प्रशांत कुलकर्णी

prashantcartoonist@gmail.com

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

बोटीचा प्रवास छान सुरू असतो. आजूबाजूला उत्साह, आनंद असतो. प्रवासी गात, नाचत असतात. खात-पीत असतात. मनामध्ये भविष्याबद्दलची स्वप्नं घेऊन इकडे तिकडे फिरत गप्पा मारत असतात. प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात हृदयाच्या स्पंदनांची देवाण-घेवाण सुरू असते. इतक्यात काही तरी अघटित घडतं. एक भली मोठी लाट येते किंवा बोट एखाद्या खडकावर आदळते. हजारो प्रवासी एकाच आकांताने जीव वाचवण्यासाठी सरावैरा पळू लागतात, धडपडतात, हाताला लागेल ते धरून तरंगण्याचा प्रयत्न करतात. अनेक तासांनंतर त्यातल्या एकाला कळतं की तो एका बेटावर येऊन पोचला आहे- एकटाच!

आता या गोष्टीत कधी हे जहाज असतं तर कधी विमान, पण ते समुद्रात बुडतं किंवा कोसळतं आणि त्यातला एखादाच एखाद्या निर्मनुष्य, अगदी छोटय़ा बेटावर पोहोचतो. ही खरं तर एखाद्या मोठय़ा गोष्टीची सुरुवातच (आठवा टॉम हँक्स या अभिनेत्याचा ‘कास्ट अवे’ हा हॉलीवूड चित्रपट). जगभरातल्या रसिकांना सदैव आवडणारी ही गोष्ट. रहस्य, भीती, अशाश्वतता, साहस, एकटेपणा याचं मिश्रण बेटावर पोहोचल्यानंतरच्या गोष्टीत असणार हे नक्की. अनेक गोष्टी तशा लिहिल्या गेल्या आहेत. खऱ्या-खोटय़ा आणि दोघांचंही मिश्रण असणाऱ्या! मानवाच्या आदिम प्रेरणांचं दर्शन संकटात होतं, तसं काहीसं या कथानकात असतं.

पण जगभरातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रं काढण्यासाठी असलेला हा एक ‘प्लॉट’ आहे असं समजून त्या अनुषंगानं हजारो व्यंगचित्र रेखाटली. अशा  काही व्यंगचित्रांचा आस्वाद आपण घेतला तरी विचारातील, विनोदातील आणि रेखाटनातील वेगळेपणा लक्षात येईल.

या रेखाटनातील साधारण ‘प्लॉट’ म्हणजे अगदी छोटं बेट, त्यावर एकच असलेलं झाड म्हणजे पाम ट्री, चहूबाजूंनी पसरलेला अथांग समुद्र आणि असाहाय्यपणे सुटकेची वाट बघत बसलेला एकमेव माणूस!! फारच भयंकर कल्पना! क्वचित या चित्रात एका ऐवजी दोन पुरुष किंवा एक स्त्री व एक पुरुष असे दाखवले आहेत. त्यांच्यातील संभाषण मजेदार असतं.

एका चित्रात एक मोठं बेट दाखवलं असून त्याच्या एका टोकावर एक युवक आणि एक तरुणी दाखवले आहेत. दोघांनाही बेटावर येऊन बरेच दिवस झालेले दिसत आहेत. कारण दोघांनी आपापली घरं दोन टोकांवर बांधलेली दिसताहेत. दोघांचीही ओळख झालेली दिसते. अशातच त्यांच्या सगळ्या आधुनिक शहरी प्रेरणा जागृत झालेल्या दिसत आहेत. कारण तो युवक तिला डेटवर घेऊन जाण्याचं आमंत्रण देतोय आणि आज वेळ नसेल तर मग शुक्रवारी जमेल का, अशी चाचपणीही करतोय. कारण शुक्रवार हा वीकेंडचा आदला दिवस. ही सगळी उपहासात्मक केलेली दृश्यं टिप्पणी आहे. रॉबर्ट डे असं या चित्रकाराचं नाव आहे.

अमेरिकन व्यंगचित्रकार गॅरी लार्सन याने या विषयावर भरपूर चित्रं काढली आहेत. या ‘प्लॉट’ संदर्भात बहुतेक सगळ्या शक्यतांचं रेखाटन त्याने केलं आहे. त्याचे काही नमुने पाहता येतील. एका चित्रात एक माणूस पोहत त्या बेटाकडे निघाला आहे आणि बेटावर ‘कुत्र्यापासून सावधान’ अशी पाटी घेऊन उभा असलेला एक कुत्रा त्याने दाखवला आहे.

काही वेळेला गरजवंतांना मदत उशिरा पोहोचू शकते, ही लार्सन याने रेखाटलेली शक्यता फारच चटका लावणारी आहे. बेटाकडे वाहत येणाऱ्या पेटय़ांमध्ये फोल्डिंग बोट, सिग्नल देणारे उपकरण, नकाशा, बोटीसाठीची मोटार इत्यादी वस्तू आहेत. मात्र, बेटावरच्या त्या गरजवंत माणसाचा दरम्यान सांगाडा झाला आहे.

