19 September 2020

News Flash

डॉ. खंडेराव.. विश्वनायक- २०२०

एखाद्या कादंबरीची  लेखकाकडून वाट पाहणं हे भाग्य फक्त नेमाडय़ांच्याच नशिबात असावं.

'हिंदू' कादंबरी

शिशिर सिंदेकर – shishirsindekar@gmail.com

‘‘हिंदू’नंतरची दहा वर्षे’ याबद्दल ‘लोकरंग’तर्फे लेख पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. तथापि, विषयाच्या अनुषंगाने लिहिण्यापेक्षा या कादंबरीची चिकित्सा करण्यावरच अनेकांचा भर जाणवला. काहींनी बदलत्या काळानुरूप ‘हिंदू’च्या पुढच्या भागांत काय अपेक्षित आहे याचा पाढा वाचला. आजूबाजूचे झपाटय़ाने बदलणारे वास्तव ‘हिंदू’च्या पुढील भागांत कसे उतरेल याचे ठोकताळे काहींनी मांडलेले दिसले. तथापि काहीही असले तरी ‘हिंदू’कडून मराठी वाचकांना बऱ्याच आशा-अपेक्षा आहेत, हे वास्तव आहेच. त्यापैकी प्रातिनिधिक लेख..

जुलै २०१०! दहा वर्षांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ महाकादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला होता. एखाद्या कादंबरीची  लेखकाकडून वाट पाहणं हे भाग्य फक्त नेमाडय़ांच्याच नशिबात असावं. ‘पटोत- न पटोत, नेमाडे हे टाळता येण्याजोगे लेखक कधीच नव्हते आणि नाहीत.’ (संदर्भ : ‘सन्मानाची समृद्ध अडगळ’, संपादकीय- लोकसत्ता, ७ फेब्रुवारी २०१५) नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्यासाठी ‘हिंदू’ प्रकाशित झाल्यानंतर तब्बल पाच वर्षे जावी लागली. ज्ञानपीठामुळे नेमाडेंसारखे लेखक मोठे होत नाहीत, किंवा दुर्गा भागवतांना (कोण्या गाडगीळांचे मांजर आडवे गेल्याने) ज्ञानपीठ न मिळाल्याने त्यांचे लेखनकार्य लहान होत नाही. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे मराठी भाषेचा सन्मान भारतभर वृद्धिंगत होतो. मराठी माणसाला मराठी माणसासंदर्भातच पोटदुखीचा विकार आहे. उदाहरणार्थ, वगैरे गिरीश कार्नाड किंवा अन्यभाषिक साहित्यकारांना हा पुरस्कार मिळतो तेव्हा आम्हाला वाईट वाटत नाही. त्याची आम्ही चिकित्साही करीत नाही. जी. ए. कुलकर्णीसाठी, विजय तेंडुलकरांसाठी आम्ही का प्रयत्न केले नाहीत? असो.

आज दहा वर्षांनंतर ‘हिंदू’च्या पुढच्या भागाची वाचक पुन्हा एकदा वाट पाहत आहेत. दरम्यान, काळ बदलला आहे. काळाच्या ओघात विद्रोही नायक सांगवीकर तडजोड करायला शिकला होता. त्याचं रूपांतर चांगदेव पाटील नामक बैलासारख्या प्राण्यात व्हायला लागलं होतं. खंडेराव तर पूर्णपणे बदललेला आढळतो. तो खानदेशातल्या मोरगावचा. काळ १९४० ते १९९०. शेती, ग्रामीण जीवन याला कंटाळलेला. तिथून पळू पाहणारा. एकूण सर्व व्यवस्थेकडे निरिच्छपणे बघणारा खंडेराव हा इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात अभ्यास करणारा संशोधक. ‘‘स्थळ आणि काळाच्या पलीकडे असलेल्या जाणिवांच्या आधारावर संस्कृतीतील विकास (?), बदल, तसेच मोहंजोदाडो, हडप्पापूर्वी, आर्य संस्कृतीपूर्वी एक संस्कृती खानदेश ते श्रीलंका या भागात अस्तित्वात होती..’’ असे संपूर्ण नवीन संशोधन मांडणारा हा खंडेराव त्यासाठी युनेस्कोत प्रेझेन्टेशन देणारा, गावगाडय़ाच्या हिंदू कुटुंबपद्धतीत अर्थशून्य, हतबल झालेला दिसतो. मात्र, स्वत:ची मूळं शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आता प्रतीक्षा आहे ती नव्या नायकाची.

