डॉ. देवानंद सोनटक्के

‘‘हिंदू’नंतरची दहा वर्षे’ याबद्दल ‘लोकरंग’तर्फे लेख पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. तथापि, विषयाच्या अनुषंगाने लिहिण्यापेक्षा या कादंबरीची चिकित्सा करण्यावरच अनेकांचा भर जाणवला. काहींनी बदलत्या काळानुरूप ‘हिंदू’च्या पुढच्या भागांत काय अपेक्षित आहे याचा पाढा वाचला. आजूबाजूचे झपाटय़ाने बदलणारे वास्तव ‘हिंदू’च्या पुढील भागांत कसे उतरेल याचे ठोकताळे काहींनी मांडलेले दिसले. तथापि काहीही असले तरी ‘हिंदू’कडून मराठी वाचकांना बऱ्याच आशा-अपेक्षा आहेत, हे वास्तव आहेच. त्यापैकी प्रातिनिधिक लेख..

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

१९९९ पासून मी भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यविचार आणि त्यांच्या कादंबऱ्यांतील त्याचे उपयोजन या विषयाचा एम. फिल., यूजीसी प्रकल्प आणि पीएच. डी.च्या निमित्ताने अभ्यास करतो आहे. २०१० मध्ये ‘हिंदू’ कादंबरी आली तेव्हा तिचा खूप गाजावाजा झाला, कारण एखाद्या कादंबरीचे तीस वर्षे चाललेले लेखन, पांडुरंग-चांगदेवनंतरच्या नेमाडय़ांच्या पुढील नायकाची उत्सुकता, ‘कोसला’त केलेले संस्कृतीचे विडंबन/चेष्टा, तर ‘बिढार- हूल-जरीला- झूल’मध्ये सांस्कृतिक-शैक्षणिक, सामाजिक व वाङ्मयीन अध:पतनाचे वास्तव रेखाटल्यानंतर आता कोणते सांस्कृतिक वास्तव सामोरे येणार याबद्दलची उत्सुकता, शिवाय पहिल्या एक हजार प्रतींवर खुद्द भालचंद्र नेमाडे यांची स्वाक्षरी असा खरेदीचा फंडा, प्रथितयश नावे टाळून ताज्या दमाच्या, पण देशीवादी कादंबरीकारांच्या हस्ते प्रकाशन, नेमाडय़ांनी प्रसार माध्यमांना दणकून दिलेल्या मुलाखती आणि त्यातील राम-कृष्ण, मांसाहार, हिंदू संस्कृती, ब्राह्मण, आर्य व त्यांचा इतिहास याबद्दलची खळबळजनक विधाने!

खरे तर यातील काही विधानांचा तर कादंबरीतील आशयाशी काही संबंधही नव्हता. फक्त राम-सीता यांच्याबद्दल कादंबरीत काही असेल असे श्रद्धाळू व विरोधक अशा दोन्ही वाचकांना वाटून कादंबरी वाचायला भाग पडावी अशी ती विधाने होती. शिवाय कादंबरीचे नाव ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ असल्याने समर्थक व विरोधक असे दोन परस्परविरोधी गट निर्माण झाले होतेच. त्यात पुन्हा ‘साहित्य संमेलन हा रिकामटेकडय़ा लोकांचा उद्योग आहे’, ‘इंग्रजी माध्यमातील मुले बारावीनंतर मूर्ख बनतात’ अशा नेमाडय़ांच्या विविध  प्रसार माध्यमांतील विधानांची त्यात आणखी भर पडलेली.

अशा कादंबरीबाह्य़ विधानांमुळे कादंबरी परंपराविरोधी नसूनही ती तशी आहे, हे बिंबवण्यात सुरुवातीला नेमाडे यशस्वी झाले. कारण त्यानंतर नेमाडे जिथे जातील तिथे त्यांना सनातन्यांचा विरोध झाला होता. खानदेशातील एका चर्चासत्रासाठी नेमाडे यांना व्यासपीठावर तर राहोच, त्या गावातही जाऊ दिले गेले नव्हते. सप्टेंबर २०१५ मध्ये नागपूरच्या चर्चासत्रात तर नेमाडय़ांना धमकीचे पत्र दिले गेले. त्यानंतर नेमाडे यांची ‘तर हे माझा दाभोलकर, कलबुर्गी करतील’ अशी उद्विग्न प्रतिक्रियाही प्रसिद्ध झाली होती. पुढे बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देण्याच्या विरोधातही त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुरोगामी वाचकांचा नेमाडय़ांना पाठिंबा मिळत होता.

मात्र, जसजसे कादंबरीचे वाचन वाढत गेले, तसे ‘‘हिंदू’ ही स्थितीवादी कादंबरी आहे’ असे म्हणत त्यांच्यावर पुरोगामी लेखकांनीही हल्ला चढवला. ‘मुक्त शब्द’च्या फेब्रुवारी २०११ च्या अंकात अरुणा देशमुख यांनी ‘‘हिंदू’तील स्त्रीवादद्वेष्टे नेमाडे’ असा लेख लिहून नेमाडे यांची स्त्रीवादाबद्दलची दृष्टी कशी पारंपरिक आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले. केवळ लेखच नव्हे; तर ‘देशीवाद : रूप आणि रंग’ (मोतीराम कटारे, २०१०), ‘हिंदू : एक चकवा’ (संदीप जावळे, २०११) या ग्रंथांतूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. श्रीधर तिळवे, हरिश्चंद्र थोरात, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी तर आधीपासूनच लेखांतून नेमाडे यांच्या साहित्यविचारांवर टीका केलेली होती. आता ‘हिंदू’नंतर त्यांच्या साहित्यविचारासोबतच त्यांच्या ‘हिंदू’तील संस्कृति समर्थन, ग्रामीण व प्राचीन भारतीय संस्कृती, जातिव्यवस्था यांचे चित्रण व समर्थन आदी प्रतिपादनाविषयी टीका होऊ लागली आहे. (विशेष म्हणजे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर जास्तच!)

पुरोगामी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी तर ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ (२०१६) या ग्रंथातून नेमाडे यांचा साहित्यविचार, त्यांचे सांस्कृतिक विवेचन आणि समाजशास्त्रीय-मानववंशशास्त्रीय आकलन कसे चुकीचे वा अपुरे आहे याबद्दलचे प्रतिपादन केले आहे. त्यातील पहिलाच लेख ‘ज्ञानपीठ आणि ब्रीदहीन फॅसिस्ट लेखक’ असा आहे. यातच काय ते आले!

त्याला प्रत्युत्तर म्हणून अशोक बाबर व सुशील धसकटे यांनी ‘देशीवादाचे दुश्मन’ (२०१८) हा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्या पहिल्याच पानावर ‘सांप्रतकाळी सवतीमत्सराने ग्रासून देशी विचारांपासोन स्वार्थापोटी वाट चुकलेल्या शिक्षित बहुजनांना आणि देशीवादाच्या दुश्मनांना देशीवाद नीट समजावून सांगणेसाठी..’ अशी भूमिका छापली आहे. तर त्यातील पहिले प्रकरण (नेमाडय़ांना संबोधलेल्या) कसबे यांच्या ‘विशेषणे- संबोधने ऊर्फ शिव्यांची सूची’ असे आहे. म्हणजे या ग्रंथात टीकाकारांना खरमरीत उत्तरे देत देशीवादाची पुनर्माडणी केली गेली आहे.

‘हिंदू’ ही कादंबरी असूनदेखील नेमाडय़ांच्या साहित्यविचारांसोबतच कादंबरीवरही टीका होत असते, याचे कारण नेमाडय़ांच्या देशीवादी साहित्यविचारांचे उपयोजन या कादंबरीत आहे, हे होय. माझ्या पीएच. डी. प्रबंधातही भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यविचार आणि त्यांच्या कादंबऱ्या यांच्यात परस्परसंबंध कसा आहे याचे विवेचन असून तो ग्रंथरूपात पद्मगंधा प्रकाशन प्रसिद्ध करीत आहे.

‘समीक्षक भालचंद्र नेमाडे’ (२०१८) या ग्रंथात तर सुधीर रसाळ यांनी ‘समीक्षा कशी असावी यासंबंधी नेमाडय़ांच्या अपेक्षांवर त्यांची स्वत:ची समीक्षा मात्र उतरत नाही. नेमाडय़ांनी तुकारामाबद्दलचे अतिशय संकुचित चिंचोळे क्षेत्र निवडून आपली तुकाराम मीमांसा सादर केली आहे,’ असे म्हटले आहे.

तात्पर्य.. या दशकात नेमाडय़ांच्या ‘हिंदू’ कादंबरीचा मोठाच प्रभाव राहिला आहे. केवळ कादंबरीच नव्हे, तर मर्ढेकरांच्या कविता, कादंबरी व सौंदर्यशास्त्र यांनी जसे १९४५ ते १९६० हे दीड दशक मराठी साहित्यविश्व गाजवले, तशीच गेल्या दशकावर नेमाडय़ांची नाममुद्रा आहे, हे निश्चित. मात्र, जागतिक साहित्य आज आधुनिकतावादाकडून उत्तर आधुनिकतेकडे वळत असताना मराठी साहित्य हे देशीवादाच्या प्रभावात राहणे हे स्थितीशीलतेचे लक्षण आहे. जाता जाता.. नेमाडे यांच्या ‘हिंदू’चे पुढील भाग बाकी असून त्यातील एका भागाचे शीर्षक ‘कुडीसह गुप्त झाला तुका’ असे आहे. ते पाहता पुढील दशकही नेमाडय़ांवरील उलटसुलट चर्चेने गाजण्याची सोय भालचंद्र नेमाडे यांनी करून ठेवली आहे, हे नक्की!