‘सत्यमेव जयते’ असे म्हटले जाते म्हणून ते लगेच खरे वगरे मानण्याचे कारण नसते. समजा ते खरे मानले, सत्याचाच विजय होतो, असे गृहीत धरले, तरी जे जिंकले ते सत्यच आहे, हे कशावरून? हे फारच तत्त्वज्ञानात्मक होत आहे. पण तरीही एकंदरच सत्य म्हणजे काय, याबाबतच एकवाक्यता नसते म्हटल्यावर त्याविषयी वेगवेगळे प्रश्न निर्माण होणारच. शिवाय सत्याबाबत बोलताना, ते तर जाणत्याचे मत असते असेही काही जण म्हणतात. याचा अर्थ सत्य हे व्यक्तिसापेक्षच. आकाशात सूर्य आहे. आता आपण वाचतो आहोत ते वृत्तपत्र आहे. किंबहुना वाचत आहोत ते आपणच आहोत, ही सगळी सत्ये व्यक्तिसापेक्षच. आकाशात सूर्य दिसतो तो सात मिनिटांपूर्वीचा. म्हणजे आपण सूर्य आहे असे म्हणतो, तेव्हा कदाचित मधल्या सात मिनिटांत त्याचा नाशही झालेला असू शकतो, अशी सर्व गंमत. शिवाय माणूस मायावादी असेल, तर त्याच्या दृष्टीने सर्व साच मिथ्याच की!
तर सर्व षड्यंत्र-सिद्धांतांच्या मुळाशी कुठेतरी हे असते. मायावाद वगरे नव्हे, तर सत्य म्हणून जे सांगितले जाते, त्याविषयीचा संशय. ते तथाकथित सत्य सांगणाऱ्यांविषयीचा संशय. पण हा संशय बिनहातापायाचा नसतो. तो पांगळा असून चालतच नाही. इतर सांगतात ते खोटे आणि मी सांगतो तेच खरे, हे पटवून द्यायचे असेल, तर त्यासाठी ठोस पुरावे द्यावे लागतात. पुन्हा ते पुरावे खरेच आहेत हे तर्काच्या कसोटीवर पटवून द्यावे लागते. अन्यथा षड्यंत्र-सिद्धांताचे सगळे मनोरे कोसळून पडतात आणि शिल्लक राहतो तो फक्त संशय. कोणत्याही मोठय़ा दुर्घटनेतील मृतांचे सरकारी आकडे सर्वसामान्य भारतीयांना नेहमीच खोटे वाटतात. त्या जातकुळीतला हा संशय असतो. त्याला षड्यंत्र-सिद्धांत म्हणता येणार नाही. या सिद्धांतासाठी पुरावे आवश्यकच असतात. समाजाने वा सरकारने सिद्ध केलेल्या सत्याला आव्हान देणे, त्यावरील फोलपणाचे पापुद्रे सोलून काढणे आणि ‘खरे’ काय ते लोकांसमोर मांडणे हे षड्यंत्र-सिद्धांताचे काम. आता हे सगळे समाज आणि सरकारी मान्यतेविरुद्धच असल्याने त्याला सामाजिक प्रतिष्ठा नसणारच. षड्यंत्र-सिद्धांतांची वासलात संशयात्म्यांची विलसिते म्हणून लावण्याकडे म्हणूनच साऱ्यांचा स्वाभाविक कल असतो. पण काही सिद्धांत असे असतात, की मूर्ख, अविश्वसनीय, अतिशयोक्त म्हणून ते टाळणे शक्यच नसते. उदाहरणार्थ, अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येचा षड्यंत्र-सिद्धांत.
केनेडी यांची हत्या नेमकी कोणी केली, याचा तपास लावण्यासाठी नेमण्यात आलेला वॉरेन आयोग काहीही सांगत असला, तरी अमेरिकेतील बहुसंख्य लोकांचा त्यावर विश्वास नाही. केनेडी यांच्या हत्येमागे सोव्हिएत रशिया, क्युबा, अमेरिकी माफिया येथपासून सीआयएपर्यंतच्या अनेकांचा हात असल्याचे सांगितले जाते. सरकारी सत्य काहीही असले, तरी केनेडी यांची हत्या ली हार्वे ओसवाल्ड याने एकटय़ानेच गोळ्या घालून केली, यावर अमेरिकेतील कोटय़वधी लोकांचा विश्वास नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचे कारस्थान हे एकटय़ा बतुल्ला मेहसूद या दहशतवाद्याचे आहे यावरही पाकिस्तानातील अनेकांचा विश्वास नाही. आमिर मीर हे पाकिस्तानातील एक प्रतिष्ठित शोधपत्रकार आहेत. सध्या ते लाहोरच्या ‘द न्यूज इंटरनॅशनल’चे वरिष्ठ संपादक आहेत. ‘हत्या बेनझीर भुत्तोंची – का आणि कशी?’ या आपल्या प्रस्तुत पुस्तकात (मूळ इंग्रजी – द भुत्तो मर्डर ट्रायल : फ्रॉम वझिरीस्तान टू जीएचक्यू) ते म्हणतात, ‘‘त्यांच्या (बेनझीर यांच्या) हत्येचा कट नक्की कुणी केला, हे पाकिस्तानी लोकांना कदाचित कधीच कळणार नाही; मात्र ज्यांच्यावर संशय घेता येईल अशा लोकांची वानवा नाही. अल्-कायदा व तालिबानशी संबंधित इस्लामी अतिरेकी, अत्यंत शक्तिशाली अशा पाकिस्तानी लष्करी गुप्तहेर संघटनेतले बदमाश किंवा त्यांच्या हत्येच्या वेळी राष्ट्राध्यक्ष असलेल्या जनरल परवेझ मुशर्रफसारख्या त्यांच्या राजकीय विरोधकांनी नेमलेले भाडोत्री मारेकरी.. कटकारस्थानाची निरनिराळी गृहितकं रोजच्या रोज अधिकाधिक गडद होत चालली आहेत.’’ या पुस्तकातून त्यांनी भुत्तो आणि केनेडी यांच्या हत्याप्रकरणांतील बरीचशी साम्यस्थळे दाखवून दिली आहेत. केनेडी हत्येबाबतच्या वॉरेन आयोगाच्या अहवालाप्रमाणेच बेनझीर यांच्या हत्येसंदर्भात मुशर्रफ राजवटीने काढलेल्या निष्कर्षांवर अनेकांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले आहे. केनेडी यांचा कथित मारेकरी ओसवाल्ड याने या हत्येशी आपला संबंध नसल्याचे म्हटले होते. त्याच्यावर कधीच खटला उभा राहू शकला नाही. कारण अटकेनंतर दोनच दिवसांनी त्याची एका नाइट क्लबच्या मालकाने हत्या केली. बेनझीर यांची हत्या आपण केली नसल्याचे बतुल्ला मेहसूदनेही म्हटले होते. या प्रकरणी त्याच्याविरुद्धही कधीच खटला भरण्यात आला नाही. बेनझीर हत्येनंतर २० महिन्यांत तो अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला.
केनेडी घराण्याप्रमाणेच भुत्तो घराण्याला हत्येचा ‘शाप’ होता. बेनझीर यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो यांना जनरल झिया उल हक यांनी फासावर चढवून मारले. बेनझीर यांचा एक भाऊ मीर शाहनवाज भुत्तो यांचा १९८५ मध्ये फ्रान्समध्ये संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय आहे. दुसरा भाऊ मीर मूर्तजा भुत्तो यांना १९९६ मध्ये कराचीत पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्या वेळी बेनझीर या पंतप्रधान होत्या. आणि २७ डिसेंबर २००७ रोजी बेनझीर यांची रावळिपडीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर अठ्ठेचाळीस तासांतच, तेहरीक-ए-तालिबानचा अमीर कमांडर बतुल्ला मेहसूद हा या हत्येमागचा सूत्रधार असल्याचे मुशर्रफ सरकारने जाहीर केले. पण आमिर मीर हे बतुल्लाला बेनझीर यांचा खुनी मानत नाहीत. मीर यांच्या षड्यंत्र-सिद्धांतानुसार मुशर्रफ हेच बेनझीर यांच्या हत्येचे सूत्रधार आहेत.
असा गंभीर निष्कर्ष काढायचा म्हणजे त्याचे पुरावे देणे आलेच. साक्षीदार उभे करणे आले. या पुराव्यांवर खटल्याची मांडणी करून निकालापर्यंत जाणे आले. मीर यांनी उत्तमरीत्या हे काम केलेले आहे. बेनझीर हत्येचा सूत्रधार कोण आहे हे त्यांना तसे आधीच माहीत होते. मृत्यूपूर्वी दोन आठवडे आधी खुद्द बेनझीर यांनीच त्यांना ते सांगितले होते. ‘‘माझी हत्या करण्यात आली, तर तुम्ही मुशर्रफ यांचं नाव मारेकरी म्हणून घेऊ शकता,’’ असे बेनझीर त्यांना म्हणाल्या होत्या. बेनझीर यांच्या हत्येचा याआधीही एक प्रयत्न झाला होता. २००७मध्ये त्या निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानात परतल्या. १८ ऑक्टोबरला कराचीत त्यांची स्वागतयात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेवर आत्मघातकी बॉम्बहल्ला करून बेनझीर यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या हल्ल्यामागे पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तहेर संघटनांमधले काही उच्चपदस्थ अधिकारी होते, अशी बेनझीर यांची खात्री होती. या हल्ल्यानंतर काही दिवसांनी बेनझीर यांनी त्यांचे अमेरिकेतील सल्लागार मार्क सिगेल यांना एक ई-मेल पाठवला होता. बेनझीर यांचा मृत्यू झाला, तरच त्यांनी तो उघडून वाचायचा असे ठरले होते. त्या ई-मेलमध्येही बेनझीर यांनी मुशर्रफ यांच्यावरच संशय व्यक्त केला होता.
बेनझीर यांच्या सांगण्यावरून कारस्थान नेमके कुणाचे हे समजले, परंतु ते सिद्ध कसे करणार? मुळात बेनझीर यांच्या हत्येचे कारण काय? ‘निवडणुकांमध्ये गरप्रकार करण्याची योजना’ या मथळ्याच्या प्रकरणात आपणांस ते कारण सापडते. गरप्रकार करून निवडणूक जिंकण्याची मुशर्रफ यांची योजना होती. त्यासाठी एक गट नेमण्यात आला होता. तो आयएसआयच्या इस्लामाबादेतील एका सेफहाऊसमधून काम करत होता. अमेरिकेने आयएसआयला दिलेले पसे या कामासाठी वापरण्यात येत होते. त्याचा गुप्त अहवाल बेनझीर यांनी तयार केला होता. तो त्या अमेरिकेला देणार होत्या. बेनझीर यांच्या हत्येच्या कारणांपकी हे एक कारण होते, असे मीर म्हणतात. मुशर्रफ यांना त्यांच्याबद्दल वाटत असलेले भय हेच खरे त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरले.
मीर यांनी हे सगळे धागेदोरे मोठय़ा कौशल्याने जुळवले आहेत. बेनझीर हत्येनंतर मुशर्रफ सरकारने केलेली लपवाछपवी, पुरावे नष्ट करण्याचे केलेले प्रयत्न, हत्येचा सूत्रधार म्हणून उभा केलेला बतुल्ला नावाचा बळीचा बकरा, बेनझीर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणूनबुजून केलेली हलगर्जी हे सर्व मीर यांनी येथे तपशीलवार मांडले आहे. जाता जाता त्यांनी मध्येच, ‘..पाकिस्तानी आणि अमेरिकी प्रशासनानं एकत्रितरीत्या कट करून बेनझीर यांची हत्या केली, असा अंदाज करणं खरोखरच चुकीचं ठरेल का?’ अशा प्रश्नाचे पिल्लूही सोडून दिले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध शोधपत्रकार सेम्यूर हर्श यांच्या एका मुलाखतीच्या आधारावर त्यांनी हा उपषड्यंत्रसिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो मात्र फसला आहे. ओसामा बिन लादेन मेला असल्याचा दावा २००७ मध्ये बेनझीर यांनी केला होता. पण ओसामा मेल्याचे जाहीर होणे बुश प्रशासनाला नको होते. म्हणून अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी यांच्या हुकूमावरून मारेकऱ्यांच्या एका विशेष पथकाने बेनझीर यांची हत्या केली, असा हर्श यांचा दावा होता. लादेनबाबतच्या नंतरच्या घटनाक्रमावरून मूळ दावाच फुसका ठरल्याने पुढची सगळीच इमारत कोसळते. अर्थात मीर यांनीही यावर जोर दिलेला नाही. त्यांचे लक्ष्य मुशर्रफ आहे.
गेल्याच महिन्यात मुशर्रफ यांच्याविरुद्ध पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने रावळिपडीतल्या दहशतवादविरोधी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. बेनझीर हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून त्यात त्यांचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे या आरोपपत्रात बेनझीर यांनी सिगेल यांना पाठविलेल्या ई-मेलचा, तसेच त्यांच्या स्वत:च्या निवेदनाचा समावेश आहे. मुशर्रफ यांच्यावरील हे आरोपपत्र हा मीर यांच्या षड्यंत्र-सिद्धांताचा जणू विजयच आहे. किंबहुना आता त्याला षड्यंत्र-सिद्धांत म्हणताच येणार नाही.
शोधपत्रकारितेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आता हा प्रवाही अनुवाद वाचावा लागेल. आंतरराष्ट्रीय राजकारणातील एका महत्त्वपूर्ण गूढाचा उलगडा करणारे पुस्तक म्हणून याचे महत्त्व आहेच. पण कोणतीही घटना जशी दिसते तशी ती असत नाही, याचा प्रत्यय देणारे षड्यंत्र-सिद्धांतपर पुस्तक म्हणूनही ते वाचणे आवश्यक आहे. दृष्टी बदलण्यास अशी पुस्तके चांगलीच मदत करतात.
‘हत्या बेनझीर भुत्तोंची – का आणि कशी?’ : आमिर मीर, अनु. मिलिंद कोकजे, सुजाता देशमुख,
मेनका प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २५४, मूल्य – ३९० रुपये.