News Flash

अंतर्नाद : मन कुंतो मौला

बहुधा दग्र्याच्या अंगणात वा लगतच्या मोकळ्या जागेत, रस्त्यावर मांडव टाकून कव्वाली सादर होते.

दग्र्यात मुस्लीम संताच्या स्मृतिनिमित्त होणारा वार्षिकोत्सव. उरुसाच्या दुसऱ्या-तिसऱ्या रात्री कव्वाली पेश करतात

डॉ. चैतन्य कुंटे keshavchaitanya@gmail.com

‘ना तो कारवाँ की तलाश है’सारख्या ‘ओल्ड क्लासिक्स’पासून ‘पिया हाजी अली’सारख्या अलीकडच्या हिंदी चित्रपटगीतांनी कव्वाली आणि ‘सुफी संगीत’ याविषयी एक विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात तयार केली आहे. टाळ्यांच्या जोरकस साथीने ढोलकच्या ठेक्यावर गायलेली सवाल-जवाबी कव्वाली.. विशेषत: नौशाद, रोशनसाहेबांसारख्या संगीतकारांनी अप्रतिम रचना केलेली ही कव्वाली गीते चित्रपटांतून आपल्या ओळखीची असतात. पण खरीखुरी कव्वाली कशी असते?

कव्वाली हा इस्लामच्या सुफी संप्रदायाने पुढे आणलेला, सांगीतदृष्टय़ा अत्यंत संपन्न व दीर्घ इतिहास असलेला हा प्रस्तुतीप्रकार. कुराण, हदीथमधील अरबी भाषेतील वचनांना ‘कलबाना’ असे म्हणतात, तर ‘कौल’ म्हणजे अल्लाची पवित्र वचने. आणि कौलची ‘तरन्नुम’ म्हणजे सुरावटीतील, गेयरूपातील प्रस्तुती म्हणजे कव्वाली. कव्वालीत कौल-कलबानाखेरीज अन्य भक्तिपर रचनांचेही गायन होते.

इस्लाममध्ये मूलत: संगीत हे निषिद्ध असले तरी चिश्तिया संप्रदायाने संगीतास उपासनामार्ग म्हणून मान्यता दिली आणि त्यातून कव्वाली हा गीतप्रकार रूढ झाला. १३ व्या शतकातील अमीर खुस्रोला कव्वालीचा जनक मानतात. चिश्तिया पंथ भारतात दाखल होण्यापूर्वीही पूर्व आशियात सुफी संगीत होतेच. या सुफी परंपरेतील भक्तिसंगीताची सभा म्हणजे ‘समा’ (अल्लाचे गुणगान ऐकण्यासाठी एकत्र येणे, हा मूलार्थ.)! भारतात चिश्तिया पंथ आल्यावर एतद्देशीय संगीताच्या सम्मीलनातून ‘समा’चे जे भारतीय रूप सिद्ध झाले ते म्हणजे ‘कव्वाली’! खुस्रो हा कव्वालीचा महनीय कवी होता व त्याच्या रचना आजही भक्तिभावाने गायल्या जातात. ‘हिंदुस्थाना’त कव्वालीचा सांगीतिक विकास झाला आणि आज कव्वाली आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाली आहे. भारतीय उगमामुळे की काय, फारसीपेक्षा उर्दू, ब्रज, अवधी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम् या भारतीय भाषांत कव्वालीच्या रचना अधिक आहेत. कव्वालीचा सांगीतिक पक्ष तपासता त्यातही अरब-इराणपेक्षा अस्सल भारतीय म्हणावे असे सांगीत रूप ठळकपणे दिसते.

कव्वालीचा संबंध मशिदीशी नसून दग्र्याशी आहे. सुफी संताचे वास्तव्य असलेल्या किंवा दफनानंतर त्याची मजार (समाधी) असलेल्या स्थळी उभारलेले प्रार्थनागृह म्हणजे दर्गा! दर्गा हा एक प्रकारे मुस्लीम-हिंदू समन्वयाचे चिन्ह आहे. कारण दग्र्यावर कित्येक हिंदूही दर्शन घेतात, मन्नत मागतात. या समन्वयाचे अजून एक चिन्ह म्हणजे शंकर-शंभू, वडाली बंधू असे अनेक हिंदू कलाकार हे ‘कव्वाल’ म्हणून नावाजलेले आहेत.

