News Flash

वाचवू माती, पाणी, हवा… बहुगुणाजींचा ठेवा!

मात्र, तरीही भारतीय शासक, राजकीय नेते आणि समाजधुरीण मोठ्या धरणांबाबत पुर्निवचार करण्यास तयार नाहीत.

|| मेधा पाटकर

सुंदरलाल या पृथ्वीवरचे एक सुंदर लाल- म्हणजे पुत्र होते. तेही बहुआयामी आणि गुणांनी समृद्ध! आयुष्याची ९० वर्षे खडतर संघर्षमय जीवन व्यतित केल्यानंतर ते सामाजिक पटावरूनही अदृश्य झाल्यागत राहिले. मात्र, वयाच्या ९४ व्या वर्षी ते हे जग सोडून गेल्याने पुन्हा एकदा ‘बहुगुणी’ विचारधारा अनेकांच्या लेख-संवादातून पुढे आणली जात आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना शासकीय श्रद्धांजली वाहिलीच; परंतु राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांचे ‘चिपको आंदोलन’ आणि पर्यावरण संरक्षणासाठी झटणे हे अनेक युवा संघटना व संस्थांना प्रेरणादायी ठरते आहे.

‘मिट्टी, जल और बयार। जीवन के तीन आधार॥’ ही नुसती घोषणा नव्हती, तर तो संदेश होता; जो माती, पाणी, हवा वाचविणाऱ्या बहुगुणांच्या मुखातून उमटला होता. आज तो प्राणवायूविना प्राण गमावणाऱ्या देशवासीयांच्या मनात घुमतो आहे. यावेळीच तर सुंदरलालजी हवे होते… झाडा-जंगलांतून मिळणाऱ्या श्वासाची महत्ता पुन्हा नव्याने जगापुढे मांडण्यासाठी! त्यांचेही करोनाच्या आघाताने जाणे हा एक विरोधाभासच नव्हे का? अनेक संत-तत्त्वज्ञांचे बोल आणि त्याचे मोल त्यांच्या मृत्यूनंतरच जगाला पटते… विचार करायला लावते. बहुगुणाजींच्या बाबतीतही हे खरे ठरू शकते! उत्तराखंडसारख्या अनेक नैसर्गिक आघात सोसणाऱ्या राज्यापासून, गंगेच्या खोऱ्यापासूनच याची सुरुवात झालेली असली तरी पुन्हा एकदा केवळ पर्यावरणच नाही, तर जग वाचविण्यासाठी संपूर्ण जनजागरण साध्य होईल असा विश्वास आपण बाळगू या का?

बहुगुणाजींचा आयुष्यपट हा गांधीवादाच्या कॅनव्हासवर साकारलेला होता. त्यांनी जातिनिर्मूलनासाठी केलेली पदयात्रा त्यांचे व्यापक विचार आणि कृती दर्शविते. गांधींच्या विचारांना भूदान-ग्रामदान यांसारख्या कार्यप्रणालीतून दृश्यरूप देणाऱ्या विनोबांच्या आवाहनापोटी ते पहाडी क्षेत्रात कार्यरत झाले, ते अखेरच्या क्षणापर्यंत! गांधींनाच मानणाऱ्या त्यांच्या सहचारिणी विमलाबहेनजींच्या अटीनुसार, राजकारण वगळून समाजकारणच स्वीकारून ते विवाहबद्ध झाले. या जोडप्याने एकमेकांचे प्रेरणास्राोत बनूनच कार्य केले, हे सुंदरलालजीच सांगत असत. हिमालयातून उगम पावणाऱ्या अलकनंदा, भागीरथी, मंदाकिनी यांसारख्या गंगेच्या उपनद्यांचे जाळेच नव्हे, तर पहाड, पर्वत, जंगल आणि वाहून, धुपून जाणारी जमीनही पिढ्यान् पिढ्यांसाठी वाचावी, सर्वांना ती जीवनदात्री ठरावी, या विचाराने ते झपाटलेले होते. अत्यंत मृदु भाषेत, परंतु कणखर भूमिकेद्वारे त्यांनी व्यक्त केलेले विचार हे पर्यावरणीय चौकटीत, परंतु जीवनरक्षेच्या कोंदणात बसवलेल्या हिऱ्यांसारखे चमकत राहिले आहेत ते आजवर! त्यांचा प्रकाश नाकारणाऱ्या शासनकर्त्यांनी मात्र कोट्यवधी जनांच्या आयुष्यात अंधार दाटणारा मार्गच स्वीकारला!

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या छोट्या उत्तराखंडपासून नव्हे, तर उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्यातून बहुगुणाजींनी आपल्या कार्यास सुरुवात केली असली तरी पहाडी, कष्टाळू आणि निसर्गप्रेमी जनतेवरच त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांची दीर्घ पदयात्रांतून सामील झालेल्या युवकांतूनच आशिष कोठारींसारखे पर्यावरणवादी निर्माण झाले. बिष्णोई समाजातील अमृतादेवींच्या नेतृत्वाखाली झाडे वाचविण्यासाठी जीव गमावणाऱ्यांची प्रेरणा बहुगुणाजींनी ‘चिपको आंदोलना’च्या रूपाने पुढे नेली… जी आजही रस्ते, महामार्ग वा मोठ्या धरणांसाठी झाडा-जंगलांचा विनाश करणाऱ्यांविरुद्ध आंदोलनकत्र्यांना लढण्याचे बळ देते. बिरसा मुंडाचा भूअधिकाराचा लढा असो की स्वामी सहजानंद सरस्वतींचा समाजवादी शेतकरी संघर्ष असो, अथवा चिपको आंदोलन असो… ही आंदोलनांची मांदियाळीच परिवर्तनाचा विचार मांडत इतिहास रचते!

बहुगुणाजींनी टिहरी धरणाला संपूर्ण विरोध दर्शवला तेव्हा विकासविरोधाचे दूषण त्यांनाही लावले गेले, जसे नर्मदा आंदोलनाला! मात्र, त्यांनी आजच्या उत्तराखंडला आणि देशालाही अशा विनाशकारी धरणांमुळे होणाऱ्या  नुकसानीबाबत इशारा दिला आणि अखेरपर्यंत आपली भूमिका तडजोड न करता कायम ठेवली. आज अमेरिकेनेही टेनेसी खोरे योजनेची दिशा उलथून एक हजाराहून अधिक धरणे ध्वस्त केली आणि त्यांच्यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या नद्यांचे रक्षण करण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र, तरीही भारतीय शासक, राजकीय नेते आणि समाजधुरीण मोठ्या धरणांबाबत पुर्निवचार करण्यास तयार नाहीत. म्हणूनच तर बहुगुणांच्या सत्याग्रही चिकाटीसह आजही एकेका नदीखोऱ्यात लढा दिल्याशिवाय तिथले जीवन वाचवणे अशक्य होते. टिहरीच्या विस्थापितांचे पुनर्वसन आजही अपूर्ण आहे. आणि नर्मदा आंदोलनाच्या ३५ वर्षांच्या काळात हजारोंना जमीन, घरासाठी भूखंड इत्यादी लाभले तरी अखेरच्या वंचितासाठी संघर्ष आवश्यकच आहे.

