News Flash

बुद्धी प्रकाशा विठ्ठला!

संगीत हे हृदयास भिडण्यासाठी शिष्यत्व खरे असावे लागते व शिष्यत्वाचा भाव निरागसतेने आजन्म जपावा लागतो

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. राजा काळे

rajakale1952@gmail.com

संगीत हे हृदयास भिडण्यासाठी शिष्यत्व खरे असावे लागते व शिष्यत्वाचा भाव निरागसतेने आजन्म जपावा लागतो. अतिहुशारीने, कावेबाज व धूर्तपणे वागून ‘सूर निरागस’ होत नाहीत. सुरांची साधनाही खरी असावी लागते व सुरांचा ध्यासही खरा असावा लागतो.

अहो देवा तिमिर नाशा।

बुद्धी प्रकाशा विठ्ठला।।

अनुग्रह तुमचा झाला जया।

विसरला माया तम त्याचा।।

‘बुद्धी प्रकाशा विठ्ठला..’ समजाविण्याचे जेव्हा सर्व उपाय खुंटतात, मती मारली जाते व तारतम्याची वाट लागते; तेव्हा असे म्हटल्याशिवाय पर्याय उरत नाही. सध्याच्या सांगीतिक परिस्थितीचा व सादरीकरणाचा विचार करता संत निळोबारायांचा हा अभंग अत्यंत सार्थ आहे असे वाटते. संतांची वाणी आणि रागदारी संगीत हे कालातीत आहे. जे संगीत खऱ्या शिष्यत्व भावाने, गुरुजनांच्या संस्कारांबद्दल कृतज्ञता ठेवून, स्वत:च्या सखोल व्यासंगाने, रियाजाने स्वत:चा रंग घेऊन प्रगट होते आणि. हृदयास भिडते; ते संगीत सार्थ ठरते व संगीताचा उद्देशही सार्थ ठरविते. ‘‘एकाच क्षणाला जी गोष्ट सर्वसामान्याला व जाणकारांना दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवते त्यास कला म्हणतात,’’ असे महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी म्हटले होते.

स्वत:ला आधुनिक, नवीन व प्रयोगशील म्हणवणारे हल्लीचे अनेक संगीतकार व गायक नवीन पिढीची दिशाभूल करत आहेत. गाण्याचे आंतरिक प्रेम आणि अखंड साधना सोडून हे लोक प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांतल्या प्रसिद्धीतच देवत्व आणि संगीत शोधायला निघाले आहेत. आणि या चुकीच्या मार्गामुळे त्यांनी संगीताचा बाजार मांडलेला आहे. परिणामी त्यांच्या संगीतातील ‘गाणे’पण व त्याची धून हरपली आहे. गाण्याचे कधी नव्हे ते खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत लज्जास्पद, किळसवाणे असे सादरीकरण होत आहे. त्यातून भारतीय संगीताच्या उच्च परंपरेची लक्तरे टांगली जात आहेत. येनकेनप्रकारेण पसा व प्रसिद्धीचा माज इतका आलेला आहे की आपण फक्त ईश्वराकडे प्रार्थना करू शकतो- ‘बुद्धी प्रकाशा विठ्ठला.’

संगीतासारखा विषय, ज्यात समर्पित वृत्ती ठेवून कलाकारांनी आपले संगीताचे वेड जपले, आपले आयुष्य केवळ कलेसाठी देऊन संगीत समृद्ध केले. त्या परंपरेचा वारसा जतन करताना अनेक पिढय़ा खर्ची पडल्या. ‘शत जन्म शोधिताना शत आर्ती व्यर्थ झाल्या’ तेव्हा कुठे या समृद्ध संगीत परंपरेचा वारसा आम्हाला मिळाला व आता त्याची नावीन्याच्या नावाखाली इतकी दुर्दशा व्हावी याचे भान नवीन पिढीच्या गायकांना नसावे, ही फार चिंताजनक बाब आहे.

संगीत हे हृदयास भिडण्यासाठी शिष्यत्व खरे असावे लागते व शिष्यत्वाचा भाव निरागसतेने आजन्म जपावा लागतो. अतिहुशारीने, कावेबाज व धूर्तपणे वागून ‘सूर निरागस’ होत नाहीत. सुरांची साधनाही खरी असावी लागते व सुरांचा ध्यासही खरा असावा लागतो.

युगपुरुष गायक व संगीत वाग्गेयकार गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकींच्या चतुरस्र गायकीचे खोटे परवानाधारक शिष्यत्व मिरवणारे, बुवांच्या गायकीवर भाष्य करून रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून तज्ज्ञ म्हणून मिरवून नवीन पिढीची दिशाभूल करीत आहेत. बुवांच्या अजरामर स्वरशिल्पांची मोडतोड करणारे व नाविन्याच्या नावावर ‘घेई छंद मकरंद’, ‘शब्दावाचून कळले सारे’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, यांसारख्या अनेक रचना बेजबाबदारपणे आणि स्वत:च्या घमेंडीत गाऊन आणि वरती परत या स्वरशिल्पावरची मरगळ आम्ही झटकली, असे उद्दाम वक्तव्य करणारे, ज्यांना गायक म्हणून संबोधताना लाज वाटावी अशांच्या किळसवाण्या गाण्यावर, संगीतक्षेत्रात अत्यंत तीव्र नापसंतीच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातील कलाकार, रसिक व जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.

गुरुवर्य अभिषेकी बुवांच्या समृद्ध गायन परंपरेचा वारसा जतन करणारा एक शिष्य म्हणून जर मी व्यक्त झालो नाही, तर हीच दळभद्री गायकी ही अभिषेकी परंपरेची गायकी म्हणून जो नवीन पिढीचा गैरसमज होईल किंवा असल्यास तो दूर व्हावा याकरता ही ‘संगीत जनहित याचिका’ मी जनताजनार्दनाच्या दरबारात दाखल करत आहे. या सांगीतिक अपराधाचे योग्य ते शासन तो वरचा जनार्दनही निश्चितच करेल याची मला खात्री आहे.

गुरुवर्य पं जितेंद्र अभिषेकी गानपरंपरा म्हणजे गाण्याचे ‘गाणे’पण राखणारा चतुरस्र चतन्यमयी गायकीचा एक समृद्ध महामार्ग आहे. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ याची पूजा बांधण्याचा एक मार्ग आहे, कारण गायन कला ही घराण्यापेक्षाही मोठी आहे. घराणे हे कलेच्या कॅनव्हासवरील एक बिंदू आहे अशी शिकवण देणारा व शाश्वत सांगीतिक मूल्यांना समर्पित असणारा, घराण्याच्या बुजुर्गाचा व परंपरेचा आदर राखून त्यांच्या रचनांना न्याय देणारा व बुजुर्गाचा आदर आपल्या गायकीतून व्यक्त करणारा एक विचारप्रवाह आहे, असे मला वाटते.

संगीत संस्काराने विकसित होते व भक्तीने केलेल्या रियाजाने, व्यासंगाने सिद्ध होते, या कलेतील शिष्यत्व कधीही संपत नाही. ज्याचे शिष्यत्व संपले तो संपला. पसा व प्रसिद्धी कुणाला कितीही मिळो त्याबद्दल..असूया. असण्याचे कारण नाही, पण संगीतकार म्हणून तुमची एक सामाजिक बांधिलकी असते, की समाजाला मी चांगले संगीत देईन, चांगली मूल्ये नवीन पिढीत संक्रमित करीन.. या गुरुजनांच्या संकल्पनेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे.

कलेमध्ये भिडणारी एकच गोष्ट मला वाटते ती म्हणजे ‘आर्तता’. आर्त भावाने केलेली सुरांची आळवणी ही ईश्वरापर्यंत पोहोचते तशीच रसिकांच्या हृदयासही भिडते. ही आर्तता तुम्हाला कुठेही विकत मिळत नाही. तुमचे संगीत उच्च दर्जाचे व्हावे यासाठीचे जे वेड (स्र्ं२२्रल्ल) घेऊन तुम्ही जगता व त्यासाठी संघर्ष करता त्यातूनच ही ‘आर्तता’ तुम्हाला मिळत असते. अशी वेदनेची पुकार व आर्तता घेऊन आलेले गाणे तुम्हाला आवडते, मनात झिरपते व संगीताच्या सखोल व्यासंगाने, रियाजाने तुम्ही ते आपले करता तेव्हा त्यातून आत्मानुभूतीचे व सकस गायकीचे दर्शन होते. गाणे कसदार तेव्हाच होते, जेव्हा ते लय-तालाशी संवाद करणारे असते. तालाचा भाव गाणारे असते. हा कसदारपणा ज्यांनी आपल्या व्यासंगातून दाखवला त्यांचे गाणे हे भावसौंदर्याचे लेणे घेऊन आले. म्हणूनच गुरुवर्य पं. जितेंद्र अभिषेकी, पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेनजी जोशी, पं. जसराजजी यांच्यासारख्या दिग्गजांचे गाणे गाण्याचे ‘गाणे’पण घेऊन आले व चतन्याचे झाले.

‘‘गाणे चतन्याचे झाले तुझे गुण गाता गाता, सांज भरल्या आभाळाची कुठवर गाऊ गाथा

तुझा रे परीस स्पर्श मंतरल्या अंतरंगाला, बहरून येते गाणे सप्त सूर छेडतांना गाणे चतन्याचे झाले’’

भारतरत्न, प्रात:स्मरणीय गायिका लता मंगेशकर यांचे एक विधान मला फार बोलके वाटते. त्या म्हणतात, ‘‘संगीत में अभ्यास का कोई बदल नहीं. यदी सच्ची सफलता चाहते हो, तो लगन से सिखो और अभ्यास करो. पब्लिसिटी से गायक नहीं बनते.’’

भारतीय संगीताची श्रीमंती ही धूनप्रधानतेमध्ये आहे. ‘लोकधुनां’वर आधारित असलेले व त्याचे नंतर शास्त्र झालेले आपले शास्त्रीय संगीत हे प्रथम संगीत आहे, नंतर शास्त्र आहे. विविध प्रदेशातल्या लोकधुना एवढय़ा आकर्षक होत्या, की समर्पित संगीतकारांनी त्यावर रचना बांधून आपल्या प्रतिभेचा साज चढवून त्या प्रस्थापित केल्या- त्याला आज शास्त्रीय संगीत किंवा क्लासिकल म्युझिक असे आपण म्हणतो- जे अभिजात आहे. ज्याला रोज नवा जन्म आहे. ते संगीत शाश्वत व कालातीत राहील. आजचा यमन, खमाज, भरव, उद्याचा वेगळा असणार आहे. पण अविनाशीपण असलेली रागधून जर हरपली तर फक्त शास्त्राचा सांगाडा तुम्ही कितीवेळ नाचवू शकता? आणि या ठिकाणी मला असे वाटते की, रागाची रागधून व बंदिशीतील ‘गाणे’पण हे ज्यांना समजले व यातील गुंजाईश ओळखून व स्वत:ची गुंजाईश निर्माण करून त्यावर स्वत:ची स्वाक्षरी ज्यांनी केली, त्यांनीच संगीताला आपले योगदान दिले व आपली नवीन वाट निर्माण केली. नाही तर सगळे एकाच छापाचे गायक निर्माण झाले असते.

संगीतात तालीम म्हणजे गुरूची शिकवण. ज्यात स्वर लगावापासून संगीताचा समग्र विचार असतो. आपल्या प्रस्तुतीत कशाचे महत्त्व असावे आणि कशाचे नसावे, सांगीतिक उच्चारणाचे महत्त्व, कमी वेळात स्वरनाटय़ ठेवून आकर्षक व चमकदार गाणे कसे असावे, लयकारी किती प्रमाणात असावी, सुरांची कविता कशी गावी, अशा गायकी सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु सांगीतिक मूल्यांना समर्पित न राहता घराण्याच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांनी अमक्याचीच तालीम ही खरी आणि बाकीच्यांची खोटी असे ठरवून ‘तालीम’ या शब्दाला विनोदी परिमाण देण्याचं थोर कार्य केलेलं आहे. त्यांनी पुरस्कृत केलेल्या गायकांनी ही ‘खरी तालीम’ पुढे आणि रागाची धून व गाण्याचे हरवलेले ‘गाणे’पण मागे म्हणजेच शास्त्राच्या तालमीचा कडक स्टार्च मारून केलेले सादरीकरण व इतकी रुक्षता असेल तरच ते खरे शास्त्रीय संगीत असे नवीन परिमाण सिद्ध केलेलं आहे. संगीतातल्या भावसौंदर्याशी याचे काहीही देणे घेणे नाही.

‘या हृदयास भिडते ते’- त्याला गाणे म्हणतात. मग ते कोणत्याही प्रकारचे असो. ‘भावनेला येऊ द्या गा शास्त्रकाटय़ाची कसोटी’ हे यांच्या गावीही नाही. किंवा त्याचीही तालीम असते हे त्यांना मान्य नाही. संगीतात ही एकलव्यी साधना असते व शेवटी ही श्रवण विद्या आहे. गायन, वादन, नृत्य व वक्तृत्व यात स्वत:ला सर्वज्ञ समजणाऱ्या एका महाभागाने संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या गान योग्यांबद्दल केलेले एक विधान पाहा.

‘‘यार! कुमारजी, जसराजजी, अभिषेकीजी ये तो सून सून कर गाते है ओर भीमसेनजी को आधी तालीम हैं ओर मं कहता हूँ बस उसीको ही पुरी तालीम हैं.’’

आपले दुकान चालविण्यासाठी पसा व प्रसिद्धीसाठी खरा कलाकार इतका बत्तमीज होऊच शकत नाही. या बत्तमिजीचे लज्जास्पद, किळसवाणे आणि बीभत्स दर्शन सध्या कलाकार घडवत आहेत याची त्यांना जराही लाज-शरम वाटत नाही, उलट आपण करतो तेच बरोबर असे वाटून नवी कळप संस्कृती व दहशतवादाच्या जोरावर नवीन पिढीचे सांगीतिक भवितव्य दिशाभूल करून ते धोक्यात आणत आहेत व त्यांना खऱ्या गाण्यापासून दूर नेत आहेत. हे पण माझ्या मते एक सांगीतिक पाप, द्रोह आणि गुन्हा आहे व ही भारतीय संगीताच्या दृष्टीने फार चिंताजनक परिस्थिती आहे.

पी.आर. एजन्सीजना पैसे देऊन व समाजमाध्यमांतून आपल्या कलेला लक्षावधी फॉलोअर्स दाखवून आपली लोकप्रियता वाढवणारे, स्वत: अभिजात राग-संगीताची साधना न केलेले व तशी सिद्धीही नसलेले हे सुमार वकुबाचे गायक आपली खोटी महती समाजावर लादत आहेत. सगळ्या समाजमाध्यमांतून, वर्तमानपत्रांतून जाहिरातीचा भडिमार करून सामान्य जनतेची सांगीतिक दिशाभूल करत आहेत.

जसे कलाकाराला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, तसेच कुठल्याही अभिजात रचनेची मोडतोड करण्याचे स्वातंत्र्य त्याला नाही. परंपरेच्या व्यासंगातून महान कलाकारांनी निर्माण केलेल्या कलाकृती भग्न करायच्या- जसे वेरुळचे कैलास लेणे वेडेवाकडे तोडायचे व त्यावर चहाची टपरी उभारून धंदा करायचा आणि हेच ते अभिजात कैलास लेणे आहे असे पटवायचे. लोकांच्या मनावर बिंबवायचे असे हल्लीच्या काही कलाकारांचे उद्योग आहेत.

मला अश्वत्थाम्याची एक गोष्ट आठवते. त्या काळात त्याचे वडील द्रोणाचार्याची कौरव-पांडवांच्या कुळात धनुर्विद्येसाठी गुरू म्हणून नेमणूक झाली नव्हती.

तो काळ ते अत्यंत गरिबीत व्यतीत करत होते. घरात दुधासाठीसुद्धा पैसे नसायचे. त्यामुळे अश्वत्थाम्याची आई पिठात पाणी कालवून त्याला ते दूध म्हणून देत असे. असे अनेक वर्षे चालू होते. जेव्हा द्रोणाचार्य कौरव-पांडवांच्या दरबारी गुरू म्हणून नियुक्त झाले तेव्हा परिस्थिती बदलली. अश्वत्थाम्याच्या आईने मुलासाठी गायीचे धारोष्ण दूध आणले. त्या खऱ्या दुधाला तोंड लावताच अश्वत्थाम्याने ते थुंकून टाकले. तो आईला म्हणाला, ‘‘हे कसले दूध? तू मला पूर्वी द्यायची तेच दूध खरे! आपल्या समाजाची अवस्था ही अशीच अश्वत्थाम्यासारखी झालेली आहे.

अभिजात संगीताच्या दुधाची गोडी सोडून पिठात कालवलेल्या पाण्याचे दूध हेच खरे संगीत वाटू लागले आहे. संगीतातच नव्हे, तर काव्य, चित्र, शिल्प व साहित्य या सगळ्या क्षेत्रांत हा दरिद्री अश्वत्थामा निर्माण झालाय. अशा पद्धतीने गेल्या तीन चार दशकांत समाजाला सांस्कृतिक दारिद्य्रावस्थेत व विपन्नावस्थेत नेण्यास अशा पद्धतीच्या गायकांचे व संगीतकारांचे अशोभनीय कर्तृत्व जबाबदार आहे. मूलत: भारतीय रागसंगीत हे ट्रान्स-म्युझिक आहे. मनाची उन्मनी अवस्था आणि उन्माद यातला फरक जनसामान्याला कळेनासा झालाय. बिचारी सामान्य जनता अश्वत्थामा बनून पिठाचे दूध पीत राहते व बेसुरे संगीत ऐकून धन्यता मानते. सांस्कृतिकदृष्टय़ा ही अतिशय भयावह गर्हणीय व निंदनीय अशी समाजाची स्थिती आहे. चांगले संगीत म्हणजे काय व वाईट संगीत म्हणजे काय, याची लोकांना जाण यावी, आपली अभिजात कला कोण विकृत करीत आहे याचे भान यावे म्हणून हा लेखन प्रपंच.

हंस श्वेतो बक: श्वेतो को भेदो बकहंसयो:।।

नीर क्षीर विवेके तु हंस: हंसो बको बक:।।

हंस ही शुभ्र रंगाचा व बगळाही शुभ्र रंगाचा दिसतो, पण त्या दोघांत फरक कसा ओळखावा? तर नीरक्षीरविवेकम्हणजे दूध आणि पाणी वेगळे करून फक्त दूधच पिण्याची क्षमता हंसात असते आणि बगळा पाणी मिसळलेले दूधच पीत राहतो.

 

रसिक जनतेने एवढाच विचार करायला हवा की, आपण संगीताच्या अभिरुचीबाबत व अभिजाततेबाबत बगळा व्हायचे का हंस व्हायचे. का या विकृत कलाकारांनी दिलेल्या पिठाच्या पाण्याचं संगीत आपण अश्वत्थामा बनून दूध म्हणून प्यायचे? रसिक हो, शेवटी तुम्हीच कलेचे खरे मायबाप आहात; तेव्हा निर्णय सर्वस्वी तुमच्या हाती आहे. शेवटी रसिक लोकाश्रयातूनच अभिजात संस्कृती रुजते, टिकून राहते आणि समृद्ध होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 4:16 am

Web Title: article on discipleship has to be true for music to soothe the heart abn 97
Next Stories
1 महर्षी शिंदे यांच्या वैचारिक योगदानाची मांडणी
2 अनुसर्जनाच्या अनोख्या वाटेवर..
3 इस्लाम- ज्ञात आणि अज्ञात
Just Now!
X