हिमानी निलेश

himanikorde123@gmail.com

‘अक्कड बक्कड बंबे बो’ हे हिंदी बालगीत ‘प्लेफोर्ड’ लायब्ररीत ऐकून मी केवळ थक्क झाले होते. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर लिंबू, मदर तेरेसा, डायनासोर आणि सिन्ड्रेला अशा पोशाख केलेल्या समस्त थोरांच्या घोळक्यात एक चिमुरडी तिचं लाडकं बालगीत सादर करत होती. तो ‘बुक-वीक’ होता. बुक-वीक म्हणजे सर्व लहान मुलं आणि ग्रंथालयातले लोक आपल्या आवडत्या पुस्तकातील आवडत्या पात्राचा पोशाख करून येतात. म्हणूनच हे लिंबू, मदर तेरेसा, डायनासोर आणि सिन्ड्रेला हे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द लायब्ररीत काम करणारे लोक आहेत हा जावईशोध मला नंतर लागला. आता लिंबानं माझा ताबा घेतला आणि अनेक दालनांच्या प्रशस्त जादूनगरीत आम्ही प्रवेश केला.

प्रथम लिंबानं मला लहान मुलांचं दालन दाखवण्यास सुरुवात केली. छोटय़ा छोटय़ा टेबल-खुर्च्याभोवती छोटे छोटे शेल्फ होते. त्यावर अनेक गोष्टींची, कवितांची पुस्तकं लेखकांच्या नावाप्रमाणे रचली होती. पुढे माहितीपर पुस्तकांचं वेगळं दालन होतं. त्यापुढे मुलांनीच रंगवलेल्या गालिच्यावर मुलं यथेच्छ रंगकाम आणि हस्तव्यवसाय करत बसली होती. हे सगळं जातीने दाखवताना लिंबाचा उत्साह उतू जात होता. इथेच लिंबानं काही वेळापूर्वी आंबट-चिंबट लिंबाची रसभरीत गोष्ट रंगवून सांगितली होती. मग लिंबू मला डोळे मिचकावून म्हणालं, ‘‘आज बुक-वीकच्या निमित्तानं आम्ही  ‘खजिना शोध’ हा खेळ ठेवलाय!’’ मुलांना संपूर्ण लायब्ररीमधल्या घटकांची इत्थंभूत माहिती व्हावी यासाठी लायब्ररीच्या अनेकविध दालनांत खजिन्यातले पुरावे पेरून ठेवलेले असतात. एकदा का खजिन्याचं कोडं सुटलं की त्या मुलांना विविध पुस्तकं बक्षिसं म्हणून दिली जातात. हे सांगताना कोणीतरी बक्षीस मागायला आलं म्हणून लिंबानं मला डायनासोरची भेट घालून दिली. डायनासोर मग मला मोठय़ांच्या दालनात घेऊन गेला. तिथे काही बायका विणकाम करत होत्या. हा आठवडय़ाला भरणारा ‘नीट नॅटर्स’क्लब होता. तिथे जांभळा, अबोली, पिस्ता, बदामी रंगाचे अनेक लुसलुशीत गोंडे आणि विणकामावरची पुस्तकं पडली होती आणि प्रोजेक्टरवर विणकामाचं प्रात्यक्षिक चाललं होतं. विणकाम करणाऱ्या बायकांनी मग डायनासोरचं हसून स्वागत केलं. त्यांनी मागच्या आठवडय़ात विणलेली टोपडी डायनासोरला दिली. ती टोपडी त्या बायका लायब्ररीतर्फे गरिबांना दान करणार होत्या. डायनासोर ते सर्व घेऊन सिन्ड्रेलाकडे गेला. तेवढय़ात मदर तेरेसा माझ्याकडे आली. ती नुकतीच भारतात जाऊन आली होती. ती माझ्याशी ‘गरम मसाल्या’बद्दलच बोलू लागली. मग मला स्वयंपाकाच्या पुस्तकांच्या शेल्फपाशी घेऊन गेली. शेल्फची उंची आता वाढली होती. इटालियन, मेक्सिकन, मलेशिअन, भारतीय अशा सर्व देशांतल्या पाककृतींची पुस्तकं तिथं मांडून ठेवली होती. पुढचं दालन होतं डीव्हीडी आणि सीडीज्चं. इथे देशोदेशींचे असंख्य चित्रपट, रॉक, जॅझ, पॉप असे संगीतप्रकार, वेगवेगळ्या जीवनपद्धती, विविध प्रकारचे व्यायाम.. या आणि अशा अनेक विषयांवरील सीडीज्चा खच होता. बरेचसे लोक भाजीवाल्याकडे भाजी निवडावी त्या निगुतीनं डीव्हीडीज्ची निवड करत छोटय़ा टोपल्यांमधून भरून घेत होते.

