खेळ म्हटल्यावर खिलाडू वृत्ती ही अपरिहार्य बाब झाली. पण ऑलिम्पिकसारख्या तुमचा शारीरिक-मानसिक कणखरतेचा कस पाहणाऱ्या सर्वोच्च स्पर्धामध्येही कधी कधी खिलाडू वृत्तीला तिलांजली दिली जाते आणि खेळांबरोबरच वादही रंगत जातात..
खेळ हा पूर्वी मनोरंजनाचा भाग होता. निखळ आनंद मिळवण्यासाठी खेळ खेळला जायचा. पण कालांतराने जिंकण्याची ईर्षां एवढी टोकाला गेली की काहीजण खेळाच्या मैदानाला युद्धभूमी समजायला लागले. खेळात व्यावसायिकता आली आणि जिंकण्यासाठी वाट्टेल ते करायचे व्यसन वाढत गेले. सर्वोत्तम ठरण्यासाठी अनैतिक मार्गही वापरले गेले आणि वादविवादांची स्पर्धाच सुरू झाली. सध्या तर हे वाद न्यायालयामध्ये नेण्याची फॅशनही पाहायला मिळते. सुशील कुमार आणि नरसिंग यादवचा वाद हे याचे ताजे उदाहरण.
सुशील कुमार हा भारताचा सर्वोत्तम मल्ल. आतापर्यंत देशाला दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकून देणारा एकमेव खेळाडू. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य, लंडनमध्ये रौप्य, तर आता रिओसाठी त्याच्यापुढे लक्ष्य होते सुवर्णपदकाचे. पण त्याचे वजनी गट रद्द करण्यात आले. त्याने वजन वाढवले आणि नरसिंग यादवच्या वजनी गटामध्ये सामील झाला. पण दुखापतींमुळे तो या वजनी गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊ शकला नाही. दुसरीकडे नरसिंगने विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आणि ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका मिळवली. अशा रीतीने पदक पटकावून ऑलिम्पिकची प्रवेशिका मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. प्रथेनुसार नरसिंग ऑलिम्पिकमध्ये खेळायला हवा. पण सुशीलने आपण सारख्याच वजनी गटात असून देशाला ऑलिम्पिक पदके मिळवून दिली आहेत, अशी भूमिका मांडत नरसिंगबरोबर चाचणी स्पर्धा घ्यावी आणि जो या स्पर्धेत जिंकेल त्याला ऑलिम्पिकला पाठवले जावे, अशी मागणी केली. पण त्याची ही भूमिका भारतीय कुस्ती महासंघाने मान्य केली नाही. न्यायालयातही त्याच्या बाजूने निकाल लागला नाही.
तर दुसरीकडे ऑलिम्पिकला काही दिवसच उरले असताना नरसिंग यादव राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध संस्थेने (नाडा) घेतलेल्या चाचणीत दोषी आढळला. आता नरसिंग हे माझ्याविरुद्ध रचलेले कटकारस्थान असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे ऑलिम्पकसाठी पाठवणाऱ्या खेळाडूंची यादी भारताने १५ जुलैला पाठवली असल्यामुळे जर नरसिंग दोषी आढळला तर त्याच्याऐवजी सुशील कुमारला पाठवण्याची शक्यता धुसरच आहे.
ऑलिम्पिकला अशा वादांची परंपराच आहे. १९०८ साली अमेरिकेचा नावाजलेला धावपटू जॉन कारपेंटरला ब्रिटिश खेळाडू विन्डहॅम हॉल्सवेलचा मार्ग अडवल्याप्रकरणी शर्यतीमधून बाद ठरवण्यात आले. अंतिम फेरीत अमेरिकेच्या विल्यिम रॉबिन्स आणि जॉन टेलर यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे हॉल्सवेलला शर्यतीशिवाय विजेता घोषित केले गेले. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये अंतिम फेरीविना दिले गेलेले हे एकमेव पदक.
