अंजली चिपलकट्टी – anjalichip@gmail.com

माणसांची मने भयमुक्त झाली तर आक्रमकतेतून होणारी हिंसाही हद्दपार होईल असं मानवी वर्तनाचे वैज्ञानिक म्हणतात. आक्रमकता वैश्विक नाही व अपरिहार्य तर अजिबात नाही, हे कशावरून? म्हणजे आपली आजी सांगते ना- ‘सर्वानी नीट वागा रे बाबांनो!’ असं ते भावनिक वगैरे विधान नाहीये, तर गंभीर अभ्यासांतून काढलेला तो निष्कर्ष आहे. कसं, ते पाहू.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

मन व शरीर हे एकमेकांवर परिणाम करतात वगैरे आपण ऐकून असतो. पण यांचा नेमका ‘इंटरफेस’ असतो कुठे आणि कसा? मन ही तर अशारीरीय गोष्ट आहे ना? मेंदूत स्रवणाऱ्या विविध रसायनांचा (हार्मोन्स/ एन्झाईम) एकत्रित परिणाम म्हणजेच आपलं मन असं ढोबळमानाने म्हणता येईल! ही जैव- रसायनं आपल्या जीवशास्त्राचा भाग असली तरी ती कोणती, किती, कधी स्रवणार, हे पर्यावरणातून मिळणाऱ्या संकेतांनुसार ठरतं.

यासंदर्भात शरीरांतर्गत तयार होणाऱ्या टेस्टोस्टेरॉन व डोपामाईन या दोन सुप्रसिद्ध संप्रेरकांची मेंदूतली कामगिरी ‘वेधक’ असते. टेस्टोस्टेरॉन स्त्री-पुरुष दोघांच्याही शरीरात बनते. पुरुषांमध्ये जास्त. आक्रमकतेचा संबंध बऱ्याचदा याच्याशी लावला जातो.. जो चुकीचा आणि घातकही आहे. टेस्टोस्टेरॉनचा उपयोग लैंगिक नियमनासाठी आवश्यक असतो. प्रयोग व निरीक्षणांतून असं लक्षात आलं आहे की टेस्टोस्टेरॉनच्या कमी-अधिक होण्याने आंतरिक आक्रमकतेच्या पातळीत फरक पडत नाही. मग आंतरिक आक्रमकता कशावर ठरते? आंतरिक म्हणजे नैसर्गिक नव्हे! ‘भवतालिक’ कारणांमुळे जी आक्रमकता आत्मसात केली जाते, ती! आक्रमक पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या पातळीपेक्षा पूर्वायुष्यात त्याला आक्रमकतेचे काय ‘एक्स्पोजर’ मिळालं आहे त्यावर त्याची वर्तणूक ठरते. याचा अर्थ पुरुषांमध्ये ही संप्रेरकं जैविकपणे जास्त स्रवतात हे खरे असले तरी त्यामुळेच ते नैसर्गिकपणे अधिक आक्रमक असतात, हा दावा खरा नाही. अधिक धोकादायक म्हणजे जितकं आक्रमकतेचं एक्स्पोजर अधिक, तितकी टेस्टोस्टेरॉनची गरज कमी! म्हणजे संप्रेरके माणसाच्या भवतालाची मर्यादा ओलांडत नाहीत!

ज्या समाजात आक्रमकता/ हिंसा प्रतिष्ठेची मानली जाते किंवा सहन केली जाते, तिथे आक्रमकतेचीही आंतरिक पातळी वाढते. त्याचे संस्करण होते. गंमत अशी की टेस्टोस्टेरॉनचा संबंध आक्रमकतेपेक्षा प्रतिष्ठेशी असतो! समजा, एखाद्या समाजात दान देणे प्रतिष्ठेचे मानले जाते, तर तिथे टेस्टोची पातळी वाढलेला पुरुष अधिकच उदार होतो. याचा अर्थ समाज जे प्रतिष्ठेचे मानतो त्यासाठी आपण आक्रमक होतो!

