चित्रकार नितीन दादरावाला यांचे ‘प्रतिमा-प्रचीती’ हे आगळेवेगळे पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रसिद्ध झाले आहे. यात त्यांनी जगभरात गाजलेल्या पंचवीस नामांकित छायाचित्रकारांची सविस्तर ओळख करून दिली आहे. सोबत त्यांची उत्कृष्टे छायाचित्रेही आहेत. या पुस्तकाला समीक्षक-कवी वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही संपादित अंश..
आमचे मित्र, चित्रकार आणि कवी नितीन दादरावाला यांच्या ‘प्रतिमा-प्रचीती’ या ग्रंथाचे वाचन हा एक विलक्षण वेगळा असा अनुभव आहे. या ग्रंथात विदेशातील पंचवीस छायाचित्रकारांचा परिचय करून देणारे लेख समाविष्ट केलेले आहेत. या छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा जो प्रत्यय दादरावाला यांना आला, तो या लेखांमध्ये त्यांनी शब्दबद्ध केला आहे. एक प्रकारे हे छायाचित्रांचे वाचन आहे. त्याचबरोबर त्या- त्या छायाचित्रकाराच्या एकंदर कामाचा परिचयही आहे. अशा प्रकारचा ग्रंथ यापूर्वी मराठीत प्रकाशित झालेला नाही असे म्हणावयास हरकत नाही.
छायाचित्रकला ही आधुनिक कला आहे. कॅमेरा या यंत्राच्या साहाय्याने या कलाकृती जन्माला येतात. कॅमेरा हे साधन आहे. छाया-प्रकाश हे माध्यम आहे. चित्र, शिल्प या दृश्यकलांप्रमाणे छायाचित्रातही एक क्षण, एक स्थिती गोठवलेली असते. तो विशिष्ट क्षण, ती स्थिती पकडणारा डोळा आणि हात कलावंताचा असतो. छायाचित्रकलेत दृश्य स्थिर करणारा क्षण अतिशय महत्त्वाचा असतो. एका क्षणानंतर दुसरा क्षण येतो. स्थिती बदलते, दुसरी स्थिती येते. तो विशिष्ट क्षण पुन्हा येत नसतो. या पुस्तकात समाविष्ट असलेल्या छायाचित्रकारांनी असे निसटणारे क्षण पकडले आहेत. एक प्रकारे त्यांनी क्षणात नाहीसे होणारे वास्तव धरून ठेवले आहे.
छायाचित्रांच्या संदर्भात वास्तवाभास की वस्तुस्थिती, असा वाद उत्पन्न केला जातो. इतर कोणत्याही कलाकृतीप्रमाणे छायाचित्र हीदेखील एक कलाकृती आहे असे मानले तर या वादाला अर्थ राहत नाही. छायाचित्रात वस्तुस्थिती असते आणि वास्तवाभासही असतो. छायाचित्राचा रूपबंध म्हणून विचार करता येतो आणि वास्तवाची अभिव्यक्ती म्हणूनही छायाचित्राकडे पाहता येते. छायाचित्र हेदेखील जग समजून घेण्याचे, जगाचा अर्थ लावण्याचे एक माध्यम आहे. ते सौंदर्याचा प्रत्यय घडवते, तसेच ते उग्र-प्रखर वास्तवाचा साक्षात्कारही घडवते. प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या आणि मनाच्या सुखात भर घालणारी प्रचीती ते देते आणि सामाजिक-राजकीय वर्तमानाचे समंजस भानही देते. नितीन दादरावाला यांनी ज्या पंचवीस छायाचित्रकारांच्या कामाचा परिचय येथे करून दिलेला आहे, त्या सर्वच छायाचित्रकारांच्या कलासृष्टीप्रमाणे त्यांच्या जीवनदृष्टीचाही परिचय करून दिला आहे. येथे दिलेल्या छायाचित्रांचा आपण स्वतंत्रपणे आस्वाद घेऊ शकतो, त्याचबरोबर मजकूर वाचत असताना आपण छायाचित्रकलेच्या इतिहासातूनही वावरत असतो. कलांचे इतिहास हे सांस्कृतिक इतिहास असतात आणि सांस्कृतिक इतिहासाचा राजकीय-सामाजिक-आर्थिक इतिहासाशी संबंध असतो. युरोप-अमेरिकेतील छायाचित्रकारांचा परिचय करून देत असताना दादरावाला यांनी इतिहासाचे भान ठेवलेले आहे, हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.
