News Flash

स्त्रीजाणिवांचा ‘अंतर्नाद’

कविता म्हणजे आतला आवाज असतो. अंतर्नाद असतो. काळजातून कविता प्रकटते. म्हणूनच कवितेला हृदयाची भाषा म्हणतात ते उगीच नाही.

कविता म्हणजे आतला आवाज असतो. अंतर्नाद असतो. काळजातून कविता प्रकटते. म्हणूनच कवितेला हृदयाची भाषा म्हणतात ते उगीच नाही. कवयित्री वंदना कुलकर्णी यांनी हृदयाचे अनेक मौनबंध

lok20

‘अंतर्नाद’मधून बोलके केले आहेत. तथापि कवयित्रीसमोर हा प्रश्न आपसूक उभा ठाकतोच..
कुणी समजून घेईल का?
माझ्या मूक शब्दांची भाषा
पाहा डोकावून
काय असतं दडलेलं
बिलोरी स्वप्नाच्या भावविश्वात?
वसुंधरा म्हणजे पृथ्वी! वसुंधरा आहे म्हणून आपण आहोत.. जीवन आहे. वसुंधरा हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. वनवृक्षांची उपयुक्तता अन् नयनमनोहारी सौंदर्य, वनाच्या विविधांगी रूपांतून पृथ्वीचे आईपण सर्वाना जाणवत राहते. वसुंधरेचे हे महात्म्य वर्णन करताना अभंगरचनेत कवयित्री लिहून जातात..

lr22

रूप वसंताचं
मोहक सुंदर
फुलांचा आकार
मनोहर।।
शब्दांनी माणसांची मनं जिंकता येतात, वळवता येतात. शब्द मना-मनांना जोडतात, तोडतात. शब्दांमध्ये किती ताकद असते! शब्द किती खोलवर परिणाम करतात, याची प्रखर जाणीव ‘शब्दांचा साज’ या कवितेतून होते. काळजाच्या गाभ्यातून उमटणाऱ्या भावनांना जोपर्यंत शब्दरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत कविता पूर्णत्वास जात नाही. जीवनात येणाऱ्या अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना शब्दांची संगत असते.  शब्दांची नितांत निकड शब्दांचा साज लेवून अशी अवतरते..
मैत्रीचे बंध जुळतात
म्हणजे नेमकं काय होतं?
विचारांचं आदानप्रदान होऊन
साचलेलं मळभ दूर होतं.
आईने आपल्याला या जगात आणले. तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले. आईचे ऋण, आईचे उपकार, आईची थोरवी सर्वानी स्वीकारली आहे. विद्यार्थीदशेत आईने केलेल्या संस्कारांमुळे मुले आयुष्यात यशस्वी होतात. आईच्या मायेला कशाचीच सर नाही. तिला स्वत:च्या सुखाची ओढ नाही. आईच्या त्यागाला तोड नाही. ‘आई’ या कवितेत आईविषयीच्या हळुवार भावना वंदना कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक मुलाला आईबद्दल कृतज्ञता वाटावी अशी ही संस्कारशील कविता आहे..
जिथं नमुनी माथा
मातृदेवोभव
हा मंगलध्वनी निनादतो
तो स्वर म्हणजे असते आई..
स्त्री-पुरुष समानतेविषयी समाजसुधारकांनी कितीही प्रबोधन केले असले तरी पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा कायमच आहे. स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण या गोष्टी केवळ बोलण्यापुरत्याच उरल्या आहेत. स्त्रियांवर होणारे अत्याचार काही कमी व्हायला तयार नाहीत. ‘निर्भया’सारखी प्रकरणे वारंवार घडताना दिसून येतात याचे कोणालाच सोयरसूतक नाही. यासंबंधाने कवयित्रीला येणारा संताप स्वाभाविक वाटतो..
ती निर्भया..!
ती आली, ती गेली
नेहमीप्रमाणे आम्ही
३१ तारखेची रात्र
जल्लोषात साजरी केली..
बाप परिस्थितीनं सामान्य असला तरी कवयित्रीला हिंमतवान वाटतो. म्हणूनच बापाने घालून दिलेल्या कष्टांच्या वस्तुपाठाचे कवयित्री पारायणे करते. आजच्या काळात श्रमांकडे पाठ फिरवून सबसिडीच्या आवर्तात सापडलेला शेतकरी पूर्वापार वाटा हरवून बसला आहे. त्यामुळे त्याला त्याचे उद्दिष्ट दिसेनासे झाले आहे. अशा पाश्र्वभूमीवर कवयित्री  म्हणते-
तरीही माझा बाप
कधी हरायचा नाही
पुन्हा नव्या जोमानं
शिवारात राबराब राबायचा
कारण त्याला आयुष्य म्हणजे
आत्महत्येसाठी नसतं
हे कळलं होतं..
समाजात वावरताना दैनंदिन  जीवनातील अनेक घडामोडींची दखल वंदना कुलकर्णी यांनी अत्यंत सहृदयतेने घेतली आहे. हे सामाजिक भान त्यांनी आपल्या आशयगर्भ कवितांमध्ये उतरवले आहे.

‘अंतर्नाद’ : वंदना कुलकर्णी, अक्षरमानव प्रकाशन, पृष्ठे : ८८, मूल्य : ८० रुपये. 

-गालिब शेख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 12:06 pm

Web Title: antarnaad by vandana kulkarni
Next Stories
1 भू-अधिग्रहणाच्या आग्रहाचे गौडबंगाल
2 ब्रिटनचे ऋतुमान
3 विजेची घंटा (Electric Bell)
Just Now!
X