टिहरी धरणाविरुद्धच्या संघर्षात बहुगुणाजींनी भांडवलशहा, ठेकेदार तसेच ‘शासकीय’ म्हणविणाऱ्या जनविरोधी संस्था अशा साऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यासाठी दोनदा दीर्घ उपोषणे झाली, ती आम्हा सर्वांनाच भलेबुरे शिकवत! मला आठवते की, उपोषणापूर्वीच्या बैठकीत विस्थापितच नव्हे, तर संघर्ष-निर्माणात सामील पहाडी कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधींना त्यावेळी मोठा धक्का दिला तो बहुगुणाजींनीच… अचानक उपोषण- तेही अनिश्चितकालीन- घोषित करून! नर्मदा आंदोलनातील छोटे तात्कालिक उपवास (जेलमधले वा रस्त्यावरचेही) सोडले तर एकेका दीर्घ उपवासावर उतरताना आणि सोडतानाही घमासान चर्चाच काय, वादविवादही व्हायचे. मात्र, सर्वांच्या निर्णयातच उपवासकत्र्यांचा निर्णय (त्यांचा विशेष अधिकार मंजूर करूनही) सामावला जायचा. त्या दिवशी काहीशा भडकलेल्या कार्यकत्र्यांना काळजी होती ती बहुगुणांच्या वयाची- आरोग्याची! आणि सुंदरलालजींना चिंता होती- राक्षसी धरणापासून पहाडपट्टी वाचवण्याची! गांधीजींनाही असे व्यक्तिवादी नव्हे, व्यक्तिगत निर्णय कधी कधी घ्यावे लागले होते, हे त्यांना समजावताना माझ्याही नाकी नऊ आल्याचे आठवते.

बहुगुणाजींच्या ५६ दिवसांच्या त्या उपोषणानंतर टिहरीचा संघर्ष चिपको आंदोलनाप्रमाणे जगभर दुमदुमला! जे. पी. असोसिएट्ससारख्या महाकाय धरणांतूनच कमावणाऱ्या ठेकेदाराला साथसंगत होती ती टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची! त्यामुळेच बहुगुणाजींना अ‍ॅड. सकलानी, डाव्या विचारांचे नौटियालजी, जगदंबाप्रसाद रतुडीजी, विजय जरधारीजी अशा अनेकांच्या सहयोगाने त्यांना टक्कर द्यावी लागली होती. या संघर्षात जमिनी लढतीत कारस्थानी अपघातात बहुगुणाजींच्या धरणस्थळीच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या १६ जणांचा मृत्यूही सोसावा लागला. शासनाने समर्थन न दिल्यामुळे कोर्टाच्या दारातही उभे राहावे लागले. बहुगुणाजींना निसर्गाची चाड आणि वैज्ञानिक तसेच संविधानात्मक भान असलेल्या एन. डी. जयाल, तरुण गांधीवादी विमलभाई आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील संजय पारेखजींची साथ लाभली. या प्रदीर्घ कायदेशीर लढाईतही न्यायाधीशांमध्ये मतभेद होऊन पर्यावरणीय व भूकंपशास्त्रीय मुद्दे ‘तांत्रिक’ म्हणून नाकारणारा कोर्टाचा निर्णय कारण ठरला बहुगुणाजींच्या दुसऱ्या उपोषणाला!

या ७५ दिवस (ग्लासभर बेल रस घेऊन) चाललेल्या उपोषणादरम्यान अनेक गोष्टी घडल्या. बहुगुणाजींनी सिलियाराचा आश्रम सोडून धरणस्थळी तळ ठोकला तो कायमचाच! त्यांना कुणी भेटू नये आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना थकवावे, ही शासनाची नेहमीची वृत्ती दिसली तेव्हा मी थोडा वेष बदलून, डोक्यावर पदर घेऊन विमलभाईंसह रात्री दिल्ली-हरिद्वार बसमध्ये चढले. एका पत्रकाराला सोबत घेतले. तरीही मधेच बस थांबवून पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. कशीबशी खरडलेली चिठ्ठी एका प्रवाशामार्फत टिहरीला पोहोचली. म्हणूनच कोर्टात आम्हाला उभे करताच पूर्ण बार असोसिएशनच्या वकिलांनी सोबत उभे ठाकून आम्हाला साथ दिली. कोर्टाने बिनशर्त सुटका केल्यावरही कोर्टाच्याच आवारात पुन्हा विनाआधार अटक करून पोलीस वाहनातून आम्हाला फिरवत असताना ‘ठीक आहे, आता बहुगुणाजींसह इथेच तळ ठोकू. उत्तराखंडाचे पाहून घेऊ…’ अशी धमकी दिल्यावरच दिल्लीला आणून सोडले. बहुगुणाजींना आंदोलनकत्र्यांचाच नव्हे, तर विद्यार्थी, युवा, पर्यावरणवादी जनसंघटनांचा, वंदना शिवांसारख्या विचारवंतांचा पाठिंबा मिळाला तरीही केंद्र सरकार झुकले नाही ते नाहीच!