पुढे जरा कोपऱ्यातच संगणकाचं दालन होतं. लायब्ररीतर्फे इथे वायफायची सुविधा मोफत पुरवली जाते. आज हे दालन एका तासासाठी अभ्यासिका म्हणून वापरलं जात होतं. किशोरवयीन मुलांसाठी रोबोटिक्स आणि कोडिंगचा वर्गही लायब्ररीकडून भरवला गेला होता. दोन रोबोट्स जमिनीवर सरपटत होते. त्याभोवती मुलांनी घोळका केला होता. कॉम्प्युटरवर बसलेल्या मुलांच्या मधोमध ड्रिलिंग मशीन, खिळे, विजेच्या तारा, स्विचबोर्ड होते. त्या मुलांनी रिमोट कंट्रोलवरची गाडी बनवायला घेतली होती. एका बाजूला थ्रीडी प्रिन्टिंगचे काम चालले होते. छोटय़ा-छोटय़ा मुलांनी त्याच्यावर बुद्धिबळातले घोडे, हत्ती, प्यादी बनवली होती. मदर तेरेसाला या विभागाबद्दल विशेष आपुलकी होती. त्या लायब्ररीच्या आय. टी. विभागाचं काम बघत. त्यापलीकडे विविध लेखकांच्या कादंबऱ्यांचे जे वीस-तीस शेल्फ होते, तिथे मधोमध एक सुंदर बैठक होती आणि तिथं अनेक मध्यमवयीन माणसं ऐसपस बसली होती. ती माणसं बुक क्लब चालवतात असं मला मदर तेरेसांनी सांगितलं. सर्वानी एकच पुस्तक वाचायचं आणि मग महिन्याअंती त्या पुस्तकावर गरमागरम कॉफी पीत चर्चा करायची. कधी लेखकाला आमंत्रित करायचं, मग त्याचं भाषण, अनुभव ऐकायचे असं त्याचं स्वरूप होतं. इथली खासियत म्हणजे दक्षिण ऑस्ट्रेलियामधल्या एकशे वीस लायब्ररीज्एकमेकांशी आंतरजालामार्फत जोडलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या लायब्ररीतल्या दहा हजार पुस्तकांमधलं तुम्हाला हवं असलेलं पुस्तक वा डीव्हीडी जर तिथे नसेल तर ते दुसऱ्या टोकाच्या लायब्ररीतून मागवता येतं. तुमच्या आडनावाच्या चिठ्ठीसकट ते काहीच दिवसांत या दालनात येऊन पडतं. ते वाचून वा पाहून झालं की तुम्ही हव्या त्या लायब्ररीत परत करू शकता आणि ते पुन्हा त्याच्या मूळ लायब्ररीत शेल्फवर जाऊन बसतं. विशेष बाब म्हणजे, ही यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध व विलक्षण आहे.

आता माझी लायब्ररीची सर संपत आली होती. लायब्ररीच्या दारात असलेल्या डेस्कपाशी मदर तेरेसांनी मला सोडलं तर तिथे होती सुहास्यवदना सिन्ड्रेला. ही निळ्या डोळ्यांची नाजुका मला चित्रातलीच वाटत होती. तितक्याच नाजूक आवाजात तिनं मला सभासद होण्याविषयी विचारलं. माझा हात पाकिटाकडे गेला. मी चाचरतच विचारलं, ‘किती वर्गणी आहे?’ तर हे सगळं ‘चकटफू’ आहे असं तिनं मला अजूनच हसून सांगितलं. पुढे या लायब्ररीची नुसती सभासदच झाले नाही तर काही वर्षांनी जेन ऑस्टेनच्या एलिझाबेथचा पोशाख करून लायब्ररी ऑफिसर म्हणून कुणाला तरी आमच्या या लायब्ररीनामक ‘स्वप्ननगरी’ची सरही मी घडवत असेन, असं माझ्या तेव्हा ध्यानीमनीही आलं नव्हतं.