भारतातील प्रसिद्ध कव्वालांत हबीब पेंटर, इस्माईल आझाद, मुनव्वर मासूम भोपाली, अतिक हुसेन खां हैदराबादी, गुलाम नबी शेख, कुतबी बंधू, वारसी बंधू, निज़ामी बंधू, इ. ठळक नावे आहेत. तर पाकिस्तानातील कल्लन खां व बन्ने खां सिकंदराबादवाले, बहाउद्दिन खां, अझीज मियां, फरीदी बंधू, नसरत फतेह अली, सामी बंधू, साब्री बंधू, अख्तर हुसेन व साबीर हुसेन, फरीदुद्दीन अयाझ व अबू महंमद अशांनी जमाना गाजवला आहे. शकीलाबानू भोपाली, प्रभा भारती अशा कव्वाली गायिकाही नावाजल्या गेल्यात.

कव्वालीच्या प्रस्तुतीत अनेक गीतांचा समावेश होतो. ती गीते अशी..

हम्द (हम्द-ए-बारे-ताला) : अल्लाचे स्तुतिगान.

नात (नात-ए-रसूल) : प्रेषितांची स्तुतिगीते.

सांगीतदृष्टय़ा हे दोन्ही अत्यंत संपन्न गीतप्रकार आहेत. आग्रा, लखनौपासून बंगालपर्यंतच्या प्रांतांत आणि महाराष्ट्रातही हम्द आणि नात गाण्याची मोठी परंपरा एकेकाळी होती. गोहरजान, शमशादबाई ऑफ दिल्ली, वहीदनबाई ऑफ आग्रा, मेहबूबजान सोलापूरकर, अख्तरीबाई फैझाबादी (बेगम अख्तर) अशा जुन्या काळातील कित्येक गायिकांच्या ध्वनिमुद्रिकांतून हम्द, नातच्या अप्रतिम रचना ऐकायला मिळतात. भैरवी, खमाज, गौडसारंग, काफी, जौनपुरी, इ. धुना या गीतांत फार सुंदर आहेत.

मन्कबत- महंमद पैगंबरांचा उत्तराधिकारी अलीच्या गौरवार्थ गीत. कव्वालीच्या महफिलीत मन्कबत हमखास असते. ‘मन कुंतो मौला’ हे अमीर खुस्रोरचित गीत सर्वात लोकप्रिय मन्कबत आहे.

नशीद- इस्लामी श्रद्धा, उत्सव, इ. अनेक विषयांचे वर्णन करणारी उत्साहपूर्ण गीते.

मुनजात- यात अल्लास शुक्रिया देऊन असेच कृपाछत्र राहावे अशी प्रार्थना.. एका प्रकारे हे ‘पसायदान’च असते.

रंग व बधावा- कव्वालीच्या अंतिम भागातील गीत. भारतीय कव्वाली परंपरेत प्राय: अमीर खुस्रोने रचलेली रंगची रचना पेश केली जाते. पीराच्या स्मृतीनिमित्त ‘रंग’ गातात, तर त्याच्या जन्मदिनानिमित महफिल असेल तर ‘बधावा’ गातात.

