ताम्हिणी घाटातील आदरवाडी गावातून साठी पायऱ्यांच्या वाटेने जायचं. पुढे कोकणात उतरून घोण्याच्या दांडाने चढून घाटावरील कोंडेथर गावी परतायचं, असा यावेळचा बेत होता. 

‘‘सकाळी आठ वाजता बघा टाटाचं गेट बंद व्हायचं. आम्ही ही ३०-३५ माणसं सकाळी सकाळी या समोरच्या दांडाने उतरून जायचो. कधी उशीर झाला तर पळत जायचो. २० मिनिटांत खाली पोहोचायचो. पाच मिनिटं जरी उशीर झाला तरी गेट बंद व्हायचं. मग कामावर घ्यायचे नाहीत.’’ हे सांगत असताना बाळूदादांची नजर समोरच्या पोळाच्या दांडावर खिळली होती. आणि नकळत ते जुन्या आठवणीत रंगून गेले होते. ताम्हिणी घाटातील आदरवाडी गावातून साठी पायऱ्यांच्या वाटेने आम्ही कोकणातील विळे-पाटणूस गावाकडे निघालो होतो (आदरवाडी हे गाव पुण्याजवळील ताम्हिणी घाटात पौडच्या पुढे ४५ किमीवर आहे.) या भागातील इतर काही घाटवाटा तसेच डोंगर भटकताना आम्ही या आधीही आदरवाडीतील बाळूदादांकडून माहिती घेतली होती. आज आम्ही साठी पायऱ्यांच्या वाटेने कोकणात उतरून जाणार आहोत आणि घोण्याच्या दांडाने चढून घाटावरील कोंडेथर गावी परतणार आहोत हे कळल्यावर दादांनी स्वत:हून सोबत येण्याची इच्छा दर्शविली.

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

‘‘मी येतो संगतीला म्हणजे तुम्हाला आमचा परिसर नीट दाखवता येईल बघा’’ म्हणत दादा गावात कोयता आणायला निघून गेले. दादांनी सोबत येण्याला आमचा काही आक्षेप असणे शक्यच नव्हते, उलट त्यांच्या सोबतीमुळे आम्हाला वाटेची, परिसराची व्यवस्थित माहिती मिळणार होती, त्यामुळे आम्हीही खूश झालो. गावाजवळील हॉटेलच्या बाजूने पश्चिमेकडे जाणारी पायवाट आम्ही धरली. वाटेवर असाण्याच्या झाडावरील नुकत्याच पिकायला लागलेल्या फळांची चव आम्हाला चाखायला मिळाली. ही पायवाट आधी गावाच्या पाठीमागील गवताळ माळावर जाते. या भागाला खरप म्हणतात. येथून वाट थेट डोंगर उताराला लागते. गावाच्या पाठीमागच्या पठाराला लागून एक थोडा पुढे आलेला डोंगर आहे. गावकरी त्याला सोंड म्हणतात. साठी पायऱ्यांची वाट या सोंड डोंगराच्या उजवीकडील नाळेच्या तळात उतरते. गावातून निघाल्यावर मात्र आम्ही थेट साठी पायऱ्यांच्या वाटेला न लागता या वाटेच्या आधीच्या दांडाकडे वळलो. दादांना आम्हाला सगळा परिसर नीट फिरवायचा होता. त्यामुळे त्यांनी आम्हाला गावामागील जांभूळ टेपावर नेले. येथून कोकणातील गावं तसेच आजूबाजूचा परिसर व्यवस्थित न्याहाळता येतो. येथून पलीकडे दिसणारी डोंगररांग, त्यावरून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा पाहून दादांना एकदम भूतकाळ आठवला आणि पलीकडच्या डोंगररांगेतून कोकणातील भिरा गावी उतरणाऱ्या पोळाच्या दांडाबद्दलच्या त्यांच्या आठवणी ते सांगू लागले.

पूर्वी (ताम्हिणी घाट माग्रे पुणे-माणगाव रस्ता होण्यापूर्वी) घाटावरील डोंगरवाडी, आदरवाडी, कोंडेथर इत्यादी गावांचा बाजार हा कोकणातील विळे अथवा माणगाव या गावात भरायचा. त्यामुळे या गावांना जोडणाऱ्या अनेक पायवाटांचं जाळं या डोंगर-दऱ्यांतून विणलं गेलं. आदर वाडीतील ग्रामस्थ त्यातील साठी पायऱ्यांची वाट कोकणातील विळे गावी जाऊन बाजार भरण्यासाठी वापरत असत. त्यामुळे ही वाट अवघड जागी दगड रचून, झाडांची छाटणी वगैरे करून अंगावर सामान वाहून नेणे सोयीस्कर होईल एवढी सुकर केली जायची. पूर्वी लोकांकडे गोधनही बरंच असायचं. त्यामुळे जनावरांना लागणारा चारा गोळा करण्यासाठीही या भागात गावकऱ्यांचं वरचेवर येणं-जाणं होत असे. कोकणातील डोंगरपायथ्याला असलेल्या गवताळ माळावर गुरांना चरण्यासाठी नेले जाई. त्यामुळे गुरांचा वावर होऊ शकेल अशाही वाटा येथे तयार केल्या गेल्या.

दादांसोबत पठारावर फिरून आम्ही घोण्याच्या टेपाचा डोंगर, चोर पायऱ्यांची वाट, कोंडीची व्हळ, गोपाळ डुंगीसारखे डोंगर आणि त्यावरून उतरणाऱ्या वाटा पाहून साठी पायऱ्यांच्या वाटेकडे वळलो. कोण्या धनिकाने आदरवाडी ते कोंडेथर या गावांच्या पाठीमागील (पश्चिम उताराकडील) डोंगरउताराचा सलग लांबच्या लांब पट्टा बऱ्याच वर्षांपूर्वी गावकऱ्यांकडून विकत घेतला असून या पट्टय़ात जेसीबीच्या साह्य़ाने डोंगर कोरून कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या पायवाटा जागोजागी तुटल्या आहेत. तसेच पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे उतारावरून आडवी जाणारी वाट अजिबात दिसत नव्हती. दादा अंदाज घेत गवतातून वाट काढत पुढे चालले होते. आदरवाडीतून थेट साठी पायऱ्यांच्या वाटेला जायचे झाले तर कुंभळीच्या व्हळीच्या वरच्या बाजूने उतरून गावापासून २० मिनिटांत साठी पायऱ्यांच्या सुरुवातीपर्यंत पोहोचता येते. पण आम्ही आज दादांसोबत भटकत परिसराची माहिती करून घेत येथवर यायला चांगला तासभर वेळ लावला होता. जेसीबी लावून रस्ता केल्यामुळे जुन्या पायवाटेचा काही भाग तुटलाय. रस्ता करताना फोडलेला कातळ रस्त्याच्या कडेला तसाच उतरणीला लोटून दिला गेलाय. या दगडावरून उतरून आम्ही साठी पायऱ्यांच्या वाटेच्या माथ्यावर पोहोचलो. सोंड डोंगराच्या उजवीकडच्या नाळेच्या तळाशी ही साठी पायऱ्यांची वाट उतरते. डोंगरउतारावरून काढलेल्या या वाटेमुळे नाळेतील दगड धोंडे पार करत उतरण्याचे कष्ट वाचतात. वाटेची सुरुवात ज्या घळीतून होते तेथे सती देवीचं ठाणं आहे. कधीकाळी येथील देव म्हणून पुजल्या जाणाऱ्या दगडांना शेंदूर लावला जात असावा. पण इतक्यात तरी कोणी नव्याने शेंदूर लावला नसल्याने दगडातील देवपण पूर्ण झाकोळले गेले आहे. देवीच्या दिवाबत्तीसाठी आणलेल्या तेलाच्या बाटल्या मात्र झाडाच्या खोडाजवळ  पडलेल्या दिसल्या. येथून पुढे दगड रचून पायऱ्यासदृश वाट केली असून यामुळेच या वाटेला साठी पायऱ्यांची वाट असं नाव मिळालं असावं. या पट्टय़ातून उतरताना समोर दिसणारे कडय़ावरून कोसळणारे कुंभळीच्या व्हळीचे जोड धबधबे मन प्रसन्न करून जातात. वाटेच्या दोन्ही बाजूने वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी आणि त्यावर भिरभिरणाऱ्या पाखरांचा किलबिलाट ऐकत आम्ही अर्ध्या तासात वाटेचा पहिला टप्पा उतरून सोंड डोंगरालगतच्या नाळेच्या तळाशी पोहोचलो. येथून पुढची वाटचाल वाहत्या पाण्याच्या शेजारूनच होते.

पावसाळ्यानंतर सह्य़ाद्रीत बहुतांश प्रवाह आटतात. पण मुळशी जलाशयाच्या सान्निध्यामुळे येथील झरे जानेवारी महिन्यापर्यंत प्रवाहित असतात असे दादांकडून कळले. या ओहोळाला पुढेही एक-दोन टप्पे असून पाणी जेथे कडय़ावरून खाली कोसळते तेथे धबधब्याच्या डावीकडून खाली उतरणारी वाट आहे. येथे आणखी एका छोटय़ा कातळ टप्प्यावर चार-पाच कोरीव पावटय़ा दिसल्या.

तासभर ओढय़ाशेजारून उतराई सुरू ठेवल्यावर आम्ही कोकण सपाटीला पोहोचलो. सपाटीला कंबरभर उंचीचं गवत वाढलं होतं. यातूनच वाट काढत आम्ही ओढय़ा शेजारून वाटचाल सुरू ठेवली. थोडय़ा अंतरावर ओढय़ाने उजवीकडे वळण घेतलं तेथे आम्ही ओढा ओलांडला आणि पलीकडच्या तीरावरील जंगलाकडे चढत जाणारी पायवाट धरली. येथून असंच ओढय़ाला समांतर चालत गेल्यास अर्ध्या पाऊण तासात विळे गावात पोहोचता येतं. आम्हाला घोण्याच्या दांडाने चढून जायचं असल्यामुळे आम्ही सनसवाडीच्या दिशेला म्हणजेच दक्षिणेकडे वळलो. जंगलात शिरलेली पायवाट अर्ध्या तासात आम्हाला बेडगावच्या धनगर वाडय़ात घेऊन गेली. या परिसरात प्रशस्त गवताळ माळ असल्यामुळे वर्षांचा बराच काळ गुरांना पुरेसा चारा-पाणी येथे उपलब्ध होतो. त्यामुळे ३०-४० गुरं बाळगून असलेली धनगरांचे दोन बिऱ्हाडं येथे वास्तव्याला आहेत. बाळूदादांची ओळख असल्यामुळे आम्हाला येथे ताकाचा पाहुणचार लाभला. भरपूर गोधन बाळगत असल्यामुळे हे वाडेही चांगले ऐसपस बांधलेले आहेत. वाडय़ाच्या परिसरात भाताची खाचरे आहेत. तूर डाळीचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेताच्या चतकोर भागात स्वत:पुरती तूर डाळही पेरलेली पाहायला मिळाली. घाटावरील मंडळी मात्र येथे आली की येथील गावकऱ्यांकडे मिरचीची मागणी करतात. घाटावर मिरची चांगली होत नाही. कोकणातील दमट वातावरणात मिरची चांगली निपजते. येथील जवळ जवळ प्रत्येकच घरात परसबागेत मिरचीची लागवड केली जाते. बेडगावात दारोदारी वाळत ठेवलेल्या लालबुंद मिरच्या पाहायला मिळाल्या.

नुकतीच कापणी झाल्यामुळे गावात भाताच्या झोडपणीचं काम जोरात सुरू होतं. तर मळणी झालेली मंडळी भात पाखडत होते. गावात शिरताच या मंडळींनी कोण, कुठून अशी चौकशी केली. त्यामुळे जरा वेळ विसावून गावकऱ्यांशी चार गप्पा रंगवल्या आणि त्यातूनच या परिसरातील इतर दोन घाट वाटांची माहिती पोतडीत पडली. त्यासोबत गावानजीक असलेली देवाची कोंड गावकऱ्यांनी हौसेने सोबत येऊन दाखवली.

पाण्याच्या प्रवाहामुळे मऊ दगडाची झीज होऊन चमत्कारिक घळी निर्माण होतात. या देवाच्या कोंडीजवळही अशीच अद्भुत घळ पाहायला मिळाली. खडकाची असंतुलित झीज झाल्यामुळे येथे डोहाचं तीन भागांत विभाजन झालं आहे. आणि या तीन भागांना कमी झीज झालेल्या खडकाच्या िभती विभाजित करतात. येथील प्रपात छोटासाच असला तरी प्रवाहाला चांगला वेग आहे. प्रपाताच्या वरच्या भागात आणखी एक उथळ डोह आहे. कोंडीच्या शेजारीच बायांचं ठाणं असून (ग्राम देवता) गावकरी या भागाचं पावित्र्य राखतात. येथे कोणीही पाण्यात उतरत नाही. डोहाच्या काही अंतरावर पादत्राणे काढून ठेवूनच डोहाच्या परिसरात प्रवेश केला जातो. भिऱ्याच्या देवडोहाचं झालेलं बाजारीकरण इथल्या ग्रामस्थांना अजिबात पटलेलं नाही. आपल्या गावच्या देवाच्या डोहाचं पावित्र्य राखणं हे ते कर्तव्य मानतात.

डोहाजवळ जरा वेळ विसावून आम्ही बेडगाव ग्रामस्थांचा निरोप घेतला आणि गावाच्या बाहेरील पाणवठय़ाच्या कडेने घोण्याच्या दांडाच्या दिशेने निघालो. खरं तर येथून डांबरी रस्त्याने सणसवाडी गाठून पुढे घोण्याच्या दांडाच्या वाटेकडे निघायचं होतं. बाळूदादा काही गेल्या १०-१२ वर्षांत या भागात फिरकले नव्हते. त्यामुळे गावातून नीट माहिती काढून मग पुढे जाण्याचा आमचा विचार होता. बेडगावातील ग्रामस्थांकडून पुरेशी माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही थेट घोण्याच्या दांडाची वाट धरली.

विळे – कोंडेथर मार्गावरील ताम्हिणी घाटाचा गाडी मार्ग जिथे नागमोडी वळणं घेतो त्याच्या अलीकडचा डोंगर म्हणजे घोण्या डोंगर आणि या डोंगराच्या दांडावरून चढणारी ही वाट म्हणून हिला घोण्याचा दांड म्हणून ओळखलं जातं. या परिसरातील कोकणातील गवताळ माळ ज्ञानदेव नावाच्या धनगराच्या मालकीचा होता. काही वर्षांपूर्वी त्याने येथील सगळी जमीन विकली. या वाटेच्या पायथ्याशी या ज्ञानदेव धनगराचा वाडा होता. दादा त्याचा शोध घेत गवतातून वाट काढत पुढे जात होते. जमीन खासगी मालकीची झाल्यामुळे या माळावर आता ठिकठिकाणी तारेचं कुंपण घालण्यात आलं आहे. आम्ही ही कुंपणं चुकवत ज्ञानदेवाच्या वाडय़ाचा शोध घेत चालत होतो. या कुंपणाच्या जंजाळात एक कौलारू वाडा दिसला. चारी बाजूने कुंपणांनी वेढलेला वाडा पाहून खूप वाईट वाटलं. एकेकाळी या संपूर्ण माळाचा मालक असलेल्या ज्ञानदेवाला स्वत:च्या वाडय़ावर जायला आता बलगाडी जाऊ शकेल एवढीही वाट नाही. वाडा बंद असला तरी वापरत असल्याचं जाणवलं. आवारात चारा आणि ओलं शेण दिसत होतं. वाडय़ाच्या पुढय़ात उभं राहून दादांनी आम्हाला घोण्याच्या डोंगरउतारावरील एक आंब्याचं झाड दाखवलं. त्या आंब्याच्या झाडाच्या पायथ्यातून वाट वर चढते हे दादांना पक्कं माहीत होतं. पण हा आंबा गाठायला आम्हाला तारेची आणखी तीन कुंपणं ओलांडावी लागली. कुठेतरी एखादी वाकवलेली तार शोधून कुंपणातील त्या चिंचोळ्या फटीतून कुंपण पार करायला फार त्रास झाला. कुंपण पार केली खरी पण पुढे वाट काही मिळेना. सगळीकडे नुसतं गवत माजलेलं. मग उगाच वाट शोधायच्या भानगडीत न पडता आम्ही झाडांच्या जाळीत शिरलो आणि थेट खुणेचं आंब्याचं झाड गाठलं.

आंब्याच्या झाडाच्या शेजारून वर चढणारी अस्पष्टशी पायवाट मिळाली. कुठे रचलेले दगड तर कुठे झाडांवर केलेले जुने कोयतीचे वार शोधत आम्ही चढायला सुरुवात केली पण अर्ध्याच तासात वाट पूर्णपणे हरवली. आम्ही घनदाट जंगलाच्या पट्टय़ात पोहोचलो होतो. आणि आता पुढील सगळा डोंगरउतार विरळ झाडांच्या जंगलाचा आणि डोक्यावर दोन फूट उंच वाढलेल्या गवताने व्यापला होता. निदान वर्षभरात तरी येथे मनुष्य वावर अजिबात झाला नसावा. हातातील काठीने गवत बाजूला सारत आम्ही उभा दांड चढायला लागलो. दाट गवतातून पुढे सरकणं खूपच कष्टदायक होतं. त्यात त्या गवताच्या पात्यावरील लव अंगाला घासून खाज सुटत होती. वर चढता चढता मधेच पुसटशी पायवाट मिळाली. पण गवत इतकं वाढलं होतं की पायाखालची वाट त्यात पूर्ण झाकोळून गेली होती. अर्धा पाऊण तास गवताशी ही झुंज सुरू ठेवल्यावर आम्ही एका सपाटीवर पोहोचलो. येथून दांडाचा मार्ग सोडून डावीकडच्या घळीकडे गेल्यावर मळलेली पायवाट मिळाली. कोंडेथर गावातील गुरांना येथे चरण्यासाठी आणलं जातं, त्यामुळे येथून पुढची वाट चांगली मळलेली होती.

पलीकडचा डोंगर फोडून त्यातून चांगला चार-पाच फुटी प्रशस्त रस्ता बनवलेला पाहून आश्चर्य वाटलं. कोकणातून चढणारी जवळ जवळ बुजलेली पायवाट घाटावर इतकी रुंद होईल अशी अपेक्षाच नव्हती. १०-१५ मिनिटांत आम्ही ताम्हिणी घाटाच्या डांबरी रस्त्यावर पोहोचलो. घोण्याचा दांड तशी छोटीशी चढाई आहे. तासाभरात कोकणातून कोंडेथर गावात चढून येणं सहज शक्य असलं तरी गवतातून वाट काढण्यात बरेच श्रम पडल्यामुळे आम्हाला दीड दोन तास लागले होते. या वाटेवरून चढत असताना अगदी ज्ञानदेवाच्या वाडय़ापासूनच विळे-ताम्हिणी डांबरी रस्त्यावरून पळणाऱ्या गाडय़ाचे आवाज आपली साथ देत असतात. बरेचदा हे आवाज इतक्या जवळून येतात की असं वाटतं आता पाच मिनिटांत आपण रस्त्यावर बाहेर पडणार. घोण्याच्या डोंगराच्या पलीकडून डांबरी रस्ता फिरत असल्यामुळे डोंगरात आवाज घुमून असे भास होतात.

आम्ही कोंडेथरच्या दिशेने चालत असताना दोन गावकरी दादा रस्त्यात भेटले. त्यांच्याकडे मजेतच वाट वापरात न ठेवल्याने आम्हाला त्रास झाल्याबद्दल तक्रार केली असता त्यांच्याकडून नवीनच माहिती मिळाली. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घाटावरून कोकणात जाणारी मेंढपाळ मंडळी आपल्या मेंढय़ांचे कळप या वाटेने कोकणात उतरवतात. त्यांचे फेरे सुरू झाले की वाट आपोआप मोकळी होते. त्यामुळे गावकरी वाट मोकळी करण्याच्या फंदात पडत नाहीत. ऐकावं ते नवलच. डोंगर-दऱ्यांत आज डांबरी रस्त्यांचं जाळं विणलं गेलंय, त्यामुळे माणसांनी या वाटा टाकल्या असल्या तरी गुरं, शेळ्या घेऊन सतत स्थलांतर करत फिरणाऱ्या धनगर, मेंढपाळ मंडळींनी आणि त्यांच्या सोबत वणवण फिरणाऱ्या त्यांच्या मुक्या सोबत्यांनी अजून या वाटांची साथ सोडली नाहीये तर. यांच्या वावरामुळे का होईनात सह्य़ाद्रीतील काही घाट वाटांना आजही वर्षांतून काही काळ मोकळा श्वास मिळतोय हेही नसे थोडके.

डॉ. प्रीती पटेल response.lokprabha@expressindia.com