येथे पंचवीस छायाचित्रकारांच्या कामाचा आणि जीवनाचा वेध दादरावाला यांनी घेतलेला आहे. एकोणिसाव्या शतकात काही छायाचित्रकारांचा जन्म झालेला असला तरी बहुतेकांचे काम विसाव्या शतकामधलेच आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे विसाव्या शतकातील युरो-अमेरिकी छायाचित्रकलेचे प्रातिनिधिक दर्शन आहे असे म्हणता येईल. त्यातून युरो-अमेरिकी छायाचित्रकला कसकशी विकसित होत गेली हे कळते, त्याचबरोबर तेथील राजकीय-सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक पर्यावरणही समजते.
दादरावाला यांनी केलेले छायाचित्रांचे विवेचन नितांत वाचनीय तर आहेच; छायाचित्रे कशी पाहायची असतात, त्यांतले सौंदर्य कसे समजून घ्यायचे असते याचे भान देणारेही आहे. त्यांच्या कलाज्ञानाचा आणि सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय या पुस्तकाच्या पानापानांतून येत राहतो.
उदाहरणार्थ, मान रे या छायाचित्रकाराविषयी दादरावाला म्हणतात, ‘‘फोटोग्राफी या माध्यमाशी मान रे याने एक उदात्त खेळ केला आणि या खेळासाठी त्याने वापरलेलं तंत्र पक्कं घोटवलेलं होतं.’’ मान रे यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते याविषयी दादरावाला म्हणतात, ‘‘बुद्धिमान माणसाचं समाधान हे त्याच्या इच्छाशक्तीमध्ये आणि हटवादीपणात असतं हे विधान मान रेसाठी चपखलपणे बसतं.’’ मान रेच्या संदर्भात दादरावाला यांनी तत्कालीन अतिवास्तववादी चळवळीचा नेमक्या शब्दांत परिचय करून दिला आहे. ते म्हणतात, ‘‘असंज्ञ मनाच्या सर्जनशील ताकदीचा शोध लावून ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आणि तिला सन्मान देण्याचं काम या चळवळीने केलं.’’ मान रेचा या चळवळीशी संबंध होता. त्याने नेहमीच्या साध्या लोखंडी इस्त्रीला भयावह वस्तूचे रूप दिले. मॉडेलचे दोन डोळे, नाक आणि भोवती टप्पोरे अश्रू. दादरावाला यांनी भाष्य केलेले आहे : ‘‘दु:खसुद्धा एकदम टप्पोरं आणि विकायला मांडल्यासारखं.’’
भिन्न भिन्न छायाचित्रकारांचे जीवन, त्यांच्या काळातल्या कलाचळवळी, त्यांची छायाचित्रणकला या विविध अंगांचा, विविध संदर्भ देत, रसज्ञ परिचय दादरावाला यांनी घडवला आहे. त्यांच्या विवेचनातून त्या त्या छायाचित्रकाराचा काळ आणि त्यांच्या कामांचे स्वरूप आणि महत्त्व आपल्याला समजत जाते. पॉल स्ट्रँडविषयी लिहिताना दादरावाला सहजपणे, ‘‘सेझ्ॉनं, पिकासो, ब्रांकुसी यांसारखे चित्रकार/ शिल्पकार ज्याचं प्रतिनिधित्व करत होते असा चित्रकलेतील नवा संप्रदाय उदयास येत होता,’’ असे विधान करतात. चित्रकलेतील या नव्या संप्रदायाचा छायाचित्रकलेवर प्रभाव पडला.
पॉल स्ट्रँडने त्याच काळात छायाचित्रणाला सुरुवात केली होती. स्टीग्लिट्सशी परिचय झाल्यावर त्याच्या कामात बराच बदल झाला. या सगळ्या संदर्भातून वाचकांसमोर छायाचित्रकलेचा इतिहास साकार होत जातो.
पॉल स्ट्रँडचा डाव्या चळवळीशी संबंध आला. त्या चळवळीचाही त्याच्या कामावर प्रभाव पडला. ‘त्याने छायाचित्रणाकडे जीवनाविषयी थेट भाष्य करणारी कला म्हणून बघितलं,’ हे दादरावाला यांचे विधान यथार्थ आहे. पॉल स्ट्रँडच्या छायाचित्रांमध्ये शोषित, पीडित, स्थलांतरित, अभावग्रस्त लोकांची व्यक्तिचित्रे आहेत. त्याने निवडलेले विषय सामान्य असले तरी त्यातील असामान्यत्व सहजपणे प्रकट होताना दिसते.
अलेक्झांडर रोचेंको हा रशियन छायाचित्रकार होता. त्याच्या उमेदीच्या काळात रशियात समाजवादी वास्तववाद हा विचार रूढ झाला होता. आरंभी रोचेंकोवर या विचाराचा प्रभाव होता. परंतु कालांतराने तो या विचारापासून दूर जात आहे, त्याच्यावर ट्रॉटस्कीच्या विचाराचा प्रभाव आहे असा अपप्रचार त्याच्याबाबत होऊ लागला, त्याच्यावर रूपवादी असल्याचा आरोपही झाला. ‘सोव्हिएत सरकारच्या अपेक्षांचं ओझं वाहता वाहता रोचेंको कधी हरून गेला ते त्याचं त्यालाच कळलं नाही,’ असे दादरावाला यांनी म्हटले आहे. कलावंत आणि राजकीय सत्ता यांच्यातला संघर्ष आणखीही काही कलावंतांना भोगावा लागलेला आहे.
वॉकर एव्हन्झ आणि मार्गरेट बर्क-व्हाइट हे दोघेही सामाजिक बांधिलकी असलेले छायाचित्रकार होते. एव्हन्झ काळ्या अमेरिकन लोकांच्या भागात भटकला आणि त्याने रस्त्यावरच्या जगण्याची छायाचित्रे घेतली. अलाबामामधल्या जमीनदारांकडे काम करणाऱ्या कुटुंबांची छायाचित्रे हा सामाजिक दस्तावेज आहे, त्याचबरोबरच त्या कलाकृतीही आहेत. अमेरिकन शेतकऱ्यांचे वास्तव त्याने आपल्या छायाचित्रांमध्ये पकडले आहे. ‘संपूर्ण अमेरिकन संस्कृती नष्ट झाली आणि फक्त वॉकर एव्हन्झची छायाचित्रं मागे राहिली तरी त्या छायाचित्रांतून अमेरिकन जीवनासंबंधी अमूल्य अशी माहिती मिळू शकेल,’ असे एव्हन्झबद्दल म्हटले गेले आहे. एखाद्या कादंबरीकाराविषयी उच्चारले जावेत असे हे उद्गार आहेत. मार्गरेट बर्क-व्हाइटचा कॅमेरा जगातल्या वेगवेगळ्या भागांतल्या शोषितांकडे, पीडितांकडे वळला. दुसऱ्या महायुद्धात तिने जर्मनी, इटली, उत्तर आफ्रिका येथे काम केले. बुखेनवाल्ड या छळछावणीला तिने भेट दिली. कोरियातील युद्धाच्या काळातील छायाचित्रे तिने घेतली.
भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळातील फाळणीनंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या कथा तिच्या कॅमेऱ्याने जगभर पोहचवल्या. दादरावाला यांनी अतिशय सुंदर वाक्ये लिहिली आहेत. ते म्हणतात, ‘‘फाळणीत दोन्ही बाजूंनी मारल्या गेलेल्या लोकांसाठी कुठलेही स्मारक उभारले गेले नाही. मार्गरेट बर्क-व्हाइटची ही छायाचित्रं म्हणजे त्यांचं स्मारक आहे.’’
