प्रत्येकाच्या घरात किंवा वस्तीत सुरक्षेच्या दृष्टीने कुत्रा असणे  गरजेचे असले तरी गेल्या काही वर्षांत विदर्भात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. काही लोकांना कुत्र्याने चावा घेतल्याने जीव गेल्याच्याही घटना समोर आल्या आहे. विदर्भात मोकाट कुत्र्यांची संख्या सुमारे दोन लाख असून त्यात नागपूर शहरात सुमारे ९० हजार मोकाट कुत्री आहेत. मात्र यात वाढच होत असूनही महापालिकेकडून त्यावरील नियंत्रणासाठी कुठलीच यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरोघरी पाळण्यात येणाऱ्या कुत्र्यांना घरातील एक सदस्य म्हणूनच वागवले जाते. मात्र मोकाट श्वानांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडे मात्र फारच तोकडी यंत्रणा असल्यामुळे त्यांचा त्रास सामान्यांना होत आहे. महापालिकेकडून या मोकाट कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी केले जाते, पण पिसाळलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मात्र कुठलीच व्यवस्था केली नसल्यामुळे कुत्र्यांनी चावा घेतल्याने जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. रात्री-बेरात्री अनेक जण वाहनाने घरी जात असताना गल्लोगल्ली बसलेली ही कुत्री वाहनाच्या मागे धावतात आणि त्यातून अपघात झालेले आहेत.

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बेवारस कुत्र्यांवर लसीकरण केले जाते खरे, पण अनेक वर्षांत त्या दृष्टीने ठोस प्रयत्न झालेले नाहीत. २००६ मध्ये न्यायालयाने या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर २००६ ते २०१२ पर्यंत नसबंदी मोहीम चालविली. त्यात ५८ हजार ८४३ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. त्यानंतर दीड वर्षे ही मोहीम थंडबस्त्यात गेली. बेवारस कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांच्या तक्रारी बघता जुलै २०१४-२०१५ दरम्यान ११ हजार ९३ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आणि त्यानंतर ही प्रक्रियाच थंडावली. गेल्या वर्षी २०१६ मध्ये केवळ दोन महिने नसबंदी अभियान राबविण्याची घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीच नाही.

मोकाट कुत्र्यांवर नसबंदी किंवा लसीकरणाची जबाबदारी नागपुरात शासकीय पशुचिकित्सा महाविद्यालयाकडे देण्यात आली आहे. करारानुसार महापालिका शासकीय पशुचिकित्सा महाविद्यालयाला प्रत्येक नसबंदीसाठी ६५० रुपये शुल्क देते. नसबंदीसोबत महाविद्यालयाच्या वतीने तीन दिवस कुत्र्याची देखभालही करण्याचा करार करण्यात आला आहे. शहरात गेल्या काही वर्षांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून याबाबत धक्कादायक माहिती समोर येते. गेल्या २०११ ते २०१६ या सहा वर्षांत शहरात ५२ हजार लोकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. यापैकी ८४ जणांना तर जीवही गमवावा लागला आहे. दोन वर्षे आधी शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या बघता त्यावर अंकुश लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविली होती. हे काम एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र, दरम्यान संबंधित कंपनीने केलेल्या नसबंदीत अनियमितता झाल्यामुळे ती मोहीम बंद करण्यात आली. त्या वेळी महापालिकेने मात्र ही मोहीम फत्ते झाल्याचा दावा केलेला होता. वास्तविक कंपनीने विविध प्रभागांतून कुत्र्यांची उचलून नसबंदी केलेली नव्हती. शिवाय नसबंदीनंतर अशा कुत्र्यांची नोंदही नव्हती. महापालिकेच्या या अनियमिततेमुळे गेल्या एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत पाच हजार ८०० कुत्रे चावल्याची प्रकरणे पुढे आली आहे. एका खासगी रुग्णालयात वर्षांत एक हजार ४६२ नागरिकांना कुत्रा चावल्याचे पुढे आले. त्यात ४८७ बारा वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या आहे.

अमरावतीत सुमारे २० हजार मोकाट कुत्री असून त्यापैकी गेल्या दहा महिन्यांत चार हजार कुत्र्यांनी लोकांना चावा घेतल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यापैकी कुणी दगावले नसल्याचे समोर आलेले आहे. गेल्या दोन वर्षांत सहा हजार १५५ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून ही नसबंदी केली जाते आहे. अमरावतीत शहराबाहेर महापालिकेच्या हद्दीतील जागेवर जखमी कुत्र्यांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने केली जाते.

चंद्रपुरात दहा ते बारा हजार मोकाट कुत्री असून त्यापैकी गेल्या वर्षभरात दोन हजार ३५८ कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली. नसबंदीसाठी चंद्रपूर महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. या मोकाट कुत्र्यांवरील लसीकरण आणि नसबंदीबाबत २० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अकोल्यात १३ हजारांवर मोकाट कुत्री असून अनेकंना शहराबाहेरील जंगलात नेऊन सोडले जाते. गेल्या पाच वर्षांत पाच हजार कुत्र्यांचे लसीकरण आणि दोन हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. येथील शासकीय रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतलेल्याची संख्या वर्षांला सुमारे १३०० आहे. मात्र गेल्या एक दीड वर्षांत त्यामुळे कुणी दगावल्याच्या घटना नाही. राज्यात विविध शहरे स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून त्यात विदर्भातील नागपूर आणि अमरावतीचा समावेश आहे. या स्मार्ट सिटीसह अन्य शहरांत कुत्र्यांचा सुळसुळाट कायम राहिला, तर त्यावरही ‘स्मार्ट’ विचार होणे आणि त्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न करण्याचीही गरज आहे.
राम भाकरे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabies scare nagpur
First published on: 27-01-2017 at 01:03 IST