04 December 2020

News Flash

नादांच्या वाटा

ज्येष्ठ लेखक, चित्रपटकार, समीक्षक अरुण खोपकर यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठली. त्यांचा ‘अनुनाद’ हा ललित लेखसंग्रह मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाला.

‘अनुनाद’ हा ललित लेखसंग्रह

ज्येष्ठ लेखक, चित्रपटकार, समीक्षक अरुण खोपकर यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठली. त्यांचा ‘अनुनाद’ हा ललित लेखसंग्रह मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाला. त्याला त्यांनी लिहिलेल्या रसाळ प्रस्तावनेतील संपादित अंश..

‘नाद’ म्हणजे ध्यास. एखाद्या गोष्टीचा नाद लागला की माणूस बाकी सारे विसरून जातो. तो ‘नादिष्ट’ होतो. तिच्याच मागे लागतो. जागेपणी तिचा शोध करतो, गुंगीत, झोपेत तिची स्वप्ने पाहतो व मृगजळातल्या तिच्या प्रतिमेलाही पकडू पाहतो. धून मनात घोळवता घोळवता कधीतरी एखाद्या संगीतकाराला विस्तृत रचनेचे बीज मिळते. मग बंदिशींच्या रेषाकृती निर्माण होतात. त्यांना शब्दांनी अलंकृत करता करता नायिकांची रूपे जाणवू लागतात. हळूहळू त्यांचे डोळे, भिवया, पापण्या उमलू लागतात. पापणीचा लांबसडक केस न् केस दृश्यमान होतो. चेहरामोहरा स्पष्ट होतो. बांधा भरीव होतो. शरीरसौष्ठव उमटू लागते. ओठ मिटलेलेच असतात. ते अलगद उघडल्यावर त्यातून जो नाद ऐकू येतो, ती संपूर्ण बंदिश असते. ती नखशिखान्त प्रकट होताच संगीतकार स्वत:च स्तिमित होतो.

‘अनुनाद’ या पुस्तकाची जन्मकथा यापेक्षा फार वेगळी नाही. ही एका संगीतरचनेची जन्मकथा नाही; तरी तिच्यात नादिष्टपणाच्या अनेक वाटांनी केलेल्या प्रवासांचे चित्रण आहे. वाट हरवलेल्या क्षणांची अनामिक भीतीही आहे.

बालपणापासूनचा पहिला नाद ध्वनींचा. त्यांना आकार व अर्थ येता येता मायबोली ऐकू येऊ लागली. मग तिच्या सहवासाचा नाद लागला. तो नाद वाढू लागला. बोलींचे हेल व अनुनासिके, चढउतार व अचानक येणारे विराम आपल्यात सामावून घेऊ लागला.

मग नादाची मजल गेली खेळातल्या निर्थक, पण नादवाही शब्दांपर्यंत.

…………………..

शब्द

शब्दावर केलेल्या प्रेमातून ‘शब्द’ या भागातले लेख आले आहेत. मातृभाषेची ओळख श्रुतीतून झाली व स्मृतीत बसली. मग ऐकायच्या गोष्टी आल्या. तिथून शब्द पळाले, ते मूळाक्षरांच्या तक्त्यात जाऊन एकेका चौकोनात मांडी घालून बसले. लहान लहान वाक्यांच्या सोप्या पुस्तकांत भेटू लागले. इसापच्या व पंचतंत्रातल्या गोष्टीतले बोलके प्राणी ते वापरू लागले. मग घरी पाळलेल्या कुत्र्यामांजराची भाषा शिकावीशी वाटायला लागली. समुद्रावर वाळूत खेळायला नेल्यावर लाटांतून व माडांच्या पानांच्या सळसळीतून शब्द ऐकू येऊ लागले. शंख उचलून कानाला लावला की एक गूढरम्य नाद ऐकू येत असे. त्याचे रहस्य उलगडेच ना.

