जुई कुलकर्णी

प्रत्येक माणसाच्या जन्मापासून सुरू होते एक रेषा.. आणि ती अखंड सुरूच राहते त्याच्या मृत्यूपर्यंत. रेषा म्हणजे तरी काय? असंख्य बिंदूच की! रेषा उमटली की कधी कधी मधेच अडखळते, कधी रेषेतही गुंतागुंत होते, कधी रेषा तुटक होते. हे जग म्हणजे अशा असंख्य रेषांचं जंजाळ आहे. आणि या रेषांच्या अधेमधे असतो अवकाश. हा अवकाश म्हणजे जगणं. एका चित्रकाराच्या आयुष्याचं शब्दचित्र असणाऱ्या या पुस्तकाचं शीर्षक अगदी योग्य आहे- ‘बिटवीन द लाइन्स.’

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
How to draw a cat using 5 four times
Video : चार वेळा इंग्रजीत पाच लिहून काढले सुंदर मांजरीचे चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आयुष्यभर चित्रं काढली. ते लिहितात तेव्हाही ते चित्रच काढत असतात. चित्र असो की लिखाण- चंद्रमोहन कुलकर्णी म्हणजे अत्यंत उत्कृष्ट इल्स्ट्रेशनची हमी असते. आजवर अनेक मासिकांसाठी चित्रं, स्केचेस, अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे, अनेक थीम्सवरची वेगवेगळ्या माध्यमांतली चित्रप्रदर्शनं, वैशिष्टय़पूर्ण शिल्प- प्रदर्शनं असं भरपूर आणि दर्जेदार काम चंद्रमोहन कुलकर्णीनी केलंय. त्यांच्या कामामागे विचार आहे. तो घडायला त्यामागील कलाकाराच्या जगण्यात खूप काही घडत असतं.

या पुस्तकात चित्रकार काही व्यक्तिचित्रं साकारताना स्वत:लाही चितारतोय. काळाचा एक मोठा तुकडा या पुस्तकात साकारला आहे. पुस्तकाची सुरुवातच होते ती लेखकाच्या वडिलांच्या व्यक्तिचित्रापासून. ‘निळी सायकल’ या लेखातून वडिलांचं व्यक्तिचित्र नीटच उमटलं आहे. ‘दे दान’ या लेखातही वडील फार ठळक झालेले दिसतात. कुठल्याही काळात मुलाला चित्रकार बनायला प्रोत्साहन देणारे वडील हे दुर्मीळच. तो काळ तर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचा आहे. या बेभरवशी पेशात यायला मुलाला हवी ती मदत करणारे, पेशाने साधे पोलीस हवालदार असणारे त्यांचे वडील आजच्या जगातल्या रॅट रेसनं झपाटलेल्या पालकांसमोर नक्कीच एक रोल मॉडेल ठरतील.

‘दे दान’ हा लेख चित्रकाराच्या तरुण वयातील एका कटू अनुभवावर आहे. या वयात घेतलेले बरेच अनुभव विशेष खोल रुततात. अपमानास्पद अनुभवांचे चरे मनावर कायम राहतात. या लेखात शिक्षण देणाऱ्या चित्रकाराचं आणि त्याच्या उर्मट मुलाचंही व्यक्तिचित्र लख्ख उमटलं आहे. चाळीसएक वर्षांपूर्वी होणारी होतकरू विद्यार्थ्यांची पिळवणूक हा तसा नित्याचा विषय. तेव्हाच्या काळातील आर्थिक, सामाजिक परिस्थितीत असं अनेकांच्या बाबतीत घडलेलं असेल. परंतु शेवटाला आल्यावर हा लेख एकदम चटका देतो. तिथे लेखकाला झालेली जखम या शब्दचित्रातून आपल्याला जाणवते. या लेखामागे अनेक वर्षे आत्मसन्मानाला झालेली ही जखम त्यांनी दाबून ठेवली असेल हे जाणवतं. लेखक आणि वाचक यांचं नातं जुळणं हे चांगल्या ललित लिखाणाचं गमक आहे.

