प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

वास्तविक शिक्षण हा अतिशय गंभीर विषय आणि म्हणूनच तो हलक्याफुलक्या, आकर्षक, अनोख्या पद्धतीने शिकवायला हवा अशी अपेक्षा! पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. खरं म्हणजे शिकणारा आणि शिकवणारा या दोघांपुरताच असणारा हा विषय प्रत्यक्षात इतका विस्तारलेला आहे की त्यात शिक्षणसंस्था, शिक्षणसम्राट, शिक्षणमंत्री आणि त्यांचे विनोदी आदेश, प्रवेश परीक्षा, भरमसाट फी, पाठय़पुस्तकांचा तुटवडा, धडय़ातल्या चुका, वादग्रस्त उल्लेख, शिक्षकांचे संप, त्यांची अनुपस्थिती, पात्रता, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, विद्यार्थ्यांना मारहाण, मास कॉपी, प्रचंड मार्क्‍स, खिचडीमध्ये भेसळ  इत्यादी, इत्यादी शेकडो विषय ‘शिक्षणा’च्या अनुषंगाने येतात. साहजिकच अत्यंत गंभीर असणारा हा विषय अनेकदा हमखास विनोदाचा किंवा व्यंगचित्राचा विषय होऊन बसतो.

जॉनी हॉकिन्स हा अमेरिकन तरुण व्यंगचित्रकार आहे. आजवर जवळपास ६०० नियतकालिकांतून त्याची चाळीस हजार व्यंगचित्रं प्रकाशित झाली आहेत. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे तो वर्षभराची टेबल कॅलेंडर्स तयार करतो. रोज एका तारखेला एक व्यंगचित्र असं त्याचं स्वरूप असतं. या कार्टून कॅलेंडरचे विषय असतात कुत्रा, मांजर, फिशिंग, डॉक्टर्स, बागकाम वगैरे वगैरे. अशी जवळपास पन्नास  वेगवेगळ्या विषयांवरची त्याची कार्टून कॅलेंडर्स जगभर प्रसिद्ध आहेत. ‘धर्म’ या विषयावरसुद्धा त्याने असंख्य कार्टून्स काढली असून ती चर्चच्या विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाली आहेत. त्याचंच ‘टीचर’ या नावाचं एक कार्टून कॅलेंडर आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण या विषयांभोवती फिरणारी व्यंगचित्रं त्यात आहेत. त्यातली सोबतची दोन उल्लेखनीय उदाहरणं.

बऱ्याच कॉलेजमध्ये बिचाऱ्या बेडकाचा जीव घेऊनच जीवशास्त्र हा विषय शिकवला जातो. त्याचबरोबर राजकन्येच्या चुंबनाने शापित बेडकाचे रूपांतर पुन्हा देखण्या राजपुत्रात होतं- ही परिकथाही आपल्याला माहिती असते. जॉनीने या दोन स्वतंत्र गोष्टी एकत्र आणून एक बहारदार व्यंगचित्र तयार केलं आहे.

दुसरं व्यंगचित्र हे भेदक आहे. आपल्या लहानग्या बाळाला जगातले सर्व विषय अगदी लहानपणीच आले पाहिजेत असं अनेक पालकांना वाटत असतं. त्यासाठी व्यंगचित्रकाराने दुधाच्या बाटलीचा उपयोग करून जबरदस्त भाष्य केलं आहे.

जगविख्यात ‘मॅड’ मासिकाने अनेक विषयांची व्यंगचित्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे खिल्ली उडविली आहे. अर्थात शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही. चित्रकार बॉब क्लार्क आणि लेखक स्टॅन हार्ट या जोडगोळीने अनेक मालिका साकारल्या. त्यांची शिक्षकांवरची मालिका ही अशीच टिपिकल मॅड ह्य़ुमर  दाखवणारी, चिरफाड करून सत्य सांगणारी आहे. त्याची ही काही उदाहरणे..

‘शिक्षणातून शारीरिक शिक्षा हद्दपार केली हे चूक की बरोबर?’ असा प्रश्न एका कॉलेजमधील शिक्षकाला विचारला जातोय. त्यावर हा शिक्षक म्हणतोय, ‘अगदी योग्य निर्णय आहे हा. कारण हा कायदा झाल्यापासून विद्यार्थ्यांनी मला एकदाही मारहाण केलेली नाही!’

शिक्षकांना आणखी सुट्टय़ा हव्यात म्हणून ते आंदोलन करताहेत असं हे सोबतचं चित्र आहे. त्यावर  न्यायमूर्ती म्हणताहेत की, ‘तुम्हाला तर भरपूर  सुट्टय़ा असतात. आणि तुमच्यापेक्षा समाजामध्ये एकच वर्ग असा आहे की त्याला तुमच्यापेक्षा जास्त फ्री टाइम आहे! तो वर्ग म्हणजे बेरोजगार लोक!’

