00-lp-ganeshमहाभारतात गणपती ही देवता आपल्याला दिसते ती व्यासांची लेखनिक म्हणून. व्यासांनी गणपतीला आपला लेखनिक होण्याचे केलेले आवाहन आणि गणपतीने त्यांना घातलेली अट हे सगळं अचंबित करणारं खरं, पण वास्तव नव्हे. कारण गणपती या देवतेला साधारण सहाव्या शतकापासून महत्त्व प्राप्त व्हायला लागलं.

ज्ञानार्थवाचको गश्च णश्च निर्वाणवाचक:।

तयोरीशं परब्रह्म गणेशं प्रणमाम्यहम्॥

‘‘ज्ञानाशी संबंधित ‘ग’ आणि निर्वाण म्हणजे मोक्षाशी संबंधित ‘ण’ अशा वर्णानी निर्माण झालेल्या ईश तत्त्वाला श्रीगणेशाला मी वंदन करतो’’.

‘ज्ञानान्मोक्ष:’ ज्ञानातूनच मोक्ष प्राप्त होतो ह्य संकल्पनेशी गणेश शब्दाची वरील व्युत्पत्ती जुळणारी आहे. गणेश ही बुद्धीची, ज्ञानाची देवता मानली जाते. ‘गणपती’ असल्याने तिच्याकडे सेनापतीत्वही दिले गेले आहे. गणपती ही बुद्धी आणि पराक्रमाची देवता आहे म्हणूनच प्रत्येक कार्याच्या आरंभी तिचे स्तवन करण्याची परंपरा आहे.

याच परंपरेतून गणपती हा महाभारताचा लेखनिक आहे, अशी भारतीयांची दृढ धारणा आहे. व्यासांना काव्य लिहून घेण्यासाठी योग्य लेखनिक हवा होता. ब्रह्मदेवाने त्यांना गणेशाची निवड करण्यास सांगितले. पण गणपतीची एक अट होती. लेखन करताना व्यासांनी कोठेही थांबता कामा नये. एवढं मोठं महाकाव्य म्हणजे कुठे तरी विचार करायला थांबावं लागणारच. व्यासांनीही तोड काढली. गणपतीनेही कुठेही न कळून लिहायचे नाही. मग गणपतीची बुद्धी पणाला लागेल असे कूटश्लोक घालत व्यासांनी महाभारत सांगितले. अर्थातच त्या कूटश्लोकांचा अर्थ समजण्यासाठी गणपतीला जरा विचार करावा लागायचा आणि व्यासांना काव्यासाठी आवश्यक तो विचार करायला थोडा अवसर मिळायचा. परंपरेतून ही कथा आली असली तरी साधारणपणे दहाव्या शतकापर्यंत तिचा उल्लेख आढळत नाही.

महाभारताचा लेखनिक गणेश ही संकल्पना समजून घेण्याआधी गणेशाचा इतिहास थोडक्यात पाहू या. गणेशाची गणपती, वक्रतुण्ड, लंबोदर, ब्रह्मणस्पती, एकदन्त अशी असंख्य नावे आहेत. विष्णूप्रमाणे गणेशाची सहस्रनामावलीच आहे. आधुनिक काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेली ही देवता दीर्घ कालानंतर लोकप्रिय होत गेल्याचे दिसते. वैदिक साहित्यात गणपती ही प्रधान देवता कधीच नव्हती. भारतीय परंपरेतील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेद. तेथे ब्रह्मणस्पती सूक्त आहे,

गणानां त्वा गणपित हवामहे किव कवीनामुपमश्रवस्तमम्।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: श्रुण्वन्नूतिभि: सीद सादनम्॥ (२.३१.१)

या ऋचेत ‘गणपति’ आणि ‘ब्रह्मणस्पति’ ही गणेशवाचक दोन नावे येतात. नंतरच्या काळात गणपती या नावाने प्राधान्याने ओळखल्या गेलेल्या गणेश आणि ब्रह्मणस्पती या दोघांत अनेक गोष्टींचे साम्य आहे. ब्रह्मणस्पती आणि गणपती दोघेही ज्ञान देणारे, दोघांच्याही हातात परशू असलेले आहेत. कार्यारंभी या दोघांचेही आवाहन केले जाते.

शुक्ल यजुर्वेदात, व्रातपति, गृत्सपति अशा शब्दात स्तवला गेला आहे.

नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो

व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो

गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्य वो नमो नमो

विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नम:।

यातील ‘व्रातपति’ या शब्दाचा अर्थ टोळीचा किंवा गणाचा नायक असा आहे. तर अत्यंत विद्वान लोकांचा अधिपती या अर्थाने ‘गृत्सपति’ शब्द येतो.

अथर्ववेदात गणपत्यथर्वशीर्ष नावाचे एक उपनिषद आहे. गणपतीचे सकल वर्णन येथे येते. अथर्वशीर्षांतील गणपती लोकमान्य झाल्यावर ब्रह्मणस्पती हे गणपतीचे आद्यरूप मानले जाऊ लागले.

तत्तिरीय आरण्यकात,

तत्पुरुषाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि।

तन्नो दन्ती प्रचोदयात्॥

असा ‘वक्रतुण्ड’ आणि ‘दन्ती’ या नावांचा उल्लेख येतो.

