गणेश मूर्ती बनवणं ही कला आहे. त्यासाठी अनेक कलाकार प्रसिद्ध आहेत. वाडवडिलांचा हा वारसा पुढे नेणाऱ्यांमध्ये आजकालच्या काळात मुली-स्त्रियादेखील मागे नाहीत. म्हणूनच अशा काही स्त्री मूर्तिकारांच्या कामाचा मागोवा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योती मोरे यांनी जोपासली मूर्तिकला
गुजरातमध्ये माहेरी असताना मूर्तिकाम, रंगकाम याच्याशी कोणताही संबंध आलेला नव्हता. परंतु घरातील वातावरण धार्मिक असल्याने सासरी अशा कलेसाठी ते पूरक ठरले. त्यामुळेच विवाहानंतर अवघ्या एकदोन वर्षांत सर्वकाही शिकणे सोपे गेले. गणेशाची मूर्ती तयार करताना मनामध्ये भक्तिभाव निर्माण होणे महत्त्वाचे असते. सासरकडील सर्व मंडळींमध्ये तो पुरेपूर असल्यानेच आमच्या मूर्ती इतरांपेक्षा वैशिष्टय़पूर्ण ठरत असाव्यात..
गेल्या वीस वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामात कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर स्वत:ला झोकून देणाऱ्या नाशिक येथील ज्योती शांताराम मोरे यांचा हा अभिमान वृथा म्हणता येणार नाही. सिडकोतील राणाप्रताप चौक परिसरात राहणाऱ्या ज्योतीताईंचे नाव नाशिकमधील निवडक महिला मूर्तिकारांमध्ये विशेषत्वाने घेतले जाते. मोरे कुटुंबीयांच्या गणेश मूर्ती केवळ भारतातच नव्हे तर, अमेरिकेतही पोहोचल्या आहेत. यंदा अमेरिकेत २० तर अबुधाबी येथे एक मूर्ती त्यांनी पाठवली आहे. ‘निव्वळ शाडू मातीच्या मूर्ती’ ही ओळख निर्माण करणाऱ्या मोरे कुटुंबातील एक प्रमुख सदस्य म्हणून ज्योतीताई यांनी आज स्थान मिळविले आहे.
गणेश मूर्ती तयार करणे हे एका व्यक्तीचे काम नव्हे, त्यासाठी कुटुंबातील सर्वाचाच हातभार लागत असतो. ज्योतीताईंनी नेमके हेच हेरले. विवाहानंतर पतीसह सासूबाई वत्सला व घरातील इतर सदस्यांनी त्यांना मूर्ती तयार करण्याचे शिक्षण दिले.
‘प्रारंभी केवळ माती गाळणे, मळणे, गोळे तयार करणे यांसारखी कामे मी करीत असे. हळूहळू मूर्ती तयार करावयास शिकले. त्यानंतर मूर्तीला रंग देण्यासही सुरुवात केली. आता सर्व कामांची सवय झाली आहे. सहजपणे ती करता येतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तीना रंग देणे हे अधिक जोखमीचे काम होय. कारण या मूर्तीवर ब्रश काहीसा अडखळत फिरतो. परंतु असे असले तरी प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे डोळे अधिक तेजस्वी दिसतात,’ असेही ज्योतीताईंनी नमूद केले.
मूर्तीना रंगकाम करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यासाठी घरातील सर्व मंडळींशी सल्लामसलत केली जाते. आपल्या मूर्तीना दिलेल्या रगांमुळे जलप्रदूषणात भर पडणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे ज्योतीताईंचा भर पर्यावरणपूरक रंग वापरण्यावरच राहिला आहे. आवड निर्माण झाल्यानेच आपण हे काम मनापासून करीत असून यापुढेही करीत राहू, असे सांगणाऱ्या ज्योतीताईंचा मोठा मुलगा मयूर हा जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालयात शिल्पकला अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. तर, लहान मुलगा गणेश हाही गणपतीची चित्रे आणि मूर्ती तयार करण्यात रस दाखवू लागला आहे. त्यासाठी कोणीही दबाव टाकलेला नाही. मुलांमध्ये हे गुण घरातील वातावरणामुळे आपोआपच आले असल्याचा उल्लेखही ज्योतीताई आवर्जून करतात.
