News Flash

प्रयोगमुक्त आशयाचे नवे सर्जन

प्रयोगमुक्त आशयाचे नवे सर्जनजी. के. ऐनापुरे‘सो लेदाद’ (१९७५), ‘आतंक’ (१९९९) या कथासंग्रहांनंतर ‘चिरंतनाचा गंध’ हा विलास सारंग यांचा प्रसिद्ध झालेला तिसरा कथासंग्रह.

| June 28, 2015 12:25 pm

प्रयोगमुक्त आशयाचे नवे सर्जनजी. के. ऐनापुरे‘सो लेदाद’ (१९७५), ‘आतंक’ (१९९९) या कथासंग्रहांनंतर ‘चिरंतनाचा गंध’ हा विलास सारंग यांचा प्रसिद्ध झालेला तिसरा कथासंग्रह. या सगळ्या कथासंग्रहांत मिळून सारंगांच्या नावावर फक्त ४१ कथा आहेत. सारंगांनी कथा-कविता या दोन्ही वाङ्मयप्रकारांना (मराठी साहित्य-संस्कृतीत) चिकटलेल्या ‘मागणी तसा पुरवठा’ अशा सराईत आणि फालतू व्यवहाराला सफाईदारपणे फाटा दिला आहे. लेखक म्हणून मान्यता मिळविण्याच्या लढाईत ‘संस्कृती’ म्हणून रूढ झालेल्या गोष्टी वजा करणे, हा मोठाच धोका असतो. आपल्या बेलाक्वा (सॅम्युअल बेकेटचा नायक) वृत्तीनुसार त्यांनी हा धोका पत्करलेला आहे.