कव्वालीच्या आरंभी ‘नगमा-ए-कुद्दुसी’ ही धून केवळ वाद्यांवर वाजवतात, तेव्हा तालवाद्यांचे स्वतंत्र वादनही होते. मग ‘अल्लाहू अल्लाहू’चा गजर करत गायक स्वर मिसळतात. इथून पुढे वर नमूद केलेली विविध गीते पेश होतात. गझल हा गीतप्रकार मूलत: ऐहिक आशयाचा आहे, धर्मपर नव्हे. मात्र, कव्वालीच्या मूळच्या साच्यात नसूनही तो नंतर समाविष्ट झाला. पंजाबी सराईकी बोलीतील ‘काफी’ हा गीतप्रकार सिंधकडे कव्वालीत गातात. गीतांच्या दरम्यान बंद, दोहा, शेर, रुबाई असे काव्यचरणही पेरले जातात. त्यांना ‘गिरह करना’ (गाठ बांधणे) असे म्हणतात. कव्वालीत रंग भरला जाऊन श्रोतृगण तादात्म्याच्या विशिष्ट स्थितीत पोहोचतो तेव्हा अल्लाच्या समीप असल्याचे द्योतक म्हणून जलद लयीतील तराणा गाण्याचाही प्रघात आहे. महफिलीचा समारोप ‘सलाम’ने केला जातो. एकंदरीत कव्वालीचा हा क्रम पाहता हिंदू संकीर्तनातील, विशेषत: वारकरी भजनातील मार्गक्रमाशी (गजर, वाद्यांची उठान, रूपाचा अभंग, संतपर अभंग, भक्ती-नीती-तत्त्वचिंतनपर अभंग, पसायदान) त्याचे ठळक साम्य जाणवते. म्हणूनच की काय, आचार्य रातंजनकर यांच्यासारख्यांनी कव्वालीला  ‘भारतीय मुस्लिमांचे भजन’ म्हटले होते!

‘महफिल-ए-आम’ आणि ‘महफिल-ए-समा’ असे कव्वालीच्या प्रस्तुतीचे दोन ठळक प्रकार आहेत. ‘महफिल-ए-समा’ ही पूर्णत: धार्मिक स्वरूपाची असते व ती शेख, वली इ. धार्मिक अधिकारी व्यक्तींच्या समोर होत असल्याने त्यात गांभीर्याने, पारंपरिक क्रम पाळून प्रस्तुती होते. उलट, ‘महफिल-ए-आम’ अथवा ‘आवाम की महफिल’ ही सर्वसामान्य जनतेसाठी असल्याने लोकानुनय करत लोकप्रिय गीतांचा समावेश असलेली रंजनप्रधान पेशकश असते. यात बव्हंशी उडत्या चालीची, फिल्मी गीतांच्या चालींवर आधारलेली गाणी काहीशा भडक, दिलखेचक शैलीत सादर केली जातात. त्यात श्रोत्यांचाही उघड, मोकळा सहभाग असतो. यांखेरीज तिसरा प्रकार म्हणजे ‘बंद समा’- ज्यात धर्माधिकाऱ्यासमक्ष कोणत्याही वाद्यांखेरीज, केवळ कौलचे गायन केले जाते.

उर्स (उरूस) म्हणजे दग्र्यात मुस्लीम संताच्या स्मृतिनिमित्त होणारा वार्षिकोत्सव. उरुसाच्या दुसऱ्या-तिसऱ्या रात्री कव्वाली पेश करतात. बहुधा दग्र्याच्या अंगणात वा लगतच्या मोकळ्या जागेत, रस्त्यावर मांडव टाकून कव्वाली सादर होते. साधारणत: रात्री १० वाजता सुरू झालेला कार्यक्रम दोन-अडीच वाजेपर्यंत.. अगदीच रंग भरला तर पहाटे चार-साडेचार वाजेपर्यंत चालतो.

एकेकाळी सुफी परंपरेत ‘मकान, ज़्‍ामान, अख्वान’ ही त्रिसूत्री पाळली जाई. ‘मकान’ म्हणजे महफिलीची जागा- ही वस्तीपासून दूर, एकांताची व केवळ सुफींच्या वास्तव्याची असावी. ‘ज़्‍ामान’ म्हणजे नमाज वा अन्य महत्त्वाच्या उपासनेच्या वेळी कव्वाली गाऊ नये. आणि ‘अख्वान’ म्हणजे श्रोते हे केवळ सुफीच असावेत. आज हे नियम जणू विस्मृतीत गेलेत. इस्लामी नियमांनुसार परिपक्वपुरुषच कव्वाल असतो. स्त्रिया-बालकांना कव्वाली गायची मनाई होती. परंतु हाही नियम आता शिथिल झाल्याने ‘कव्वाली पार्टी’त अनेकदा लहान मुलेही असतात. आणि कव्वाली गाणाऱ्या कित्येक स्त्रिया आज प्रसिद्ध आहेत.