वास्तविक इतक्या छोटय़ा बेटावर हे असं अपघाताने येणं ही फारच भयंकर कल्पना आहे. कारण किती दिवस राहायला लागणार याची काहीच शाश्वती नसते. अशातच सोबत एखादा माणूस असेल तर तेवढाच आधार, विरंगुळा असं आपल्याला वाटू शकतं. पण माणूस हा विचित्र प्राणी असल्याचं व्यंगचित्रकारांनी ओळखलं असल्याने अशा संकट प्रसंगातही ते कसे वागू शकतील याचं वर्णन लार्सन याने चांगलं केलंय. एका चित्रात या बेटावर एक खुर्चीही वाहत आली आहे. ‘या माझ्या (!) खुर्चीवर तू का बसतोस?’ म्हणून दोघांतील एकजण वाद घालतोय!

दुसऱ्या एका चित्रात दोघे पुरुष तावातावाने भांडत आहेत आणि वाहत येणाऱ्या एका पेटाऱ्यावर ‘पिस्तूल’ असं लिहिलंय. तेव्हा पुढे काय होणार, हे देवावरतीच सोडून दिलंय या व्यंगचित्रकाराने.

गॅरी लार्सन याच्याच आणखी एका चित्रात एक वेगळीच गंमत दाखवली आहे. दोन पुरुषांमधला एक जण चक्क तिथे वर्तमानपत्र काढतोय आणि त्याच्या भरपूर प्रती त्याने काढल्या आहेत आणि त्यावर हेडलाइन असते की ‘नेड (म्हणजे तो दुसरा माणूस) हा फारच किरकिऱ्या स्वभावाचा आहे!’

तसंच आणखी एका चित्रात तिघे आहेत. दोन पुरुष आणि एक बाई. बाई मध्यमवयीन, आनंदात आणि शांत दाखवली आहे. मागे एक तरुण मुलगा बसला आहे आणि या बाईचा नवरा तिला चिंताग्रस्त होऊन विचारतोय, ‘‘तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलय का? कोण आहे तो?’’ वगैरे, वगैरे..

बेटावर असलेलं एकमेव झाड म्हणजे पाम! याच्या तेलाविषयी टिप्पणी करताना ही बाई याही परिस्थितीत आपला स्त्रीसुलभ स्वभाव लपवू शकत नाही, हेच लार्सन याने दाखवलं आहे.(द कम्प्लीट फार साइड).

आणखी एक मजेशीर कल्पना एकाने चितारली आहे. एका बेटावर दोघे पुरुष पोहोचले आहेत. पोहोचून त्यांना बरेच महिने झालेले दिसत आहेत. त्यातला एक म्हणतो, ‘‘प्लीज, माझी एक विनंती आहे- बोलताना ‘हे फक्त आपल्या दोघांतच ठेव हं’ असं सतत म्हणू नकोस!’’

डॉन मार्टनि हा प्रख्यात ‘मॅड’ या अमेरिकन मासिकाचा व्यंगचित्रकार. साहजिकच अत्यंत विक्षिप्त, विचित्र कल्पनांसाठी तो प्रसिद्ध असणारच! बेटावरचा असहाय्य माणूस विरुद्ध लांबवर दिसणाऱ्या जहाजातील अतिश्रीमंत बाई आणि तिचा अति लाडावलेला कुत्रा यांच्यातील हा भयंकर प्रसंग त्याने चित्रित केला आहे. हे चित्र क्षणभर हसायला लावणारे, गमतीशीर भासत असले तरी आर्थिक आणि मानसिक विषमतेवरच  प्रखर भाष्य आहे.

जीन मार्क या फ्रेंच व्यंगचित्रकाराचं हे सोबतच व्यंगचित्र खूप बोलकं आहे. प्रचंड कंटाळा आला की अशा प्रकारचा स्वत:लाच कोडी घालून स्वत: त्याची उत्तरे शोधण्याचा विरंगुळा निर्माण होत असावा असं त्यांना सुचवायचं असावं. वरकरणी गमतीदार भासत असलं तरी अंतिमत: ते अतिशय अंतर्मुख करणारं चित्र आहे.

‘पंच’ या ब्रिटिश मासिकातील एक चित्र फारच विषण्ण करणारं आहे. कित्येक वर्ष सुटकेची वाट पाहून कंटाळलेला एक जण म्हणतोय, प्रत्येक तासाला घडाळ्याचे काटे पुढे जातात की मागे हे मी साफ विसरून गेलोय!!

या सगळ्यांना पुरून उरणारं एक अमेरिकन व्यंगचित्र आहे जे सगळ्या व्यंगचित्रकारांनाही लागू आहे. (व्यंगचित्रकार टॉम टोरो). बेटावरच्या या असाहाय्य माणसाला सोडवायला गेलेलं जहाज आहे आणि त्यावरची माणसं म्हणतायेत, ‘‘तू इतके दिवस येथे आहेस म्हणजे तुला असंख्य विनोद सुचले असतील ना?’’