माहिती आणि नभोवाणी खात्याचे सचिव जमाल किडवाई यांनी माझी तात्पुरती बदली ‘बालचित्र समिती’मध्ये प्रमुख प्रोडय़ुसर (प्रोडय़ुसर इन-चार्ज) म्हणून केली. म्हणजे दूरदर्शनने मला काही काळापुरते समितीला ‘उधार’ दिले. या नेमणुकीमागचे रहस्य मला नंतर कळले. अहमदाबादला प्रो. यशपाल यांच्या नेतृत्वाखाली इंडियन स्पेस रिसर्च सेंटरचे (इस्रो) काम जोरात सुरू होते. प्रा. यशपालांनी किडवाईंजवळ माझ्यासाठी ‘मागणी’ घातली होती. ती इस्रोची नोकरी माझ्या चालू ‘ग्रेड बी’च्या नोकरीपेक्षा सरस होती. वेतनही अधिक होते. पण हे प्रकरण माझ्यापर्यंत आलेच नाही. किडवाईंनी सौजन्यपूर्वक या प्रस्तावाला परस्पर नकार दिला आणि भरपाई म्हणून की काय, मला ही नवी मानाची नोकरी देऊ केली.
पुन्हा एकवार मुलांच्या मनोरंजनाचे काम करायला मिळणार म्हणून मी सुखावले. वैयक्तिक पातळीवर मात्र आम्हाला खूप तडजोडी कराव्या लागल्या. बालचित्र समितीचा संसार मुंबईला असल्यामुळे मी मुंबईला, अरुण त्याच्या नोकरीनिमित्त दिल्लीला आणि विनी-गौतम दोघे पुण्याला त्यांच्या आज्यांकडे सुपूर्द.. अशी आमची पांगापांग झाली.
इथे एक छोटेसे निवेदन करणे मला आवश्यक वाटते. ‘सय’मध्ये चालू असलेल्या माझ्या लेखमालेच्या प्रतिक्रियेत एका स्नेह्य़ाने तक्रार केलीय, की मी काय, कधी, केव्हा घडले, याचा तपशील तारीखवार देत नाही. तसे केले तर वाचकांना संदर्भ लावायला सुकर होईल. मला हा मुद्दा तद्दन पटतो. पण माझी एक छोटी नव्हे, मोठी अडचण आहे. तारखा, आकडे, वार माझ्या अजिबात लक्षात राहत नाहीत. थोडक्यात म्हणजे काळ- काम-वेगाचे माझे गणित (गणितज्ञ रँग्लर परांजपे यांची नात असूनही!) अगदी कच्चे आहे. नेमके वर्ष आठवू लागले की कलानिर्मितीचा झरा आटतो.. लेखणी अडखळते. कुणी विचारले की, ‘तू किती साली फ्रान्सला गेलीस?’ किंवा ‘‘स्पर्श’ चित्रपट कुठल्या वर्षी बनवलास?’ तर मी क्षणभर कोरी होते. मग बोटे मोडून आणि स्मरणशक्तीला कोलांटय़ा उडय़ा मारायला लावून अखेर उत्तर सापडतंही. नाही असं नाही. पण नेमकेपणाच्या या कालनिर्णयापायी वेळ आणि श्रम यांची निष्कारण पदरमोड होते. तेव्हा सहसा मी आकडेवारी, तारीख, टिप्पणी यांना डावलून मार्ग आक्रमते. तरी वाचकांनी समजून घ्यावे, ही विनंती. मला घटना, प्रसंग आणि व्यक्ती अतिशय ठळकपणे आठवतात, हेही नसे थोडके!
चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचे मुख्य बस्तान दादरच्या जुन्या, प्रसिद्ध श्री साऊंड स्टुडिओमध्ये होते. दोन-तीन खोल्या (त्यात माझी एक) आणि एक गोडाऊन होते. शिवाय वरळीच्या अ‍ॅनी बेझंट रोडवर एका इमारतीत आणखी एक ऑफिस होते. मी लहान असताना अच्युतमामाबरोबर (सिनेदिग्दर्शक अच्युत रानडे) श्री साऊंडला एका स्टुडिओत शूटिंग पाहायला आल्याचे मला आठवले. त्याच स्टुडिओत आता आमच्या बालचित्रपटांचे डबिंग चालत होते. उत्तमोत्तम परदेशी चित्रपट प्राप्त करून घेऊन त्यांचे ‘हिंदीकरण’ करून मुलांना दाखवणे, हा समितीचा मुख्य कार्यक्रम होता. पण गंमत अशी, की खुद्द बालचित्र समितीच्या पदरी आठ-दहा सिनेतंत्रज्ञ आणि कर्मचारी पगारी नोकरीवर होते. त्यांना काहीही काम नव्हते. रोज ऑफिसमध्ये हजेरी लावायची, दिवसभर बसून राहायचे आणि महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार घ्यायचा. बस्स! बऱ्याच दिवसांपासून त्यांना कामावरून काढून टाकण्याची चर्चा मिनिस्ट्रीत चालू होती. पण सरकारी रूढीला अनुसरून चर्चाच चालू राहिली. मला या प्रकाराचे फार वैषम्य वाटले. हाताशी हक्काचे, अनुभवी युनिट सज्ज असताना केवळ परकीय चित्रपट विकत घ्यायचे; ते का म्हणून? माझ्यामधली दिग्दर्शिका जागी झाली. काही ठोस करून दाखविण्याची वेळ येऊन ठेपली होती.