याज्ञवल्क्य स्मृतीत विनायक असे नाव येते. पण ते विघ्नहर्ता या अर्थाने न येता विघ्नकारक अशा अर्थाने येते. हा विनायक महाभारत कर्त्यांनाही ज्ञात होता. पण हा विनायक भूतपिशाच अशा गणातील म्हणजेच दुसऱ्यांना त्रास देणाऱ्यांपकी होता. महाभारत काळात गणेश, गणाधिप, गणकार, गणकृत, गणपती ही नावेसुद्धा ज्ञात होती; पण ती शिवाची म्हणून.

महाभारताच्या भांडारकर संशोधक आवृत्तीत ‘महाभारताचा लेखनिक गणेश’ हा भाग गाळला आहे. हा भाग का बरे गाळला गेला असेल? विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता असा गणेशाचा प्रवास झाला तसा त्याच्यामागे नवा इतिहास जोडला गेला असेल का? महाभारताचा लेखनिक श्रीगणेश ही संकल्पनाही अशीच उशिरा आली असेल का?

मोरिझ िवटरनिट्झ यांनी सर्वप्रथम या विषयाकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले. क्षेमेंद्रांच्या ‘भारतमंजरी’ या महाभारतावरील ग्रंथातसुद्धा गणपती महाभारत लिहितो, असा उल्लेख नाही. पण िवटरनिट्झ यांनी अल बिरूनीला ही कथा ज्ञात असल्याचा उल्लेख त्यांच्या ‘गणेश इन द महाभारत’ या शोधनिबंधात केला आहे.

मुळात गणेश ही महत्त्वाची देवता म्हणून सहाव्या शतकानंतर मान्य झाली असावी. प्रा. आर. जी. भांडारकर यांच्या मते गणेशाचे पुरातनत्व सहाव्या शतकाच्या मागे जात नाही. पुराण साहित्यातसुद्धा गणपतीचा समावेश सात्त्विकपुराणांत नसून शैव, िलग, स्कंद, आणि अग्निपुराणात येतो. गरुडपुराणांत ती एक महत्त्वाची देवता झाली होती तर पद्मपुराणांत गणपतीच्या संप्रदायाचा उल्लेख आहे. ब्रह्मवैवर्तपुराणाच्या सेहेचाळिसाव्या अध्यायाची गणपती ही अधिष्ठात्री देवता आहे. अनेक उपपुराणांत गणपती ही प्रमुख देवता झाल्याचे दिसते. ब्याण्णव अध्यायांच्या उपासना खंड आणि एकशे पंचावन्न अध्यायांच्या क्रीडाखंडाने युक्त असे गणेशपुराण हे उपपुराण मात्र पूर्णपणे गणेशाला वाहिले आहे. मुद्गलपुराण हे असेच दुसरे गणपतीला वाहिलेले चारशे अठ्ठावीस अध्याय असलेले पुराण. या पुराणात गणेशाच्या वक्रतुंड, एकदंत, विकट अशा विविध अवतारांसाठीच्या कथा रचलेल्या आहेत. पण हे सारे पुराणसाहित्य तुलनेने उशिरा आले आहे. या साऱ्या साहित्यातून गणेश देवतेला प्रयत्नपूर्वक मोठे केले गेले आणि याच काळात कधी तरी गणपती हा महाभारताचा लेखनिक झाला. पण त्याला फार मोठा आधार नसल्याने भांडारकरांच्या चिकित्सक आवृत्तीत हा प्रसंग टाळला आहे.

असे असले तरी परंपरेतून आलेली कल्पना इतर आवृत्तींमध्ये खालीलप्रमाणे मांडली जाते –

कृतं मयेदं भगवन् काव्यं परमपूजितम्।

ब्रह्मन् वेदरहस्यं च यच्चान्यत् स्थापितं मया॥

साङगोपनिषदां चव वेदानां विस्तरक्रिया।

यच्चापि सर्वगं वस्तु तच्चैव प्रतिपादितम्॥..

परं न लेखक: कश्चिदेतस्य भुवि विद्यते॥

..हे भगवन, सर्व लोकांत वंदनीय अशा काव्याची मी रचना केली आहे. सर्व वेद, सर्व उपनिषदांचे सार मी सांगितले पण या ग्रंथाला योग्य असा लेखनिक मला या पृथ्वीवर दिसत नाही, अशी व्यथा व्यास व्यक्त करतात. आणि मग ब्रह्मदेव सांगतात, ‘‘काव्यस्य लेखनार्थाय गणेश: स्मर्यतां मुने।’’.. ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार व्यासांनी गणेशाचे स्मरण केल्यावर गणेश व्यासांसमोर प्रकट होतात आणि मग व्यास त्यांना ‘‘लेखको भारतस्यास्य भव त्वं गणनायक’’। आपल्या काव्याचा लेखनिक होण्याची विनंती करतात. पण गणेश त्यांना लिहिताना मी थांबणार नाही, असे सांगतात आणि व्यास त्यांना न समजता काहीही लिहायचे नाही, अशी विनंती करतात असा सारा प्रसंग आदिपर्व १.६१-७८ येथे आला आहे (गीताप्रेस).

शेवटी अभ्यास, वस्तुस्थिती, चिकित्सा या साऱ्यांपेक्षा ‘रूढि: बलियसी’ असे म्हटले जाते. त्याची सत्यता महाभारताचा लेखनिक गणेश या संकल्पनेत दिसून येते, एवढेच आपल्याला म्हणता येईल.
असावरी बापट – response.lokprabha@expressindia.com