17 February 2020

News Flash

कलेतून स्वातंत्र्याकडे…

स्वातंत्र्याची आस कायम राखण्याचे काम कलेची ऊर्मी करत असते..

|| न्या. धनंजय चंद्रचूड

स्वातंत्र्याची आस कायम राखण्याचे काम कलेची ऊर्मी करत असते.. पण कलेच्या स्वातंत्र्याला असलेला धोका हा प्रचलित सामाजिक वास्तवाकडून किंवा प्रस्थापित कला आणि कलावंत-समूह यांच्याकडूनही असू शकतो. सरकारी दमनशाही असते हे खरे, पण धोका केवळ सरकारकडून नसतो. कलेतून स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या आजच्या काही कलावंतांची उदाहरणे अशा वेळी उभारी देतात..

पुस्तकांच्या गराडय़ात चेंबरमध्ये तासन् तास करावे लागणारे काम शीण आणणारेच असते. कदाचित त्यामुळे भवतालाकडे पाहण्याचा न्यायाधीश आणि वकिलांचा दृष्टिकोन संकुचित होऊ शकतो असं मला वाटतं. मात्र, कल्पनाशक्तीचे सामर्थ्य लाभलेली कला आपल्या डोळ्यांना न दिसणारेही पाहायला शिकवते.. ऐकू न येणारेही ऐकायला शिकवते. ‘आर्ट, इमोशन्स अ‍ॅण्ड एथिक्स’ (प्रसिद्धी साल: २००७) या पुस्तकाचे लेखक बेरीज गाउट म्हणतात त्याप्रमाणे- ‘‘कलेच्या सामर्थ्यांचा पुरेपूर वापर केला तर आपण चूक काय, बरोबर काय, हे ठरवू शकतो. कल्पनाशक्तीमुळे आपण शिकू शकतो.’’  स्वातंत्र्य आणि कला यांचे हे सख्य, त्यांच्यातले नाते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे.

कला हा खऱ्या स्वातंत्र्याचा ‘बालेकिल्ला’ आहे, हे अनेकांना मान्य होते. सांस्कृतिक स्वातंत्र्य हा राजकीय स्वातंत्र्याचा गाभा आहे. कलाकार कलेतून अनेक शक्यतांचा शोध घेत असतो. अनेक शतकांपासून कलेचा वापर चांगल्या.. अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीची कल्पना करण्याकरता झालेला आहे. गतकाळातील शोषणामुळे समाजाचे झालेले तुकडे सांधण्याकरता, माणसांची हृदये आणि मने एकमेकांशी जोडली जावीत यासाठी कलेचा वापर झालेला आहे. इथे संविधानिक कायद्यामागे असलेला स्वातंत्र्याचा मूलगामी विचार आठवून पाहा : प्रत्येकाला विवेकबुद्धी आहे आणि स्वायत्ततासुद्धा आहे, असे हा विचार सांगतो. न्यायाधीश म्हणून मला असे जाणवते की, जगातील आव्हानांना सामोरे जाताना आपण केवळ बुद्धीवर अवलंबून असणाऱ्या दृष्टिकोनांचाच वापर करतो. या बुद्धिनिष्ठ भूमिकांना आपण एवढे घट्ट चिकटून आहोत, की त्यापल्याडचे अनेक शक्यता असलेले किंवा प्रू्ण विरोधी चित्र आपल्याला दिसतच नाही. अशा निव्वळ बुद्धिनिष्ठ आवाहनापेक्षा कला निराळी असते. ती बुद्धीला आवाहन करतेच; पण त्याहीपेक्षा सामूहिक चेतना जागवते. आणि नेहमीच ती भावनिक आणि दैहिक पातळीवरही परिणाम करते. ज्या कल्पना आपल्याला काही वेळा चुकीच्या वाटू शकतात, अशा कल्पनांना आपण कलेतून मात्र कोणत्याही अपराधगंडाविना सामोरे जातो. अकादमिक आणि राजकीय चर्चा-वादविवादांपेक्षा कला जास्तीत जास्त लोकांना खिळवून ठेवते. म्हणूनच कलेतून सामाजिक पातळीवर वाद-प्रतिवादाच्या शक्यता निर्माण होतात. अस्तित्वात असलेल्या सत्तेच्या विरोधातला वाद-प्रतिवाद उभा राहू शकेल अशा जागा कला निर्माण करते.