पूनम भोईरला घराचा भक्कम पाठिंबा
मनातील भावना जर उत्कट असतील तर कोणत्याही मूर्तिकाराच्या स्पर्शात मातीचा गोळा जिवंत करण्याची ताकद असते. तुम्ही जे काही कराल ते आतून आलं पाहिजे. अशा वेळी निर्माण होणारी कलाकृती खऱ्या अर्थाने परिपूर्ण होऊ शकते..
सुमारे ४५ वर्षांपासून नाशिकच्या नाटय़ व सांस्कृतिक क्षेत्रावर आपला अजोड ठसा उमटविणारे ज्येष्ठ मूर्तिकार, सजावटकार व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष नेताजी भोईर यांची परंपरा पुढे चालविणारी त्यांची नात पूनम सुरेश भोईर हिची ही भावना. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालयात ‘पोर्ट्रेट’ विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देशभरातील पाच जणांमध्ये निवड झालेल्या पूनमला मूर्तिकला व सजावटीचा वारसा घरातूनच मिळाला. कित्येक वर्षांपासून संपूर्ण घराने व्यवसाय म्हणूनच हा वारसा स्वीकारला असल्याने त्यातील बारीक सारीक गोष्टी पूनमला आपोआपच कळत गेल्या. त्यामुळे मूर्तिकाम व रंगकामाची नक्की सुरुवात कोणत्या वर्षांपासून करण्यात आली, हे पूनमला आठवतही नाही. पूनम जे जमेल ते काम करत गेली, चुका होत असतील तर आजोबा आणि वडिलांकडून मार्गदर्शन मिळत गेले. चुकल्याशिवाय शिकता येणार नाही ही आजोबांची शिकवण तिला अधिक उपयोगी पडली.
गणेशासह मातीच्या इतर मूर्ती तयार करण्याचे प्रमाण संपूर्ण भोईर कुटुंबियांनी गेल्या काही वर्षांपासून कमी करून देखाव्यांसाठी लागणाऱ्या फायबरच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. ‘मूर्ती कोणतीही असो, तिचे डोळे हा भाग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. प्रेमळ, क्रोधित, दयाळू यापैकी तुम्हाला जे भाव दाखवायचे असतील ते निव्वळ डोळ्यांमधून प्रकट करू शकता. त्यासाठी रंगसंगतीला अधिक महत्त्व आहे. उदाहरणार्थ पाणीदार डोळे दाखविण्यासाठी निळ्या रंगाचा वापर करणे आवश्यक ठरते. मुळात महिलांना उपजतच सौंदर्यदृष्टी पुरुषांपेक्षा अधिक असल्याने डोळ्यांमधील भाव ते अधिक चांगल्या प्रकारे वाचू शकतात, मांडू शकतात’ असे मत पूनमने व्यक्त केले.
आजोबांप्रमाणेच पूनम नाटय़क्षेत्रातही कार्यरत आहे. मूर्तिकाम, सजावट, रंगकाम या सर्वाचा संबंध नाटय़कलेशी नकळत का होईना येत असतो. त्यामुळे एखाद्या देखाव्यातील विषयांप्रमाणे मूर्तीच्या चेहऱ्यावर हावभाव दाखविताना पूनमला अभिनयाची चांगलीच मदत होते. मनात कला असेल तर, मूर्तिकाम किंवा रंगकाम करताना ती आपसूकच बाहेर पडते, हे मत मांडणाऱ्या पूनमच्या पाठीमागे संपूर्ण भोईर परिवार भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे यापुढे चित्रकलेला प्राधान्य देणार असली तरी या क्षेत्रापासून दूर जाणे आपणांस जमणार नाही, अशी भावना पूनमने व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women ganesh idol makers
First published on: 06-09-2013 at 12:47 IST