मी एक प्रस्ताव मांडला. पदरी असलेल्या सिने-कर्मचाऱ्यांना घेऊन स्वत:च एक ‘इन् हाऊस’ चित्रपट बनवायचा. मिनिस्ट्रीने प्रस्ताव आनंदाने मान्य केला. पण खरा हर्ष कुणाला झाला असेल, तर तो रिकामपणाला कंटाळलेल्या युनिटला. सिनेमा करायचे ठरले तेव्हा त्यांच्या अंगात जणू वारे संचारले. ‘जादूचा शंख’ या माझ्या बालनाटिकेवर आधारून मी पटकथा लिहिली. प्रत्यक्ष सिनेमा दिग्दर्शित करण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. फिल्म इन्स्टिटय़ूटच्या लायब्ररीत मी दिग्दर्शनाचे तंत्र कोळून प्यायले होते. दिग्गज डायरेक्टर्सच्या चित्रपटांचा (ते अनेकदा पाहून) शॉटवजा अभ्यास केला होता. आणि दूरदर्शनमध्ये कितीतरी छोटे-मोठे कार्यक्रमही तयार केले होते. पण चित्रपट दिग्दर्शित करायचा, हे एक वेगळेच आव्हान होते. A totally different ball game. तर ते शिवधनुष्य पेलायचं मी ठरवलं. युनिटमध्ये प्रकाश मल्होत्रा हे कॅमेरामन, आर. डी. पाटील ध्वनितंत्रज्ञ आणि राजेश अगरवाल हे एडिटर होते. आपापल्या क्षेत्रात तिघे अनुभवी होते. त्या तिघांनी मला सांभाळून घेतले. मीही त्यांच्या सल्ल्याचा मान राखला. ‘मला सगळं येतं’ असा आव कधी आणला नाही. ‘जादू का शंख’ हा खरोखरच एक ‘सहकारी’ प्रयत्न ठरला. वरील तिघांव्यतिरिक्त एक व्यवस्थापक, एक कपडेपट सांभाळणारा आणि बाकीचे लाइटबॉइज होते.
सिनेमाची कथा अगदी साधी, बाळबोध होती. सोनी आणि श्यामू हे दोघे गरीब बहीण-भाऊ. दारी आलेल्या साधूला ते आपल्या वाटची भाकरी देतात. तो त्यांना एक शंख देतो. तो जादूचा असतो. त्याच्या मदतीने मुले देशाच्या राजावर येणारे संकट टाळतात. या छोटय़ाशा सिनेमाला मोठे कलाकार लाभले. राजा- गिरीश कर्नाड, लुच्चा प्रधान- पं. सत्यदेव दुबे, चांगला प्रधान- कुलभूषण खरबंदा, लबाड दासी- तरला मेहता, सावकार- अरुण जोगळेकर, सावकाराची बायको- पर्ल पदमसी. छोटय़ा सोनीसाठी नंदिता अरसची निवड केली. तिला पुढे मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भूमिकेसाठी बक्षीस मिळाले. श्यामूसाठी योग्य मुलगा काही मिळेना. जोरात शोध चालू होता. एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते. तिला माझी निकड सांगितल्यावर मीरा म्हणाली, ‘राहुलला बघ गं काही जमतंय का?’ तिचा आठ वर्षांचा राहुल जवळच खेळत होता. त्याला विचारताच तो टुण्कन् उडी मारून उठला आणि आम्हाला त्याने झकास ‘वन् बॉय शो’ करून दाखवला. अगदी ‘पुरे’ म्हणेपर्यंत. तिथल्या तिथे त्याची निवड मी पक्की केली. राहुलने ‘श्यामू’ उत्तम उभा केला. मात्र, शॉट्सच्या मधे एकसारखे रटाळ विनोद ऐकवून वैताग आणायचा. राहुल आता मराठी सिने- नाटक- टेलिव्हिजनवर संगीत दिग्दर्शक म्हणून आब राखून आहे. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसले होते, हे खरे.