१९१२ च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या जिम थॉर्पने पँटाथलॉनध्ये सुवर्णपदक पटकावले होते, पण यापूर्वी तो व्यावसायिक बास्केटबॉल लीगमध्ये खेळला होता. हे नियमबाह्य़ असल्यामुळे त्याचे सुवर्णपदक काढून घेऊन रौप्यपदक विजेत्याला द्यायचे ठरवले. पण त्या रौप्यपदक विजेत्याने या गोष्टीला नकार दिला. अखेर १९८३ साली जिमच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना हे पदक देण्यात आले. १९१६ सालचे ऑलिम्पिक जर्मनीमधील बर्लिनमध्ये घेण्याचे ठरवले होते, पण पहिल्या महायुद्धामुळे ते रद्द करावे लागले. त्यामुळे हे ऑलिम्पिक अॅमस्टरडॅम येथे आयोजित करण्यात आले, पण ऑस्ट्रिया, बल्गेरिया, जर्मनी, हंगेरी आणि तुर्कस्थान यांना स्पर्धेचे निमंत्रणच देण्यात आले नाही. हा रोष त्यानंतरच्या १९२४ च्या ऑलिम्पिकमध्येही कायम राहिला. पण या वेळी फक्त जर्मनीला स्पर्धेचे निमंत्रण पाठवले गेले नाही. त्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये स्वीडनच्या पाव्हो नुरमी या खेळाडूने ऑलिम्पिकसाठी देशाकडून जास्त पैसे घेतले, या कारणावरून त्याला स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले. १९३६ चे जर्मनीच्या बर्लिनमधील ऑलिम्पिक सर्वात वादग्रस्त ठरले. कारण त्या वेळी जर्मनीमध्ये हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर यांची राजवट होती. स्पेनने या ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास नकार दिला, अशीच काहीशी परिस्थिती अमेरिकेचीही होती. आर्यलडनेही स्पर्धेवर बहिष्कार घातला. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला हिटलरच्या उपस्थितीने साऱ्यांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत अमेरिकेचा लांबउडीपटू जेस ओव्हेन्सने पदक जिंकले. पदक देण्यासाठी आलेल्या हिटलरने जेसशी हस्तांदोलन केले नाही आणि हे प्रकरण सर्वात जास्त गाजले. या स्पर्धेत सायकलिंगच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या टोनी मेर्कन्सकडून काही चुका झाल्या, पण तरीही त्याला सुवर्णपदक देण्यात आले. १९४० चे ऑलिम्पिक जपानच्या टोकियोमध्ये घेण्याचे निश्चित झाले होते. पण जपानच्या सरकारने सिनो-जॅपनीज युद्धामुळे आम्ही हे ऑलिम्पिक आयोजित करू शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे हे ऑलिम्पिक रद्द करण्यात आले. त्यानंतरचे ऑलिम्पिक दुसऱ्या महायुद्धामुळे खेळवण्यात आले नाही.
१९५६ च्या ऑलिम्पिकवर सात देशांनी विविध कारणांमुळे बहिष्कार टाकला होता. १९६४ साली जपान आणि उत्तर कोरिया यांनी आपले खेळाडू ऑलिम्पिकला पाठवले नाहीत. कारण १९६३ साली झालेल्या एका स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कौन्सिलने या दोन्ही देशांच्या खेळाडूंवर बंदी आणली होती, त्याचा निषेध म्हणून या दोन्ही देशांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी न होण्याचे ठरवले. या ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिकेवर बंदी घालण्यात आली, त्यानंतर १९९२ साली ही बंदी उठवण्यात आली. १९८२ साली म्युनिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकमध्ये इस्राइलच्या संघाला पॅलेस्टिनच्या अतिरेक्यांनी बंधक बनवले होते, यामधील ११ खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांची या अतिरेक्यांनी हत्या केली. १९८० साली मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवर अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांनी बहिष्कार घातला होता. जवळपास ६२ देश या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले नाहीत. त्याचा वचपा रशियाने त्यापुढच्या म्हणजेच १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये काढला. हे ऑलिम्पिक लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केले होते. त्या वेळी रशियासहित त्यांच्या चौदा मित्रराष्ट्रांनी बहिष्कार घातला. १९८८ मध्ये सेऊलमध्ये झालेल्या ऑलिम्पिकवर उत्तर कोरियाने बहिष्कार घातला तर सहा देशांनी आपले खेळाडूच स्पर्धेसाठी पाठवले नाहीत. याच ऑलिम्पिकमध्ये कॅनडाचा धावपटू बेन जॉन्सनने सुवर्णपदक पटकावले खरे, पण उत्तेजक सेवनात तो दोषी आढळला आणि गालबोट लागले. त्याचबरोबर सदोष पंचगिरीमुळेही ही स्पर्धा चर्चेत राहिली. २००० साली झालेल्या ऑलिम्पिकलाही उत्तेजक सेवनाचा फटका बसला, त्याचबरोबर स्पर्धेचे आयोजनही चांगले नसल्याचे प्रदर्शनास आले. त्यानंतर आजतागायत उत्तेजक, सदोष पंचगिरी आणि यजमान देशाबद्दल बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत.
काही देश ऑलिम्पिकमध्ये आपला गट तयार करून जातात आणि त्याचा फटका खेळाला बसतो. यामध्ये प्रगत राष्ट्रांची संख्या अधिक आहे. आपल्या शत्रुराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक असेल तर जगासमोर त्यांच्या नावावर बट्टा कसा लावता येईल, याचीही रणनीती आखली जाते. हे असेच चालू राहिले तर ऑलिम्पिकमधले वाद कधीच संपणार नाहीत. आपण आपल्या खेळामुळे जगातील तमाम क्रीडारसिकांना आनंद द्यायला हवा आणि तो आनंद स्वत:ही उपभोगायला हवा. तुम्ही खेळाचा आनंद घेता तेव्हा तुमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होत असते आणि त्याचा आनंद चाहत्यांनाही मिळत असतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने खेळ आणि त्याचा आनंद यापुरताच विचार केला तरच ही स्पर्धा यशस्वी होऊ शकते.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com