सुनिता कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्या म्हणजे तुम्ही, आम्ही आपण सगळेच. जगाच्या तुलनेत देश म्हणून आपण लोकसंख्येने भरभक्कम आहोत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली लोकसंख्या ३३ कोटींच्या आसपास होती. त्यानंतरच्या ७० वर्षात आपण १३८ कोटींपर्यंत पोहोचलो आहोत. चीनची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे. पण आपण या बाबतीत चीनची बरोबरी करण्यासाठीचा काळ फार दूरचा नसेल. मार्च २०२० पर्यंत जगाची लोकसंख्या ७.८ अब्ज होती. भारत आणि चीन हे दोन्ही देश मिळून जगाची ३६ टक्के लोकसंख्या व्यापतात.

या दोन्ही देशांच्या लोकसंख्येकडे अचंब्याने बघायची जगाची पद्धत होती आणि आहे. पण १९९१ मध्ये आपण व्यापारासाठी जगाला आपली दारं उघडली आणि आपली लोकसंख्या जगावरचा बोजा न उरता ते आपलं मनुष्यबळ म्हणून गणलं जायला लागलं. युरोपातल्या एकेका देशाएवढी लोकसंख्या आपल्या एकेका राज्यात असल्यामुळे ही लोकसंख्या म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी प्रचंड मोठी बाजारपेठ होती आणि आहे.

आपल्याकडची लोकसंख्या आणि गरिबीबाबत दोन सिद्धांत मांडले जातात. एक सांगतो की लोकसंख्या जास्त आहे म्हणून आपल्याकडे गरिबीचं प्रमाण जास्त आहे तर दुसरा सिद्धांत सांगतो की आपल्याकडे गरिबी खूप आहे म्हणून लोकसंख्या जास्त आहे. कारण जास्त मुलं झाली तर कमावणारे हात वाढतील असा विचार गरीब माणूस सहसा करतो.

लोकसंख्या, आरोग्य, दारिद्र्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. तो नीट लक्षात घेतला जावा, जागतिक पातळीवर लोकसंख्येच्या प्रश्नाचा नीट विचार व्हावा यासाठी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठरवली जाते. यंदा करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर जगभरात स्त्रिया तसंच मुलींचे आरोग्य तसंच हक्कांची सुरक्षा करणं ही जागतिक लोकसंख्या दिनाची थीम आहे. कारण टाळेबंदी अशीच आणखी सहा महिने सुरू राहिली तर जगभरातल्या निम्न तसंच मध्यम आर्थिक स्तरातल्या ४७ दशलक्ष स्त्रियांना कुटुंबनियोजनाची आधुनिक साधनं उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याचा परिणामी ७ दशलक्ष नकोशी गर्भधारणा लादली जाईल असं मानलं जात आहे.

तर दुसरीकडे करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर ‘बेबी बूम’ होणार नाही आणि पुढच्या वर्षभरात जगातला जन्मदर घटलेला असेल अशीही मांडणी केली जात आहे. १९१८-१९ च्या स्पॅनिश फ्ल्यूच्या काळात तसंच १९३० आणि २००८ च्या मंदीच्या काळात जगातला जन्मदर घटलेला होता. हाताला काम नाही, हातात पैसा नाही, आहे तो रोजगार टिकवण्याचं आव्हान, करोनाकहरात रुग्णालयात जाणं धोक्याचं आहे, जन्माला आलेल्या बाळाचं या काळात लसीकरण होईल की नाही माहीत नाही अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सुजाण जोडपी या काळात कुटुंबनियोजन अधिक जाणीवपूर्वक करतील आणि त्यामुळे पुढील वर्षदोन वर्षात जगात सगळीकडेच जन्मदर घटलेला असेल असं मानलं जात आहे.

असं झालं तर त्याचं स्वागतच आहे कारण पृथ्वीवरची वाढती लोकसंख्या पृथ्वीवरच्या पर्यावरणावर ताण निर्माण करते आहे. वाढत्या लोकसंख्येला इंधन जास्त लागत असल्यामुळे प्रदूषण वाढतं. या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. लोक वाढले की जास्त जागा लागते, त्यामुळे जंगलतोड वाढते. वाळवंटीकरणाचं प्रमाण वाढतं. शेतातून जास्त उत्पन्न घेण्यासाठी खतांचा वापर वाढतो.

या सगळ्याचा पृथ्वीवरच्या पर्यावरणावर ताण येऊन त्याचा समतोल ढासळतो आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today is world population day population means you we and we all are aau
First published on: 11-07-2020 at 11:52 IST