सर्जनशील छायाचित्रकार आंद्रिआ फेनींजर; सत्याची अभिव्यक्ती हीच शैली असलेला जॉर्ज रॉजर; माणसाचे मन, आत्मा, चैतन्य व्यक्त करणारी पोट्रेट्स काढणारा युसूफ कार्श; युद्धभूमीवर सहज वावरणारा आणि तेथेच देह ठेवणारा रॉबर्ट कापा; व्यावसायिक छायाचित्रकार असूनही कलात्मकतेचे भान ठेवणारा अर्विग पेन; भोवतीच्या अवकाशासह व्यक्तीचा वेध घेणारी पोट्रेट्स काढणारा अरनॉल्ड न्यूमन; ‘कॅमेरा सतत खोटं बोलत असतो’ असे म्हणणारा पण सत्याची प्रखर अभिव्यक्ती करणारा रिचर्ड अ‍ॅवडॉन; सर्वत्र माणसांचे चेहरे वाचत जाणारा रॉबर्ट फ्रँक अशा विविध प्रकृती असलेल्या छायाचित्रकारांच्या कामाचे सौंदर्य या पुस्तकात उलगडलेले आहे. लोकांच्या दु:खांचा, यातनांचा, त्यांच्या सोसण्याचा वेध घेणारा डॉन मॅक्लीन येथे आहे. जगभराच्या युद्धभूमीवर त्याने छायाचित्रण केले. युद्धाची भयानकता त्याने घेतलेल्या प्रतिमांमधून जाणवते. शोषणग्रस्त, दु:खी, अगतिक लोकांची छायाचित्रे सेबास्टिओ सालगाडो याने काढली. शोषित कामगार, युद्धामुळे उद्ध्वस्त झालेला समाज, औषधांविना मरून जाणारी मुले- सालगाडोच्या छायाचित्रांतून सतत अस्वस्थ, अशांत वर्तमान आपल्या अंगावर येत राहतो. दादरावाला यांनी म्हटले आहे, ‘‘सालगाडोचा कॅमेरा तीव्र मानवी दु:खाला, वेदनेला स्पर्श करताना सतत दिसतो. मायकेलेंजेलोच्या भित्तिचित्रांत दिसावा तसा त्याच्या छायाचित्रात मातीतून उगवलेला हात दिसतो, कुणापर्यंत तरी पोहचू पाहणारा.’’ निक यूट हाही आपल्याला अस्वस्थ करून टाकणारा छायाचित्रकार आहे. त्याचे व्हिएतनामच्या युद्धावर तीव्र भाष्य करणारे ‘नापाम गर्ल’ जगातील असंख्य लोकांनी पाहिले. याच छायाचित्रामुळे व्हिएतनामचे युद्ध आवरते घ्यावे असे अमेरिकेला वाटले. आधुनिकतेतून निर्माण झालेला आणि या आधुनिक जगात मानवाने केलेला पृथ्वीचा नाश एडवर्ड बर्टिन्स्कीच्या छायाचित्रांमधून दिसतो. या पुस्तकात दिलेले ‘टायरचा कचरा’, ‘वायर यार्ड’ ही छायाचित्रे बोलकी आहेत. बर्टन्स्किीने औद्योगिकीकरणातून होणारा निसर्गाचा संहार दाखवलेला आहे. केविन कार्टरच्या छायाचित्रांमध्ये अनेक पातळ्यांवर होत असलेल्या हिंसेचे दर्शन घडते. त्याने घेतलेली सुदानमधल्या कुपोषित बालकांची छायाचित्रे राजकारण, अर्थकारण, आधुनिक माणसाची संस्कृती यांवर आसूड ओढणारी आहेत. हळूहळू खुरडत जाणारी, हाड-कातडे एकत्र झालेली, त्राण संपत चाललेली मुलगी आणि तिच्या मागे उतरलेले गिधाड यांचे केविन कार्टरने घेतलेले छायाचित्र जगभर गाजले.
त्याच्यावर जहरी टीकाही झाली. त्याने केवळ दुष्काळग्रस्त जिवाचे चित्रण केले नाही, तर दुष्काळामागचे धूसर राजकारणही दाखवले. आपल्या अवतीभवतीचे भीषण वास्तव पकडणारे छायाचित्रकार आहेत तसेच छायाचित्रांमध्ये सूक्ष्म सौंदर्य पकडणारे मिचेल विसिलीसारखेही आहेत. त्याचे चेहरा धूसर, अस्पष्ट होत गेलेले पोट्रेट छायाचित्रणकलेतील प्रयोगाचा निर्देश करणारे आहे, त्याचबरोबर व्यक्तीला येत चाललेली व्यक्तित्वहीनता दाखवणारेही आहे.
एकूणच या पुस्तकातून आपले विचार, भावना व्यक्त करण्याचे, इतिहास नोंदण्याचे, अवतीभवतीचे वास्तव उघड करण्याचे छायाचित्र हे किती प्रभावी माध्यम आहे याची जाणीव होते. या पुस्तकाच्या रूपाने नितीन दादरावाला यांनी मराठी कलाविचाराच्या संदर्भात महत्त्वाचे काम केले आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी