News Flash

अरतें ना परतें.. : थकलेल्या ययातीचं भय

एक म्हणजे अचानक काही दिवसांपासून मला जाणवू लागलं आहे : मी काही सांगू लागलो की लोक दुर्लक्ष करत असतात.

प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com

कवी वसंत आबाजी डहाके यांचा एक लेख वाचत होतो. त्यात ‘कबीर व्हायरस’विषयी लिहिलं होतं त्यांनी. काही लोक- विशेषत: कवी, लेखक, कलावंत वगैरे या व्हायरसमुळे प्रभावित झालेले असतात असं निरीक्षण डहाकेंनी त्यात मांडलं होतं. या व्हायरसमुळे प्रभावित असलेले लोक सेक्युलर विचारांचे, मानवतावादी, उदारमतवादी असे बनलेले असतात. त्यामुळे अनेकदा ते आजच्या जगाच्या व्यवहारात हास्यास्पद ठरतात, अडगळीत जातात असं त्यांचं म्हणणं होतं. तरीही जास्तीत जास्त लोक या व्हायरसने प्रभावित होऊ देत अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. डहाके सरांच्या या लेखातली ‘कबीर व्हायरस’ ही संकल्पना मनात रुतून राहिली होती. ‘कबीर व्हायरस’ने पछाडलेले लोक अल्पसंख्याक असले तरी ते सहजासहजी मोडीत काढता येऊ शकतील, पूर्णपणे नामशेष होऊन जातील असं मात्र मला वाटत नव्हतं. पण गेल्या काही वर्षांपासून जगभरात घडू लागलेल्या काही घटना पाहताना, त्यांविषयी विचार करताना, त्यांची कारणमीमांसा करताना कबीर व्हायरसने प्रभावित झालेले लोक झपाटय़ाने कमी होऊ लागले आहेत, त्यांची जागा दुसऱ्याच कुठल्याशा भयावह व्हायरसने घेतली आहे असं जाणवू लागलं आहे.

प्रभाव कमी कमी होत जात कबीर व्हायरसने पछाडलेले लोक हळूहळू दिसेनासे होऊ लागलेत. मुख्य म्हणजे त्या दुसऱ्या नव्या व्हायरसने मेंदूचा ताबा घेतलेले लोक कबीर व्हायरसवाल्यांना टिच्चून वेचून संपवू लागले आहेत याची जाणीव आपल्याला नेमकी कधीपासून होऊ लागली? हा दुसरा अधिक प्रभावी आणि अत्यंत वेगाने जगभर पसरू लागलेला व्हायरस नक्की कुठचा असावा? त्याला कसं शोधून काढायचं? काय नाव द्यायचं? याविषयी विचार करताना काही गोष्टी समोर येऊ लागतात.

एक म्हणजे अचानक काही दिवसांपासून मला जाणवू लागलं आहे : मी काही सांगू लागलो की लोक दुर्लक्ष करत असतात. एक वेळ मी विद्यार्थ्यांचं समजू शकतो. मुलं बेफिकीर झालीयत, शिक्षकांची कदर नाहीये, शिकणं, ज्ञान मिळवणं वगैरे गोष्टी बिनमहत्त्वाच्या वाटू लागल्यात त्यांना- असं म्हणून आपल्या मनाची समजूत काढता येते. सहकारी शिक्षकांशी वगैरे त्याविषयी बोलून आपल्यासारखंच इतरांच्याही बाबतीत होतंय याचं समाधान मानता येतं. ते एक ठीक आहे समजा; पण उर्वरित लोकांचं काय? आपल्या घरच्या लोकांचं काय? मित्रमैत्रिणींचं काय? शेजारीपाजारी आणि आजूबाजूच्यांचं काय? ते तुमचं ऐकून घेत नाहीत, सरळसरळ तुम्हाला जाणवेल असं दुर्लक्ष करत आपलं आपलं बोलत राहतात, त्याचं काय करायचं? अनेकदा असंही वाटू लागतं की, आपण बोललेलं यांना नक्की ऐकू येतंय ना? बोललेलं समजतंय ना? मुळात आधी आपल्याच मुखातून काही शब्द बाहेर पडतायत ना? नक्की काय प्रकार आहे? असं का होऊ लागलंय हे?

की आपली भाषाच बदलत किंवा बिघडत चालली आहे? माझ्या आणि इतरांच्या भाषेत अंतर पडत चाललं आहे? नव्या काळाने नवी भाषा जन्माला घातली आहे आणि आपल्याला या काळाशी जुळवून घेता येत नसल्याने आपण हळूहळू आपल्या भाषेसहित कालबा ठरू लागलो आहोत, असं तर काही नसेल ना हे? आपल्या आणि इतरांच्या भाषेत अंतर पडत जातंय, याचा अर्थ आपला संवादही नीटपणे, सुसंगतपणे होऊ शकत नाहीये. आपण आजवर भाषेतूनच व्यक्त करत असलेल्या संवेदना, जाणिवा, विचार सगळंच आता अधांतरी लोंबकळत राहील. बरं, आपली भाषा कळत नसल्याने कुणाचं काही अडत असेल असंही वाटत नाहीये. हे असं त्या नव्या, अधिक प्रभावशाली व्हायरसमुळेच तर होत नसेल ना?

परवाचंच बघा ना! तीनसांजे अचानक पंख फुटलेली वाळवी उडू लागली होती. घराच्या सगळ्या कोनाकोपऱ्यांतून, बारक्यासारक्या फटी-सांदींतून भसाभसा वर येत हजारो, लाखो पंखांची भिरी भिरभिरत होती. त्यांतल्या अनेकांचे पंख गळून जमिनीवर पडत होते. दिव्यांखाली तर खच पडत होता तुटल्या पंखांचा. पंख गळालेले इवले इवले किडे इकडे तिकडे घरभर सरपटत होते. हे दृश्य पाहताच मी मुलाला म्हटलं, ‘आता पाऊस येईल लवकरच. वाळवीला पंख फुटले! हल्ली ते लाल-शेंदरी मृगकीडे कुठे दिसत नाहीत. पूर्वी याच दिवसांत घराशेजारी, इकडे तिकडे घोळक्याघोळक्यानं दिसायचे. ते दिसू लागल्यावर आम्ही समजायचो की आता लवकरच पाऊस येणाराय!’

स्वगत बोलत असल्यासारखा, काहीसा एक्साइट होत मी बोलत राहिलो होतो. माझ्याकडे लक्ष न देता मुलगा मात्र आपलं काम करीत राहिलेला. मृगकिडय़ांविषयी किंवा पावसाविषयीच्या या असल्या पारंपरिक संकेतांविषयी त्याला माहीत असायचा काही प्रश्नच नव्हता. लवकरच आता रखरखाटी दिवस संपवणारा पाऊस येणाराय, या सुवार्तेचं याला काहीच कसं वाटत नाही, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नाही, म्हणून मी चिकाटीनं पुन्हा म्हटलं, ‘अरे, खरंच, पाऊस येतो की नाही बघ, येत्या चार-आठ दिवसांत. हे आमचे गावठी आडाखे खोटे नाही ठरायचे!’

त्याने मोबाईल फोनमधून डोळे वर उचलून त्रासिकपणे माझ्याकडे पाहत म्हटलं, ‘अरे बाबा, हे सांगायला या तुझ्या व्हाइट अँट्स कशाला हव्यात? काल न्यूज ऐकल्या नाहीस का, यंदा मॉन्सून लवकर येणार आहे. मिटिऑरॉलॉजिस्ट्सनी ऑलरेडी सांगितलंय  ना!’

‘या तुझ्या हवामानशास्त्रज्ञांचं काही सांगू नकोस मला. सगळं अंदाज पंचे धाव्वोदश्शे चाललेलं असतं त्यांचं. पण हे निसर्गातले कृमीकीटक बघ, त्यांचं बारकाईने निरीक्षण कर, कधी चुकणार नाहीत ते. ऋतूबदलाची चाहूल आपल्यापेक्षा अधिक अचूकपणे त्यांनाच लागत असते. आपण झाडंपेडं नष्ट केली. किडय़ामुंग्या संपवल्या. जैविक साखळीच तोडून टाकली. म्हणून हे असं सगळं अनियमित सुरू झालं आहे. नाहीतर आधी कोण कुठचा हवामानशास्त्रज्ञ येत होता शेतकऱ्याला पावसाचं भाकीत सांगायला? घरात मुंग्यांचं रीवाण दिसायला लागलं, कणग्या-करांद्यांना कोंब फुटायला लागले, माडांच्या शेंडय़ावर बसून धनेश पक्षी ओरडायला लागले की आमचे कुणबी-कुळवाडी लोक शेतीच्या तयारीला लागायचे. जमिनी भाजायला घेत. पेरणीच्या आवानाची जमवाजमव करत. बैल, नांगर, बाकीची अवजारं, कामेरी सगळी धावपळ सुरू व्हायची. सगळं जगणंच निसर्गावर अवलंबून असलेले किती सुंदर दिवस होते ते!’

माझं पुन्हा स्वगत सुरू झालेलं पाहताच मुलगा उठून आतल्या खोलीत निघून गेला. याही गोष्टीची आता सवय होत चालली आहे. आसपासच्या माणसांना आपलं बोलणं एकतर कंटाळवाणं वाटत असावं, किंवा निर्थक तरी! अगदी फार फार वर्षांपूर्वीचं नव्हे, कालपरवाचं आपण जगलेलं काही सांगू गेलं तरी माणसांना ते दंतकथेतल्यासारखं वाटू लागलं आहे. कल्पित, अवास्तव आणि अतिशयोक्ती असल्यासारखं. काहींना वाटतं, लेखक, प्राध्यापक, पत्रकार आणि वयाच्या हिशेबाने स्वत:ला शहाणे समजू लागलेल्या ज्येष्ठांना वगैरे हे असं बोलायची गरजच वाटत असते. त्यांचं काय ऐकायचं?

हळूहळू आता ही भावना सार्वत्रिक होऊ लागल्याचं चित्र सगळीकडे दिसून येत आहे. लेखक-कवींना तर कुणी फारसं गंभीरपणे घेत नाहीयेत. अनेकदा तर हास्यास्पदही ठरवलं जाऊ लागलं आहे त्यांना. लेखक शेतीविषयी बोलले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी बोलले की लोक हसू लागतात. कवी पर्यावरणाविषयी बोलू लागले की लोक शिटय़ा वाजवतात, टोप्या उडवतात. जाती-धर्माविषयी, इतिहासाविषयी, राजकारणाविषयी काही विधान एखाद्या लेखकाने केलं की सगळे मिळून त्याच्यावर तुटून पडतात.. खिल्ली उडवतात. अशातून मग काही लेखक व्यवस्थेशी हातमिळवणी करू लागले, सत्तेच्या बाजूने बोलू लागले, त्यामुळे मिळणारी सुरक्षितता नि आनुषंगिक लाभ मिळवू लागले, तर त्याचंही कुणाला काही वाटेनासं झालंय. कालपरवापर्यंत असं कुणी केलं तर लोक एकदम चिडून त्याला लेखकाचं काम काय असतं, म्हणून जाब विचारत असत. आता लेखक कुणाच्या बाजूने बोलतोय, शेवटच्या माणसाच्या की प्रस्थापितांच्या, कुणीच पाहत नाहीयेत. पाहत असले तरी लोकांना वाटतंय, असा काय मोठा फरक पडतोय लेखक कुठेही गेला, कुणाच्याही बाजूने बोलला तरी? लेखक म्हणजे काय सत्तेची कवचकुंडलं लाभलेला कुणी मसिहा आहे का? त्याने कितीही कंठशोष केला आमची बाजू घेऊन व्यवस्थेच्या विरोधात, तरी आमचं जगणं थोडंच बदलू शकणाराय तो! यामुळेच बहुधा लेखक काहीही बोलू दे, कुणीच त्याचं ऐकत नसावेत. त्याचं त्याला काय ते लिहू दे; आपल्याला वाटलं तर आपण वाचावं किंवा न वाचावं. वाचलं तर वेळ घालवण्यासाठी वाचावं, करमणूक करून घेण्यासाठी वाचावं. आपण बुद्धिजीवी असलो तर धंद्याचा भाग म्हणून वाचावं, किमान वाचण्याचा बहाणा करावा नि लेखकाला विसरून जावं. बाकी विचार करण्यासाठी, जग समजून घेण्यासाठी, जाणिवा समृद्ध करण्यासाठी वगैरे काही वाचायची गरजच काय असते?

लेखक-कवीच असं नव्हे, गंभीरपणे जगण्याविषयी, आपल्या अनुभवांविषयी, बऱ्यावाईट मूल्यांविषयी- असं कशाहीविषयी कुणी जाणतेपणानं काही सांगू लागला तरी त्यालाही असाच अनुभव येऊ लागला आहे. शहाणपणा शिकवायचा नाही; आम्हाला सगळं कळतं, सगळं माहीत आहे; नसलं माहीत तरी काही बिघडत नाही. आम्ही गूगलसारख्या कुठल्याही सर्च इंजिनवरून हवं ते शोधून काढू शकतो. तुम्ही बाबा आदमच्या जमान्यातलं काही तरी आउट डेटेड सांगून आम्हाला अक्कल शिकवायचा प्रयत्न करू नका. तसं करून तुमचा आणि आमचाही वेळ वाया घालवू नका.

हे असं का होतंय? नक्की कोण चुकतंय? अनुभवाला, शहाणपणाला, स्वतंत्र आणि स्वयंस्फूर्त विचाराला, आयुष्यभराच्या अभ्यासाला काहीच किंमत उरली नाहीये का? मेंदू गहाण टाकल्यागत हे जे काही सुरू आहे, ती नक्की कुठल्या व्हायरसची परिणती असावी? या नव्या व्हायरसने भावना-संवेदनांची, नात्यांची परिभाषा खाऊन टाकली आहे. ज्ञान, विवेक आणि चिकित्सेची लिपी धूसर केली आहे. खुज्या, संकुचित अस्मितांची नवी हिंसक बोली रुजवली आहे. स्वार्थी, आत्मलोलुप, अहंभावी व चंगळवादी वृत्तीचे रोपण देहामनांत केलं आहे.

