अलीकडेच २१ जून हा जागतिक योगदिन साजरा झाला. योगसाधनेचं उज्ज्वल भवितव्य त्यातून अधोरेखित झालं. याच योगसाधनेला असलेल्या प्राचीन वारशाचे पुरावे शिल्पकलेतूनही सापडत आहेत.

भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात २१जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून प्रथमच साजरा केला जात आहे. संपूर्ण विश्वाने एकमताने योगाचे महत्त्व मान्य केलेले आहे. शरीर-स्वास्थ्य ही मानवी जीवनातील सर्वात मोठी संपत्ती समजली जाते. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ ही उक्ती तर आपल्यापैकी खूप लोकांनी बालपणापासूनच ऐकली असेल. निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही चांगले असायला हवे. आधुनिक युगातील ताण-तणावाच्या जीवन शैलीमुळे साहजिकच मनुष्य निरनिराळ्या आजारांच्या आधीन होत चाललेला दिसत आहे. यामुळे मनुष्याचे आयुष्य अधिकच गुंता-गुंतीचे व किचकट होऊन बसले आहे. असेही म्हटले जाते की निरोगी शरीरातच निरोगी मनाचा निवास असतो. उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली म्हणून संपूर्ण विश्वच योग अभ्यासाकडे मोठय़ा आशेच्या नजरेने पाहू लागले आहे. योग अभ्यास संपूर्ण मानव जातीची प्राथमिक गरज बनली आहे म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी याची दखल घेऊन २१ जून हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. योग अभ्यासामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही लाभते. आज हजारोंच्या संख्येने जगभर योग शिकवणाऱ्या लहान-मोठय़ा संस्था विखुरलेल्या आपल्याला दिसून येतात.
योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हा अमूल्य ठेवा भारतीय संस्कृतीने केवळ आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण जगभर याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुम्बकम’ची धारणा प्रत्यक्षात आणली आहे. योग विद्येच्या अनेक प्राचीन खाणा-खुणा आपल्याला भारतीय संस्कृतीत दडलेल्या दिसतात. अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत हा प्रवाह अव्याहतपणे निरंतर प्रवाहित होत आहे. योग परंपरेला अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध तर आहेतच, शिवाय काही पुरातात्त्विक अवशेषही आपल्याल्या पाहायला मिळतात. अशा या पुराव्यांची एक झलक आपणास गुजरातमधील दभोई येथे तेराव्या शतकात ‘महुडी गेट’वर कोरलेल्या वेगवेगळ्या योगिक क्रियांतून दिसून येते.
दभोई हे ठिकाण बडोदा शहरापासून ३४ किलोमीटर अंतरावर वसलेले मध्यकालीन तटबंदीयुक्त एक नगर आहे. या किल्ल्याची निर्मिती तेराव्या शतकात ‘वाघेला’ राज्यकर्त्यांनी केली. दभोई नगराला चारी बाजूंनी चार विशाल दरवाजे आहेत. या चार दरवाजांपैकी उत्तरेकडील ‘महुडी’ किंवा ‘चम्पानेरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दरवाजाच्या आतील भागावर नाथ-सिद्धांची योगसाधना करत असतानाची वेगवेगळी सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांमध्ये नाथ-सिद्धांची विविध आसने, ध्यानधारणा व समाधी लावून बसल्याची साधारणत: ८४ शिल्पे आपणास दिसतात. नाथ-संप्रदायातील श्रेष्ठ गुरू आदिनाथ, मत्स्येन्द्रनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ व इतर काही नाथ-योग्यांची शिल्पेही खूपच सुंदर आहेत. यामध्ये आदिनाथांना अर्ध पद्मासनात तर गोरक्षनाथांना गोमुखासनात दाखविले आहे.
याशिवाय या दरवाजाच्या डाव्या बाजूवर नाथ-सिद्धांना गोमुखासन, अर्ध-पर्यंकासन, मलासन, उत्कटासन, नावासन, ऊध्र्वमुख पश्चिमोत्तानासन, एक-पाद शीर्षांसन, बाल गुणासन, वृक्षासन, वज्रासन, द्विपाद शीर्षांसन, लोलासन इत्यादी तर उजव्या भागावर शीर्षांसन, दक्षिण पाद पवनमुक्तासन, सूर्यासन, ऊध्र्व सिद्धासन, अजरासन इत्यादी आसने शिल्पांकित केली गेली आहेत. दोन्ही बाजूंना मिळून साधारणत: ४० आसनांचे प्रकार दर्शविले आहेत तर बाकी शिल्पे ध्यान-धारणा करत असतानाची आहेत. विशेष म्हणजे या शिल्पांमध्ये नाथ-सिद्ध संप्रदायाशी संबंधित स्रिया ही योगिक क्रिया करत असताना दाखविल्या गेल्या आहेत. काही आसने ही खूप क्लिष्ट दिसत असली तरीही ती करत असताना शिल्पकारांनी योग्यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा या खूपच सहजपणे दिग्दर्शित केलेल्या दिसतात. हे सर्व योगी योगविद्येत किती प्रवीण होते हे यावरून दिसून येते.
नाथ-सिद्ध संप्रदायात योगाभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग-साधना हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अभिन्न भाग होता. नाथ-सिद्धांनी योग विद्येवर पुष्कळ ग्रंथ लिहिलेले आहेत. आजही हे ग्रंथ आपणास पाहायला व वाचायला मिळतात. यामध्ये विवेक मार्तंड, गोरक्षशतक, खेचरी विद्या, योगबीज, चंद्रावलोकन, अमरौघशासनम, हठरत्नावली अशा काही ग्रंथांची नावे सांगता येतील. यात ‘स्वात्माराम’ या योग्याने साधारणत: १४-१५ व्या शतकात लिहिलेला ‘हठयोगप्रदीपिका’ हा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथही नमूद करता येईल. नाथ-योग्यांच्या या ग्रंथांमध्ये महुडी येथील बऱ्याच आसनांची नावे व संदर्भ आलेले दिसतात. मध्यकाळात सुफी संतांनी ही नाथ-योग्यांची योगिक क्रिया स्वीकारल्याचे अनेक दाखले इतिहासात पाहायला मिळतात. दभोई येथील योग शिल्पे व अन्य पुरातात्त्विक अवशेष आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केवळ राष्ट्रीय वारसाच नव्हे तर जागतिक वारसा म्हणून संबोधता येतील अशी आहेत. ही योग शिल्पे शतकानुशतके उभी आहेत आणि भविष्यातही विश्वाला योग विद्येची प्रेरणा देत उभी राहतील. आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने या योग-स्मारकाला त्याच्याभोवताली असणाऱ्या रहदारीच्या विळख्यातून मुक्त करून त्याचे योग्य प्रकारे संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे.
योग विद्या ही केवळ विशिष्ट जनसमुदायापुरती मर्यादित नसून संपूर्ण विश्वाची संपत्ती आहे. त्याचा सांभाळ करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जातिधर्म, स्त्री-पुरुष, पंथ-समुदाय असा भेदाभेद न करता आतापासून केवळ एवढेच म्हणावे लागेल की ‘करो योग, रहो निरोग.’
विजय सरडे response.lokprabha@expressindia.com