आता डोपामाईनविषयी- हे संप्रेरक मेंदूत तयार होतं. कधी? तर आपण केलेल्या एखाद्या कामाचे बक्षीस/ पावती (१ी६ं१)ि मिळणार असे वाटते तेव्हा. बक्षीस म्हणजे केलेल्या कामाचा, कृतीचा स्वीकार, योग्य पोच, परतावा! तर अशा बक्षिसाच्या अपेक्षेमुळे मिळणारा आनंद याच रसायनाचा परिणाम असतो. डोपामाईन हे फ्रंटल-कॉर्टेक्सच्या पेशींमधील सुसंवादाचे काम करते. याचा आक्रमकतेशी काय संबंध? तर तो असा की, भावनिक आवेग रोखण्याचे काम फ्रंकॉ अमिग्डालाशी बोलत राहून सतत करत असतो; डोपामाईन कमी झाले तर फ्रंकॉची क्षमता कमी होते. मग भावनिक आवेगातून अचानक उद्भवणारी आक्रमकता फ्रंकॉ रोखू शकत नाही. पण डोपामाईन कमी होण्याची कारणे काय? ती बऱ्याचदा सामाजिक असतात. उदा. समाजाकडून मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिसादामुळे, संधी नाकारली गेली तर, सतत प्रयत्न करूनही अपेक्षित परतावा (रिटर्न्‍स) मिळत नसेल तेव्हा डोपा कमी तयार होऊ लागते. म्हणजे इथे वर्तुळ पूर्ण होते! (इथे हे खूप सोपे करून लिहिले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.) संवेदनशील वयातील उपेक्षा, वाईट अनुभव किंवा अत्याचार यामुळे फ्रंकॉच्या विकासावर/ कामावर परिणाम होऊन अशा व्यक्ती भावनांना पटकन् बळी पडून आक्रमक होऊ शकतात.

अति ताण, वैफल्य, हताशा किंवा वेदना सहन करण्याची मर्यादा ओलांडली गेली की आक्रमकता वाढते. उंदराला सतत शॉक देत राहिलो तर ताण येऊन तो त्याच्या आसपासच्या दुसऱ्या उंदराचा चावा घेतो. एखाद्या ‘वरच्या’ श्रेणीच्या बबूनकडून मार खाल्लेला बबून त्याच्या ‘खालच्या’ श्रेणीतल्या बबूनवर राग काढतो. तसे केल्याने त्याचा स्वत:चा ताण कमी होतो म्हणे! म्हणजे ताण येण्याचे कारण एकीकडे आणि त्यामुळे वाढलेली आक्रमकता निघणार कोणा दुय्यम/ दुर्बल व्यक्तीवर! करोनाकाळात घरगुती हिंसेत वाढ झालेली दिसली ती याचमुळे. मग हे नैसर्गिक आहे की! घरातल्या इतरांनी हे सहन करण्यावाचून गत्यंतर नाही? तर ते तसे अजिबात नाही. आपल्या ‘भवताल’च्या समाजात कोणत्या गोष्टी ‘खपवून’ घेतल्या जातात त्यानुसार ताण/ आक्रमकतेचा ‘निचरा’ कसा करायचा, हे माणसे ठरवतात. एखादा समूह/ संस्कृती आक्रमकतेला काय वाट करून देते यावर बरेच अवलंबून आहे.

बेरोजगारी, गरिबीमुळे हिंसा वाढते, असे होते का? तसे असते तर बरेच गरीब लोक आक्रमक दिसले असते! याउलट, ते अधिक हतबल झालेले दिसतात. गरिबी, बेरोजगारीमुळे काही प्रमाणात गुन्हेगारी वाढते असे दिसत असले तरी त्याचे मूळ कारण आक्रमकता वाढणे हे नसून गुन्हे त्यांच्यावर लादले जातात, ‘वरच्या’ श्रेणीतले लोक सत्ता राखण्यासाठी त्यांचा ‘वापर’ करतात असे अनेक अभ्यास सांगतात.

जीवनावश्यक वस्तूंची (अन्न, पाणी) कमतरता असेल तर स्पर्धात्मक वृत्ती वाढते, मग त्यातून आक्रमकता येते असे तर्कट काहीजण लावतात. पण खोलात शिरल्यावर वेगळेच पुरावे आणि त्याचे अर्थबोधनही वेगळे मिळते. दुष्काळ किंवा अन्न-पाण्याची दुर्भिक्ष्यता निर्माण झाली की प्राणी व मानवी समूहांमध्येही आक्रमकता वाढत नाही तर कमी होते असे निरीक्षण आहे. ते कसे? कारण अन्न मिळवण्यासाठी एरवी जेवढा वेळ लागत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ अन्नाची तजवीज करण्यात खर्च होतो. मग रिकाम्या वेळेतले उद्योग म्हणजे दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणे, हल्ले करणे- हे करायला वेळच उरत नाही! असेच उदाहरण आहे आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातल्या सिंहांचे. जेव्हा झेब्रांच्या झुंडी स्थलांतर करतात तेव्हा सिंहांचे त्यांच्यावरचे हल्ले वाढतात. पण खाण्यासाठी नव्हे. सिंह प्रजातीत भूक भागवण्यासाठी शिकार नेहमी सिंहीण करते; सिंह नव्हे. मग झेब्रा स्थलांतरात सिंह का बरे हल्ले करतात? निरीक्षणांतून लक्षात आले की, हे केवळ रिकाम्या वेळेत भरल्या पोटीच सिंह करतात. करायला दुसरे काही नाही म्हणून!

माणसातही असेच काहीसे दिसते. मानवी संस्कृती/ समूहांना ज्या आक्रमकतेने ग्रासलेले दिसते ती बहुतांशी मूलभूत गरजा, जीवन-मरणाच्या संघर्षांसाठी नसून, उपद्रव देण्याच्या आणि वर्चस्व गाजविण्याच्या मानसिकतेतून आलेली आहे. याला ‘वर्तनीय सूज’ असे म्हटले जाते. प्रतिष्ठेला अती महत्त्व देणाऱ्या समूह, जमातींमध्ये आक्रमकता जास्त दिसते. ‘ऑनर किलिंग’ हे याचे ठळक उदाहरण.

अनेक प्राणी व प्रायमेट्सच्या नरांमध्ये प्रजननासाठी मादीवर हक्क मिळावा म्हणून चढाओढ असते. त्यातून आक्रमकता येते. तर काही प्राण्यांत (हायना, मासे प्रजाती, लेमुर) माद्या आक्रमक असतात. निसर्गात नर-माद्या दोन्हींमधे आक्रमकता दिसते. पण वेळप्रसंगी माद्या एकमेकांशी जास्त जुळवून घेताना दिसतात.

प्रायमेट्स समूहांमध्ये वर्चस्व-श्रेणीरचना (social ranking) दिसते. बबून्स आणि ऱ्हीसस यांच्यात ती ‘वरून खाली’ अशी दिसते; ज्यात आक्रमक नर हिंसा करत सर्वोच्च स्थान बळकावतात. याउलट, वव्‍‌र्हेट माकडांमध्ये ती ‘खालून वर’ असते. यात सर्वोच्च स्थानी असलेला नर उगीचच आक्रमक होऊन त्रास देत असेल तर बाकीचे त्याला खाली ओढतात आणि नवीन नेता निवडतात! (म्हणजे पाच र्वष थांबत नाहीत? ही तर अति-लोकशाहीच!)

बोनोबो या माणसाच्या अगदी जवळच्या प्रायमेटमध्ये आक्रमकता फारशी दिसत नाही. त्यांची टोळीरचना मातृसत्ताक असली तरी माद्या समूहाला त्रास देत नाहीत. पाटस प्रकारच्या माकडांमध्ये आक्रमकता खूप असूनही हिंसा होऊ दिली जात नाही, याचे कारण त्यांची टोळीरचना. एका टोळीत बऱ्याच माद्या आणि एकच नर असतो आणि तो वयस्क माद्यांचे नेतृत्व स्वीकारतो. बाकीचे नर टोळी सोडून एकेकटे किंवा सैल टोळ्यांमध्ये फिरतात. फक्त प्रजनन काळापुरते ते टोळ्यांमध्ये शिरून समागम करतात. टोळीतली अल्फा-मादी स्वत:कडे सूत्र ठेवते आणि टोळीत आक्रमकता वाढू देत नाही. या अशा वेगवेगळ्या समाजरचना प्रायमेट समूहांत उत्क्रांत झाल्या आहेत.

माणसाने अशा ‘टेरिटोरिअल’ टोळीच्या मर्यादा कधीच ओलांडल्या असल्या तरी अनेक काल्पनिक श्रेणी तयार करून त्याद्वारे वर्चस्ववादी आक्रमकता मोजक्या लोकांनी ‘जोपासली’ आहे. बहुसंख्य त्यात वाहवत जातात. आक्रमकतेला विधायक वाट देणारे समूह आपल्या आजूबाजूला दिसतात. अशांना बळ देणे हे पुढील पिढय़ांसाठी उचित ठरेल.

आक्रमकता, हिंसा सर्वात जास्त आविष्कृत होते ती धर्म, जात, वंश, लिंग यांतील भेदभावातून. हे भेदभाव कोणत्या मानसिकतेतून निर्माण होतात, ते पुढच्या लेखात पाहू.