं, आदराचं नातं दोघांनीही कायम जपलं. ७ जुलै २०२१ रोजी साहेब गेले आणि ६ फेब्रुवारी २०२२ ला दीदी गेल्या. अवघ्या सात महिन्यांच्या फरकाने दीदी गेल्या! माझ्या जिवाभावाचे हे दोघेही मला एकापाठोपाठ पोरकं करून गेले. ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. दीदींना मी नियमितपणे फोन करत असे. रचनाकडे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत असे. ५ फेब्रुवारीलाही माझं आणि रचनाचं बोलणं झालं. ती म्हणाली, ‘आत्याची तब्येत बरी नाहीये, पण प्रकृतीत सुधारणा होईल याची खात्री वाटते.’ हे ऐकून मला बरं वाटलं. पण ६ तारखेला सकाळी ८ वाजता त्या गेल्याची क्रूर बातमी आली आणि मन सुन्न झालं.

१९६१ मध्ये रिलीज झालेल्या ‘जंगली’ चित्रपटातून माझी अभिनय क्षेत्रातली कारकीर्द सुरू झाली. निर्माता- लेखक- दिग्दर्शक सुबोध मुखर्जीच्या या चित्रपटाचा नायक शम्मी कपूर होता. गाण्यांचं रेकॉर्डिग बहुधा फिल्म सेंटर किंवा फेमस स्टुडिओमध्ये होतं. ‘काश्मीर की कली हूँ मैं’, ‘दिन सारा गुजारा तोरे अंगना’, ‘एहसान तेरा होगा मुझ पर’ आणि ‘जा जा जा मेरे बचपन’ अशी माझ्यावर चित्रित झालेली चार गाणी लतादीदींनी गायली होती. त्या काळातही लता मंगेशकर यांचा आवाज आपल्या पात्राला लाभणं ही अभिनेत्रींसाठी मोठी प्रतिष्ठेची बाब होती. मी खूप आनंदात होते. लता मंगेशकर या देशातील सर्वोत्कृष्ट गायिकेशी माझी भेट होणार, त्या माझ्यासाठी पाश्र्वगायन करणार हा विचार सुखावणारा होता. सुबोध मुखर्जी यांनी मलाही रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये बोलावलं होतं. ‘वेळेवर ये,’ हेही बजावून ठेवलं होतं. सकाळी ठीक १० वाजता लता मंगेशकर लाल काठाची पांढरीशुभ्र साडी नेसून स्टुडिओत सगळय़ांना नमस्ते म्हणत आल्यात. त्यांची मूर्ती लहानखुरी असली, तरी प्रसन्न चेहऱ्यावर सात्त्विकतेचं तेज होतं. सुबोध मुखर्जीनी आमचा रीतसर परिचय करून दिला. दीदींना हात जोडले आणि एक छान स्मित केलं. दीदींना सुबोध म्हणाले, ‘ही अभिनेत्री नवोदित आहे, आणि वयाने देखील लहान. चित्रपटाची नायिकाही बाल्यातून तारुण्यात पदार्पण करतेय आणि म्हणून गातेय- जा जा जा मेरे बचपन कहीं जा के छूप नादाँ.. ‘त्यामुळे तिच्या भूमिकेचा रस, रंग, गोडवा, वयानुसार असलेला अल्लडपणा या गाण्यात प्रतििबबित होईल, हे पाहा.’

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

एखादी जादूची कांडी फिरावी तशा त्या व्यक्तिरेखेच्या हळुवार, तारुण्यसुलभ भावना दीदींच्या खडीसाखरेसारख्या आवाजातून व्यक्त होऊ लागल्या. माझ्या त्या पहिल्यावहिल्या ध्वनिमुद्रणापासूनच मी त्यांची, त्यांच्या आवाजाची निस्सीम भक्त झाले आणि यापुढेही हा भक्तिभाव  कायम राहील. जगात दिलीप कुमार आणि लता मंगेशकर फक्त एकुलते एकच असतात आणि माझे भाग्य मी दिलीप कुमार यांची पत्नी तर लता मंगेशकर यांची भावजय आहे. आमचं नातं नणंद- भावजयीसारखं नव्हतं, ते त्याही पलीकडचं होतं. आम्ही खास मैत्रिणी झालो. फोनवर खूप गप्पा मारत असू. दीदी जेव्हा उपनगरात येत, त्या आवर्जून आमच्या घरी येत असत. अनेक तास गप्पांचा फड रंगत असे. दीदी लहान लहान किस्से- विनोद सांगत आणि घर आणि मन आनंदाचे डोही, आनंद तरंग होऊन जाई! दीदींकडे विनोद, चुटकुल्यांचा संग्रहच होता. नकलाही छान करत. त्यांच्या गप्पा ऐकण्यात तासन् तास निघून जात.

