डॉक्टरच खरे हिरो…

…त्यांच्या अथक परिश्रमांना कितीही सलाम ठोकले तरी ते अपुरेच ठरतील.

प्रतिकात्मक छायाचित्र

-सुनिता कुलकर्णी
आज १ जुलै, आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. डॉक्टरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी देशभर डॉक्टर दिन साजरा केला जातो. जागतिक डॉक्टर दिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिन वेगवेगळ्या तारखांना साजरे केले जातात. ३० मार्च हा जागतिक डॉक्टर दिन असतो तर आजचा दिवस आपल्या देशात डॉक्टर दिन म्हणून साजरा होतो.

सगळं काही ठीक असतं, तर आजच्या दिवशी कुठे कुठे डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे लेख प्रसिद्ध झाले असते आणि कुठेकुठे फुलं देऊन त्यांचे आभार मानले गेले असते.

पण करोनासारख्या सूक्ष्म विषाणूने इतकी उलथापालथ केली आहे की डॉक्टर या व्यवसायाला, शब्दाला इतर कशापेक्षाही जास्त महत्त्व आलं आहे. करोना रुग्णांमुळे संभाव्य संसर्गाची शक्यता असतानाही फक्त डॉक्टरच नाही तर वैद्यकीय पैशामधले इतरही लोक आपला जीव पणाला लावून या अदृश्य शत्रूशी मुकाबला करताहेत. ज्याच्यावर कोणतंही औषध उपलब्ध नाही की, अजून लस सापडलेली नाही अशा आजाराच्या महासाथीशी मुकाबला करणारे डॉक्टर हेच आज मानवतेचे खरे हिरो आहेत. मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या त्यांच्या अथक परिश्रमांना कितीही सलाम ठोकले तरी ते अपुरेच ठरतील.

प्रचंड संख्येने येणारे रुग्ण, अपुऱ्या सोयीसुविधा अशा परिस्थितीत आपल्याकडचे डॉक्टर नव्हे तर सगळे वैद्यकीय कर्मचारीच कोविडयोद्धे होऊन जीवनमरणाच्या रणांगणावर उभे आहेत.

आपल्याकडचा १ जुलै रोजीचा डॉक्टर्स डे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिपीनचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक थीम ठरवली जाते आणि तिच्यावर काम केलं जातं. गेल्या वर्षी डॉक्टरांना केल्या जाणाऱ्या मारहाणीला अटकाव घालणं यासंदर्भात थीम होती. यावर्षीची थीम अजून जाहीर झालेली नाही. पण हे मात्र खरं की डॉक्टर या व्यवसायाचं महत्त्व सगळ्यांनाच अधिक तीव्रतेने पटलं आहे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशात डॉक्टरांची संख्या ४७ हजार ५२४ होती. दर सहा हजार ३०० लोकांमागे एक डॉक्टर उपलब्ध होते. २०१८ च्या एका आकडेवारीनुसार आता आपल्याकडे दर हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर उपलब्ध असतात. त्यामुळे दर हजार रुग्णांमागे एक डॉक्टर हे जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेलं प्रमाण आपण २०१८ मध्येच गाठलं आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The doctor is the real hero msr

ताज्या बातम्या