मॉस्को चित्रपट सोहळ्यात ‘जादूचा शंख’ वाखाणला गेला खरा; पण मला वाटतं, ते उपचार म्हणून असावं. प्रांजळपणाने पाह्य़चं म्हटलं, तर सिनेमा ‘ठीक’च झाला होता. ‘पहिला प्रयत्न’ असल्याचं जागोजाग जाणवत होतं. बालप्रेक्षक फारसे चोखंदळ नसल्यामुळे ते मात्र सोनी-श्यामूच्या गोष्टीवर खूश होते. एक गमतीची आठवण सांगते. सिनेमाचा शेवट- राजा दोघा भावंडांना आपल्या हत्तीवरून थाटामाटाने राजवाडय़ात घेऊन जातो, असा होता. या प्रसंगाचे चित्रण शूटिंगच्या अखेरच्या दिवशी झाले. पुण्याला गावाबाहेर असलेल्या एका मोकळ्या, ओसाड मैदानात. सजवलेल्या हत्तीवर राजा, सोनी आणि श्यामू आरूढ झाले. आपल्या लेकीला हत्तीवर बसलेली पाह्य़ला नंदिताची आई खास मुंबईहून आली होती. राहुलला बघायला मीरा तर होतीच; पण गिरीश कर्नाडच्या आईदेखील मुद्दाम हजर होत्या.. राजाच्या वेशातल्या आपल्या मुलाला हत्तीवर स्वार झालेले पाहायला! त्या तीन भारावलेल्या आयांचे दर्शन मोठे विलोभनीय होते.
जमाल किडवाईंनी कौतुकाने या चित्रपटाचा खेळ दिल्लीला निमंत्रितांसाठी केला. महादेव रोडवर माहिती आणि नभोवाणी खात्याचे एक लहानसे थिएटर आहे. तिथे हा खेळ आयोजित झाला. या खेळाला त्यांचे स्नेही रोमेश आणि रोमिला थापर मुद्दाम आले होते. सिनेमा पाहून दोघांनी फार प्रतिकूल अभिप्राय दिला. ‘या काळातही तुम्ही अजून मुलांना जादूटोणा आणि चमत्कार यांतून बाहेर काढीत नाही. जादूचा शंख मिळवा म्हणजे काम फत्ते होईल, हेच कायम मुलांना शिकवणार का?,’ असे तिखट उद्गार त्यांनी काढले. मला तेव्हा फार राग आला. मुलांना अद्भुताच्या दुनियेपासून दूर ठेवले गेले असते तर आपण इसापनीती, अरेबियन नाइट्स, ग्रिम्स आणि अँडरसनच्या परीकथा, सिंड्रेला, स्नोव्हाइट, पीटर पॅन, वॉल्ट डिस्नेची तमाम कार्टून्स, विंदांचा एटू लोकांचा देश.. आणि अगदी आपले महाभारतसुद्धा- या सगळ्या महान कथा/ कलाकृतींना आपण मुकलो असतो, असा मी आवेशपूर्ण युक्तिवाद केला. पण आज मागे वळून पाहताना त्यांच्या अभिप्रायामध्ये तथ्य होते, हे जाणवते. कोवळ्या वयात सतत अद्भुततेचा खुराक देऊन, पर्यायाने आपण मुलांना अंधश्रद्धेचा पहिला पाठ तर देत नाही ना, असा विचार आता मनात डोकावू लागला आहे. त्यानंतरच्या माझ्या बालचित्रपटांच्या वेळेला मी चमत्कार, छूमंतर आणि गौडबंगाल यांपासून कटाक्षाने दूर राहिले. ‘चिरायू’ (गुजरात भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर) ‘भागो भूत’ (अंधश्रद्धाविरोधात) आणि ‘चकाचक’ (पर्यावरण बचाव) ही त्याची उदाहरणे सांगता येतील.
चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचे नित्याचे काम चालूच होते. वेगवेगळे परदेशी चित्रपट पाहणे, त्यातून आपल्याला आवश्यक असलेल्या चित्रपटांची निवड करणे, करार करून ते ठराविक मुदतीच्या बोलीवर मिळवणे आणि मग हिंदीमध्ये ते ‘डब्’ करणे, हे आता साचेबद्ध झाले होते. प्रीती गांगुली ही आमची ‘स्टार डबर’ होती. तऱ्हेतऱ्हेचे संवाद अदा करण्याची तिची ढब लाजवाब होती. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जपान आणि चेकॉस्लोव्हाकियाहून खास कार्टून फिल्मस् आम्ही नियमित घेत असू. हे सिनेमे मुलांना खूप आवडत. परंतु भारतीय तोंडवळा असलेले चित्रपट त्यांना अधिक जवळचे वाटत यात शंका नाही. ‘जादू का शंख’ला शाळांकडून चांगली मागणी असल्यामुळे मी दुसऱ्या सिनेमाची तयारी करायला उद्युक्त झाले. त्याकाळी दिल्लीला सप्रू हाऊसमध्ये आणि मुंबईला रमाबाई हॉलमध्ये दर रविवारी सकाळी मुलांसाठी बालचित्रपटांचे खेळ होत असत. बालप्रेक्षकांची त्याला तुंबळ गर्दी उसळत असे.
‘सिकंदर’ हा माझा दुसरा बालचित्रपट. सीताराम, कुंदन, दर्शन आणि रमोला या चार जिगरी दोस्तांची ही कथा होती. ही मुले समाजाच्या अगदी वेगवेगळ्या स्तरांमधली दाखवली होती. वर्गभेदाला मुलं किती सहजपणाने छेद देतात, हे जाता जाता दाखविण्याचा तो एक प्रयत्न होता. मकसूद खान, सुधीर काटे आणि विनी व गौतम ही घरची मुले यांची चौघा मुलांसाठी निवड केली. पालकांच्या भूमिका सुनीला प्रधान, विनोद दोशी, ज्योत्स्ना कार्येकर, विश्वास मेहंदळे, मालती बापट आणि मनोरमा वागळे यांनी सांभाळल्या. मुलांचा हितचिंतक युसूफ अंडीवाला कुलभूषण खरबंदाने साकार केला. अद्याप त्याचे नाव झाले नव्हते. या छोटय़ा चौकडीला रस्त्यात एक छानसे कुत्र्याचे बेवारशी पिल्लू सापडते. ते कुणी पाळायचे, यावर आधी त्यांच्यात बाचाबाची होते. पण सगळ्याच पालकांकडून वेगवेगळ्या कारणास्तव कडवा विरोध झाल्यावर मुले हवालदिल होतात. मग त्यांच्या मदतीला युसूफ अंडीवाला धावून येतो. सगळे लहान-मोठे कलाकार तर ठरले; आता एक गोंडस कुत्र्याचे पिल्लू हवे होते. युनिटमधल्या बऱ्याचजणांनी उत्साहाने पिल्ले आणली. श्री साऊंड स्टुडिओमध्ये श्वान उमेदवारांची रीतसर ‘ऑडिशन’ झाली आणि काळ्या ठिपक्यांचे एक गोजिरवाणे पिल्लू आम्ही निवडले. चित्रपटाचे शूटिंग पुण्याला झाले. युसूफ अंडीवाला आपल्या सायकलवर चारही मुलांना (त्यांच्या पिल्लासकट) बसवून चालला आहे. सगळे गाणे म्हणताहेत..
‘एक मुछंदर, चार बिलंदर,
हम सबका सरदार सिकंदर
सिकंदर सिकंदर सिंकदऽऽर’
हेलकावणारी सायकल पिटाळत, डुगडुगणारी बच्चा पार्टी सांभाळत वर गाणे म्हणायचे, हे मोठे अवघड काम होते. पण ते मजेत पार पडले.
एका प्रसंगासाठी आम्हाला ओसाड, निर्मनुष्य अशी जागा हवी होती. ‘फग्र्युसन टेकडीवर जा..’ कुणीतरी सुचवले, ‘एकही माणूस दिसणार नाही.’
मग कॅमेराचे धूड, ध्वनिपेटारा, रिफ्लेक्टर, इ. बोजड सामान घेऊन ‘हाफ्..हुफ्’ करीत आम्ही भल्या पहाटे टेकडीवर पोहोचलो. पाहतो तो काय? टेकडी माणसांनी फुलली होती. अगदी जत्रा भरावी तशी. आम्ही चक्रावून गेलो. गर्दी एका बाजूला हटवण्यात मोलाचा दीड तास वाया गेला. कोवळे ऊन हुकले. नंतर कळलं की, आमच्या छोटय़ा मकसूदमियॉंची ही करणी होती. टेकडीच्या पायथ्याशीच वडारवाडी होती. तिथे मकसूदचे कुटुंब एका खोलीत राहत असे. त्याने तमाम वडारवाडीला ‘उद्या माझे शूटिंग बघायला या..’ असे आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्याबरहुकूम अख्खी वडारवाडी लोटली होती.
