News Flash

आमचे अण्णा!

अण्णा, म्हणजे माझे वडील आणि संगीत रंगभूमीचे बिनीचे शिलेदार नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांची जन्मशताब्दी २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर

ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर – dnyaneshkumar.1961@gmail.com

नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांची जन्मशताब्दी येत्या २५ नोव्हेंबरपासून सुरू  होत आहे, त्यानिमित्ताने..

अण्णा, म्हणजे माझे वडील आणि संगीत रंगभूमीचे बिनीचे शिलेदार नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांची जन्मशताब्दी २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने माझ्या मनात आठवणींचा प्रचंड मोठा कोलाज उभा राहतो आहे. अण्णांचं आभाळाएवढं मोठं व्यक्तिमत्त्व आणि या आभाळाच्या कृपाछायेत वाढलेली आम्ही मुलं! आमच्या चिमुकल्या शब्दांच्या ओंजळीत ते आभाळ कसं मावावं? पण जेव्हा आपण गंगेला अघ्र्य देताना गंगेतलं पाणी ओंजळीत घेऊन तेच पाणी गंगेला अर्पण करतो, तसंच आज अण्णांनी दिलेल्या शब्दांचे अघ्र्य त्यांच्या स्मृतीला अर्पण करतो आहे.

आमचे अण्णा हे ‘ललितकलादर्श’च्या व्यंकटेश तथा बापुराव पेंढारकर या तेजस्वी प्रतिभावंताचे एकुलते एक सुपुत्र!  बापुरावांकडे अगदी नाटय़मयरीत्या ‘ललितकलादर्श’ची मालकी आली आणि तितक्याच नाटय़मयरीत्या अण्णांकडे ‘ललितकलादर्श’ची धुरा अचानक आली. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्युपत्रानुसार बापुराव ‘ललितकलादर्श’चे मालक झाले. १९३७ साली बापुरावांचा जलोदरानं मृत्यू झाला आणि अण्णा ‘ललितकलादर्श’चे मालक झाले. अण्णांनी नाटकाचा व्यवसाय करू नये अशी बापुरावांची इच्छा होती. त्यांनी डॉक्टर किंवा वकील व्हावं असं बापुरावांना वाटे. पण काळाची योजना काही वेगळी होती. अण्णांना नाटय़व्यवसायच कारावा लागला. त्यांनी तो इमानेइतबारे केला आणि ‘ललितकलादर्श’ला वैभवाच्या शिखरापर्यंत घेऊन गेले.

बापुरावांचं निधन झालं त्या दिवशी संध्याकाळी त्यांची आजी त्यांना म्हणाली, ‘‘इथे बसून काय करतोस? हिराबाईंचं गाणं आहे. ते ऐक जा!’’ अण्णा तिथं गेले. त्यांना तिथे पाहून सर्वाना आश्चर्य वाटलं. त्यांचं सांत्वन करून हिराबाईंनी गायला सुरुवात केली. त्यांनी असा काही षड्ज लावला की बस! सूर्यासारखा तेजस्वी!  त्या क्षणी अण्णांनी ठरवलं, आपल्याला असं गाता यायला हवं. त्यांनी घरी येऊन आजीला सांगितलं की, ‘‘मला गाणंच गायचंय!’’