या लेखापासून सुरू झालेला हा प्रवास मग अनेक टप्प्यांतून पुढे जातो. कुमार वयात घेतलेले काही धाडसी, अतरंगी अनुभव, चित्रकलेचं- अप्लाइड आर्टचं शिक्षण, प्रिंटिंगचे अनुभव, इल्स्ट्रेशन्समागचा विचार, अ‍ॅनिमेशन शिकणं, कामानिमित्त भेटलेली वेगवेगळी माणसं, व्यवसायात प्रवेश, स्थिरावणं.. असं करत करत शेवटी आपण लेखकासोबत नर्मदातीरावर येऊन स्थिरावतो.

पुस्तकनिर्मितीत मांडणीच्या अंगानं बराच विचार केला जातो. याविषयी वाचकाला सहसा फारशी माहिती नसते. हा विचार, प्रयोग, प्रक्रिया उलगडून दाखवणं हे या पुस्तकात झालं आहे. ‘मित्र’ हा लेख एका मित्राचा कलंदरपणा तंतोतत दाखवतो. ‘आत्मशत्रू’ तर थंड चटका देतो. हा माणूस व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा भारतीय अवतारच म्हणायला हवा असा आहे.

एकूणच या सगळ्या लिखाणाची भाषा स्टुडिओत बसून गप्पा माराव्यात तशी इनफॉर्मल आहे, थेट आहे आणि त्यामुळे मजा येते. या पुस्तकात कवी ग्रेस यांचे व्यक्तिचित्र उमटले आहे. ‘प्रिय चंद्रजी!’ म्हणणारा दु:खाचा महाकवी इथे शब्दचित्रातून दिसतो. या महाकवीला शेवटच्या आजारपणात साथ देणारा पंढरीही उत्तम रेखाटला आहे.

एखादा प्रसंग असो की व्यक्तिचित्र- चंद्रमोहन कुलकर्णी यांचं लिखाण वाचताना ते एक शब्दचित्रच असतं. या चित्रांची रंगसंगती विशेष बांधून ठेवणारी असते. या पुस्तकात तुम्हाला बरीच थोर माणसं भेटतात. शान्ताबाई शेळके, पुलं आणि सुनीताबाई, कमलाबाई ओगले, शिल्पकार शर्वरी रायचौधरी, अक्षराची व्हर्जिनिटी शिकवणारे र. कृ. जोशी गुरुजी या पुस्तकात भेटतात. यात नर्मदातीरावर भटकताना भेटलेले साधू आहेत, चित्रकलेची शाळा आहे, पोलीस कॉलनी आहे, जुनं शांत पुणं आहे. एखादा कॅलिडोस्कोप असावा असं हे लिखाण आहे. कारण चंद्रमोहन कुलकर्णी हा मटक्याच्या अड्डय़ापासून ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीपर्यंत मुशाफिरी केलेला अफलातून चित्रकार आहे.

‘बिटवीन द लाइन्स’ पकडणं म्हणजे

अर्थ गवसणं, खोलात पोहोचणं. हे नेहमीच कठीण असतं. पण या लिखाणात मात्र ती गोष्ट सहज शक्य झालेली दिसते. कारण या

चित्रकार-लेखकाची लेखणी शब्दांसहित कुंचला, कॅमेरा, टाइम मशीन अशी बहुरूपी, बहुढंगी झाली आहे.

‘बिटवीन द लाइन्स’चं मुखपृष्ठ  मैत्रेयकुलकर्णीचं आहे- जे पुस्तकाच्या आशयाला अमूर्त पद्धतीच्या चित्रातून योग्य तऱ्हेनं साकारतं. चित्रकारानं केलेलं

ललितलेखन हा तसा दुर्मीळच प्रकार. या वेगळ्या लिखाणाचा आनंद घेणं हा एक प्रगल्भ अनुभव म्हणता येईल.

‘बिटवीन द लाइन्स : रेषांमधील अवकाश’

– चंद्रमोहन कुलकर्णी, राजहंस प्रकाशन,

पृष्ठे : २४०, किंमत : ३०० रुपये.