News Flash

अरतें ना परतें.. : डाव्या बाजूचं दुखणं

डावी बाजू कायमच सहाय्यकारी भूमिकेत. तरीही हे तसं ठीक होतं म्हणता आलं असतं.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण दशरथ बांदेकर

काही लोक जन्मत:च डावे असतात, तसा मी नाही. अपवादात्मक काही लोक तसे असू शकतात. बाकी बहुसंख्य उजवेच असतात. मीही त्या बहुसंख्याकांमध्येच मोडतो. साहजिकच प्रत्येक कामात माझा उजवा हात किंवा शरीराची उजवी बाजूच पुढे पुढे करत असते. डावी बाजू कायमच सहाय्यकारी भूमिकेत. तरीही हे तसं ठीक होतं म्हणता आलं असतं. दोघांमध्ये समन्वय होता. शरीराची काही तक्रार नव्हती. सगळं काही सुरळीत चाललं होतं. त्यामुळे खरं तर या दुय्यम व वरचढ भूमिकांविषयी याआधी कधी लक्षातही आलं नव्हतं.

पण अचानक काय झालं की, डाव्या बाजूकडचे एकेक अवयव गळपटायला लागले. आपणही उजव्यांपेक्षा कमी महत्त्वाचे नाही, हेच विसरून गेल्यासारखे वागू लागले. आधी वाटलं, उजव्या बाजूनेच डाव्यांवर कुरघोडय़ा करायला सुरुवात केलीय, त्यामुळे हे असं होत असावं. म्हणजे हे उजव्या बाजूवाले डाव्यांना जमेतच धरत नाहीयेत. आपणच सगळ्या देहाच्या जबाबदाऱ्या सांभाळू लागलेत; नि यांना पार रिकामी नि निकामी बनवून टाकलंय. ते नाही का, डार्विनने की कुणीसं सांगितलेलं- ज्या अवयवांचा वापर माणूस कमी कमी करत जातो ते अवयव हळूहळू बिनकामाचे बनून जात गळून पडतात; नाहीसे होतात. उजव्यांचा डाव्या अंगाला नामशेष करून टाकायचा असाच काही कट तर नव्हता ना?

हळूहळू डाव्या बाजूने माघार घ्यायला सुरुवात केली. म्हणजे हे काही इतक्या सहजपणे, कसल्याही आत-बाहेरच्या संघर्षांविना, प्रतिकाराविना घडत गेलं असं मात्र म्हणता यायचं नाही. आपल्याला आपल्याच जवळच्या सहकाऱ्यांकडून उणं लेखलं जातंय, अगदीच मोडीत काढलं जातंय, हे तसं कुणालाच आवडणारं नाही. अशा वेळी कुरबुरी सुरू होणारच ना! बाहेरून बाकी कुणाच्या हे तसं लक्षातही येऊ नये अशा पद्धतीनं हे सुरू होतं. बाकीच्यांचं कशाला, माझ्याच देहाच्या या दोन बाजू असून मलाही बऱ्याच दिवसांपर्यंत आपल्या आत असं काही शीतयुद्ध सुरू झालंय याची बिलकूलही कल्पना नव्हती. मी आपला नेहमीप्रमाणे वावरत होतो, रोजच्या जगण्यात व्यग्र होतो. डाव्यांपेक्षा उजव्यांवर जास्त विसंबून दैनंदिन गरजेची कामं करत राहिलो होतो. तशातच एका सकाळी अनपेक्षितपणे या गोष्टीची जाणीव झाली. अर्थात, हीच सुरुवात होती असंही म्हणता आलं नसतं. गोष्टी खूप आधीपासून सुरू झालेल्या असू शकतात. आपण आपल्यातच इतके मश्गुल असतो की बाहेर काय किंवा आत काय, आपलं नक्की काय बिघडत चाललंय याची जाणीव आपल्याला काहीशी उशिरानंच होते. कळून येतं तेव्हा बरीच पडझड झालेली असते. दुरूस्त करता येणं कठीण अशी मोडतोड झालेली असते.

तर त्याप्रमाणे आता, सुरुवात नक्की कधीपासून झाली असावी, हे नेमकेपणानं सांगता येणं कठीण आहे. कदाचित मुळातच आपल्या नेणिवेत या दुहीची बीजं होती असावीत. आपण नाकारत असलो, दुसऱ्या कसल्या कसल्या झुली चढवून झाकत गेलो, तरी ते होतंच तळाशी निपचित पडून. संधी मिळताच ते उफाळून आलं असावं असंही म्हणता येणं शक्य आहे. पण जेव्हा हे इतक्या थेटपणे जाणवून येतं, तेव्हा आपण इतके कसे गाढ झोपेत भलतीच स्वप्नं पाहत गाफील राहिलो आजवर, असं मनात येऊन धक्का बसतो. अशा वेळी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईस्तोवर आपण झोपा काढत होतो, ही जाणीव भयंकर क्लेशदायक असते.

तर झालं असं की, अचानकच एका सकाळी माझा डावा कान गप्प झाला. ही म्हटलं तर फारच किरकोळ गोष्ट होती. असं अनेकदा अनेकांच्या बाबतीत होत असतं. अशा आतल्या कुरबुरींकडे कुणीच गंभीरपणे पाहत नाही. काही काळ जाऊ देणं हेच त्यांच्यावरचं उत्तर असतं. आपसूकच सगळं बंड शमतं, सगळं जगणं पूर्ववत होतं. आधीच्या अशा अनुभवांवरून मीही हे चांगलंच जाणून होतो. त्यामुळे फारशी फिकीर करण्याचं काहीच कारण नव्हतं. काहीतरी पाणी वगैरे गेलं असावं अंघोळ करताना, होईल बरा आपोआपच, म्हणत मी दुर्लक्ष केलं. पण दिवस सरत गेले तरी फरक पडत नाहीये हे जाणवू लागल्यावर थोडी चिंता वाटू लागली. शिवाय आपल्या ऐकू न येण्याचा आपल्यापेक्षा इतरांनाच जास्त त्रास होतो. त्यामुळे घरच्या नि बाहेरच्या संबंधितांच्या सततच्या तक्रारींना कंटाळून एका संध्याकाळी कानांच्या स्पेशालिस्टकडे धावलो. त्याने तपासलं नि दोष काहीच दिसत नाहीये म्हणाला. कसले तरी इअर ड्रॉप्स नि गोळ्या वगैरे लिहून दिल्या नि ‘आठवडय़ानं या’ म्हणाला परत. पण आठवडय़ामागून पंधरवडा सरला. महिना गेला. वर्ष गेलं. डावा कान कायमचाच अधू झालेला. कारण कळलंच नाही आजपर्यंत.

मग एका सकाळी पुन्हा डोळ्याच्या बाबतीतही असंच सुरू झालं. उठल्यापासून डाव्या डोळ्यानं धूसर धूसर दिसतंय असं वाटू लागलं. पुन्हा मग आय स्पेशालिस्टला गाठणं, डोळे तपासणं, डोळ्यांत ड्रॉप्स. दोष काहीच नाही. डावा डोळा अधू झालाय. अगदी जवळचं अंधूक अंधूक दिसतं. लांबचं मात्र काही दिसत नाही. वाचता येत नाही- पुस्तकं आणि माणसंही!

नंतरची पाळी डाव्या हाताची होती. हात वरखालीच करता येत नव्हता. भयंकर वेदना. ऑर्थोपेडिक्सने एक्सरे काढायला लावला. ब्लड चेक करा, शुगर तपासा म्हटलं. सगळं केलं. रिपोर्ट नॉर्मल. हात तसाच. मग फ्रोजन शोल्डरचं निदान करून फिजिओच्या ताब्यात. त्याने सांगितलेले एक्झरसाइज रात्री झोपेत उठूनही करत रालो. गिअर टाकणं, बॉलिंग करणं, जातं फिरवणं, कथ्थक, भरतनाटय़म् सगळ्या हस्तमुद्रा फक्त डाव्या हातानं. दुखणं कमी झालं; पण हात अधूच.

कधी कधी मुंग्या येतात डाव्या बाजूला. एक बाजू लुळी पडल्यासारखी वाटत राहते. भीती वाटते, कधीतरी झोपेत असतानाच एखाद्या पहाटे पक्षाघाताचा झटका येईल. डावी बाजू कायमचीच लुळी पडेल.

याविषयी कुणापाशी बोलावं? काय सांगावं? मला कळेनासं झालं आहे. मी भांबावून गेलो आहे. काहीसा सैरभैरही झालो आहे म्हटलं तरी चालेल. कोल्हापूरचे एक डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत. चांगला वाचक नि स्वत:चे स्वतंत्र विचार असलेला माणूस आहे. आपलं-परकं वगैरे पक्षपात न करता रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध. एक नाटकही आलंय त्यांचं रंगभूमीवर. पण त्यांचा यच्चयावत सगळ्या दांभिकपणा करणाऱ्या, भोंगळपणे घोळ घालणाऱ्या डाव्यांवर भलताच राग. फेसबूकवरच्या पोस्ट्समधून वगैरे ते सतत डाव्यांना झोडपत असतात. मला त्यांचं सगळंच पटतं, आवडतं असं नाही. पण माणूस प्रामाणिक आहे, पारदर्शी आहे. माझ्या मनात येतंय, त्यांना विचारावं का? त्यांचा काही सल्ला घ्यावा का? तसंही काही वर्षांमागे त्यांनी मला एका गंभीर आजारातून बरं केलंय. जिवंत ठेवलंय. या नव्या आजारातही ते काही मदत करू शकतात का, पाहायला काय हरकत आहे? शेवटी काय आहे, आपापल्या व्यवसायात उजवे असलेल्यांनाच अशा वेळी मदतीकरता साद घालणं गरजेचं आहे.

की डावं-उजवं न करता समजून घेणाऱ्या एखाद्याला हे सांगून टाकावं? बाबा रे, एक बाजू अशी निकामी होत चालल्याने आजकाल उजव्या बाजूवर फारच लोड वाढू लागला आहे. काय करायचं? देहाला या दोनच बाजू. डावी नि उजवी. एक दुबळी होत गेली, नि दुसरी प्रभावी, की हे असं संतुलन हरवत जाणं साहजिकच आहे. कसं होणार या देहाचं, कळत नाही. पण आजकालच्या दिवसांत माणसं एक तर या बाजूची असतात किंवा त्या. मधले रंगच हरवून गेलेत. त्यामुळे असा अरतें परतें न करता बॅलन्स साधणारा सम्यकमार्गी कुठे शोधायचा, हाही प्रश्नच आहे.

आणि बाहेर तर बेफिकीर माणसांच्या झुंडी वाढत चालल्यात. एक बाजू निकामी झालेल्या माझ्यासारख्यांची पर्वा आहे कुणाला जगण्याच्या कैफात?

अशातच काय झालं, नेहमीची वाट सोडून गावाच्या बाहेर जंगलाच्या दिशेने फिरत गेलो होतो. गाव संपलं तसा पुढे रस्ता जवळपास निर्मनुष्य. रस्त्याकडेला एक खडक होता. त्यावर बसून हातासाठी एक्झरसाइज सुरू केले. तर कुठून तरी उगवल्यागत एक म्हातारी समोर पुढय़ात. ‘‘झिला, काय झालां रे?’’

‘‘काय नाय गे आवशी, ो डावो हात जरा दुखतां. अर्ध्यापर्यंतच वर जातां.’’

‘‘आनी काय काय व्हतां?’’

‘‘डाव्या कानान् आयकूक येत नाय धड. डावो डोळो पण अधू झालोसां. डाव्या पायाक् मुंग्ये येतत्..’’

‘‘समाजलां! माझ्या नातवाचांय असांच झाल्लां.. तू आता मी सांगतंय तसां करशील..?’’

..पण आधी एक लक्षात घे. या सगळ्याला तू स्वत:च जबाबदार आहेस. ही तुझी डावी बाजू, मेंदूचा डावा भाग पाहा. कधी लक्ष दिलंयस, विचार केलायस त्यांच्याविषयी? तर्क, भाषा, कल्पनाशक्ती, संवेदना, मूल्यविचार, विवेक अशा सगळ्या या भागाशी जोडलेल्या गोष्टी कुणी मोडीत काढायला सुरुवात केल्या? आपलं हे काम सोडून कोण बहकत गेलं विनाकारण भलत्याच्या नादानं? लक्षात घे, तुझं काम खेडय़ापाडय़ांतल्या पोरांना भाषा शिकवायचं आहे. भाषेतून विचार आणि संस्कार रुजवायचं आहे. पण हेच सहेतुक नजरेआड करून तू शेअर बाजारात लक्ष घालायला सुरुवात केलीस, जमिनीचे व्यवहार करायला सुरुवात केलीस, कोचिंग क्लासेसचा धंदा उघडलास, वाळू, खडी आणि बांधकामाच्या साहित्याची दलाली सुरू केलीस, तर तुझी म्हणून असलेली जी काही ‘ओळख’ आहे, ती किती दिवस टिकून राहणार आहे? मागाहून मग ‘माझं अस्तित्व पुसट झालं, माझी गरज संपून गेली, माझ्यावर विरोधी विचारांनी आक्रमण केलं, मला संपवलं,’ हा आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे? तुला खोलवरची ओल शोधून काढत तिथपर्यंत तुझं बियाणं पोचवता आलं नाही, नीट रुजवून मशागत करता आली नाही. तुझी जमीन नांगरटीविना मोकळी सोडल्यावर दुसरा कुणीतरी तिथे धोतरा पेरेल, एरंड लावेल, नाहीतर नुसतंच तणकट फोफावू देईल. मुळात तू त्याला संधीच का दिलीस तसं करायची?

‘‘..आता रडान् काय उपेग आसां रे, मुंग्यो येतत्, हातपाय काम करनत् नाय..’’

म्हातारी किती वेळ बोलत राली होती. बाहेर काळोख गडद होऊ लागला होता. पण का कोण जाणे, मला मात्र आपल्या आत कुठेतरी उजाडू लागलंय असं वाटू लागलं होतं. धूसर नजरेला लाल-कोवळा प्रकाश जाणवू लागला होता.

samwadpravin@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:36 am

Web Title: article on pain in the left side by praveen dashrath bandekar abn 97
Next Stories
1 मोकळे आकाश.. : कोव्हिडायझेशन
2 अंतर्नाद : प्रार्थनेतील संगीत
3 पुस्तक परीक्षण : स्त्रीचे माणूसपण अधोरेखणाऱ्या कथा
Just Now!
X