‘कव्वालों की चौकी’ (हल्लीचा शब्द ‘पार्टी’) साधारणत: आठ-नऊ लोकांची असते. त्यात मुख्य गायक (मोहरी), दोन-तीन गायन साथीदार, दोन ढोलक, एक तबला, हार्मोनिअम, बेंजो किंवा सिंथेसायझर वादक असे कलाकार हे ‘हमनवा’ असतात. इस्लामने एकंदरीतच वाद्यांना निषिद्ध मानल्याने पूर्वी वाद्याच्या साथीखेरीज कव्वाली पेश व्हायची. त्यामुळेच कव्वाली गाताना समूहाने जोरकस टाळ्या वाजवून लय राखणे महत्त्वाचे ठरले आणि टाळ्या वाजवण्याची ही खास रीत कव्वालीचे चिन्ह बनले. कालांतराने कव्वालीत वाद्यांचा समावेश होऊ लागला. कव्वालीत हार्मोनिअम, बेंजो, सिंथेसायझर, ढोलक, तबला, डफ, डफली, चिमटा, करताल, घुंघरूकाठी अशी वाद्ये प्रचलित आहेत. गीतांच्या दरम्यान वादकांनाही स्वतंत्र वादन करून आपले कसब दाखविण्यासाठी संधी मिळते.

हिंदुस्थानी रागदारी संगीताचा आणि कव्वालीचा संबंधही खूप जुना, दृढ आहे. १८व्या शतकात सदारंग रचित खयाल रचनांचा अंगीकार करून या गायकीला वाढवणाऱ्या आरंभीच्या कलाकारांत मूळचे कव्वाल असलेले गायक होते. कव्वालबच्चे खानदानांतूनच पुढे ख्यालियांच्या ग्वाल्हेर, दिल्ली (तानरस खांची परंपरा), सहस्वान अशा परंपरा बनल्या. त्यामुळे अनेक मुस्लीम कलाकार राजदरबारांत खयाल आणि सुफी महफिलींत कव्वाली गायचे. पाकिस्तानमध्ये रागसंगीताला ‘हराम’ ठरवून त्यावर अलिखित बंदी आणल्याने तिकडचे अनेक तालीमदार गवय्ये हे कव्वाली, गझलकडे वळले आणि रागदारीतील आपले सारे कसब त्यांनी कव्वालीत ओतले!

हल्लीच्या कव्वालीत यमन, केदार, दरबारी, पूरियाधनाश्री, भैरव, अहिरभैरव, पिलू, पहाडी, काफी, जोग, चारुकेशी, बैरागी, भैरवी असे राग प्रचलित आहेत. क्वचित मालकंस, बागेश्री, बसंत, सोहनी, तोडी इ. रागही वापरले जातात. हल्ली धिम्या लयीत, विस्तारपूर्वक अशी कव्वाली अभावानेच पेश होते. त्यामुळे गंभीर व गुंतागुंतीची स्वरवाक्ये असलेल्या रागांपेक्षा चटकन् रंग भरणारे, गतिमान चलनाचे चंचल रागच जास्तकरून आढळतात. दरबारी कानडय़ासारखे रागही त्यांचे मूळचे संथ चलन टाकून गतिमान झालेले दिसतात. श्रोत्यांची रुची, प्रतिसाद पाहून कव्वाल राग वा चालीची ठेवणही आयत्या वेळी बदलतो. हल्लीच्या कव्वालीत प्रामुख्याने कहरवा, दादरा, दीपचंदी, रूपक, त्रिताल हे ठेके आढळतात. जनसंगीताच्या वाढत्या प्रभावामुळे अलीकडे पाश्चात्त्य ठेक्यांचा वापरही मोठय़ा प्रमाणात दिसतो.

