जालीम व्यसनांच्या दुष्टचक्रात अडकून स्वत:च्या आयुष्याची ससेहोलपट करून घेतलेल्या आणि पुन्हा जिद्दीने त्यातून वर आलेल्या तुषार नातू यांचं ‘नशायात्रा’ हे आत्मकथन ‘समकालीन प्रकाशना’तर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातील संपादित भाग.
दिवस-दिवस घराबाहेर राहणं, पसे उडवणं, अभ्यासात लक्ष नसणं यामुळे माझं काही तरी बिनसलं आहे हे माझ्या घरच्यांना लक्षात आलं होतं. व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे माझी पशांची मागणीही वाढत चालली होती. त्यामुळे घरात रोजच काही ना काही कुरबूर व्हायची. रविवार माझ्यासाठी घातवार असे. त्या दिवशी वडील आणि भाऊ दोघंही घरी असत. त्यांच्याकडून पसे मिळणं तर लांबच, पण आईकडूनही पसे मागता येत नसत. भावाचं माझ्यावर सतत लक्ष असे.
एका रविवारी भाऊ घरी असताना मी आईला हळूच पसे मागितले, पण तरीही भावाने ते ऐकलंच. त्याने आईला स्पष्ट ताकीद दिली, ‘‘यापुढे तुषारला एकही पसा द्यायचा नाही. तो दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेलाय. बाहेर हा काय काय धंदे करतो ते सगळं मला कळलं आहे. त्याला पसे दिल्याचं मला कळलं तर मी हे घर सोडून जाईन!’’ त्याच्या धमकीमुळे आई-वडील दोघंही घाबरले. पण मी मात्र निर्लज्ज झालो. आता भावाने घरात सगळं सांगितलंच आहे म्हटल्यावर मी वेगळा हट्ट सुरू केला. ‘‘ब्राऊन शुगर घेतली नाही तर मला खूप त्रास होतो. काहीही करून पसे द्या’’, असं म्हणून मी आई-वडिलांच्या मागे लागलो; पण भाऊ आज काहीही ऐकायला तयार नव्हता. तो मला म्हणाला, ‘‘होऊ दे त्रास. आम्ही तुला दवाखान्यात घेऊन जाऊ, पण पसे मिळणार नाहीत.’’ त्या वेळी माझी मोठी बहीणही सुट्टीसाठी मुलांसोबत घरी आली होती. भावाने तिलाही पसे न देण्याची ताकीद दिली. काहीच मार्ग दिसेना म्हटल्यावर मी शेवटी तसाच बाहेर पडलो. बाहेर मित्रांकडून थोडी ब्राऊन शुगर मिळवली. ब्राऊन शुगर कुणीच कुणाला आपणहून देऊ करत नाही. कारण सगळेच व्यसनी कंगाल असतात आणि ब्राऊन शुगर महाग. ती त्यांची त्यांनाच पुरत नसते. त्यामुळे बराच वेळ इकडे-तिकडे फिरलो आणि मग घरी गेलो. संध्याकाळी भाऊ बाहेर गेला की मग आईकडून पसे मिळवू, अशा आशेवर मी होतो. पण त्या दिवशी भावाने चंगच बांधला होता. तो दिवसभर घरातच बसून होता. आता मात्र काय करावं ते मला सुचेना. आधीच टर्की सुरू झाली होती. त्यामुळे मी जे तोंडात येईल ते बरळू लागलो. इमोशनल ब्लॅकमेिलग सुरू केलं. ‘‘तुम्हाला माझ्या भावनांची पर्वा नाही, माणसापेक्षा तुम्हाला पसा जास्त महत्त्वाचा आहे, लहानपणापासून तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे, लोक भावासाठी प्राण देतात आणि तू साधे शंभर रुपये देऊ शकत नाहीस.. ’’ वगरे.
सगळे शांतपणे माझी बडबड सहन करत होते पण कुणीही पसे देत नव्हतं. मग मी शेवटचं अस्त्र काढलं. आता आत्महत्याच करतो, असं म्हणत खिशातून एक नवं कोरं ब्लेड काढलं; पण भाऊ बधला नाही. तो म्हणाला, ‘‘ही सगळी तुझी नाटकं आहेत! त्याला आम्ही घाबरत नाही. मरायचं असेल तर बाहेर जाऊन रेल्वेखाली डोकं ठेव!’’ त्याने मला बरोबर ओळखलं होतं. मला मरायचं नव्हतंच. मला फक्त त्यांना घाबरवायचं होतं. मी सरळ एक कागद घेऊन सुसाइड नोट लिहायला सुरुवात केली – ‘मी ब्राऊन शुगरच्या आहारी गेल्याने जीवनाला कंटाळलो आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे. मृत्यूनंतर माझे डोळे आणि किडनी, तसंच इतर उपयुक्त अवयव गरजू लोकांना दान करण्यात यावेत, अशी माझी अंतिम इच्छा आहे. माझ्या मरणास कोणीही जबाबदार नाही.’ चिठ्ठी मुद्दाम सगळ्यांना वाचून दाखवली आणि मग आत्महत्येचा ड्रामा सुरू केला. ब्लेडने उजव्या हाताच्या मनगटावर हळूच कापण्यास सुरुवात केली. मग मात्र आईचा धीर सुटला आणि ती रडू लागली. ते पाहून बहीण आणि तिची मुलंही घाबरून रडू लागली. ‘‘एवढा तमाशा बघण्यापेक्षा त्याला पसे देऊन टाक’’ म्हणू लागली. रक्ताची एक लाल रेघ मनगटातून बाहेर पडली तसे आईचे हुंदके वाढले. त्यांच्यावरचा दबाव वाढवण्यासाठी मी ब्लेडचं पातं हाताकडून गळ्याकडे नेलं. गळ्यावरून हळूच ब्लेड फिरवलं. तिथेही रक्ताची एक रेघ उमटली. मनगटाची शीर कापताना नेमकं किती कापलं जातंय ते मी पाहू शकत होतो. पण गळा चुकून जास्त कापला गेला तर प्रकरण अंगाशी येईल, या भीतीने मी घरातला छोटा आरसा घेतला आणि त्यात पाहून हळूहळू गळ्यावरून ब्लेड फिरवू लागलो. रक्त वाहू लागलं, पण तरीही भाऊ ऐकायला तयार होईना. शेवटी आई आणि बहीण मुलांना घेऊन शेजारी निघून गेल्या. वडीलही घरातून बाहेर गेले. आता फक्त मी आणि भाऊच राहिलो. रक्ताची एक धार माझ्या गळ्यावरून ओघळत छातीवर आली होती. बनियन रक्ताने लाल होऊ लागलं. शेवटी मी खूप शक्तिपात झाल्यासारखा डोळे मिटून, मान वर करून िभतीला टेकून बसून राहिलो. माझ्या या अवस्थेमुळे भाऊही घाबरला असावा. तोदेखील उठला आणि चप्पल घालून घरातून बाहेर पडला. बाहेर जाताना भावाने दाराला बाहेरून कडी लावल्याचा आवाज आला तसा मी भानावर आलो. मागच्या खोलीत जाऊन पाहिलं तर तिथेही अंगणाकडे जाणाऱ्या दाराला कुलूप लावलेलं. मागच्या दाराने बाहेर पडणंही शक्य नव्हतं. एकंदरीत, भावाने मला घरात अडकवून ठेवलं होतं. बराच वेळ तसाच विमनस्क अवस्थेत बसून राहिलो. आता गळ्याची जखम ठसठसू लागली होती. त्यातच टर्की सुरू झाली. काय करावं सुचेनासं झालं.
तितक्यात बाहेर एका गाडीचा आवाज आला. बाहेरून लावलेली दाराची कडी काढली गेली. चार-पाच पोलिसांसह भाऊ आत शिरला. पोलिसांनी मला उठवून उभं केलं. त्यातला एक जण मला ओळखत होता. तो म्हणाला, ‘‘अरे, हा तर इथल्या शिवसेना शाखेचा सेक्रेटरी आहे. जखम काही मोठी नाही. चला, याला गाडीत घ्या.’’ बाहेर पोलिसांची मोठी निळी गाडी थांबली होती. गाडीभोवती बरीच गर्दी जमली होती. माझ्याबरोबर भाऊही गाडीत बसला. मी त्याला खुन्नस देत होतो. ते पाहून त्याने मान फिरवून घेतली. मला नाशिक रोड पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. भावाने तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरला सगळी माहिती सांगितली. ऐकताना ते खेदाने मान हलवत होते. मला म्हणाले, ‘‘काय रे, तू चांगल्या घरचा मुलगा आणि अशी नाटकं करतोस?’’ त्यांनी शिपायांना माझी झडती घ्यायला सांगितलं. त्यांना सुसाइड नोट सापडली. ती वाचून साहेब म्हणाले, ‘‘किती चांगला मुलगा आहेस तू! मेल्यानंतर डोळे, किडनी दान करायला निघाला आहेस; पण देवाने जे तुला दिलंय ते आधी तू स्वत:च नीट वापर की!’’ मग त्यांनी मला खूप वेळ समजावून सांगितलं. ते बोलतील त्याला मी निमूटपणे ‘हो’ म्हणत होतो. शेवटी ते भावाकडे पाहून म्हणाले, ‘‘याच्यावर आत्महत्येची केस दाखल केली तर याचं पुढे खूप नुकसान होईल. त्यामुळे मी त्याला फक्त ताकीद देऊन सोडतो. याला आधी एखाद्या दवाखान्यात न्या.’’ त्यांनी आम्हाला जायला सांगितलं. आम्ही दोघंही एकमेकांशी न बोलता निमूटपणे चालू लागलो. थोडा वेळ गेल्यावर भावाने विचारलं, ‘‘दवाखान्यात चलतोस का?’’ मी नकारार्थी मान हलवली. पोलीस स्टेशनपासून जरा दूर, सुरक्षित अंतरावर आल्यावर भावाला म्हणालो, ‘‘दवाखान्यात पसे खर्च करण्यापेक्षा मला दे पन्नास रुपये.’’ भाऊ लगेच म्हणाला, ‘‘परत जाऊ का मी पोलीस स्टेशनला?’’ मग मी चूप राहिलो. पण पसे कुठून मिळवायचे याचा किडा डोक्यात वळवळतच होता.