यानिमित्ताने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भेटलोे तेव्हा संवेदनशील मानल्या जाणाऱ्या त्यांनीही नुसतेच ऐकून घेतले. मात्र अनेक मान्यवरांच्या दबावाने अखेरीस धरणाचे काम थांबवले गेले आणि त्यांचे सरकार कोसळले! आज अनेक वीज प्रकल्प, चारधामसारखे महामार्ग या देवभूमी मानलेल्या क्षेत्राला धक्के देत आहेत. भूकंप, भूस्खलन, पूर आणि नदीघाटीतील आजीविकेवरील संकट सोसत उत्तराखंडमधील जनता जगते आहे. अशा प्रकल्पांविरुद्ध जेव्हा ती आवाज उठवते तेव्हा त्यांची लोकशाहीतील भूमिकाच नाकारत, निसर्गाचे योगदान न मानता शासन भांडवलदार धनदांडग्यांनाच साथ देते. टिहरीसंबंधी चाललेला कोर्टातील लढा जिंकला नाही तरी न्यायपालिकेचा, हरित प्राधिकरणाचा दरवाजा ठोठावत संघटित शक्ती आणि वकिली युक्तीनेच नव्हे, तर घटनात्मक अधिकाराच्या आधारेही जिंकत आहेत. नर्मदा आंदोलनाच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवणारे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अर्थशास्त्री भरत झुनझुनवालाही आता समजून उमजून या प्रकल्पांना विरोध करत गंगा वाचवू पाहताहेत. जी. डी. अग्रवालांसारखा संतत्व जपणारा वैज्ञानिक त्यांचे चार साथी याचसाठी हौतात्म्य पत्करूनही आज लढत आहेत. बहुगुणाजींच्या विकासाच्या निरंतर आणि न्याय्य भूमिकेला शासनाचा सहयोग मिळाला असता तर पर्यावरण मंत्रालय स्थापनेसाठी सफल प्रयत्न करणाऱ्या बहुगुणाजींचा हिमालयातील पहाडी पट्टाच काय, आज प्रेते वाहून नेणाऱ्या, प्रदूषित झालेल्या गंगेचा जीवही वाचला असता.

आपल्या व्यापक विचारापोटीच नर्मदा खोऱ्यातील लढतीला सतत साथ-समर्थन दिलेल्या पर्यावरणवाद्यांपैकी एक होते बहुगुणाजी! त्यांच्या नजरेत हा संघर्ष येताच ते स्वत: भेटायला आले. ‘नर्मदा घाटी में घूम रही है लडकी’ असे वयोवृद्ध वडिलकीच्या भूमिकेतून लेखात मांडत त्यांनी आंदोलनाच्या प्रसिद्धीविन्मुख काळात अनेकांना आमची ओळख करून दिली. अनेक कार्यक्रमांत सामील होत त्यांचा विशेष सहभाग लाभला तो बाबा आमटेंसह पंतप्रधानांसमोर १५०० आदिवासी, शेतकरी, स्त्री-पुरुषांच्या धरणे कार्यक्रमात! व्ही. पी. सिंगांच्या संवादशीलतेमुळे सर्वांना त्यांच्या निवासस्थानी घेऊन जात असताना केरळच्या सुगथा कुमारींबरोबरच बहुगुणाजीही त्यात सामील झाले होते. त्यावेळी एक दीर्घ आणि सखोल संवाद झाला. निर्णय होता सरदार सरोवराच्या पुनर्विचाराचा! मात्र, माधव चितळेजींनी ती प्रक्रिया पुढे जाऊ न देता पुस्तिका छापून एकतर्फी उत्तरे दिली, याचे कारण होते- व्ही. पी. सिंग सरकारचे कोसळणे! आज सरदार सरोवराचे पितळ उघडे पडले आहे, त्याला जबाबदार कुणाकुणाला धरावे आणि कसे?

या गंभीर प्रश्नाबाबत राष्ट्रीय जनशक्तीने आवाज उठवला तो ‘हरसूद’ मध्ये- १९८९ साली. हरसूद या ७०० वर्षे जुन्या शहरास ध्वस्त करून चुकलेल्या नर्मदासागर धरणाबाबतच नव्हे, तर ‘विकास’ हा ‘जनविकास’ व्हावा, निसर्ग आणि मानवाला जपूनच संसाधनांचा वापर व्हावा आणि पिढ्यान् पिढ्यांचा ठेवा  एकाच पिढीने विनाशकारी तंत्रज्ञानाने संपुष्टात न आणावा, यासाठी! ‘विकास चाहिये, विनाश नहीं!’ ही घोषणा देताना त्या ३५००० च्या मेळाव्यातील मंचावर बहुगुणाजींबरोबरच ठाकुरदासजी बंग, सिद्धराज ढढ्ढा होते, तसेच स्वामी अग्निवेशही. शबाना आझमी, शिवराम कारंथही! बाबा आमटेंनी नर्मदा खोऱ्यात त्याचवेळी प्रथम पाऊल टाकले आणि आमच्यासह दहा वर्षे ते राहिले. आपल्या सतत हसतमुख चेहऱ्याने नर्मदाघाटीच नव्हे, तर देशाचे निसर्गधन जपण्याचे बहुगुणाजींचे त्यावेळचे आवाहन आंदोलनाला आत्मविश्वास देऊन गेले होते. तेही दिवस गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुगुणाजींना आणि आंदोलनालाही पर्यायी नोबेल पुरस्कृत केले गेले तरीही मुलभूत प्रश्नांची गुंतागुंत सुटली नाहीच, हेही खरे!

आज चारधामसारख्या प्रकल्पाबाबत रवि चोपडांसारख्या जनवैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमूनही त्यांचा अहवाल डावलत अशा योजना पुढे रेटणाऱ्या शासनकत्र्यांना बहुगुणाजींचा गुणगौरव कोण ऐकवणार आणि कशासाठी? महाराष्ट्रातला नाणार प्रकल्प असो किंवा समुद्र बुजवून पुतळा किंवा महामार्ग उभारण्याचा निर्णय असो; लाभ-हानीचा विचार कितपत होतो? शेतकऱ्यांच्या जीवावर आणि आजीविकेवर उठलेल्या मोठ्या उद्योगपतींनाच लुटू देणाऱ्या कायद्यांना थोपवताना लोकशाहीचा आधार कोण घेतो? माती, धरती आणि शेतीवरील आक्रमण थोपवणाऱ्या शहिदांना नमन न करणारा सत्ताधीश कसा तगतो? सत्याचा म्हणजे विज्ञानाचाच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवाघाताचा विचार कोण करतो? बहुगुणाजींनाही भोगावा लागला तो ‘करोना’ व्हायरस जैविक नव्हे, अजैविकतेतून निर्माण झालेले हत्यार ठरतो! तेव्हा आता तरी पर्यावरणाचे आपल्या जीवनातले स्थान समजावून देणाऱ्या बहुगुणाजींनी मागे ठेवलेल्या प्रेरणा, सत्याग्रही संघर्ष-निर्माण आणि स्वावलंबनाचा समन्वय आपण स्वीकारावा हाच मार्ग उरतो! शासनकर्ते झुकले नाही तरी जनता राजकारणाला पर्यावरणाशी जोडून आवाज उठवेल आणि जनविरोधकांना, निसर्ग-विनाशकांना झुकवेल तेव्हाच बहुगुणाजींना ती खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

medha.narmada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:03 am

Web Title: chipko movement nationally and internationally strive for environmental protection akp 94
Next Stories
1 मोकळे आकाश… : ब्रोकन क्रेयॉन
2 थांग वर्तनाचा! : मैत्र जीवांचे!
3 चवीचवीने… : भुकाळी, फँड्री, पंदी, पोर्क…
Just Now!
X