सांगीतिक गुणवत्तेखेरीज एक प्रकारची नाटय़ात्म अदाकारी हाही कव्वालांच्या सादरीकरणाचा महत्त्वाचा गुण असतो. आवाहक हावभाव, उमाळ्याने टाहो फोडल्यासारखे उच्च तारतेचे उच्चार, एखाद्या गतिमान सुरावटीनंतर अचानक घेतलेला आश्चर्यकारक विराम, श्रोत्यांवर इच्छित परिणाम होत नसल्याचे दिसताच चटकन् लय चढती करून जमावास सामावून घेईल अशा प्रतिसादी रचना निवडणे, गाता गाता साथीदार व श्रोत्यांशी गद्य संवाद, सवाल-जवाब, दोन कव्वालांतील व्याज चुरस, नाटकी हुकमीपणे रडणे व रडवणे अशी प्रस्तुती तंत्रे वापरून आपले सादरीकरण चटपटीत करण्यात कव्वाल माहीर असतात. लोकमनाची नस ओळखून त्यांना झुलवत ठेवण्याचे अनोखे कसब असलेला खरा प्रस्तुतीकार असतो कव्वाल!

धर्मसंगीताच्या संशोधनातील क्षेत्रीय अभ्यासादरम्यान पुण्यातील कव्वालांशी बातचीत झाली. त्यातून अनेक अपरिचित बाबी कळल्या. महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर, मालेगाव, सोलापूर, परभणी, अकोला, नांदेड इ. मुस्लीमबहुल वस्तीच्या भागांत, शिवाय मुंबईतही अनेक कव्वाल होते व कव्वालीची बरीच जुनी परंपराही इथे आहे. पुण्यात एकेकाळी उरुसाच्या वेळी सप्ताह, पंधरवडाभराचे कव्वालीचे जलसे होत असत. त्यात गावोगावचे नामांकित कव्वाल येत, चुरशीचे सामने होत आणि सर्वोत्कृष्ट कव्वालास सुवर्णपदक दिले जाई. त्याकाळच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्समध्ये बशीर खां कव्वाल ऑफ पूना, शब्बीर अली, उस्मान अली, मास्टर सलीमुल्ला, प्यारू, पन्ना, रघुनाथ जाधव असे उत्तम कव्वाल भेटतात. विसाव्या शतकात पुण्यामध्ये शेख चांद, मोहम्मद ठासू, बशीर भाई, मनोहर व मोहन अजमेरी, गुलाम कादर हाशमी असे नामांकित कव्वाल होते. शकीला पुनवी, सायरा बानू, रानी रूपलता अशा प्रख्यात कव्वाल स्त्रियाही होत्या. अन्य भागांतील मास्टर हबीब, अली व महमूद निझामी, मोहम्मद अहमद वारसी, जानी बाबू, कमर नाझा, झहीद नाझा, अबू साबा इ. कव्वालही वेळोवेळी इथे येत. मात्र, २१व्या शतकात पुण्यात ही परिस्थिती राहिली नसून कव्वालीची प्रथा नामशेष होतेय. आज पुण्यात शमीम बानो, मोनू अजमेरी आणि सुलतान नाझा असे केवळ तीनच व्यावसायिक कव्वाल शिल्लक आहेत.

एकीकडे कव्वालीला ‘ग्लोबल मार्केट’ आहे, तर दुसरीकडे तिचं ‘लोकल मार्केट’ आटत आहे!

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:03 am

Web Title: antarnaad introduction to qawwali music journey of qawwali qawwali songs zws 70
Next Stories
1 वननीती, वनकायदा आणि पर्यावरणाचा ऱ्हास
2 पडसाद : विनाशाकडची वाटचाल अस्वस्थ करणारी!
3 जपू या निसर्गाचा आनंदकंद!
Just Now!
X