लवकरच पुस्तके मला घरातून बाहेर नेऊन दूरदूरच्या प्रवासांवर घेऊन जायला लागली. प्रवासाचे मुख्य वाहन म्हणजे फडफडणाऱ्या शब्दांचे पुस्तक. तेच भरधाव दौडत दऱ्याखोऱ्यांतून, पर्वता-पठारावरून, झरे-ओढे-नद्या-समुद्र ओलांडत सर्वत्र नेत असे. शूरवीरांच्या कथा प्रत्यक्ष घडता घडता दाखवत असे. तो दूरचा इतिहास नव्हता. केवळ एक पान उलटले की तिथे जाता येत असे.

अरबी सुरस कथा ऐकवण्याकरिता माझ्या हातातले पुस्तक वाळवंटातले जहाज होऊन मला आपल्या उंटपाठीवर बसवून ‘बगदाद’ या अद्भुत शहरात नेत असे. तिथे असलेले खुजे, खोजे, अलिबाबा, सिंदबाद, राजे, वझीर, गुलाम, शहजाद्या, महाकाय राक्षस हे खरे कोणत्या देशात होते कुणाला पर्वा! कधी हातातले पुस्तक चंद्रावरच्या स्वारीवर घेऊन जात असे. कधी दिवसेन् दिवस कॅप्टन नेमोबरोबर पाणबुडीतून प्रवासाला घेऊन जात असे. फक्त ते हातात असले, की पुरे. मग टारझनबरोबर वेलींना धरून एप माकडांच्या टोळ्यांबरोबर फिरायला मिळत असे. घरातल्या टेबलावर चढून टारझनची आरोळी देताना आजूबाजूला घनदाट जंगलच दिसत असे. तिथे करचक व टबलट भेटत. दुसरे पुस्तक उघडले की तीन शिलेदारांच्या तलवार बहादुरीच्या कथा दिसू लागत. तलवारींचा खणखणाट ऐकू येत असे. असेच एक दिवस अदृश्य माणसाला पाहिले व त्याच्या मृत्यूनंतर रडलो. रॉबिनहूडचा मृत्यूही कुटुंबातल्या मृत्यूइतकाच दु:खाचे कारण झाला होता.

या काळात बरोबर खेळणाऱ्या शेजारच्या मुलामुलींकडून कधी गुजराती, कधी तमिळ, पंजाबी, सिंधी, तर कधी हिंदी असे उडते शब्द अचानक ऐकू येत. इंग्रजी ही फक्त प्रौढांची भाषा आहे आणि सातवीत गेल्याखेरीज ती शिकायची नसते, हा समज अगदी पक्का होता. चणेवाला, भेळवाला, दूधवाला, इस्त्रीवाला व इतर दुकानदारांशी बोलतानाची हिंदी चौथ्या यत्तेत शाळेच्या पाठय़पुस्तकात टपकली. जसा मोठा होऊ लागलो, तसे अंतराळातले संदर्भरहित भाषिक जग पृथ्वीवर उतरू लागले. त्याला भूगोलाच्या अक्षांशाच्या व रेखांशाच्या आडव्या-उभ्या रेषा गच्च बांधू लागल्या. त्याबरोबर आलेल्या इतिहासातून इतर प्रांतांच्या ओळखी होऊ लागल्या.

शाळेत शिकलेल्या इंग्रजीकरिता सोहोनी सरांसारखा अत्युत्तम शिक्षक मिळाल्याने तिच्या अगदी सहज प्रेमात पडलो. ‘शब्द’ या पहिल्या भागातला पहिला लेख त्यांना आदरांजली म्हणून वाहिलेला आहे. त्यांनी इंग्रजी तर शिकवलेच, पण त्यांची सर्वात मोठी शिकवण म्हणजे कोणतीही गोष्ट शिकायची कशी, ही होती. इंग्रजीने आयुष्यभर साथ दिली व इतर भाषांच्या पहिल्या ओळखी करून देण्यात मध्यस्थी केली. दुसरी युरोपीय भाषा येईपर्यंत तिचेच बोट धरून जगाचा प्रवास करीत होतो.

शाळेत शिकलेल्या संस्कृतच्याही सुखद स्मृती आहेत. तिच्या नादलालित्यामुळे पाठांतर किती सोपे होत असे! शिवाय लहानपणी तिची ज्योत ‘शुभम् करोति कल्याणम्’ या दिवेलागणीच्या परवाचाबरोबर प्रज्वलित झालीच होती. तेव्हा विजेचे दिवे होते तरी अनेक घरांतून आयाबाया, मावश्या-आत्या, काक्या-माम्या, आज्या-पणज्या दिवेलागणीला निरांजन लावून, लहान मुलांना बकोटे धरून, डोळे मिटायला लावून, एका रांगेत बसवत व श्लोक म्हणून घेत. अनेक घरांतून ऐकू येणारे वेगवेगळे श्लोक व स्तोत्रे. ‘रामो राज्यमणि सदा विजयते’, ‘या कुंदेंदु तुषारहारधवला’! संस्कृतच्या लालित्यानेही मला आयुष्यभर सोबत केली.

शब्दांवरच्या व भाषांवरच्या प्रेमातून मराठी, हिंदी व संस्कृत इ. भाषांच्या विस्तीर्ण संयुक्त अशा इंडोयुरोपीय कुटुंबातील बंगाली, फ्रेंच, जर्मन, रशियन व स्पॅनिश या भाषांनी आयुष्य समृद्ध केले. त्यांच्याही काही स्मृती व धडे ‘शब्द’ या भागात सापडतील. याखेरीज उर्दू आणि फारसी या सुमारे सत्तरीच्या सुमारास शिकलेल्या भाषांच्याही खुणा ‘शब्द’ या भागातील लेखात विखुरलेल्या मिळतील. उर्दूने मला मी न पाहिलेल्या व न अनुभवलेल्या भारताचा परिचय करून दिला व त्याच्याविषयी आपुलकी निर्माण केली.

विविध भाषांतून व विविध देशांतून पुस्तकांचा पाठपुरावा करता करता आपसूकच पुस्तकांच्या व ग्रंथसंस्कृतीच्या वैचित्र्याची जाणीव होऊ लागली. पुस्तकांतल्या फाँटस्ची वळणे, त्यांचा कागद, छपाई, बांधणी, आकार यांच्याकडे लक्ष जाऊ लागले. पुस्तकाच्या रूपाला असणारे महत्त्व हे वरवरचे नसून, त्याने पुस्तकाचा भावनिक व बौद्धिक अनुभव हा शारीर होतो. योग्य पुस्तकरूपाने आतल्या मजकुराला पूरक अशी मन:स्थिती वाचनाच्या अनुभवाचा अविभाज्य भाग होते हे कळू लागले. काही जवळच्या मित्रांमुळे- जसे र. कृ. जोशी, अशोक शहाणे व अरुण कोलटकर व त्यांच्या प्रकाशनातल्या कामामुळे पुस्तकरूपाबद्दल आपलेपणा वाटू लागला. मग मिनिएचर शैलीतली भारतातली व मध्य आशियातली सुलिखित पुस्तके पाहिल्यावर ‘पुस्तक’ किंवा ‘ग्रंथ’ या शब्दाचा छपाईपूर्वीचा विस्तार जाणवला व त्याच्या सौंदर्याशी ओळख झाली. या एकूण अनुभवातून ‘रूप पाहता लोचनी’ हा लेख लिहावासा वाटला.

मोठा झाल्याची पहिली जाणीव म्हणजे केवळ एखाद्याची भाषा आपल्या भाषेपेक्षा वेगळी असल्याने दुसऱ्या माणसाचा द्वेष करणारी माणसे असू शकतात याचा विषारी अनुभव. कोणत्याही भाषेवर माणूस प्रेम करू शकतो. प्रत्येक भाषेला आपली समृद्धी असते. खास ध्वनी असतात. त्यांच्या उलगडय़ाकरिता जर कुतूहल वाटले आणि कष्ट केले तर त्या भाषा आपल्याला केवळ समजतात, एवढेच नाही, तर त्यांना वात्सल्याने पान्हा फुटतो. त्यांचा प्रत्येक शब्द चोखल्यास मधुर लागतो. डोळ्यांना लावला तर लोलकासारखा आपल्याला जगाचे वेगळे रंग दाखवतो. त्या आपले असे पालनपोषण करतात, की सहज आपण मोठे होता होता आपल्या भावनिक व बौद्धिक जगाच्या कक्षा रुंदावतात. पण माझा हा समज म्हणजे शुद्ध भाषिक निरागसपणा होता. त्याचे तुकडे तुकडे करणाऱ्या भाषिक दंगलींनी मी अत्यंत व्यथित झालो. यात माझ्या ‘बारा भाषा येणाऱ्या’ मित्राचे दुकान जाळले गेले व त्याच्या तोंडचा घास छिनवून घेतला गेला. भाषेवरून माणसे प्राण घ्यायला तयार असतात, हे कटू सत्य कळले.

काही वर्षांनी भाषेकरता जशी प्राण घेणारी माणसे असतात, तशीच प्राण देणारीही माणसे असतात, हेदेखील कळले. बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा हा मुख्यत: बंगाली मातृभाषेच्या प्रेमातून आला होता व त्यातून २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस मानला गेला. नंतर ढाक्याच्या मुक्कामात या दरिद्री देशातल्या संपन्न ग्रंथसंस्कृतीबरोबर भाषेकरता जीव देणाऱ्यांच्या आप्तेष्टांशीही ओळखी झाल्या.

‘आपले आणि परके’ या लेखात प्रामुख्याने फारसी भाषेच्या मराठीवरील प्रभावाचा आणि शेजारी भाषांचा व संस्कृतींचा मराठीशी आलेल्या संबंधांचा अंगुष्ठरूपाने विचार केला आहे. भारतात अनेक वर्षे झालेली उर्दूची पीछेहाट, तिच्या मानेवर लादलेले धर्माचे कृत्रिम जोखड व त्याबरोबरच येणारे विविध प्रकारचे अन्याय या साऱ्याने माझे मन उदास होते. हतबल संताप येतो. उर्दूला पायाभूत असलेली फारसी ही मराठीत इतकी मिसळली आहे, की मराठीतले अनेक शब्द फारसी आहेत, यावर फारसी भाषेचा शब्दकोश व मराठीचा व्युत्पत्तिकोश पाहिल्याशिवाय विश्वासही बसणार नाही. विविध भाषांच्या देवाणघेवाणीने व संस्कृतींच्या मिलापाने येणारे वैविध्य व विस्तार याला प्रस्तुत लेखात स्पर्श केला आहे.

साहजिकच मला भाषांकडून देशांकडे वळावेसे वाटले. ज्या पर्शियन भाषेने मराठीला इतके दिले आहे, तिच्या संस्कृतीचा मी अभ्यास करू लागलो. पर्शियन चित्रपट पाहू लागलो. चित्रपटांमागचे जीवन अनुभवावे अशी तीव्र इच्छा वाढू लागली. मी पर्शियात एक महिना राहून सुमारे ५,००० मैल अंतराचे एक वर्तुळाकार भ्रमण करून इराणच्या संस्कृतीचा अनुभव घेतला. त्यातून आलेल्या लेखाने ‘शब्दचित्र’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा प्रारंभ केला आहे.

‘शब्द’मधील शेवटच्या लेखातून ‘पर्शियन मिनिएचर’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागातल्या इराणच्या संस्कृतीच्या लघुचित्राकडे जाताना वाचकाला रूळ बदलल्याचा खटका लागू नये. जरी तिचा अभ्यास नसला, तरी या संस्कृतीबद्दल ऐकीव गोष्टीतून तरी वाचकाला तिची तोंडओळख झालेली असेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2020 1:09 am

Web Title: anunad arun khopkar dd70
Next Stories
1 अमेरिकेची बोधकथा!
2 हास्य आणि भाष्य : हास्यचित्रांमधला इंग्रजी ‘पंच’
3 इतिहासाचे चष्मे : प्रामाण्याचे समाजशास्त्र
Just Now!
X