तसाच आपल्या वागण्याचा आणि कृतीचा परिणाम निसर्गावर- पर्यायाने आपल्याच आयुष्यावर होत असतो..वन्यजीव सप्ताहानिमित्ताने विशेष लेख..

फार फार वर्षांपूर्वी.. तब्बल साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी या गोष्टीची सुरुवात झाली- जेव्हा पहिल्या एकपेशीय सजीवाने पृथ्वीवर जन्म घेतला. त्या अतिशय साध्या एकपेशीय सजीवापासूनच आज आपण पाहतो त्या जटिल सजीवसृष्टीची निर्मिती झाली, हे वास्तव नाटय़मय तर खरेच. नाजूक गवतपात्यापासून शक्तिशाली वाघापर्यंत, पृथ्वीवरील सजीव जीवांमध्येआकाराने सर्वात मोठय़ा असणाऱ्या देवमाशापासून ते बुद्धिमान मानव प्राण्यापर्यंत सगळेच या जीवसृष्टीचा भाग आहेत. सारेच कळत-नकळत, येनकेनप्रकारेण जीवसृष्टीतील प्रत्येक घटकाशी जोडले गेलेले आहेत.

वनस्पती सजीवांना प्राणवायू पुरवतात हे जरी खरं असलं तरी ते पूर्णाशाने खरं नाही. त्यापैकी तब्बल पन्नास टक्के प्राणवायूचा पुरवठा हा महासागरांतून, तिथल्या पाण्यात वाढणारे अगणित सूक्ष्म सागरी जीव आणि सागरी वनस्पतींपासून होत असतो. इतकंच नाही, तर औद्योगिक क्रांती झाल्यापासून मानवाने उत्सर्जित केलेल्यापैकी अध्र्याहून अधिक कार्बनडाय ऑक्साइड वायूही या महासागरांच्या पाण्यात शोषला गेला आहे आणि त्याचा आपल्याला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या सूक्ष्म जीवांसकट साऱ्याच सागरी जीवांवर भलाबुरा परिणाम होत आहे.

आपणही निसर्गाचा एक घटक आहोत आणि आपल्या नकळत निसर्गातल्या विविध घटकांशी आपली देवाणघेवाण चाललेली असते. आपण निर्माण केलेले प्लास्टिकसारखे संपूर्ण कृत्रिम पदार्थही याच पृथ्वीवर सापडलेल्या घटकांपासून बनवले जातात. आणि आपण निर्माण करत असलेल्या साऱ्या गोष्टी याच निसर्गाचा भाग बनून राहतात. जगण्यासाठी आणि वाढीसाठी आपण नेहमीच सभोवतीच्या जैवविविधतेचा वापर करीत आलो आहोत. ज्या जैवसृष्टीसोबत आपण उत्क्रांत झालो, त्याच जैवविविधतेचं शोषण वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी आपण केलं आहे. सर्वच मानवी संस्कृतींनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अर्निबध वापर केला.

भारतालाही जैवविविधतेचा आशीर्वाद आहे. वनस्पती आणि प्राणी अशा दोन ढोबळ श्रेणींमध्ये साऱ्या जैवविविधतेचं वर्गीकरण केलं तर आपल्या देशात किमान ४५,००० वनस्पती आणि ९१,००० प्राण्यांच्या प्रजाती आहेत. याशिवाय आजही आपल्याला माहीत नसलेल्या अनेक प्रजाती आपल्या देशातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर नांदताहेत. आपला भारत हा जगातील दहा सर्वाधिक जैवविविधतासंपन्न देशांपैकी एक आहे.

ही संपन्न जैवविविधता आपल्या अस्तित्वाकरिता अत्यावश्यक आहे. एका अभ्यासाद्वारे दिसून आलं आहे की, आपण खात असलेल्या एक-तृतीयांश अन्नाच्या उत्पादनात कीटकांचा महत्त्वाचा सहभाग असतो. कीटकांमुळेच परागीभवनाची क्रिया होऊन फुलं फळाला येतात, धान्याची कणसं भरतात. शेतीतही कीटकांनी निभावलेल्या परागवहनाच्या आणि परागीभवनाच्या क्रियेमुळेच आपल्याला अन्न उपलब्ध होतं. भारतातील किमान २० कोटी जनता त्यांच्या दैनंदिन जगण्याकरता थेट वन व जंगलांच्या जैवविविधतेवर अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं तर संपन्न जैवविविधतेशिवाय आपली उपासमारच होईल.