उदाहरणार्थ- ‘स्ट्रीट आर्ट’ किंवा सार्वजनिक जागांवरची कला.. त्या जागेची मालकी खासगी असो की सरकारी; ही जागा ‘सार्वजनिक’ ठरते ती तिथे असलेल्या एखाद्या चित्रामुळे.. कलावंताने दृश्य-ठसा सोडल्यामुळे. तो ठसा प्रेक्षकांच्या मनावर सकारात्मक उमटेल की नकारात्मक, हा वेगळा मुद्दा. मात्र, कलेच्या या आविष्करणामुळे अशा अधिक जागा सार्वजनिक असाव्यात, ही मागणी वाढू लागते. विशेषाधिकार असलेल्या आणि म्हणून ‘सामर्थ्यवान’ समजल्या जाणाऱ्या लोकांची संस्कृती धुडकावून लावत कलेला सार्वजनिक ठिकाणी मोकळीक मिळवून देणारी कला म्हणजे स्ट्रीट आर्ट.

दिल्लीच्या लोधी कॉलनी परिसरात जगभरातून आलेल्या कलावंतांनी सरकारी इमारतींच्या टळटळीत भिंती अलीकडेच विविध चित्रांनी, भित्तिचित्रांनी भरून आणि भारून टाकल्या. सार्वजनिक जागांचा अशा प्रकारे वापर कलावंतांना करू देणे हेच कला-स्वातंत्र्याचे प्रतीक ठरले. या उपक्रमातील एक चित्रकार म्हणाला त्याप्रमाणे- ज्या तृतीयपंथी व्यक्तीला रस्त्यावर भीक मागावी लागते, त्याच व्यक्तीला तेथील भिंतीवरील चित्रात आपली प्रतिमा पाहून अस्तित्वाचा साक्षात्कार होतो, ही स्ट्रीट आर्टचीच किमया. स्ट्रीट आर्टबाबत आणखी एक उदाहरण.. ब्रिटिश कलावंत बान्स्की हा स्टेन्सिलचा वापर करून ग्राफिटी (भित्तिचित्रे) रंगवत असे. पोलीस येऊन त्याला मज्जाव करेपर्यंत भरभर चित्रे काढून व्हावीत याकरता तो स्टेन्सिल (पत्र्याचे छाप) वापरत असे. हे सारे आठवताना तो एके ठिकाणी म्हणतो, ‘‘छाप उमटवण्यासाठी पत्र्यातून मी पहिला आकार कोरून काढताच मला शक्ती आल्यासारखे वाटे. रंगांच्या स्प्रेचे डबे घेऊन केलेली ग्राफिटी हाही एका पातळीवरचा विद्रोहच. पण स्टेन्सिलला तर स्वत:चाच राजकीय इतिहास आहे.. अशाच स्टेन्सिलमधून कित्येकदा क्रांतीची सुरुवात झाल्याचा आणि शांततेसाठीच्या लोकलढय़ांचे स्फुल्लिंग चेतल्याचा इतिहास आहे!’’

बान्स्कीचे म्हणणे खरेच आहे. अगदी ‘अरब स्प्रिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्रोहादरम्यान याचा प्रत्यय आला. शाळकरी मुलामुलींनी सीरियातील दारा शहरात शाळांच्या भिंतींवर जेव्हा सरकारविरोधी घोषणा लिहिण्याची सुरुवात केली, तेव्हापासून तेथील आंदोलक, बंडखोरांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होऊ लागला.

भारतात १९४३ साली बंगालमध्ये जेव्हा धान्याच्या तुटवडय़ामुळे अभूतपूर्व अशी उपासमार सुरू झाली, तेव्हा चित्तोप्रसाद भट्टाचार्य आपले चित्रकला साहित्य घेऊन गावोगाव भटकत होते. या उपासमारीत गरीबांचे झालेले हाल काळ्या  शाईने भरलेल्या त्यांच्या कुंचल्यातून कागदावर उमटू लागले. वसाहतवादी राज्यव्यवस्था आणि जागतिक भांडवलशाहीमुळे निर्माण झालेले हे तीव्र उपासमारीचे अरिष्ट आणि अन्नधान्याचा तुटवडा त्यांच्या चित्रांतून प्रकटत होता. ज्या राज्यसत्तेने स्वत:च्या वसाहतिक युद्धातील विजयाचा भार भारतावर टाकून बंगालमधील लोकांना भुकेकंगाल केले होते, त्या वसाहतवादी राज्यसत्तेचा अमानवी चेहरा त्यांनी त्यांच्या चित्रांतून उघड केला. ‘हंग्री बेंगॉल’ या मालिकेतील ही चित्रे ब्रिटिश सरकारने हस्तगत करून त्यांच्या जवळपास सर्व प्रती नष्ट केल्या. परंतु ही चित्रे आजही महत्त्वाची मानली जातात.

सामाजिक चळवळींचा इतिहास आपण पाहिला तर असे दिसते की, या चळवळींच्या चित्रणाने तत्कालीन हिंसा, शोषण, अन्याय, असमानतेची रूपे उघड केली आहेत. सामाजिक-राजकीय प्रश्न आणि सामाजिक उतरंडीला आव्हान देत असतानाच जे शासक होते, त्यांच्याविरोधात बोलण्याचे बळ दुर्बलांना दिले ते कलेनेच. शोषितांच्या आवाजासाठी कलेनेच अवकाश उपलब्ध करून दिला. कला ही राजकीय असते. जर ती तशी नसती तर ती केवळ रंग, शब्द किंवा संगीतापुरतीच उरली असती. कलेच्या या सामर्थ्यांबाबतच मला तुमच्याशी संवाद करायचा आहे. कल्पना आणि पुनर्कल्पनेचा आजच्या वास्तवात काय अन्वयार्थ होऊ शकतो, याविषयी चर्चा करावयाची आहे.

‘व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण राज्ययंत्रणेपासून करणे’ असा स्वातंत्र्याचा अर्थ होतो का? न्यायाधीशांपुरते बोलायचे तर ‘राज्ययंत्रणेविरोधात व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावकाशाचे संरक्षण करणे’  हे आमच्या कामामागील मूल्य आहे. मात्र, हा स्वातंत्र्याचा मर्यादित पारिभाषिक अर्थ  झाला. ‘‘समाज म्हणून आपले यश हे केवळ दरडोई उत्पन्नाच्या फुटपट्टीने वा आपण सरकारी धोरणांना कसा विरोध केला यावरून ठरवू नये..’’ याची आठवण देणारे अमर्त्य सेन पुढे म्हणतात की, ‘‘आपल्या नागरिकांना पुरेसे स्वातंत्र्य आहे का? ते ज्या परिस्थितीचा सामना करत आहेत, त्यातून जीवनात प्रगती करण्याकडे ते वाटचाल करू शकतात का? याचं परीक्षण आपण केलं पाहिजे.’’ भूतानने आपल्याला ‘सकल राष्ट्रीय आनंदा’ची (ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस) व्याख्या दिलेली आहेच. डॉ. आंबेडकर म्हणतात की, केवळ विनाअट स्वातंत्र्य किंवा (भरपूर) पसा या कशानेही भेदभाव, एखाद्या समूहाला कलंकित करणे, सामाजिक शोषण यांचे उच्चाटन होऊ शकत नाही. तर ‘‘माणसाचे माणसावरील वर्चस्व संपवणे म्हणजे स्वातंत्र्य, हे एकदा मान्य केल्यास केवळ आर्थिक सुधारणांचाच आग्रह धरून राहणे (तेवढय़ाने वर्चस्व संपेल असे मानणे!) हे अर्थातच अशक्य आहे..’’ असे डॉ. आंबेडकर यांनी ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये म्हटले आहे.

परिस्थितीच्या वेढय़ातूनही आपण आपल्याला हवे असलेले जीवन जगू शकणे, हे जर स्वातंत्र्याचे माप मानले; तर हेही मान्य करावे लागेल, की आपल्या स्वातंत्र्यावर केवळ सरकारची बंधने नसून आपल्या सामाजिक वास्तवाचीही बंधने आहेत. म्हणजे मग आपण जेव्हा स्वातंत्र्याची कल्पना करणाऱ्या कलेच्या शक्तीबद्दल बोलतो, तेव्हा केवळ मर्यादित अर्थ गृहीत धरता येणार नाही. ते स्वातंत्र्य हे केवळ दमनकारी सरकारपासून स्वातंत्र्य नसेल, तर आपण नागरिक म्हणून एकमेकांवर जी अ-स्वातंत्र्ये रोजच्या जगण्यात हरघडी लादतो, त्याचाही विचार त्यात अनुस्यूत असेल. अशा सामाजिक वास्तवाच्या बंधनांपासून स्वातंत्र्य मिळवणाऱ्या सृजनशक्तीबद्दल थॉमन व्हर्नान रीडने म्हटले आहे की, नेहमीच शिरजोर ठरणाऱ्या कल्पनांविरोधातील ‘सांकेतिक संदेश’ देण्याचे काम विनोद, लोकगीते वा लोककथा आणि लोकनाटय़े यांमधून लोकसमूहांनी केलेले आहे. कलेमध्ये अभिव्यक्तीचा हेतू आणि स्वत:चे सार्थक करण्याचा अंतर्मुख प्रयत्न असतो, तसेच समाजात असलेल्या अस्वातंत्र्याची किंवा दमनाची जाणीव समूहमनात रुजवण्याचा बहिर्मुख प्रयत्नही असतो.

कलावंत त्याच्या कलेतून समूहाच्या धारणा तयार करतो. अशा धारणा- ज्यांना पुन्हा पुन्हा आकार देता येतो. या धारणांचा त्या- त्या समूहांच्या इतिहासातल्या व्यवस्थात्मक शोषणाशी संबंध असतो. जेव्हा एखादा समूह आपल्यापेक्षा वरचढ ठरणाऱ्या वर्चस्ववादी समूहाच्या धारणा स्वीकारतो, तेव्हा त्या दुर्बल समूहाच्या अस्मिता नष्ट होतात. मात्र, अस्मितांच्या अशा प्रकारे नष्ट होण्यालाही अवरोध केला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दलित साहित्य. शोषणाविरोधातला एक विचार (काउंटर डिस्कोर्स) या साहित्याने दिला. हा विचार केवळ दलितांच्या शोषणाविरोधात, भेदभाव व गरिबीविरोधात नव्हता, तर कोणत्याही समूहाला परिघाबाहेर लोटण्याच्या विचाराला सहजासहजी स्वीकारण्यालासुद्धा विरोध असला पाहिजे, ही जाणीव त्यात होती. जगण्यातील हीनता, अभावग्रस्तता यांविरोधात या समूहाने संघर्ष केलेला आहे. दलित साहित्याच्या उदयाने दलितांचे वर्तमानातील जीवनानुभव व इतिहास याला साहित्यात स्थान मिळू लागले.

दलित सांस्कृतिक अस्मिता ही दलितांच्या जीवनातील दु:ख, भोगवटा यांच्या पलीकडे  गेली आहे. प्रू्वापार चालत आलेल्या अस्पृश्यानुभवांच्या कथनापल्याड जाऊन नव्या, स्वतंत्र अशा सकारात्मक अस्मितेकडे हा समूह झेपावतो आहे. जुन्या धारणा, रूढींना हलवून नव्याची रुजुवात करणे तसेच सांस्कृतिक अवकाशाचा नव्याने अर्थ लावणे, हे दलित समूह करतो आहे. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. दलित साहित्य चळवळ मुळात राजकीय हेतूने, आशयाने प्रेरित आहे. लेखक-कवींनीच ‘दलित पँथर’ची स्थापना केली. राजकीय ध्येये साध्य करण्यासाठी साहित्यातल्या आशय प्रकटनाचा वापर माध्यम म्हणून करण्यात आला. जातवास्तवाबाबत चेतना निर्माण करणारा, तसेच जातीय भेदभावाचे समूळ उच्चाटन करण्याचा विचार या साहित्यातून मांडला जाऊन त्याचा प्रसार करण्यात आला. याबद्दलची रंजक गोष्ट म्हणजे दलित पँथरचा जाहीरनामा अमेरिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीच्या जवळ जाणारा होता. जातिभेद आणि वर्णभेद या भिन्न समाजवास्तवांबद्दल येथील दलित आणि आफ्रिकन अमेरिकन यांच्यात सहवेदनेचे नाते दिसते. दलित साहित्य- विचारविश्व यावर आफ्रिकन अमेरिकन वर्णभेदविरोधी चळवळीचा प्रभाव दिसतो.

अलीकडेच निधन झालेल्या नोबेलविजेत्या लेखिका टोनी मॉरिसन या त्यांच्या ‘ओरिजिन ऑफ अदर्स’ या लेखसंग्रहात म्हणतात, ‘‘आमच्यासाठी उपलब्ध असलेली संसाधनं- जी निळ्या आभाळाच्या छताखाली आम्हाला तोलून धरतात आणि आम्हाला इतरांपासून वेगळं ठरवतात- अशी संसाधनं मोजकीच, पण सामर्थ्यशाली आहेत.. भाषा, चित्रं आणि अनुभव ही ती संसाधने.’’

भोवतालातील शोषणाचे चित्रण करण्याच्या अनेक अपारंपरिक पद्धती कलावंत वापरतात. या अपारंपरिक पद्धतींमधूनच सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या संरचनेला आव्हान दिले जाते. पा रंजिथ या तमीळ दिग्दर्शकाच्या नेतृत्वाखाली ‘कास्टलेस कलेक्टिव्ह’ हा बँड असे काम करतो आहे. दलित कलावंत, गायक, हिपॉप, रॅप आर्टस्टि एकत्र येऊन काम करत आहेत. ‘तुम्ही खालच्या जातीचे असाल तर तुमचा आवाज ऐकला जाणार नाही, तुम्हाला व्यक्त होऊ दिले जाणार नाही, कलेच्या माध्यमातून तुमचे असे कथ्य (नॅरेटिव्ह) मांडू दिले जाणार नाही,’ अशी धारणा या कलावंतांच्या कलाकृतीतून प्रकट होते. मात्र नवे प्रयोग, नवीन शैली, नवा कलाप्रकार यातून हे कलावंत महत्त्वाचा संदेश देत आहेत. मागील वर्षी जानेवारीत या बँडने चेन्नईत एक कार्यक्रम केला होता. राखाडी रंगाचा वेश परिधान केलेल्या सगळ्या कलावंतांनी चार हजार प्रेक्षकांसमोर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य छायाचित्राची पाश्र्वभूमी असलेल्या मंचावर आपली कला सादर केली.

कला ही शोषित समूहांना त्यांच्या दु:खानुभवांचे विरेचन करण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देते. एका अर्थाने हे माध्यमच आहे- कोणत्याही प्रकारचा पारतंत्र्यातील अनुभव व्यक्त करण्याचे. बेंगळुरुमधील ‘आरवनी आर्ट प्रोजेक्ट’ या संस्थेने तृतीयपंथीयांना त्यांच्या अनुभवकथनासाठी व्यासपीठ तयार करून दिले आहे. त्यासोबतच विविध लैंगिक अल्पसंख्याकांना सोबत घेऊन सार्वजनिक ठिकाणी भित्तिचित्रे- स्ट्रीट आर्टद्वारे जनजागृती केली जात आहे. लिंगभावी राजकारण, अस्मिता याला आकार देण्याचे काम यातून होत आहे. चेन्नईमध्ये एका भिंतीवर ६० फूट उंचीची एक प्रतिकृती तयार केली होती. तारा नावाच्या एका देहविक्रय करणाऱ्या २८ वर्षीय तृतीयपंथी महिलेचे ते चित्र होते. ९० टक्के भाजल्यामुळे ताराचा मृत्यू झाला होता. तिच्या स्मरणार्थ हे चित्र काढून माणुसकी जपण्याबाबतचा संदेश त्यावर लिहिलेला होता. यासारख्या कृतीतून शोषितांच्या कथा सांगण्याचा प्रयत्न आरवनी प्रोजेक्ट करत आहे.

जातीय व लिंगभेदभावामुळे शोषण झालेल्या अनेकांना कलेच्या माध्यमातून आपल्या शोषणावर मात करून पुढे जाण्याचे सामर्थ्य मिळाल्याची काही उदाहरणे मी पाहिलेली आहेत. अपंगांसाठी तर कलेतून व्यक्त होणे, ही घडामोडच स्वातंत्र्याविषयी बरेच काही सांगणारी ठरते. सन १९४३ मध्ये ज्युडिथ (ज्युडी) आणि जॉय स्कॉट या जुळ्या बहिणींचा जन्म झाला होता. त्यापैकी ज्युडीला जन्मत:च बहिरेपण आणि मतिमंदत्व आले होते. वयाच्या सातव्या वर्षी दोघी बहिणींना वेगळे करून ज्युडीला रूढार्थाने ‘शिक्षण घेण्यास असमर्थ’ ठरवले गेल्याने एका सरकारी संस्थेत ठेवले गेले. पस्तीस वर्षांनी तिची तिथून सुटका झाली, तोवर जॉय तिची कायदेशीर पालक बनली होती. ज्युडी आता ख्यातनाम कलावंत बनण्याच्या मार्गावर होती.  दैनंदिन वापराच्या वस्तूंभोवती फायबरच्या आवरणावर बारीक कोरीवकाम, नक्षीकाम करून ती कलाकुसरीच्या वस्तू बनवायची. जॉय आपली बहीण ज्युडी हिच्या कलाकृतीबद्दल सांगते, ‘‘ज्युडीने बनवलेली पहिली कलाकृती मला चांगलीच स्मरणात आहे. तिने दोन मानवी प्रतिकृती तयार करून फायबरमध्ये अतिशय नाजूकपणे रचल्या होत्या. दोन्ही प्रतिकृती एकमेकांना जोडलेल्या. मला माहीत आहे की, आम्ही जुळ्या असल्याचं, दोघी एकाच शरीरातून जन्मून वेगळ्या झाल्याचं तिला माहीत असणार.’’ ज्युडिथ आणि जॉयचं उदाहरण आपल्याला दृश्य माध्यमाचे सामर्थ्य दाखवते. विशेषत: अपंग व्यक्तींना लिहिण्या-बोलण्यात अनेक अडचणी येतात. अशा वेळी या दृश्य माध्यमाचा वापर किती परिणामकारक ठरतो, हे दिसून येतं.

२००७ मध्ये तमीळ दिग्दर्शक राधा मोहन यांनी एक मोझी नावाचा ‘हलकीफुलकी प्रेमकथा’ ठरणारा चित्रपट बनवला. बहिरेपण आलेल्या महिलेभोवती हा सिनेमा फिरतो. याबाबत ते (राधा मोहन) म्हणतात :  भारतीय सिनेमात अपंग व्यक्ती नेहमी गंभीर, दु:खी (हजरजबाबीपण नसलेल्या) किंवा नेहमी रडणाऱ्या अशा दाखवल्या जातात. पण मला मात्र माझ्या सिनेमाची नायिका (अर्चना) ही आत्मविश्वासू, सकारात्मक अशी दाखवायची होती. या नायिकेला कुणाच्याही सहानुभूतीची गरज नाही. अशा कलाकृती आपल्याला हे दाखवून देतात की अपंगांचेही एक सामाजिक अस्तित्व असते. त्यांच्याकडे केवळ परोपकारी वृत्तीने पाहण्याची आवश्यकता नाही.

आपण जेव्हा सगळ्यांनी मिळून वेगळ्या पद्धतीने या पृथ्वीवर राहण्याचा विचार करतो, तेव्हा कलाच आपल्याला स्मरण करून देते की, आपण केवळ माणूस म्हणून नाही, तर व्यापक अर्थाने एकमेकांशी जोडले गेलेले या ग्रहावरचे सजीव आहोत. माणूस आणि निसर्गातील आंतरसंबंध आणि क्रिया भविष्यातील परिणामांचाही वेध घेत असतात. त्यामुळेच कलावंत कला आणि पर्यावरणाची हानी यांची सांगड घालूनही कलाकृतीची निर्मिती करू शकतात आणि पर्यावरणाच्या हानीच्या विविध छटा या कलाकृतीतून व्यक्त होऊ शकतात.

शाश्वत पर्यावरणीय अवकाशासाठी आपण काय भूमिका घेणार आहोत आणि भविष्यासाठी कोणते पर्याय निवडणार आहोत, यावरील विचारविमर्शासाठी पर्यावरणीय कलेच्या ऐतिहासिक आणि समकालीन रूपांचे महत्त्वाचे योगदान आहे. विविध आर्ट गॅलरींतील चित्रे, स्ट्रीट आर्ट, चित्रकथा, किंबहुना मोबाइलवरील विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातूनही शाश्वत पर्यावरणीय प्रारूपांवर चर्चा केली जात आहे. पिक्सर प्रॉडक्शनने बनवलेला ‘वॉल- ई’  हा सचेतपट ही एक उत्तम चित्रपटीय कविताच आहे; ज्यात पर्यावरणाच्या हानीबाबत केलेले भाष्य एकाच वेळी यातील आशयाचे सौंदर्य आणि काळी बाजूही दाखवते.

‘ग्रीनपीस’ या संस्थेने दक्षिण कोरियामध्ये बनवलेले शिल्प हे आणखी एक बोलके उदाहरण. आईने आपल्या मुलीचा हात धरला आहे, असे हे शिल्प. यातील मुलीची प्रतिकृती बर्फापासून बनवलेली होती. या शिल्पासोबतचे वर्णन होते- ‘जागतिक तापमानवाढीमुळे आपलं भविष्य नाहीसं होतंय.’ तेथील लोक, प्रवासी यांच्या डोळ्यांदेखत अवघ्या काही तासांतच त्या शिल्पातील मुलीची प्रतिकृती विरघळत विरघळत ती नाहीशी झाली. या कलाकृतीच्या तीव्र दृश्य परिणामामुळे लोक जागतिक तापमानवाढ या समस्येशी भावनिकरीत्या जोडले गेले. समाजात सामूहिक चेतना जागृत करण्यात कल्पनाशक्तीची किती मोलाची भूमिका आहे, हे या उदाहरणातून दिसून येतं.

उदाहरणे आणखीही आहेत. पण मला वाटते की, या उदाहरणांतून स्वतंत्र असण्याचा खरा अर्थ काय, आणि त्याहीपेक्षा अस्तित्वाचे आत्मपरीक्षण करत राहून ‘स्वातंत्र्या’चे विस्तारणारे क्षितीज कसे साकारायचे, याविषयी कल्पना मांडण्याची कलेची शक्ती स्पष्ट झाली असावी. स्वातंत्र्य ही काही इथे, आत्ता आपल्यासाठीच असणारी बाब नसून ते येणाऱ्या पिढय़ांसाठीही असते. कलेच्या स्वतंत्रतेला धोका हा ‘मुख्य धारे’ची मानल्या जाणाऱ्या प्रस्थापित कलावंतांच्या समूहाकडूनही असू शकतो. काही समाजांना आवाजच नाही, त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही असे जर कलेने मानले, तर कलाच दमनकारी आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाला खतपाणी घालणारी ठरू शकते. अशा समजांना आव्हान देणारे एक उदाहरण म्हणजे टी. एम. कृष्णा यांनी जोगप्पा गायकांसह केलेली ‘परफॉर्मिग द पेरिफरी’ हे मैफल. ‘विविध प्रकारच्या संगीतातून सांस्कृतिक आणि लैंगिक वैविध्याचा संवाद’ असे या मैफलीचे वर्णन टी. एम. कृष्णा यांनी केले होते.

राज्ययंत्रणेकडून कलेची होणारी दडपणूक ही याहीपेक्षा अस्वस्थ करणारी बाब. कलेचा एक स्वभावधर्मच आहे की ती झपाटय़ाने बदलत जाते. बऱ्याचदा हा बदल विशिष्ट अशा एखाद्या दिशेने नसतो. जी कला प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करते, ती राज्ययंत्रणेसाठी बंडखोर ठरते. पण हे कलेवरील दडपणुकीचे कारण नाही. त्यामागील नेमके कारण विशद करताना सांस्कृतिक हक्कांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या विशेष सांस्कृतिक दूत फरिदा शाहीद म्हणतात, ‘‘कलाभिव्यक्ती, निर्मिती या विशिष्ट असा मूल्य-संदेश, प्रतीकात्मक आशय जनमानसापर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे कलेची दडपणूक होते. यामागे हेतू असतो तो राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक, आर्थिक हितापासून वंचित करण्याचा. अशा अस्वस्थ करणाऱ्या दमनाची उदाहरणं जगभर- सर्व खंडांमध्ये आहेत.’’

जगभरातल्या शोषक राजवटींनी कलाभिव्यक्तीची दडपणूक केली आणि त्यामुळे सार्वजनिक अवकाशात सृजनशील अभिव्यक्तीचा परीघ आक्रसला, असे इतिहास सांगतो. आज जगात असहिष्णुता मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे आपण पाहतो.. जिथे कलेचा कोंडमारा केला जातो, तिला छिन्न-विच्छिन्न केले जाते. कलेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होतो. कलेवर हल्ले होतात. कलेवरील हे हल्ले म्हणजे स्वातंत्र्यावरील हल्लेच आहेत. अशा परिस्थितीत हेच सांगावेसे वाटते की, भारतीय संविधानाचा स्वीकार करताना आपल्या राष्ट्रधुरिणांनी आपल्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पायाभरणी केली.  अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य कायद्यातील निश्चल अक्षरे बनून न राहता ते जगता यावे यासाठी आपण दररोज संघर्ष केला पाहिजे.

कला भुणभुण करते असे समजता येते. कला हे औषधही ठरते. स्वातंत्र्याची आस आपल्या आत असतेच. ते स्वातंत्र्य मोघम असेल, भले त्याला अंतही असेल; पण  स्वातंत्र्याची आस कलेमुळे जिवंत राहते. कलेच्या अंगी स्वातंत्र्याचा जो संदेश आहे, तो अमिट असतो.

(सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत ‘लिट लाइव्ह- फ्रीडम लेक्चर’ या उपक्रमात ‘कलेतून स्वातंत्र्याची कल्पना’ या विषयावर केलेल्या भाषणाच्या मूळ इंग्रजी प्रतीवरून संकलित केलेला लेख.)

अनुवाद- प्रियांका तुपे

priyanka.tupe@expressindia.com

First Published on August 25, 2019 12:25 am

Web Title: art emotion and ethics judge dhananjaya chandrachud mpg 94
Next Stories
1 विकासाचे भकास चित्र
2 ‘धि गोवा हिंदु..’चे शतक           
3 त्यागाला मर्यादा नसते..
Just Now!
X