News Flash

ट्रिंग ट्रिंग..

गेली ३०-३५ वर्षे नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर डोळसपणे मुलुखगिरी केलेल्या एका भटक्याची मनोज्ञ निरीक्षणं.. देशविदेशातील माणसांबद्दलची, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींची.. अन् त्यांच्या जीवनजाणिवासंबंधीचीही!

| January 20, 2013 01:01 am

गेली ३०-३५ वर्षे नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर डोळसपणे मुलुखगिरी केलेल्या एका भटक्याची मनोज्ञ निरीक्षणं.. देशविदेशातील माणसांबद्दलची, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींची.. अन् त्यांच्या जीवनजाणिवासंबंधीचीही!
बेल वाजली. खडबडून जागा झालो. घडय़ाळात पाहिलं. चार वाजले होते. खिडकीबाहेर पाहिलं. लखलखीत ऊन पडलं होतं. इतक्या लवकर उजाडलं कसं, असा विचार करतो न करतो तोच ध्यानात आलं की, वास्तवात दुपारचे चार वाजले आहेत. म्हणजे कुरिअर आलं असणार. धडपडत उठून दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. बेल थांबून थांबून वाजतच होती. मग लक्षात आलं की, ती मोबाइलची रिंग होती. रिंगटोनचं आयुष्य संपण्यापूर्वी धावपळत जाऊन फोन उचलला.
‘‘तुमच्या घरात झुरळं खूप झाली आहेत ना?’’ पलीकडून घोगऱ्या आवाजात विचारणा झाली. झुरळांचा संदर्भ लक्षात घेता तो आवाज शेजारणीचा असणार, हे ओळखलं. बहुतेक आमच्या दरवाजाच्या फटीतून एखादं झुरळ बाहेर पडताना तिनं पाहिलं असावं. मी खजील होऊन म्हटलं, ‘‘हो. झाली आहेत थोडीफार.’’
‘‘आणि वाळवी पण लागलीय. शिवाय लाल मुंग्या, ढेकूण, कोळी आणि..’’
‘‘तुम्हाला कसं कळलं?’’ मी चकित होऊन विचारलं. नेहमीप्रमाणे घरात घुसून चौकशी करण्याऐवजी फोनवर का बातचीत चालवलीय, हे कळेना.
‘‘आमची कंपनी वाजवी दरात पेस्ट कंट्रोल करून देईल. सरकारद्वारा मान्यताप्राप्त डे अँड नाइट सíव्हस. शंभर टक्के गॅरंटी. उद्यापर्यंत करून घेतलंत तर दहा टक्के डिस्काऊंट भेटेल. किती वाजता पाठवू आमच्या माणसाला?’’
म्हणजे ही शेजारीण नाही. क्षणार्धात माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. रविवारी वामकुक्षी भंग केल्याबद्दल घोगऱ्या आवाजाची दणदणीत कानउघडणी करून मी फोन बंद केला.
हल्ली हे टेलिमार्केटिंगचं खूळ जबरदस्त फोफावलंय. वेळ नाही, काळ नाही. कधीही फोन वाजतो आणि आलिशान सेकंड होमपासून मामुली मिक्सर दुरुस्तीपर्यंतच्या ऑफर कानात घुसतात. मित्रानं सुचवलं, म्हणून ‘डू नॉट कॉल’ नोंदणी केली. काही प्रमाणात फरक पडला. पण अजूनही ‘गोवा सफरीची लॉटरी लागलीय तेव्हा चेकबुक घेऊन चहापानाला या,’ अशा प्रकारची प्रलोभनं येतच असतात.
काही दिवसांपूर्वी एका दोस्ताच्या घरी क्रिकेटची मॅच बघण्यासाठी मित्र मित्र जमलो होतो. दोस्ताचा फोन वाजला. फोन उचलून तो ‘हॅलो’ म्हणाला. त्यामुळे भारताच्या एका दिग्गज फलंदाजाचं लक्ष विचलित होऊन तो त्रिफळाचित झाला. आम्ही जाम वैतागलो. त्या कातरवेळी दोस्ताला पलीकडच्या साइडनं धनलक्ष्मीची ऑफर आली. त्यानं टीव्हीचा आवाज बंद केला आणि फोनचा लाऊडस्पीकर चालू केला.
‘‘तुम्हाला १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. अभिनंदन!’’
‘‘पण मी कधी मागितले होते?’’
‘‘तुमचं क्रेडिट रेटिंग झकास आहे, म्हणून आम्हीच ठरवलं.’’
‘‘पण माझ्याकडे क्रेडिट कार्डच नाही.’’
‘‘बरोब्बर! क्रेडिट कार्डाची ज्याला गरजच पडत नसते त्याची आíथक परिस्थिती झकासच असते ना?’’
‘‘म्हणजे मला पशांची गरज नाही, म्हणून तुम्ही मला १० लाख देऊन टाकताय?’’
