|| मनीषा टिकेकर

प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एक इतिहास असतो अशी माझी धारणा आहे. मग तो किती का साधारण वा सूक्ष्म असेना! माणसांतल्या परस्परसंबंधांनी, त्यांच्या विचारांच्या औपचारिक वा अनौपचारिक आदानप्रदानाने, कृतींनी समाजाचा, देशाचा इतिहास घडत असतो. इथे बेरजेच्या राजकारणासारखा बेरजेचा इतिहास अभिप्रेत नाही. मग इतिहास संशोधकाचं आयुष्य काय असतं? तर- इतिहासाची साधना! या साधनेतूनच इतिहास संशोधकाला ढोबळ इतिहासालादेखील सूक्ष्मतेने बघण्याची, विश्लेषण करण्याची, इतिहासात सूत्र शोधण्याची दृष्टी आणि इतिहास लेखनाची बैठक मिळते. प्रा. जे. व्ही. नाईक यांनी आयुष्यभर अशाच साधनेचा पाठपुरावा केला.

प्रोफेसर नाईकांच्या इतिहास लेखनपद्धतीची (हिस्टोरीओग्राफी) माझ्या मते तीन सूत्रे होती. लिओपोल्ड व्हॉन रांके याच्यासारख्या विद्वानाप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासाकरिता त्यांनी ‘प्रायमरी सोअर्सिस’वर- म्हणजे प्राथमिक अस्सल कागदपत्रांवर भर दिला. इतिहासाचं ‘कथा-कथना’त रूपांतर करण्याला त्यांचा पूर्ण विरोध होता. तसेच इतिहास आणि मिथकं जोडणं त्यांना नापसंत होतं. ‘१९ व्या शतकातला महाराष्ट्रातील प्रबोधनाचा कालखंड’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय राहिला. संशोधनात प्रबोधनाची प्रक्रिया केंद्रस्थानी असल्याने साहजिकच त्यांचे संशोधन व्यक्तिकेंद्री न राहता ‘विचार’(आयडिया)केंद्रित झाले. वैचारिक प्रगतीने समाजात आधुनिकता कशी येते, हे तपासून पाहण्याचा नाईकांचा अभ्यासाचा उद्देश होता. त्यांनी ही कल्पना कदाचित् जर्मन तत्त्वज्ञ जी. डब्ल्यू. एफ. हेगेल यांच्या ‘डायलेक्टिक्स’च्या संकल्पनेवर बेतली असावी. प्रोफेसर नाईकांवर फ्रान्समधल्या ‘अनाल’ स्कूल आणि त्यातले विख्यात इतिहासतज्ज्ञ फर्नाड ब्रॉडेल यांचाही प्रभाव असावा. प्रोफेसर नाईक बऱ्याच वेळा इटालियन तत्त्वचिंतक बेनेडेट्टो क्रोचे याचं एक महत्त्वाचं सूत्र उद्धृत करत. ते म्हणजे- ‘ऑल हिस्ट्री इज कन्टेम्पररी हिस्ट्री.’ म्हणजे आपण इतिहासाचं विश्लेषण वर्तमानकालीन नजरेतून करतो.

जेव्हा नाईकांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनकालीन इतिहास संशोधनाला हात घातला तेव्हा त्यांनी महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, रामकृष्ण भांडारकर आदी विभूतींवर नव्याने लेखन तर केलंच; परंतु महाराष्ट्राला फारसे परिचित नसलेले भास्कर पांडुरंग, डॉ. भाऊ दाजी लाड आणि र. धों. कर्वे यांच्यावर संशोधनात्मक लिखाण करून त्यांनी त्यांना प्रकाशात आणलं. जे. व्हीं.चं बहुतेक लिखाण इंग्रजीत असायचं. त्याचा एक फायदा असा झाला की महाराष्ट्राबाहेरच्या इतिहास-समाजशास्त्रप्रेमींना हे कळलं, की महाराष्ट्रालाही बंगालसारखी प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. फक्त त्याची जातकुळी वेगळी आहे, एवढंच. त्यांची र. धों. कव्र्यावरची शोधपुस्तिका माझ्या खास आवडीची आहे. तसंच त्यांचं महाराष्ट्राच्या १९ व्या शतकाच्या इतिहासाला दुसरं मोठं योगदान म्हणजे त्यांचं ‘परमहंस सभे’वरचं संशोधन. त्याआधी परमहंस सभेचं नाव क्वचितच कोणी मराठी माणसाने ऐकलं असावं.