हिंदी सिनेसृष्टीमधले तेव्हाचे पहिल्या क्रमांकाचे खलनायक शेट्टी यांनी ‘सिकंदर’मध्ये काम केले. एक छदामही न घेता. त्यांना खतरनाक गुंड समजून चारी मुले बेदम चोपून काढतात, असा प्रसंग होता. त्या मारामारीची ‘कोरिऑग्राफी’ खुद्द शेट्टींनीच केली होती. काम संपल्यावर निरोप घेताना ते म्हणाले, ‘मला आता घरी माझ्या मुलांना तोंड दाखवायची सोय राहिली नाही. आधीच मी रोज धर्मेद्रकडून मार खातो म्हणून ती नाराज आहेत. आता तर या चिमुरडय़ांनी मला धुतलं. बोला, मी काय करू?’
‘सिकंदर’चे काम चालू असताना मधेच गौतमला कावीळ झाली आणि शूटिंग बरेच दिवस स्थगित करावे लागले. पुन्हा जेव्हा सगळे नवी सुरुवात करण्यासाठी जमले तेव्हा लक्षात आलं की, खुद्द सिकंदर आता गोंडस पिल्लू राहिलेला नाही. तो उंचापुरा जवान झाला आहे. आली पंचाईत! पुन्हा शोध सुरू झाला. पण त्याच आकाराचा, तसेच ठिपके असलेला नवा ‘कलाकार’ मिळेना. शेवटी चेहरामोहरा आणि उंची जुळणारा, पण पांढऱ्या रंगाचा एक पिल्ला सापडला. त्यालाच मग तांबूस ठिपक्यांचा सुरेख मेकअप् केला आणि कॅमेरापुढे आणून आम्ही कशीबशी वेळ निभावून नेली.
‘सिकंदर’ पूर्ण झाला आणि मला तो समाधानकारक वाटला. अरुणने तो पाहिला तेव्हा मी त्याला विचारले, ‘काय रे, आता हा अगदीच ‘पहिला प्रयत्न’ वाटत नाही ना?’
‘छे छे! अरुण म्हणाला, ‘आता हा निश्चित ‘दुसरा प्रयत्न’ वाटतो.’
स्वत:चे लेबल असलेले धडाधड दोन सिनेमे पूर्ण केल्यामुळे बालचित्र समितीत प्रसन्न वातावरण होते. पण ते फार वेळ टिकले नाही. काळे ढग जमू लागले. प्रॉडक्शन स्टाफ बडतर्फ करण्याबद्दलच्या अफवांनी पुन्हा एकवार उचल खाल्ली. या खेपेला त्यांनी रूद्र रूप धारण केले होते. लवकरच या प्रस्तावावर ठराव करण्यासाठी कार्यकारिणीची बैठक भरली. तिच्यात किडवाई, शांता गिडवाणी (समिती सेक्रेटरी), गिरीश कर्नाड, कामिनी कौशल, इ. मंडळी होती. मला वगळून सर्वच्या सर्व स्टाफ बडतर्फ करण्याच्या मताचे ते होते. केवढा हा दैवदुर्विलास! हे आठ-नऊजण जेव्हा रिकामी बसून होते तेव्हा मजेत पगार घेत होते. पण झटून कामाला लागून आपल्या अस्तित्वाचे समर्थन करण्याचा जेव्हा त्यांनी निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्यावर नोकरी गमावण्याची पाळी आली. हे गैर, क्रूर आणि अन्यायकारक असल्याचे मी जीव तोडून सांगितले. पण ते अरण्यरुदन ठरले! स्टाफ निलंबित करण्याचा ठराव मंजूर झाला.
त्याच दिवशी दुपारी मी आपल्या पदाचा राजीनामा दिला. किडवाईंनी माझे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. ‘तू बाहेरचे तंत्रज्ञ घेऊन सिनेमे बनवू शकतेस. निवड करायला अवघी सिने-इंडस्ट्री पडली आहे,’ ते म्हणाले. पण मी माझ्या निश्चयापासून ढळले नाही. स्वत:ची खुर्ची राखून मला माझ्या टीमशी प्रतारणा करायची नव्हती.
मुंबईची औट घटकेची राजवट संपवून मी परत स्वगृही- म्हणजे दिल्ली दूरदर्शनला माघारी आले.
 

gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा