‘नगरी’ हा शब्द अहमदनगर जिल्ह्य़ातल्या लोकांसाठी वापरला जातो. त्याचे कारणच या जिल्ह्य़ातल्या  बोलीच्या वेगळेपणात आहे. चहूबाजूंनी वेगवेगळ्या बोलीप्रदेशांचा या जिल्ह्य़ाला शेजार आहे आणि मोगलांच्या काळापासूनची मुस्लीम वस्ती. या सर्व मिश्रणातून ‘नगरी बोली’चं एक वेगळंच रसायन तयार झालं आहे. शब्दांवर दाब देत व हेल काढत बोलणं इथपासून मराठी-हिंदीची सरमिसळ इथपर्यंत या बोलीत अनेक गोष्टी मिसळून गेल्या आहेत.
‘काय करून राह्य़ला?’, ‘काय बोलून राह्य़ला!’, ‘जेऊन राह्य़ला’, ‘खाऊन राह्य़ला’ असे बोल ऐकायला मिळाले की हमखास अहमदनगर जिल्ह्य़ातील व्यक्ती आसपास आहे असे समजावे. नगरी बोलीचं वेगळेपण हे असं आहे. ही बोली अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरी या बोलींप्रमाणे ठळकपणे उठून दिसणारी निश्चितच नाही. नगर जिल्ह्य़ाच्या भौगोलिक ठेवणीमुळे हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे. उत्तर बाजूने खानदेश, पूर्वेला मराठवाडा, पश्चिमेला कोकणकडा, दक्षिणेला सोलापूर-पुणे यामुळे आसपासच्या प्रदेशाचा मोठा प्रभाव लगतच्या तालुक्यांवर असल्याचे दिसते.
मराठीतले अव्वल ग्रंथलेखन, महानुभावांचे म्हाइंभटासह अनेक गं्रथकार आणि लीळांची स्थाने इथलीच. ज्ञानेश्वरी, नाथपंथीयांचे ‘अमर-शिष्य संवाद’पासून लेखन याच परिसरात घडले. शेख महंमद, चाँद बोधले आदी सुफी संप्रदायींचे लेखनही याच भूभागातले. शिवकाळातला मोजका काळ वगळता मध्ययुगीन काळापासून निजामाच्याच राज्याचा हा महत्त्वपूर्ण भाग होता. ख्रिश्चनांची पहिली मंडळी अहमदनगरला सर्वात आधी येऊन धडकली आणि मिशन कम्पाऊंडमधील वेगळी मराठी इथेच कविवर्य ना. वा. टिळक, ख्रिस्तपदनिर्माते कृ. र. सांगळे यांनी पुण्यमय करून सोडली.
त्यामुळे इथल्या भाषेला संमिश्र रूप प्राप्त झाले. स्वत:ची फार वैशिष्टय़पूर्ण बोली वगैरे असे काही येथे नसून खेडूत लोकांनी जपलेली भाषा, इथल्या मुख्य व्यावसायिक गवळी समाजाच्या भाषेत नगर बोलीचे अंश सापडू शकतात. दिवसेंदिवस सुशिक्षित बनत चाललेल्या वर्गाला इथली बोली सहजी उमगत नाही. नागर भाषा वेगळी ठरते. जिल्ह्य़ातील काही अल्पशिक्षित नेतृत्व फक्त या भाषेचा वापर करतात. त्यांना बऱ्याच गोष्टी ‘म्हाईती’ नसतात. आजूबाजूच्या माणसाला सहजच ‘भावडय़ा’ म्हणून पुकारण्याकडे कल असतो. नातेवाचक शब्दात बहिणीऐवजी ‘भयीन’ असते. आईला ‘बय’, ‘बई’ म्हणून संबोधतात. वडिलांना ‘दादा’ म्हटले जाते. आत्याला ‘मावळण’ हा आगळाच शब्द वापरला जातो.
‘क्काय राऽऽ व’, ‘अय भ्भोव’, ‘तर्र ऽऽ म ऽऽ ग’, ‘लयऽऽ भारी’, ‘त्या माह्य़चा’, ‘ब्वॉ ऽऽ कसं सांगावं?’ अशी बोलण्याची सुरुवात असते.
‘माझं, तुझं’ हे इथे ‘माव्हं, तुव्हं’ बनतं. कर्जत-जामखेड तालुक्यांत तेच ‘मपलं-तुपलं’ बनतं. ‘माह्य़ावलं, तुह्य़ावलं’ हे शब्दप्रयोग हटकून होत राहतात. बऱ्याच वेळा ‘र’ अक्षरावर अनावश्यक जोर देऊन बोलण्याची प्रथा कशी पडली कुणास ठाऊक. गोदावरी, मुळा, प्रवरा काठावर, सीनेच्या उगमापासून प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलण्यानं नगरची बोली आकाराला येते असे दिसते. इथे दुग्धोत्पादनाचा मूळ व्यवसाय आहे. त्यातही गवळी समाजाच्या सोबतीनं इतरही अनेक जण तो करतात. गाईच्या (गावडीच्या) आचळावर दाब देऊन दूध काढण्याची रीत बोलण्यातही अवतरली असावी. जनावरांनाही- म्हशीला ‘म्हसाड’, गाईला ‘गावडी’, शेळीला ‘शेरडी’, कुत्र्याला ‘कुत्ताडी’ असे न्यारेच प्रयोग इथे आहेत. ‘मी’ इथे ‘म्या’ बनतो, तर ‘मला’चा ‘माला’ होतो. ‘ड’च्या जागी ‘ढ’ होतो, ‘हा’च्या जागी ‘वा’ होतो. म्हणून ‘डोहात’चा ‘डवात’ होतो.
बालाघाट, गर्भगिरी डोंगराच्या रांगातून ये-जा करणाऱ्या कष्टक ऱ्यांचे जिणेदेखील तेवढेच कष्टदायक आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे पडणारे दुष्काळही तीव्र आहेत. तुलनेने उत्तर नगर जिल्हा समृद्ध आहे. कारण तिथे सिंचनसोयी झाल्या आहेत. त्यामुळे १९३० च्या आसपास पुणे जिल्ह्य़ातून शेती करण्यासाठी आलेल्या नवस्थलांतरित आणि बागायतदारांची नवी संस्कृती इथे रुजली. दक्षिण नगर जिल्हा हा तसा कोरडाच. तिथे खरी नगरी बोली नांदते असे म्हणावे लागेल. जामखेड हे मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार. तिथे आपुलकीला ‘आलुनकी’ म्हणायची रीत आहे. ‘काय चाललंय लेका’ऐवजी ‘काय चाललं, लका’ इथेच ऐकायला येते. लोक त्याकाळी समृद्ध बेलापूरला पोट भरण्यासाठी जात. आज कोणीही कोठेही पोट भरायला गेला तरी त्याला ‘बेलापूरला जाणं’ असंच म्हणतात.
सहकारात अव्वल ठरलेल्या या जिल्ह्य़ाला ‘इर्जिकाची’ परंपरा जुनीच. आणि हा शब्द इथूनच इतरत्र गेला. शेतीची नवनवीन तंत्रं आली, पण मोट-नाडा होत्या त्याकाळची काही शब्दांची जागा त्या वस्तू जाऊनही या ना त्या कारणाने उच्चारात आहेत. मोट, नाडा, चऱ्हाट, कासरा, सौंदर, येसन, येठन, खुर्दर, हातनी, जू, शिवळा, धुरा असे शब्द आजही इथं ऐकायला मिळतात.
आदिवासी-कोळी, ठाकर यांची स्वतंत्र बोली बोलणारे समूह कोकणकडय़ाच्या अकोले, संगमनेर व निकटच्या राहुरी तालुक्यात आढळतात. त्याविषयी गोविंद गारे आदी प्रभृतींनी मोठे काम केले आहे. मात्र, तेथील इतर समाजघटकांची भाषादेखील त्यामुळे बदलली आहे. दया पवारांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनात त्याचा नमुना सापडतो. तर कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या बोली-उच्चाराचा वेगळा अभ्यास केल्यास बराच उलगडा होईल. ‘खायलाच’ म्हणताना ‘य’ लोप पावून ‘खालाचं’, तसेच ‘जालाचं’, ‘प्यालाचं’ अशी रूपे इथे वापरात आहेत. राम नगरकर यांचा ‘रामनगरी’ हा एकपात्री प्रयोग संपूर्ण नगरी बोलीत आहेत. त्यामुळे नगरची भाषा सर्वदूर गेली. दादासाहेब रूपवते यांचे फर्डे वक्तृत्व अकोल्यातल्या बोलीचे वैशिष्टय़ होते. ‘ताम्रपटकार’ रंगनाथ पठारे यांच्या काही कादंबऱ्यांत नगरच्या बोलीचे पडसाद उमटलेले आहेत. ‘गोधडी’ हे आत्मकथन लिहिणाऱ्या अण्णासाहेब देशमुखांच्या कादंबरीत या बोलीचे वळण आढळते. त्यातील करतानी, जातानी, खातानी, पितानी, येती, जाती, उठती, बसती, खाती, पिती, चालती, येयेल हे, जायेल हे, पाहेल हे- ही रूपेदेखील ऐकायला गोड वाटतात. सरसकट उसाची शेती करणाऱ्या आणि सहकारी कारखान्यांची (आता खासगी) भरभराट असलेल्या जिल्ह्य़ात शेतकरी जेवताना भाताचेदेखील ‘आळे’ करतो. त्यात त्याला कढी, आमटी घ्यायची असते.
‘वाफसा’ असेल तर पीक पेर करणे उत्तम समजले जाते. पण इथे भूक नसेल, जेवण जाणार नसेल तर ‘वाफसा नाही’ असे म्हणतात. सहकारी कारखान्यात ऊस गेटावर नेऊन मोजून देणे आणि तिथेच पैसे घेऊन मोकळे होणे याला ‘गेटकेन’ म्हणतात. तीच पद्धती विवाहात आली. आता विवाह ‘गेटकेन’ होतात. म्हणजे एकाच दिवशी पाहणी, बोलणी आणि लग्न असे तिन्ही कार्यक्रम उरकण्याला ‘गेटकेन लग्न’ म्हणतात. नदी, कालव्यातून मोठमोठय़ा पाइपलाइन करण्याची पद्धती इथे वाढली, त्या पाइपलाइनवर एअरव्हॉल्व्ह कायम ‘हुसहुस’ असा आवाज करतात. त्यावरून एअरव्हॉल्व्हला ‘हुसहुसा’ असा नवीनच शब्द या बोलीत अवतरला.
काही म्हणी फक्त इथेच सापडतात. त्या काहीशा शिवराळ स्वरूपाच्या, नगरी लोकांच्या प्रकृतिधर्माला धरून असाव्यात. ‘येळंला केळं न् वनवासाला सीताफळं,’, ‘उखळात घालायचं, मुसळात काढायचं’, ‘नवीन मुसलमान व्हायला न् रोजाचा महिना यायला एकच गाठ पडली’ तसेच तिरळ्या माणसाला ‘कान्हेगाव-कोपरगाव’ किंवा ‘नगर-भिंगार’ असे म्हणण्याची आणि उगाच हेलपाटा पडला म्हणण्याला ‘पुण्याहून पुणतांबा केलं’ असं म्हणण्याची इथं रीत आहे. विशेष म्हणजे कान्हेगाव, पुणतांबा ही गावे शेजारीच आहेत. पण ती बोलीत अशी फिट्टं बसली आहेत. मराठीत त्याचा दूरवर वापर होतो.
नगरला पहिलवानांचे मोठे पेव आहे आणि त्यांच्या ठिकठिकाणी तालमी आहेत. त्यातूनही एक उर्मट भाषा जन्मली असावी असे दिसते. ‘जार नाही वाळला, पण उत किती?’, ‘व्हटावरचं दूध नाही निवलं अजून’, ‘आळापण घालाव लागंल, औषीद शोदाव लागंल’ अशी दादागिरीची, दमबाजीची भाषा इथे विपुल आहे. खास नगर तालुक्याच्या परिसरात ‘करडईला किडा नाही, वक्टय़ाला पिडा नाही’ ही म्हण ऐकायला मिळते. ‘पायखुटी’ हा शब्द बृहत् अर्थाने वापरतात. अगदी लग्न करून देण्यासाठीदेखील.
भाकरीला ‘भाकऱ्या’ म्हणतात. त्या तयार करण्याला बनवणारीच्या मन:स्थितीप्रमाणे ‘भाक ऱ्या घडविणे’, ‘भाक ऱ्या थापणे,’ ‘भाकऱ्या छापणे’, ‘भाकऱ्या बडविणे’ असे विविध शब्दप्रयोग आहेत. भाजीला ‘कोरडय़ास’ म्हटले जाते. कर्जत भागात उडदाच्या आमटीस ‘शिपी आमटी’ म्हणून पुकारले जाते. सोबत लसून ठेचा, खर्डा, झिरकं (दाण्याची वाटून केलेली आमटी) असे खास नगरी प्रकार असतात. फळांमध्ये पेरूला जांब, चिक्कूला चक्कू असे सुलभ शब्द योजले जातात.
इथे विहीर पुरुषभर मापात नाही, तर ‘परसा’त मोजली जाते. मापाला बाजारात ‘मापटं’ म्हणतात, तर मोजणीची परिमाणं अजूनही खंडी, मण, शेर, आदशेर, आच्छेर, पावशेर, अदपाव, आतपाव, छटाक अशी उतरत्या क्रमाने आहेत.
प्रहाराला ‘पारख’ ठरवले आहे.  कालव्याचा पूल ‘तवंग’ असतो. सवड मिळणे यास ‘सावड’ असा भलताच शब्द येतो. ‘ठेचणे’ हे क्रियापद ‘चेचणे’ बनते. कुणीकडं म्हणताना ‘कुंकडं’ असे म्हटले जाते. ‘ओरडा’ शब्दास ‘आरोड’, ‘गवार’च्या शेंगेंस ‘गोराणीच्या शेंगा’ म्हटले जाते. ‘लई लामण लाऊ नको’सारखे वाक्प्रयोग येथेच समजले जाऊ शकतात. एखाद्या गोष्टीत जास्त आशय वाढू लागला की ‘लांबण’चे ‘लामण’ होते. ‘लामणदिवा’ इथूनच आला असावा. मात्र, या सगळ्यापेक्षा खुद्द अहमदनगर शहराची भाषादेखील वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल. कोणतीही चांगली गोष्ट वर्णन करायची तर इथे ‘बेक्कार’ असे म्हटले जाते. बाजारपेठेत एक वडापावचे दुकानही ‘बेक्कार’ नावाचे होते. एखादी व्यक्ती आपले काय वाकडे करणार, यावरून ‘काय घंटय़ा करून घेणार’, ‘गडबडला’ यासाठी ‘भांबाळला’, ‘गडबड- गोंधळा’साठी ‘हुंबल’ असे मजेशीर शब्द आहेत.
नव्या पॅगो रिक्षांना येथे तिच्या आवाजावरून ‘टमटम’, हालण्यावरून ‘डुगडुगी’, दिसण्यावरून ‘डुक्कर’ अशी नावे दिलेली आढळतात. महिंद्रा कंपनीच्या मॅजिक वाहनाला ‘हत्ती’ संबोधले जाते. जीपला ‘जीपडं’ म्हटलं जातं. तर मोटारसायकलीला आवाजावरून ‘फटफटी’ अशी रंजक नावे आहेत.
नगर जिल्ह्य़ात मध्ययुगीन काळातल्या छावण्यांमधून उर्दूचा जन्म झाला असा इतिहास आहे. त्याचा प्रभाव इथल्या भाषेवर आजही आढळतो. ‘घम ना पस्तावा’ (गम ना पछतावा) अशा म्हणीत तो आढळतो. पेस्तर (चालू साल), गुदस्ता (गुजिश्ता) असे काही शब्द उर्दू, फारसी शब्दांची आठवण देतात. इथे मुस्लीम वस्ती मोठय़ा प्रमाणावर आहे आणि त्यांची दखनी हिंदी मोठी रंजक आहे. ‘परडे में शेरडय़ा ओरडय़ा’ (परसात शेळ्या ओरडल्या), ‘धावत्या धावत्या आया न् धपकन् आपटय़ा’ (धावत धावत आला नि धपकन् आपटला), इत्यादी.
हेल आणि बोलावरून नगरी बोली वेगळी काढता येईल, परंतु ती आता नष्ट पावत चालली आहे. त्याला वाढते नागरीकरण हे एक कारण आहे.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…