आजीनं बिऱ्हाड ग्वाल्हेरातून मुंबईत आणलं. तिथे बापूंचे चाहते होते. त्यांनी एकत्र येऊन ‘पेंढारकर ट्रस्ट’ स्थापन केला व त्यांना शालेय शिक्षण घेण्यास सांगितलं. पण अण्णांनी, ‘‘मला गाणंच गायचंय’’ असा आग्रह धरला. काही लोकांनी अर्थसाहाय्यास नकार दिला. त्यांच्या आजीनं निश्चयानं त्या बैठकीत सांगितलं, ‘‘एक वेळ भांडी घासू, पण याला गाणं शिकवू.’’ बैठकीतून बाहेर पडल्यावर चित्रपटासारखा योगायोग घडला. समोर गायनाचार्य वझेबुवा दिसले. आजीनं अण्णांना त्यांच्या पायावर घातलं. वझेबुवांच्या सांगण्यावरून हे कुटुंब पुण्यात राहायला गेलं. वझेबुवांच्या घरी तालमीच्या पहिल्याच दिवशी अण्णांचा आवाज फुटला. पण रोज सकाळी ५ ते ८ रियाज, मग पर्वतीवर फिरायला, १० ते १२ शिकवणी, जेवण, पुन्हा संध्याकाळी ३ ते ८ शिकवणी अशी अफाट मेहनत घेऊन अण्णांनी त्यावर मात केली. एकदा वझेबुवांचा मुंबई रेडिओवर लाइव्ह कार्यक्रम होता आणि त्यांना दम्याचा झटका आला. ते अक्षरश: धापा टाकू लागले. संचालक बुखारी साहेबांनाही आता काय करावं प्रश्न पडला. १९४१ साल होतं ते. बुवांनी अण्णांकडे बोट दाखवून ‘‘माझ्याऐवजी हा गाईल!’’ असं सांगितलं. त्या दिवशी अण्णा रेडिओवर तासभर दरबारी कानडा गायले. त्या काळी रेडिओचे मानधनाचे चेक रिझव्‍‌र्ह बँकेतून मिळायचे. अण्णांच्या नावाचा चेक तिथे बाबुराव देसाई नावाचे मॅनेजर होते त्यांनी बघितला व स्वत:कडे ठेवून घेतला. त्यांनी अण्णांना भेटायला बोलावले. त्यांनी विचारलं ‘‘बापूंचा तू कोण?’’ अण्णा म्हणाले, ‘‘मुलगा.’’ ‘‘मग कंपनी चालवायची की नाही? मुंबईत राहायचं की नाही?’’ अण्णा उत्तरले, ‘‘जागा नाही.’’ ते म्हणाले, ‘‘माझ्या घरी यायचं सर्वानी ताबडतोब. कंपनी सुरू करायची. मगच चेक मिळेल.’’

अण्णांनी वझेबुवांना वृत्तांत कथन केला. मग सारी मंडळी कपूर महालमध्ये बाबुराव देसाईंकडे थडकली. १९६० पर्यंत अण्णा तिथेच राहायचे. ‘ललितकलादर्श’ पुन्हा सुरू करायची व ‘सत्तेचे गुलाम’चा प्रयोग करायचं ठरलं. ‘‘एकही पैसा देणार नसशील तरच काम करेन,’’ या अटीवर नानासाहेब फाटक आले. मामा पेंडसे, मा. दत्ताराम आले. बापूंचा कपडेपट सांभाळणारे अनंत साखरे आदी बॅक स्टेजला उभे राहिले. वझेबुवांनी गाणी बसवून घेतली व पहिला प्रयोग बलीवाला थिएटरमध्ये केला. अण्णांनी बापूंची ‘वैकुंठ’ ही व्यक्तिरेखा केली. लोक म्हणाले, ‘‘साक्षात् बापू!’’ सर्वानी कौतुक केलं. त्यांच्या जीवनातला नवा अध्याय सुरू झाला. ‘ललितकलादर्श’ नव्यानं सुरू झाली. ती सुरू ठेवणं हे मग अण्णांचं मिशन ठरलं.

नाटक हा अण्णांचा श्वास होता आणि ‘ललितकलादर्श’ हा त्यांचा ध्यास होता. या त्यांच्या ध्यासात माझ्या आईचा- मालती पेंढारकर हिचा श्वास आणि ध्यास मिसळला होता. तुम्हाला एक नक्की सांगतो, आई व अण्णांच्या अडुसष्ट वर्षांच्या संसारात कधीही मतभेद व मनभेद झाले नाहीत. दोघेही एकमेकांत पार विरघळून गेले होते. आईची भक्कम व बरोबरीची साथ त्यांना लाभली होती.

अण्णा वेळेची शिस्त पाळत असत. नाटक ठरलेल्या वेळी चालू व्हायलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. दिल्लीच्या एका प्रयोगाला खुद्द पंडित नेहरू येणार होते. त्यांना यायला काहीसा उशीर होणार होता. पण अण्णांनी ठरलेल्या वेळीच तिसरी घंटा दिली आणि नाटक सुरू केलं. पंडितजी विंगेत येऊन थांबले व नंतर त्यांनी अण्णांच्या वक्तशीरपणाचं कौतुकही केलं.

अण्णांनी नाटकाबरोबरच चित्रपटातूनही काम केलं. १९५१-५२ साली व्ही. शांताराम यांनी ‘अमर भूपाळी’ करायचं ठरवलं व त्यात अण्णांना बाळाची भूमिका दिली. पण तिथं काम करताना अण्णांनी संगीतकार वसंत देसाईंच्या शेजारी बसून रेकॉर्डिगचं, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याकडून एडिटिंगचं तंत्र शिकून घेतलं. बापुरावांचं तंत्रज्ञानाचं वेड अण्णांच्या रक्तातच उतरलं होतं. त्या वेळची एक वेगळीच, पण मजेदार आठवण सांगतो. वसंत देसाई रेकॉर्डिग करत होते, ‘झनक झनक पायल बाजे’चं! आमीर खाँसाहेबाचं रेकॉर्डिग होतं आणि खाँसाहेबांची तान संपल्यानंतर कोरस आपली ओळ नीट उचलत नव्हते. अण्णा त्या वेळी वसंतरावांच्या बाजूलाच होते. त्यांनी अण्णांना अचानक विनंती केली, ‘‘तुम्ही कोरसमध्ये गाल का?’’ ते तयार झाले. ही त्यांनी सांगितलेली आठवण आम्हाला खूप काही शिकवून गेली. कलाकारानं कलेशी इमान राखावं. तो कलेपेक्षा मोठा असू शकत नाही हा विचार त्यातून मिळाला.

अण्णा हे प्रयोगशील कलावंत. १९५६ साली ‘स्वामिनी’ नाटकासाठी त्यांनी प्लेबॅकचं तंत्र पहिल्यांदा वापरलं. ‘स्वामिनी’ नाटकाच्या प्रारंभी रेकॉर्डेड नांदी वाजायची ती रेडिओवरच्या अनाउन्समेंटसकट. चित्रपटातील संगीतकारांना-वसंत देसाईंना मराठी नाटकासाठी संगीत द्यायला त्यांनीच पहिल्यांदा बोलावलं. विद्याधर गोखल्यांनी एक अत्यंत सुंदर नाटक लिहिलं होतं- ‘पंडितराज जगन्नाथ.’ वसंत देसाई यांना वेळ नव्हता. अण्णा त्यांच्यासाठी दोन र्वष थांबले. त्यांना वेळ मिळाल्यावर ‘पंडितराज’चं अद्भुत संगीत वसंत देसाई यांनी बांधलं- एकही पैसा न घेता!

अण्णांचं संकटांना तोंड देण्याचं कसब वेगळंच होतं. १९६८ मध्ये ‘ललितकलादर्श’चा ‘हीरक महोत्सव’ आला. त्या वेळी ‘कटय़ार काळजात घुसली’, वगनाटय़ ‘असुनी खास मालक घराचा’ आणि ‘झाला अनंत हनुमंत’ ही नाटकं सादर झाली. त्याच वेळी नेमका कोयना भूकंप झाला, वीज गायब झाली. अण्णांनी कोल्हापुरातून जनरेटर वगैरे आणून सोहळा केला. पण तो सारा तोटय़ात गेला. अण्णांवर तब्बल ६८ हजार रुपयांचं कर्ज झालं होतं. लोकांना पैसे द्यायचे होते. गिरगावात तबेला भाग आहे, तिथे काही माणसं व्याजी पैसे देत असत. तिथले सावकार, दादा लोकही अण्णांची नाटकं पाहायला येत असत. अण्णा तबेल्यात कर्ज उभं करण्यासाठी गेले. त्या मंडळींनी अण्णांना पैसे हवेत हे कळल्यावर लगेच पैसे उपलब्ध करून दिले व अण्णांनी ते पैसे परत करेपर्यंत त्यांना या मंडळींनी विचारलंही नाही.

अण्णांना पाच गोष्टींचं वेड होतं- भारतीय रेल्वे, परदेशी वस्तू, तंत्रज्ञान, कुत्रा आणि किशोरकुमार! आमचं दादरचं घर रेल्वेलाइनजवळ आहे. कोणतीही ट्रेन गेली की अण्णा लगेच सांगायचे- आत्ता राजधानी चाललीय, आता फ्राँटियर मेल जातेय. त्यांना देशभरातील रेल्वेचं टाइम टेबल पाठ होतं. परदेशी वस्तूंची त्यांना आवड होती. वेगवेगळी परफ्युम्स त्यांना आवडायची. तंत्रज्ञानाची फारच आवड होती. जरा काही नवीन तंत्रज्ञान आलं रे आलं की ते त्यांनी मिळवलंच व त्याचा यथासांग अभ्यास करून ते वापरात आणलंच! किशोरकुमारचं गाणं हा त्यांच्या जिव्हाळ्याचा भाग होता.

अण्णांच्या अखेरच्या दिवसांतली एक आठवण सांगतो. अण्णांना रुग्णालयात दाखल केलं गेलं, ते बेशुद्ध होते. मी कार्यालयीन कामासाठी कोलकात्याला गेलो होतो. बातमी कळल्यावर मी मुंबईत परतलो. रुग्णालयात धाव घेतली. अण्णा आयसीयूमध्ये होते. शुद्ध हरपली होती. मी त्यांच्या कानाजवळ गेलो आणि एक नाटय़पद गुणगुणलो. अण्णांचे डोळे किलकिले झाले, चेहरा काहीसा हसरा झाला. क्षणात उठून बसतील आणि माझ्या सोबत तेच नाटय़पद खणखणीत आवाजात म्हणायला सुरुवात करतील असं वाटलं.

आजही अण्णांनी काम केलेल्या कित्येक नाटकांच्या ध्वनिचित्रफिती, त्यांनी केलेली ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिग्ज मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. अण्णांनी स्वत:च त्या मुंबई मराठी साहित्य संघाकडे दिलेल्या आहेत. त्यांचं जतन करणं, त्यांचा अभ्यासकांनी लाभ घेणं व एकुणातच मराठी रंगभूमीचा इतिहास नव्यानं अभ्यासणं हीच अण्णांना दिलेली श्रद्धांजली असेल.

प्रचंड ऊर्जेने, खणखणीत आवाजात प्रसन्न मुद्रेने रसिक प्रेक्षकांना सामोरे जाणारे अण्णा अजूनही आठवतात. मरगळ आलेल्या संगीत रंगभूमीला, आपल्या ऐतिहासिक नाटय़परंपरेला खडबडून जागं करण्याचं काम अण्णांच्या सोबत आता आम्हा सर्वानाही करायचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 1:48 am

Web Title: bhalchandra pendharkar dd70
Next Stories
1 जो तटस्थ है, समय लिखेगा उनके भी अपराध…
2 हास्य आणि भाष्य : व्यंगचित्रकार आणि पंतप्रधान
3 इतिहासाचे चष्मे : पर्यावरण, परंपरा आणि इतिहास
Just Now!
X