मला इतिहासाची आवड अगदी शाळेपासून. माझी डिग्री जरी राज्यशास्त्रातली असली तरी इतिहासावर माझं अतिशय प्रेम. तसंही राज्यशास्त्राची मूळं  इतिहासातच रुजलेली आहेत. इतिहासाएवढंच मला इतिहास- लेखनशास्त्रात गम्य होतं. या लेखनशास्त्राशी जी काही माझी तोंडओळख झाली ती जे. व्हीं.मुळेच. माझी आणि अरूणची (टिकेकर) प्रोफेसर नाईकांशी ओळख झाली १९८४ मध्ये. त्यानंतर पाच वर्षांनी- म्हणजे १९८९ पासून सतत २०-२२ र्वष ते रविवारी सकाळी आमच्या घरी यायचे. सकाळी दहाच्या सुमारास दरवाजा वाजला की समजावं- नाईक आले आहेत. काही वेळेस मला वाटायचं की, सभा-समारंभात भेटणारे जे. व्ही. आणि घरी येणारे जे. व्ही. या दोन भिन्न व्यक्ती आहेत. एरवी औपचारिक, प्रसंगी संपूर्ण साहेबी पोशाखात वावरणारे नाईक आमच्या घरी येताना पूर्णपणे वेगळ्या वेशात येत. अर्धा डझन तरी खिसे असलेल्या कागरे पँटवर कधी रंगीत टी-शर्ट वा मोठय़ा उठावदार चौकडीचा शर्ट, तर कधी थोडासा भडक रंगाचा झब्बा आणि जीन्स. पायात चपला किंवा अक्षयकुमार जाहिराती करतो तसे सँडल्स. पण हा झाला केवळ पोशाखी फरक.

घरी येणारे जे. व्ही. मृदू, मवाळ, जंटल आणि भावुक. संशोधनातली तर्कनिष्ठता त्यांच्या रोजच्या वागण्यात असायचीच असं नाही. नाईकांचं बोलणं, गप्पा मारणं मित्रांच्या अड्डय़ात काहीसं अघळपघळ आणि सलगीचं. एकदा मैत्र जमलं की ते सरळ ‘अरे-तुरे’वर यायचे. नाईक माणसांत, समाजात रमणारे, सर्व समारंभांना शक्यतो हजेरी लावणारे आणि तेवढेच कुटुंबवत्सल आणि प्रेमळ. आपल्या अपत्यांचा त्यांना सार्थ अभिमान होता. कुटुंबाबद्दल बोलताना ते हळवे असायचे. आपल्या वैयक्तिक वा व्यावसायिक अडचणी वा चढउतारांबाबत ते खुलेपणाने बोलत. त्यांचं जीवन म्हणजे खुलं पुस्तक असल्यासारखंच होतं. त्यांच्या पत्नी नीलाताई या शांत स्वभावाच्या आणि काहीशा अबोल. गणित आणि संख्याशास्त्र या दोन्ही विषयांत वेगवेगळी एम्. एस्सी. केलेल्या. अनेक वर्षे त्यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये अध्यापन केलं. घर, मुलं आणि विशेष म्हणजे नाईकांना सांभाळून! ‘नटसम्राट’ नाटकात एक वाक्य आहे ना की- ‘बायको म्हणजे नवरारूपी गलबतासाठी बंदर असतं’- ते नीलाताई आणि जे. व्हीं.ना अगदी चपखलपणे लागू पडतं. नाईकांच्या काहीशा ‘बोहेमियन’ (कुठल्याही नकारात्मक अर्थाने नव्हे!) आयुष्याला आणि गोवेकरी सुशेगातपणाला नीलाताईंनी व्यवस्थित हाताळलं.

नाईकांचा शिष्यगणही मोठा. सर्व चांगल्या शिष्यांबद्दल जे. व्हीं.ना आत्मीयता आणि कळकळ असे. विद्यार्थी त्यांच्या घरी ये-जा तर करायचेच, पण नाईकही त्या जवळच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सदस्य बनायचे. मला तर नेहमी वाटायचं की, जे. व्ही. आणि त्यांच्या शिष्यांसाठी प्राचीनकाळची गुरुकुल पद्धतीच योग्य होती. मीदेखील रविवारच्या गप्पांत शिष्याच्या वृत्तीनेच सामील होत असे. आणि नाईक त्यात माझे ‘मेंटॉर’ बनले. त्यांचं इंग्रजी वाचन अफाट आणि भाषाही उत्तम जाणत. अनेक मोठय़ा लेखकांची, पंडितांची अवतरणे त्यांना सहज मुखोद्गत असत. त्यांनी सांगितलेल्या अशा अनेक वचनांपैकी जस्टिस रानडे यांचं ‘मनाईज, इक्वलाइज आणि स्पिरिच्युअलाइज’ हे वचन माझं सर्वात आवडतं आहे. सेमिनार्स व कॉन्फरन्ससाठी मी लिहीत असलेल्या शोधनिबंधावर मी त्यांच्याशी चर्चा करत असे. काही वेळेस नाईक मला संकल्पना तपासून घेण्यास सांगत, तर काही वेळेस वाक्यरचना सुधारून देत असत.

जे. व्हीं.बरोबर बहुतेक त्यांचे शिष्योत्तम डॉ. अरविंद गणाचारीही यायचे. मग कधीमधी सुधीर कसबेकर, के. ज. पुरोहित, विजय तापस हेही यायचे. सर्वाच्या चर्चा सुरू झाल्या की आमच्या घरातली ध्वनिप्रदूषणाची पातळी खूपच वाढलेली असायची. मग चर्चा करून दमल्यावर इतरजण निघून गेले की जे. व्ही. अरूणला म्हणायचे, ‘चल, गाणी लाव रे!’ नाईकांना जुन्या हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची अतिशय आवड आणि हिंदी चित्रपट संगीताचे भोक्ते. मधुबाला आणि वहिदा रहेमान या आम्हा तिघांच्या आवडत्या अभिनेत्री. मधुबालाची अर्धा डझन गाणी पाहून झाल्यावर जे. व्ही. आणि अरूणच्या चेहऱ्यावर ‘त्या’ वयातही ‘..कलिजा खलास झाला!’ हे भाव पाहून मला हसू यायचं.

गाण्यांइतकेच नाईक खाण्याचेही आणि वाईनचेही शौकीन. तळलेले चमचमीत पदार्थ, सामिष भोजन आणि उत्तम ब्रँडची वाईन असली की जे. व्ही. खूश. अरूण सामिष आहार अथवा मद्य घेत नसल्याने ते बऱ्याच वेळा वैतागून म्हणायचे, ‘तू काहीच कामाचा नाहीस रे!’

आमच्या अशा अनेक रविवारच्या सकाळ खूप मजेत गेल्या. या सर्व चर्चातून मला खूप काही शिकायला मिळालं. केवळ माझ्या माहितीतच भर पडली असं नव्हे, तर या चर्चा विश्लेषणात्मक आणि बौद्धिक वादविवाद स्वरूपाच्या असल्याने माझ्या ज्ञानातही मोलाची भर पडली.

जे. व्हीं.ना आयुष्यात बरेच मानसन्मानही मिळाले. आणि ते रास्तच होते. ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावर ते खूश होतेच, तसेच कोलकाताच्या राजा राममोहन लायब्ररीच्या मंडळावर त्यांची दोनदा नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आनंद झाला होता. ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’च्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाला ते न चुकता जात. या काँग्रेसमध्ये नॅशनलिस्ट इतिहासकार आणि प्रागतिक इतिहासकार असे दोन गट आहेत. जे. व्ही. कुठल्याच गटात नसायचे. नाईक कुठल्याही भाषणाचं वा परिसंवादाचं आमंत्रण आलं की सहसा नाकारत नसत. आपण केलेलं संशोधन लोकांपर्यंत पोहोचावं अशी त्यांची इच्छा असे. आणि युनिव्हर्सिटी टीचर म्हणून अशा परिसंवादात भाग घेणं आपलं कर्तव्यच आहे असं ते मानत. परंतु त्यांना इतरांच्याही मान-सन्मान समारंभाला, भाषणांना जायला मनापासून आवडत असे. अरूणचे थोरले बंधू अरविंद टिकेकर यांच्याही समारंभाला नाईक उपस्थित राहत असत.

जे. व्ही. आणि अरूण सख्खे आणि सच्चे मित्र! अरूणच्या अकस्मात निधनानंतर जे. व्ही. खूपच विषण्ण झाले होते. दर १०-१२ दिवसांनी मला फोन करून आपली खिन्नता विदित करायचे आणि ‘तुला काही मदत लागली तर मला सांग..’ असं मनापासून आश्वासन द्यायचे. आज अरूण असता तर जे. व्हीं.चं जाणं त्यानेही खूप मनाला लावून घेतलं असतं. जे. व्हीं.वर भावपूर्ण लेख लिहिला असता आणि त्यांची आठवण काढत जुनी गाणी ऐकत बसला असता. म्हणूनच हा लेख त्या दोघांच्या मैत्रीस समर्पित..

tikekars@gmail.com