दीदी म्हणजे शालीनता, सौम्यता, प्रसन्नतेचा आल्हाददायक शिडकावा होत्या. त्यांचा सहवास, त्यांचं सोबत असणं, बोलणं मला नेहमीच आश्वासक वाटत असे.

दीदींना एकदा टीव्हीवर मुलाखत देताना पाहिलं. मुलाखतकर्त्यांने त्यांना प्रश्न केला, १९४९पासून तुम्ही गाताय. अनेक अभिनेत्रींचा तुम्ही आवाज आहात. या मांदियाळीत कुठल्या अभिनेत्रीला तुमचा आवाज सर्वाधिक शोभून दिसतो, असं तुम्हाला वाटतं? एका क्षणाचाही विलंब न करता दीदी म्हणाल्यात, ‘माझा आवाज सायरा बानूला खूप शोभून दिसतो.’ त्यांचे हे अनपेक्षित शब्द ऐकले आणि मी अत्यानंदाने उडालेच. त्यांनी मला दिलेला हा सर्वोच्च सन्मान होता.

दीदींचा सहवास म्हणजे अनेक मधुर चिरंतन आठवणींचा महासागर! २०१३ च्या सुमारास दीदींनी आपल्या मोठय़ा बंधूंना (दिलीप कुमार) भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या घरी येत तो दिवस आमच्यासाठी ईद असायचा. दीदी आमच्या घरात सगळय़ांना प्रिय होत्या. माझी आजी शमशाद बेगम साहिबा देखील दीदींची आतुरतेने वाट पाहत असत. त्यांच्याबद्दल दीदींनाही खूप आदर होता. आजी नावाजलेल्या शास्त्रीय गायिका होत्या.

त्या काळात दिलीप कुमार यांची प्रकृती वरचेवर बरी नसे. साहेब कधी रात्री लवकर झोपत, कधी सकाळी उशिरा उठत. त्यांच्या आजारपणामुळे त्यांचं झोपेचं वेळापत्रक निश्चित नव्हतं. दीदींना मी या विषयी सांगितलंही होतं. त्या म्हणाल्या, ‘माझी भाची रचना संध्याकाळी सातच्या सुमारास तिच्या कामातून मोकळी होते, मग तिला घेऊन मी तुमच्या घरी येईन.’

साहेबांना मी लतादीदी घरी येत आहेत, ही खुशखबर दिली. आम्ही सगळे त्यांच्या येण्याची वाट पाहत होतो. दीदी आल्या. आम्ही सगळे साहेबांच्या ‘स्टडी’मध्ये बसलो. अनेक दिवसांनी मी माझ्या पतीला इतकं दिलखुलास हसताना- बोलताना पाहिलं. त्यांच्या डोळय़ांत आनंदाची वेगळीच चमक पाहिली! ‘भाई के गरीब खाने पर, आज उसकी बहन तशरीफ लायी है,’ असं साहेब म्हणाले. त्या दोघांच्या डोळय़ांतून अश्रू वाहू लागले. ते आनंदाश्रू होते, पण त्यानंतर दोघेही शांत होते. नेहमी अखंड बोलणारे, त्या दिवशी मात्र त्यांना काय बोलावं सुचेना! काही काळ नि:शब्द शांततेत गेला. नंतरच्या १० मिनिटांत चहा आणि स्नॅक्स आले. दीदींनी स्वत: साहेबांना चहा पाजला. हाताने खाणं भरवलं.

साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पौर्णिमेचं टिपूर चांदणं आमच्या घरावर पडल्यासारखं मला भासलं. लतादीदींच्या येण्याने आम्ही पती-पत्नी आनंदात न्हाऊन निघालो होतो! तो दिवस अनेक अर्थानी, अनेक संदर्भानी अविस्मरणीय ठरला. त्यानंतर साहेबांच्या प्रकृतीत सकारात्मक बदल होत गेले. ‘दीदी के साथ मेरा और दिलीप साहाब का दिल का रिश्ता था! इस रिश्ते के बारे में जितना बयाँ करू कम ही होगा!’

 (शब्दांकन- पूजा सामंत)