दहा वर्षांनंतर ‘हिंदू’च्या पुढच्या भागात वाढलेलं नागरीकरण, जागतिकता (‘जागतिकीकरण’ या शब्दाऐवजी भाषातज्ज्ञ नेमाडे या शब्दाचा आग्रह धरतात.) यांच्या वास्तव व दाहक परिणामांतून होरपळून निघालेला नायक समोर येईल. जागतिकीकरणामुळे स्वत:ची ओळख म्हणजे केवळ आधार क्रमांक आणि विकास म्हणजे वेगात धावणारी रेल्वे असं सांगत तो अधिकाधिक एकाकी पडलेला असेल. या काळात निर्माण झालेल्या संस्था व्यक्तीला नियमांचे गुलाम बनवतील. व्यक्ती तुटक आणि एकटी होत जाईल. समृद्ध होत असतानाच माणसाचं रूपांतर स्वत्व, प्राण हरवलेल्या संस्थेत होण्याची प्रक्रिया खंडेरावमध्ये सुरू झालेली होती.. ती दुसऱ्या भागात नेमकी किती अडगळ निर्माण करते, हे वाचण्यात आता वाचकांना रस आहे. डेक्कनवरचं इंटरनॅशनल बुक डेपो, कामगार सभेतील आकाशवाणीवर सादर होणारी गाणी या प्रतिमा गेल्या दहा वर्षांत लयाला गेल्या आहेत. गूगल व सोशल मीडिया माहीत असणारा नव्या ‘हिंदू’चा नायक महात्मा गांधी, विवेकानंद यांचं तत्त्वज्ञान जगाला सांगणारा असेल. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते बहिणाबाईपर्यंत काव्याची थोरवी सांगणारा असेल. सातपुडय़ातील खानदेशपासून ते सिमल्यातील हिडिंबा मंदिरापर्यंत रुजलेल्या महाभारत वा पुराणातल्या कथांमधून माणसा-माणसाला जवळ आणणाऱ्या  संस्कृतीची महती तो समोर आणेल. कांटपासून ते चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाची चर्चा तो करेल.  जागतिकतेत एकटा पडत गेलेला हा नायक नातेवाईकांच्या गर्दीत स्वत:ला विरघळून टाकण्याची संधी निर्माण करणाऱ्या श्राद्धविधीचे महत्त्व विशद करेल. खेडं सुटताना माणूस क्षुद्र होत गेला- हे नागरीकरणाचं भयाण वास्तव समोर आल्यानंतर नवा नायक पुन्हा खेडय़ाकडे जाईल. दलित, ब्राह्मण, मराठा यांच्याविषयीची त्याची टीका अधिकाधिक टोकदार असेल. ‘देशीवाद’ पुन्हा एकदा पूर्ण सामर्थ्यांने निर्मळ स्वरूपात मांडला जाईल. तो कदाचित डॉ. खंडेराव असेल किंवा त्याचा विद्यार्थी असेल; जो विश्वगुरू किंवा विश्वनायक असेल.

अनंत काळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे  साहित्य चिरंतन मूल्यांची जपणूक करत असतं. ‘‘कपडे शोधून आपण नग्नतेची निर्हेतुकता  घालवून बसलो.. नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे.. गरोदरींना  मारू नये, त्या दिवसाच्या गरजेपुरते मासे मारावेत.. प्रेम, माया, सहजीवन ही मूल्ये या कर्कश, आधुनिक विचारशक्तीला तुच्छ वाटतात, त्यामुळे तीन हजार वर्षांत पुन्हा गौतम बुद्धासारखा मानव जन्मत नाही, हे या उत्क्रांतीचे अपयश आहे.. जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चालीरीती आहेत, कुणाची टिंगल करू नये.. चिरंतन अंधार कल्पनेत येतो तेव्हाच वर्तमानाच्या मर्यादाही कळतात.. माणसंही नाहीशी होतात, जाणिवा राहतात.. जगणं-मरणं खेळ असतो, कोणी मरत नाही, कोणी मारत नाही, जीव उडून जातो.. चौऱ्यांशी लक्ष योन्यांचं पोकळ आरपारपण.. दोन्ही धर्म एका भयस्वप्नाला झाकणारी कव्हरंच आहेत..’’ नेमाडेंच्या पात्रांमधून त्यांचे प्रामाणिक दृष्टिकोन स्पष्ट होत जातात. चिरंतन मूल्यांची जपणूक अधोरेखित होते, हे ‘हिंदू’चं सामथ्र्य आहे.

‘‘वनसंस्कृतीच्या पोटावर पाय देऊन फोफावलेली अप्पलपोटी कृषिसंस्कृती.. आता हिच्याही पोटावर औद्योगिक शहरी संस्कृती पाय ठेवणारच आहे.. कुणबिकीचं कुंपण तोडा न् बाहेर खुल्या जगात पळा.. शेतकऱ्याची पहिली वैरीण शेती, दुसरा व्यापारी, तिसरं सरकार.. अमरवेल जशी जित्या झाडाला खाते तशी शेती शेतकऱ्याला खाते..’’ या नेमाडेंच्या निरीक्षणांत दहा वर्षांत फरक पडलेला नाही. उलट ती अधिकाधिक दृढ होत गेली. सुखदु:खाविषयी  नेमाडे म्हणतात, ‘दु:खच श्रेष्ठ आहे. दु:खामुळेच माणसं मायाळू होतात.’ तर ‘गरिबीत माणुसकी जास्त असते. साधेपणा किती उदात्त असू शकतो..’

‘दलित पुढारी व्हायचं असेल तर बायको ब्राह्मणच हवी.. हजारो र्वष आमच्यावर अन्याय करणाऱ्यांच्या पोरींशी लग्न करणं हा सूड घ्यायचा नामी उपाय आहे.. डॉ. आंबेडकर हे आधुनिक मनूच आहेत. नवा मनू येतो आहे. पुन्हा मनू मनूच करतो आहे.. मारू सवर्णाच्या ७७वर लाथा होऽऽ, आमचा बुद्धाच्या चरणी माथा होऽऽ..’ सद्य: दलित चळवळीविषयी नेमाडेंची निरीक्षणं दहा वर्षांनंतर आता बदललेली असतील. ‘‘खेडी निष्पाप उदार.. एवढय़ाशा मोरगावात आठ धर्म-पंथ, २२ जाती (आणि अशा व्यवस्थेत) जोपर्यंत हिणवणारा नसतो तोपर्यंत हीनपण नसतं.’’

ग्रामसंस्कृतीचे उदात्तीकरण ‘हिंदू’च्या पुढच्या भागात अपेक्षित आहे. तिरोनी-त्रिवेणी आत्या, आजी, मावशी, भाऊ, आई (जिच्याविषयी फारसं लिहिलेलं नाही.), वहिनी, मित्र, शिक्षक, गावातील इतर समाज असा सर्व गोतावळा, त्यांचे परस्परसंबंध, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण आता पूर्णपणे विस्मृतीत गेली असेल. त्याऐवजी परदेशात गेलेली मुलं इंटरनेटमधून डोकावतील. (महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ची इथे आठवण येते.) एकूण सहा प्रकरणांत सहाशे तीन पानांची ‘हिंदू- भाग १’ कादंबरी पूर्ण वाचून झाल्यानंतरदेखील समुद्रावर मुठीत घेतलेली रेती हातात राहावी असं वाटत असतानाच कधी घरंगळून जाते असा अनुभव देते.

मराठी समाजमनाची दैवतं समजल्या जाणाऱ्या  साहित्यिकांवर टीका करीत मोठय़ा झालेल्या प्रोटॅगॉनिस्ट नेमाडेंचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ स्वीकारतानाचे भाषण त्यांच्यात होत असलेल्या समृद्ध बदलांची  जाणीव करून देणारे होते. म्हणूनच दहा वर्षांनंतर येणारे ‘हिंदू’चे पुढचे भाग वेगळे असतील असे वाटते.

दरम्यान, या  दहा वर्षांमध्ये ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही रंगनाथ पठारेंची मराठीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी एकमेव महाकादंबरी वाचनात आली. राजन गवस, कृष्णात खोत, प्रवीण दशरथ बांदेकर, रवींद्र रुक्मिणी, हृषीकेश गुप्ते यांसारख्या अनेक दर्जेदार लेखकांकडून महाकादंबरीच्या अपेक्षा आहेत.

पात्रांमधून लेखकाचे तत्त्वभान शोधू नये असा सल्ला अनेक जण देतील; पण भालचंद्र नेमाडे त्याला अपवाद ठरतील. नेमाडेंचे टीकाकार त्यांना संधिसाधू म्हणतील; पण नेमाडे नेमाडेच. देशीवादाचे निर्माते नेमाडे आणि आता दहा वर्षांनंतर बदललेले नेमाडे समजण्यासाठी ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ.. भाग दोन’ची वाट पाहावी लागेल. नाहीतर ‘आहे कुठे आकांक्षांचं दुसरं पाऊल देवा, आम्हाला ह्य़ा शक्यतांच्या रानात एकाच पावलाचा ठसा मिळाला.’ (संदर्भ : सर्वाना माहीत आहेच.)

मुंबईत फोर्टमध्ये किंवा पुण्यातल्या जे. एम. रोडच्या फूटपाथवर जगप्रसिद्ध दर्जेदार पुस्तकांच्या पायरेटेड कॉपीज केवळ १०० रुपयांत विकत मिळतात. लेखक दर्जेदार आणि  जगप्रसिद्ध असण्याचं ते एक प्रतीक आहे. आणि या जागेवरदेखील नेमाडेंना प्रचंड मागणी असते. ‘ज्ञानपीठ ते फूटपाथ’ अशा सर्व वाचकांसाठी  चिरंतन मूल्यं जपणारं नेमाडेंचं साहित्य एकात्मभावनेने परात्मभाव साधतंय, हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 1:17 am

Web Title: bhalchandra nemade hinu novel response by shishir sindekar dd70
Next Stories
1 कथित ग्रामीण साहित्यिकांची कोंडी!
2 अडगळ समृद्ध आहे म्हणून कवटाळून बसणे उचित नाही!
3 शीर्षकापासूनच संभ्रमावस्था!
Just Now!
X