जैवविविधता ही काही परकी, आपल्यापासून भिन्न अशी गोष्ट नाही. आपल्या अन्नसुरक्षेत जैवविविधतेचा मोठा वाटा आहेच; शिवाय आपल्याला लागणाऱ्या पाण्याकरताही आपण त्यावर अवलंबून आहोत. हे सर्वज्ञात आहेच, की समुद्र आणि वनं जलचक्राकरता अत्यावश्यक आहेत. पावसाचं पाणी आपल्यापर्यंत नद्यांच्या माध्यमातून पोहोचतं. पण आपण हे लक्षात घ्यायला हवं की, आपल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ६०० नद्यांचा पाणीसाठा हा प्रामुख्याने वाघ असणाऱ्या जंगलांतून उपलब्ध होतो. या नद्यांची पात्रं आणि खोरी आणि त्यांनी वाहून आणलेला गाळ शेतीला समृद्ध करतो. पर्यायाने आपली अन्नसुरक्षा सुनिश्चित करतो. शिवाय आपली पाण्याची गरज भागवण्यात महत्त्वाची भूमिकादेखील बजावतो. आपल्या अस्तित्वाकरता ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साइड तसेच इतर वायू आणि त्यांचं हवेतील प्रमाण किती महत्त्वाचे आहे, हे आपण जाणतोच. परंतु पृथ्वीच्या इतिहासात वातावरणाची रचना आज आहे तशीच नेहमी नव्हती. पृथ्वीवरील वातावरणात आपल्याला आवश्यक अशा प्राणवायूच्या निर्मितीची प्रक्रिया आदिम वनस्पतींनी केलेल्या प्रकाश संश्लेषणानंतरच सुरू झाली. तेव्हा असं नक्कीच म्हणता येईल की, आपल्या अस्तित्वाकरता आवश्यक अशा हवा, पाणी आणि अन्नासारख्या प्राथमिक गरजा या सजीवसृष्टीमुळेच भागविल्या जातात.

या वन्यजीव सप्ताहानिमित्ताने आपण आपल्या अस्तित्वाकरता, रोजच्या जगण्याकरता जैवविविधतेवर किती अवलंबून आहोत, आणि आपण त्याचाच अविभाज्य घटक कसे आहोत, याचे भान बाळगणे आवश्यक आहे. अगदी दगडमातीच्या आपल्या निवाऱ्यात सुरक्षित आयुष्य जगतानाही ज्या सजीव-निर्जीव घटकांच्या प्रक्रियांतून आपला जन्म होतो त्या प्रक्रियांचा आपल्या जगण्याशी जवळचा संबंध असतो. आपण राहतो ती इमारत, आपलं घर, कार्यालय यांचा संबंध पर्यावरणाशी असतोच.

मानव आणि मानवाने घडवलेल्या गोष्टींव्यतिरिक्त नैसर्गिक प्रक्रियांमधून जी सजीवसृष्टी आकार घेते, ती प्रामुख्याने वन्यजीवनाचा भाग आहे. उदाहरणच द्यायचं तर रानात सापडणारी द्राक्षाची वेल वन्यजीवनाचा भाग आहे. मात्र, आपण बागेत लागवड करतो ती संकरित व मानवाने घडवलेली प्रजाती आहे. ती जैवविविधतेचा भाग असेल; वन्यजीवनाचा नाही. साहजिकच वन्यजीवनाकरता एखाद्याने जैवविविधता हा प्रतिशब्द वापरला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. वन्यजीव सप्ताह हा जैवविविधता आणि वन्यजीवांशी असलेल्या

आपल्या नात्याची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या संरक्षणाकरता कटिबद्ध होण्याची गरज अधोरेखित करणारा सप्ताह म्हणता येईल.

१९५५ पासून सुरू झालेला वन्यजीव सप्ताह आज भारतभर सरकारी व बिगरसरकारी संस्थांच्या माध्यमातून साजरा केला जातो. लोकजागृतीकरता वन्यजीव सप्ताहाची निकड आहेच. आज देशात कायद्याच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाच्या बाबतीत खूप सुधारणा झाली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम- १९७२ हा अतिशय कडक कायदा आहे. वन्यजीवांची शिकार त्यान्वये बेकायदेशीर ठरवली गेली आहे. प्राणी-वनस्पतींच्या वर्गीकरणामुळे तसेच राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये अशा वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासांच्या वर्गीकरणामुळे वन्यजीवांना संरक्षण लाभले आहे.

भारतात तब्बल ७०४ राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये आहेत. मात्र, त्यांनी संरक्षित केलेलं क्षेत्र भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या केवळ ४.८८ टक्के एवढंच आहे. संरक्षित नसलेल्या भागांमध्ये अनेक धोक्यात आलेल्या वन्यजीवांच्या प्रजाती आढळतात. उदाहरणार्थ, शिवडीच्या खाडीत आढळणारे रोहित आणि अनेक जातींचे पक्षी किंवा अनेक पठारांवर आढळणारी दुर्मीळ जातींची रानफुलं. भारतीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाच्या माध्यमातून सरकार संरक्षित क्षेत्रांत वन्यजीव संरक्षण-संवर्धनाचं काम करत असलं तरी अनेक स्वयंसेवी आणि विश्वस्त संस्था आणि व्यक्तींची वन्यजीव संरक्षणामधली महत्त्वाची भूमिका नाकारता येणार नाही. विविध स्वयंसेवी आणि विश्वस्त संस्थांनी वन्यजीव आणि पर्यावरण संशोधन, संवर्धन आणि संरक्षणाची धुरा गेल्या शतकापासून भारतात समर्थपणे सांभाळली आहे. अनेक व्यक्तींनी यासाठी आपलं आयुष्य वेचून अनमोल योगदान दिलेलं आहे. ‘वाइल्डलाइफ कंझव्‍‌र्हेशन ट्रस्ट’ या मुंबईस्थित संस्थेसोबतच वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य अग्रणी संस्थांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. गेल्या पाच वर्षांत आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून १९ राज्यातील ११० संरक्षित भागांत आम्ही दाखवून दिलं की, वन्यजीव संरक्षणाकरता कार्यरत यंत्रणा अधिक सशक्त करून आपण पाच टक्के भौगोलिक क्षेत्र योग्य प्रकारे संरक्षित करू शकतो. वनविभागाचं पायदळ आणि प्रामुख्याने वनसंरक्षकांना वनसंरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरता प्रशिक्षण आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देऊन सक्षम केले जाते. संशोधनाद्वारे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून वनक्षेत्रांचं अधिक प्रभावी व्यवस्थापन आज शक्य आहे. संरक्षित क्षेत्राबाहेर आढळणारे वन्यजीवन आणि जैवविविधतेचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. त्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्याकरता शिक्षण, व्यवसायाचे विविध पर्याय, आरोग्य आणि स्वच्छता या स्थानिक सोयी अग्रक्रमाने निर्माण करणं आवश्यक आहे. याकामी वनखात्यापेक्षा स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांची जबाबदारी अधिक आहे. स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय वन्यजीव व जैवविविधतेचं संवर्धन आणि संरक्षण ही अशक्यप्राय गोष्ट आहे.

वन्यजीव आणि आपल्या अस्तित्वादरम्यानचा अन्योन्य संबंध जाणवला तरच लोक वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाकरता काम करण्यास प्रेरित होऊ शकतील. आपल्या घरात आपल्याला पाणी, अन्न, हवा आणि इतर जगण्याकरता आवश्यक गोष्टी हव्या असतील तर वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण हे आपलं अनिवार्य कर्तव्य आहे.

(लेखक ‘वाइल्डलाइफ कंझव्‍‌र्हेशन ट्रस्ट, मुंबई’ या संस्थेत पर्यावरण संवर्धन-संरक्षणाच्या धोरणात्मक कार्यक्रमांची आखणी करतात.)

वन्यजीव सप्ताहानिमित्ताने..

वन्यजीव संरक्षणासाठी पुढील गोष्टी कटाक्षाने करण्याचा संकल्प वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येकाने करावा..

आपण वन्यजीव आणि जैवविविधतेशी कसे अन्योन्य संबंधांनी जोडलेले आहोत याची माहिती करून घ्या आणि ती आपल्या मुलांपर्यंत, जवळचे नातेवाईक, मित्र आणि आप्तेष्टांपर्यंत पोहोचवा.

चुकूनही वन्यजीव उत्पादनांची खरेदी करू नका. उदा.- रानफुलं, वाघाची नखं, हस्तिदंत, इ.

आपल्या रोजच्या आयुष्यात छोटे छोटे बदल घडवून आणत पाणी, वीज इत्यादी साधनांचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने करा. या साधनांचा स्रोत जैवविविधता आणि जंगलं आहेत याची जाणीव ठेवा.

आजूबाजूच्या जैवविविधतेच्या आणि वन्यजीवनाच्या अस्तित्वाची नोंद घेऊन त्याविषयी अधिक सजग राहावे. त्यांच्या संवर्धन-संरक्षणाकरता कायदेशीर मार्गाने प्रयत्न करा. जगभरात ‘सिटिझन सायंटिस्ट’ या लोकचळवळीचं उदाहरण वानगीदाखल आहेच. आपल्याकडेही चिमण्या नाहीशा होण्याच्या नोंदी स्थानिकांनीच ध्यानात आणून दिल्याचं उदाहरण आहे.

वन्यजीव संरक्षणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता स्थानिक पातळीवर वन्यजीव संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींशी संपर्क साधा.
-शब्दांकन : श्रीपाद कुलकर्णी
-rushikeshc@gmail.com