सकाळी चहा पिणे झाल्यावर मी खाली बागेत जाते. फुले तोडण्यासाठी बागेत चक्कर मारताना सहजच घराला प्रदक्षिणा होते. समोरच्या हिरवळीवर अनवाणी पावलांनी शतपावली करते. दवभरल्या, लुसलुशीत गवताचा मुलायम स्पर्श सुखवून जातो. मग मी विसावते हिरवळीवरच्या कॅशियाच्या झाडाखाली. वाऱ्याची आल्हाददायक झुळुक मन प्रसन्न करते. माझी नजर समोरच्या दृश्यावर स्थिरावते. पावसाचं पाणी अडविण्यासाठी केलेलं छोटंसं तळं. तळ्याच्या मधोमध एक आणि काठावर एक अशी दोन बोरीची झाडं. त्या झाडांच्या झुकलेल्या फांद्यांवर स्वच्छंदपणे बागडणारे छोटे पक्षी, ते लव्ह बर्ड्स, आम्ही त्यांना फुलचुंबे म्हणतो. अलगद या फांदीवरून त्या फांदीवर जाताना दिसणारं त्यांचं ते मोहक रुपडं, मनाला मोहित करतं.
तळ्याच्या काठावरचं हिरवं गवत, त्यानंतर लांबवर पसरलेली छोटी झुडपं आणि त्या पलीकडचे उंचउंच वृक्ष जंगलाचा आभास निर्माण करतात. त्या झाडांच्या पलीकडून डोकावणाऱ्या उंचउंच इमारती, पलीकडच्या शहरी वस्तीची जाणीव देतात. त्या दोन्हीच्या मधून, परिसराच्या शांततेला भेदत, रेल्वेचे इंजिन शिट्टी मारते अन् दिमाखात पुढे सरकतं. सगळे डबे त्याच्यामागे निमूटपणे जात असतात. झाडांच्या मधल्या रिकाम्या जागेतून ती धावणारी गाडी थोडीशी दिसते. प्रत्येक गाडीचा बाज निराळा. मालगाडी असेल तर धडाडधडाड आवाज करणार. सुपरफास्ट गाडय़ा असतील तर डौलात, अजिबात आवाज न करता. समोर आलेली गाडी समजत पण नाही. क्वचित प्रसंगी, समोर सिग्नल नसल्यास, शांतपणे उभी राहिलेली गाडी पाहताना, त्या इंजिन ड्रायव्हरची मन:स्थिती काय असेल, असा विचार मनात घोळत राहातो.
ऋतू हिरवा ऋुतू बरवा, या गीताचे स्मरण करून देणारी हिरवाई. हिरव्या रंगाच्या किती छटा असाव्यात? फिक्का, कोवळा हिरवा, पोपटी, गडद मखमली हिरवा, पाचूचा हिरवाकंच रंग, तो हिरवा रंग, मन तृप्त होईपर्यंत डाळ्यांत साठवावा. हिरव्या गालिच्यावर उमटणाऱ्या फुलपाखरी वेलांटय़ा. पिवळसर, पोपटी, पांढरी छोटी फुलपाखरे, त्याहून मोठी काळ्यावर, जांभळ्यावर, लाल, हिरवी, निळी, पिवळी, नक्षी असलेली मोठी फुलपाखरे, परिसर जिवंत करून सोडतात. मधूनच आकाशात बगळ्यांची माळ फुलते. त्यातलाच एखादा बगळा पाण्याच्या काठावर उभा राहून अलगद त्यातील मासळी टिपून घेतो. त्या नीरव शांततेत, जमिनीवर बसलेला पाच-पन्नास चिमण्यांचा थवा हवेत झेपावतो, तेव्हा त्यांच्या पंखांचा आवाज, शांतता भेदत जातो.
थोडय़ा लांबच्या झाडावरून, भारद्वाज पक्ष्याचा आवाज बऱ्याचदा कानी येतो आणि कधी तरी अवचित आपल्या भगव्या पंखांचा पसारा सावरीत तो समोर गवतावर अवतीर्ण होतो. कधी निळकंठाची निळी जोडी अलगद खाली उतरते. फाल्कन, किंग फिशर, तर कधी विविध रंगांचा साज ल्यालेला, नजरेत भरणारी लाल चोच आणि डोक्यावर छोटासा तुरा असलेला सुतार (वूडपेकर) आपलं लक्ष आकर्षित करतो. बुलबुल, साळुंक्या, झाडांच्या झुकलेल्या फांद्यांवर रांगेत बसून झोके घेतात. क्वचित कोकिळेची साद कानी येते, पण ती दिसत नाही.
खारोटय़ा खाली जमिनीवर येऊन, सावध पवित्रा घेत, दबक्या पावलांनी पुढे सरकत अगदी पायापर्यंत येऊन पोहोचतात. एखाद्या दमट, ओलसर सकाळी, ‘लडिवाळ थवे राघूंचे, रानात भरारत जाती, पंखात मऊ ओलेते आभाळ लपेटुन घेती’ ह्य बाकीबाब बोरकरांच्या ओळींची आठवण देणारे, पोपटांचे थवे अज्ञाताकडे उडत जाताना दिसतात. नजरेने त्या पोपटांचा वेध घ्यावा, तर पलीकडचे प्रचंड मोठे बाभळीचे वृक्ष, त्यांच्या शेंडय़ांवर उमललेली पिवळीधमक फुले, वृक्षांनी सोन्याचा मुकुट धारण केल्यासारखी भासतात. निसर्गाच्या ह्या संपूर्ण किमयेमध्ये हरवून जाताना सहजच समाधी लागते. ‘एक्सटसी ऑफ समाधी! सकाळच्या त्या शांत रमणीय वेळी, मला तो समाधीचा अत्युच्च आनंद अनुभवायास मिळतो.
मी स्वत:तच हरवून जाते.
स्वाती शहाणे – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain
First published on: 04-09-2015 at 01:27 IST