‘‘बरोब्बर! मग कधी बनवायची लोन डॉक्युमेंट्स? उद्या सकाळी ११ वाजता चालेल?’’
दोस्ताला आता चेष्टा करण्याची लहर आली, ‘‘चालेल की. या बक्षिसाकरता माझी निवड केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. या रकमेतून मी सहकुटुंब वर्ल्ड टूर करून येईन. आम्ही तिथं भरपूर शॉिपग करू. दहा लाख रुपये काय आम्ही हां हां म्हणता फुंकून टाकू. उद्या सकाळी ११ वाजता बक्षिसाची रक्कम कॅशमध्येच पाठवा. पत्ता लिहून घ्या.’’
पलीकडून फोन कट झाला. आमच्यातला एकजण म्हणाला, ‘‘बरं केलंस. सारखी भुणभुण लावत असतात फोनवर- हे घ्या, ते घ्या. मी तर अस्सा झोडतो साल्यांना की, जन्माची याद राहिली पाहिजे. वैताग आलाय नुसता.’’ आम्ही माना डोलावल्या.
त्यानंतर एकदा बागेतल्या कट्टय़ावर बसून संध्यासमयीचं रंगीबेरंगी दृष्टिसौंदर्य न्याहाळत असताना शेजारी दोन विशीतली पोरं येऊन बसली. हल्लीची कार्टी बोलतात तरी काय म्हणून कान टवकारले. माझ्या शेजारचा सुका बोंबील म्हणत होता, ‘‘अजून पसे कमवत नाही, म्हणून घरी रोज राडा होतो. तुझ्या कंपनीत लावून घे ना मला! दिवसभर फोनवर बोलायचं आणि कस्टमर पटवायचे. लकी आहेस तू.’’
लकी उद्गारला, ‘‘मलाच पनवती लागलीय यार. उद्या महिना संपतोय. उद्याच्या एका दिवसात दोन कस्टमर फायनल झाले नाहीत तर सॉलिड लोचा होईल.’’
‘‘किती सॉलिड?’’
‘‘जॉब जाईल. महिन्यात दहा कस्टमर आणले नाहीत तर पगारच भेटत नाही. पुढच्या महिन्याला काढून टाकतात. तुला वाटतं, माझी लाइन लागलीय. पण बोलून बोलून आवाज तर पार ऑफ झालाय. शंभर लोकांच्या मिनतवाऱ्या केल्या तर एखाद्याला दया येते. मी तर हल्ली अक्षरश: गयावया करतो फोनवरून.’’
‘‘काय काम आहे सध्या तुझ्याकडे?’’
‘‘रिपेिरग. एसीपासून ओव्हनपर्यंतच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक आयटेमचं मेन्टेनन्स काँट्रॅक्ट देण्यासाठी कस्टमरांना फोनवरून पटवायचं. लोक जाम वैतागतात आपल्यावर. काय वाट्टेल ते बोलतात. शिव्यापण देतात. ऐकून घ्यावं लागतं रे. पोरी तर ढसाढसा रडतात. लेकिन अपना लक खराब चल रहा है, तो क्या करेंगे? मजबुरी है! दहावी पास गरीब पोरांना आणखी कसली नोकरी भेटणार? हा कॉल सेंटर सुटला की दुसरा कॉल सेंटर पकडायचा.’’
‘‘म्हणजे तुझा जॉब पर्मनंट नाही? मला वाटलं, तू त्या बडय़ा कंपनीतच नोकरीला लागलायस.’’
‘‘ओरिजिनल कंपनी बडीच असते रे. पण मार्केटिंगचं काम करायला ते लोक हल्ली स्वत:चा स्टाफ नेमत नाहीत. कंपनीबाहेरच्या एखाद्या कॉल सेंटरला कमी पशात कामाला लावतात. तिथं आमच्यासारख्यांना घेतात आणि इतके कस्टमर आणले तर इतका पगार देऊ, असं तोंडी सांगतात. म्हणजे जमलं नाही तर उद्यापासून येऊ नका, असं सांगायला ते मोकळे. मूळ कंपनीशी तर आपला संबंधच नसतो.’’
हे ऐकलं आणि मी हतबुद्धच झालो. लकी पोरानं सांगितलेला पगाराचा आकडा ऐकला आणि पोटात खड्डाच पडला. आपल्याकडच्या अशिक्षित मोलकरणीला चार ठिकाणी धुणीभांडी करून यापेक्षा जास्त पसे मिळतात. खुल्या अर्थकारणाचे वारे जोमात वाहू लागल्यानंतर रोजगार वाढले की असंघटित तरुणांची आर्थिक पिळवणूक होऊ लागली, हेच मला कळेनासं झालं. एक फरक मात्र पडला. तो असा की, हल्ली दिवसाच्या कोणत्याही प्रहरी यापकी कोणाचा फोन आला की मी न चिडता हळुवारपणे त्यांच्याशी बोलतो आणि त्यांची ऑफर मला नको असेल तर पुढच्या कॉलकरता त्यांना शुभेच्छा देतो.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2013 1:01 am

Web Title: a story on telemarketing
Next Stories
1 बोलगप्पा : कामापुरता
Just Now!
X