वास्तविक हल्ली शिक्षण हा इतका महत्त्वाचा विषय झालाय की वेगवेगळ्या रूपाने तो वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जवळपास रोज असतोच. साहजिकच त्यावर असंख्य कार्टून्स मी काढली आहेत. त्याची ही काही मासलेवाईक उदाहरणे..

शिक्षणापेक्षा मार्क महत्त्वाचे ठरल्यामुळे संपूर्ण समाजाच्या होकायंत्राची दिशाच बदलली आणि तो भलतीकडेच जाऊ लागला. मार्काना आलेलं हे प्रचंड महत्त्व अक्षरश: जीवघेणं ठरू लागलं. म्हणूनच एका व्यंगचित्रात दहावीतला एक मुलगा म्हणतो, ‘‘मला साडेनव्याण्णव टक्के  मार्कस् मिळालेत. पण आई म्हणाली की, कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरच पेढे वाट!’’

याला वास्तविक नव्या प्रकारचा ‘मार्क्‍सवाद’ म्हणता येईल. कारण इथे प्रत्येक मार्कासाठी वादावादी, रेटारेटी, दमछाक, झोंबाझोंबी केलेली असते. हा प्रकार अगदी बालवाडीपासून सुरू असतो. यावरच्या व्यंगचित्रात इतिहासाच्या वर्गात जेव्हा शिक्षक विचारतात की, ‘सांगा मार्क्‍सचा जन्म कुठे झाला?’ तेव्हा विद्यार्थी स्वाभाविकपणे  उत्तर देतात, ‘ज्युनिअर केजीत!’

एका व्यंगचित्रात विद्यार्थ्यांसमोरच्या अनेक समस्या एकवटल्या होत्या. चार-पाच मित्रांपैकी एक जण म्हणतो, ‘या बिचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. एकाचा रिझल्ट लागायचा आहे,  दुसऱ्याची परीक्षा व्हायची आहे, तर तिसऱ्याची अ‍ॅडमिशन व्हायची आहे. त्यांच्यापेक्षा मी सुदैवी आहे. कारण गेली तीन र्वष मी सुशिक्षित बेकार आहे.’

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी ग्रामीण किंवा निमशहरी भागांत कॉपीचा महापूर येतो. बऱ्याच ठिकाणी तर रिझल्ट चांगला लागावा म्हणून शिक्षकच कॉपी पुरवतात अशा बातम्या येतात. त्यावरच्या व्यंगचित्रात आई मुलाला खडसावते की, ‘तरी सांगत होते कॉपी करू नको. शिक्षकांनी पुरवलेल्या कॉपीतील सगळी उत्तरं चुकीची होती ना?’

शाळांची प्रचंड फी हा नेहमी वादाचा विषय असतो. विशेषत: खासगी शाळांसाठी! त्यावरून पालक आंदोलन वगैरे  करतात आणि थोडीफार फी कमी होते. यावर काढलेल्या व्यंगचित्रात फी कमी झाल्यामुळे आनंदित झालेली आई म्हणते, ‘बरं झालं.. आता आपण मुलाला एखाद्या महागडय़ा क्लासला घालू शकू!’

हा ‘क्लास’ नावाचा जो प्रकार आहे तो आपल्या समाजामध्ये आता पुरेपूर मुरला आहे. विशेषत: मिडल क्लास लोक आपल्या मुलाला हायक्लास शिक्षण मिळावं म्हणून क्लासला घालतात! यातूनच ‘यश’ क्लासेस आणि ‘विद्या’ क्लासेस यांच्यामधला असमान संघर्ष दाखवणारं सोबतचं चित्र सुचलं. (दोन्ही नावं अर्थात प्रातिनिधिक आणि काल्पनिक!) थोडं बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की, विद्या क्लासेसच्या खिडक्या उघडय़ा आहेत. कारण तिथे प्रश्न-उत्तरांची देवाणघेवाण आहे. तिथे पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत आणि फी माफक आहे. याउलट, यश क्लासेस वातानुकूलित आहे. वर झटकन् पोहोचण्यासाठी लिफ्ट आहे आणि फी प्रचंड आहे. अर्थात जास्त फी म्हणजे यशाची गॅरेंटी हे सूत्र समाजमान्य आहेच. म्हणूनच आपल्या मुलाने ज्ञानी व्हावं यापेक्षा त्याने कोणत्याही प्रकारे यशस्वी व्हावं असं वाटणाऱ्या पालकांच्या मुलांची गर्दी तिथे जास्त आहे.