या संदर्भात विचार करताना मला ययातीची व्यक्तिरेखा आठवते. या व्यक्तिरेखेला कितीतरी वेगवेगळी डायमेन्शन्स आहेत. खांडेकरांना दिसलेला ययाती वेगळा आणि इरावतीबाईंना आकलन झालेला वेगळा. मला स्वत:ला वाटत आलं आहे की, हा एक कसल्यातरी भयगंडाने पछाडलेला, सतत त्या भयाचं ओझं उरावर बाळगून थकून गेलेला माणूस आहे. ते भय विसरावं म्हणूनच तो आपल्या तृष्णा आणि भुकांच्या आहारी गेलेला आहे. त्यापायी त्याला नैतिक मूल्यांचा विचार करावासा वाटत नाही, नात्यांचा विचार अस्वस्थ बनवत नाही. आपल्या पाशवी भुकांची पूर्तता करता करता आपले रूपांतर एका विवेक हरवून गेलेल्या, वखवखलेल्या जनावरामध्ये कधी झालं, हे त्याचं त्यालाही कळलं नव्हतं. मला अनेकदा वाटतं, आज आपलीही अवस्था या ययातीसारखीच काहीशी झाली आहे. नेणिवेच्या पातळीवर सतत एक प्रकारच्या असुरक्षिततेचं भय आपल्याला कुरतडत असतं. टिकून राहण्याचं, पुढे जाण्याचं, शिल्लक उरण्याचंही. थकवतं ते भय आपल्याला. दमछाक करतं. या भयातूनच संभ्रमावस्था निर्माण झाली असावी. मग आपण असहायपणे शॉर्टकट्स शोधू लागतो ययातीसारखेच. काम, क्रोध, मत्सर, द्वेष, तुच्छता, हिंसा, जातीय वा धार्मिक अस्मिता.. अशा कशाचा तरी आश्रय हवा असतो आपल्यातल्या ययातीला आपलं डळमळतं अस्तित्व टिकवून ठेवायला. एकीकडे जगण्याचा वेग आपल्याला घाबरवतो आहे, त्यातील गुंतागुंत गोंधळात टाकते आहे. त्यामुळेच भूतकालीन अनुभवांचे संचित घेऊन पुढे जाण्याऐवजी आम्हाला आभासी वर्तमान अधिक जवळचं वाटू लागलं आहे. दुसरीकडे नव्या जगण्यातील स्वैर आणि अनिर्बंध स्वातंत्र्यातून आलेली एकटेपणाची पोकळी आम्हाला भेदरवू लागली आहे. अशावेळी आभासी जगण्यातून मिळणारं खोटं सुख-समाधानसुद्धा हवंहवंसं वाटतं. त्यापायी आजवर जपलेल्या मूल्य-विवेकाचा, आपल्या जवळच्या नात्यांचा बळी देण्याचीही आमची तयारी असते. हे अनैतिक आहे, माणूस म्हणून आपलं अध:पतन करणारं आहे याचीही आम्हाला जाणीव उरलेली नाहीये.

की हाच तो नवा किंवा खरं तर माणसाइतकाच आदिम असलेला व्हायरस म्हणायचा? ययाती व्हायरस? आपल्याला वाटत असतं, काळाच्या या प्रदीर्घ पटावर माणूसपणाच्या दिशेने वाटचाल करताना आपण त्याचा कधीच खात्मा केला आहे, तो कधीच नष्ट होऊन गेला आहे. पण आपण किती चुकीचे आहोत हेच तर आजकाल लक्षात येऊ लागलं आहे. ययाती व्हायरस कधी नष्ट होत नसावा. काही काळ थकल्यासारखा, हरल्यासारखा वाटला तरी तो आपल्याच पुढच्या पिढय़ांचा, आपल्याच भविष्याचा जीवनरस रक्त शोषून नव्याने चिरतरुण होत असावा. नव्या रूपात आपल्याला मोहात पाडणाऱ्या अधिक देखणेपणासह पुढे पुढे जात राहिला असावा. या ययाती व्हायरसला दूर ठेवायचं असेल तर डहाके सर म्हणालेत तसं कबीर व्हायरसचा जास्तीत जास्त फैलाव कसा होईल हेच आता शहाण्यासुरत्या माणसांना पाहावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:06 am

Web Title: arten na parten article based on poet vasant abaji dahake story kabir virus zws 70
Next Stories
1 अंतर्नाद : बुद्धं सरणं गच्छामि
2 मोकळे आकाश.. : टेक केअर..
3 पुस्तक परीक्षण : चित्रकाराची बोलकी शब्दचित्रे
Just Now!
X