अगोदरच्या कथासंग्रहांपेक्षा सारंग यांचा ‘चिरंतनाचा गंध’ हा संग्रह वेगळा आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे या संग्रहातील सर्व कथा भरगच्च आशय सांगण्याच्या दृष्टीने रचल्याचा निष्कर्ष सहजच काढता येतो. सारंगांच्या नावाचा उच्चार केल्यानंतर त्याला लागूनच येणाऱ्या ‘प्रयोग’, ‘प्रयोगशीलता’ या शब्दांच्या lr04शक्यता जवळजवळ नसल्यासारख्याच येथे जाणवतात. त्या अर्थाने या कथा प्रयोगमुक्त अशा आहेत. या संग्रहातील कथेच्या अवकाशातील आशयात सारंग नव्या सर्जनाच्या दिशेने जाणीवपूर्वक सरकताना दिसतात. हे सर्जन नेमका, टोकदार आशय, आपल्या साहित्यामागची सुटलेली, न समजलेली भूमिका सांगण्यासाठी उपयोगात आणलेले आहे. हा नवा प्रकार कथा वाचणाऱ्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करीत नाही. या विवेचनाच्या दृष्टीने या कथासंग्रहातील आशयसूत्रे पाहता येतील. ही आशयसूत्रे अगोदरच्या कथासंग्रहांतील ‘वैश्विक  वाचकांसाठीची’ अशा अर्थाची असली, तरीही या आशयसूत्रांना सारंग जी ‘आतली बाजू’ (भारतीय) देतात ती अगदी थेट, स्पष्ट भूमिकेजवळ जाणारी अशी आहे.
पुरामुळे हतबल झालेल्या आणि सर्व काही गमावलेल्या जयंतीला बघून मुलगी- बाप, स्त्री-पुरुष, दलाल अशा भावनिक ताणतणावाच्या पुरात सापडलेला फोरास रोडचा दलाल, वयाचा मोठा फरक विसरून स्त्री-पुरुष या एकमेव नात्यापर्यंत सवयीनुसार येणारा परेश (पूर), डोक्यात स्वर्गाची कल्पना बाळगून असलेल्या छोटय़ा रुमीला वेश्याव्यवसायासाठी पटेलला विकून तोच स्वर्ग आहे हे पटवून देणारे आई-वडील (हरवलेला दुवा), सरसा या वय झालेल्या वेश्येची आपल्यावर बेकारी कोसळणार या जाणिवेने सुरू झालेली मानसिक घालमेल, या बिकट परिस्थितीत तिला पेन्शनची आयडिया सांगून, नायपॉलसारख्या नोबेल प्राइज जिंकणाऱ्या लेखकाने वेश्यांचे आभार मानून आपल्या सर्जनशील कामात कशी सुखसेवा दिली, या बाजूने वेश्यांचे महत्त्व अधोरेखित करून सरसाला मानसिक आधार देणारा पत्रकार पाध्ये.. याच्याबरोबर पुरुष वेश्या म्हणून काम करणारा, एड्सचा शाप मिरवणारा बबलू.. अशा विचित्र अनुभवजन्य त्रिकोणात फिरणारी ही कथा राजकुमार बबलू आणि फ्रॉक घातलेली छोटी सरसा अशा हिंदी सिनेमास्टाईल स्वप्नावर येऊन वर्तमानातील वास्तव रूप गडद करते (पिंजऱ्यातील बायका), बोंबिल आणि बॅरल (शार्क- देवमासा) यांच्यातील अलौकिक प्रेमसंबंध सांगत असताना देवमाशाच्या संघर्षांची आणि बोंबिलाच्या चिवटपणाची तुलना शेवटाला साहित्य व्यवहाराकडे सरकते. (बॅरल आणि बोंबिल : एक प्रेमकथा), मागासवर्गीय गायकवाड या तरुणाचा गल्फमध्ये रेबीजने झालेला मृत्यू (परदेशातील मृत्यू), जातीव्यवस्थेचा तुलनात्मक शोध- बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाच्या पाश्र्वभूमीवर (मडकं आणि सावली), महाभारतातील कथेचं पुनर्निवेदन एकलव्य कांबळेनं निर्माण केलेल्या एकलव्याच्या साह्याने, अधिक सांस्कृतिक व्यवहारातून आलेला वर्चस्वाचा मुद्दा (एकलव्य), ब्रह्मदेवाची विश्वनिर्मितीची संकल्पना आणि रूद्राचा प्रस्थापित होण्यासाठीचा संघर्ष (ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक),  वच्छा दरोडेखोरांचा वाघिणीबरोबरचा संभोग, त्याचं भिक्षू धर्मपाल होऊन बौद्ध धर्माचा प्रसार करणं; भाषिक राजकारणाकडे अगदी सूचक पद्धतीने सरकणारी आणि तीन नव्या जातककथांचा उगम सांगणारी बुद्धनिर्वाणानंतरची गोष्ट (एक प्रक्षिप्त जातककथा), इ.
‘चिरंतनाचा गंध’ ही स्त्रीशोषणाचे धार्मिक रूप समोर आणणारी एक अप्रतिम कथा. नेपाळमधून आलेल्या आणि कामाठीपुऱ्यातल्या दलदलीत अडकलेल्या चंपा या मुलीची ही कथा फॅण्टसी, वर्तमानकालीन वास्तव सांगत धर्मशास्त्राच्या खोटेपणावर नेमकेपणानं बोट ठेवते. अंगावर असंख्य योन्या बाळगणारी चंपा इंद्राबरोबर रत होऊन आपल्या स्त्रीशक्तीचा सन्मान सिद्ध करते. तरीपण तिच्या डोक्यात धर्मशास्त्रातून आलेली भीती आहेच. तिचा उपभोग घेणारा इंद्र तिला म्हणतो, ‘शेवटी तू एक बाई आहेस आणि एक मर्त्य प्राणी.’ (पृ. ८५) चंपाच्या या नव्या रूपाने उद्भवणाऱ्या शारीरिक समस्या आहेतच. आणि या समस्यांमुळेच कामाठीपुऱ्यात तिचं दैवतीकरण होतं. सारंग या कथेच्या निमित्ताने सामाजिक स्थितीचा अर्थशास्त्रीय परिणाम तर सांगतातच; पण मार्केटिंग स्ट्रॅटेजी, त्यातील निर्थकताही ठळक करतात. ‘नारी-सिंह’ ही कथा ‘नर-सिंह’ या कथेला उलटय़ा बाजूने बघणारी आहे. भक्त प्रल्हादाच्या कथेत नरसिंहाचा जन्म ज्या पद्धतीनं होतो त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीने विनायक-विचित्रा या जोडप्याच्या पोटी नारी-सिंह येतो- असे साचेबद्ध विधान सारंग आपल्या कथेत पूर्णपणे पुसून टाकतात. या कथेत ‘जेनेटिक इंजिनीअरिंग’ ही सूक्ष्मजीवशास्त्रीय कल्पना मध्यवर्ती बनते; जिला भविष्यकाळात प्रसूतिशास्त्रामध्ये अधिक महत्त्व येण्याची शक्यता आहे. यानुसार नारी-सिंह ही विनायकच्या पोटी जन्म घेते. (याचा एक अर्थ विनायक म्हणजे गणपती- असाही काढला जाईल.) विचित्राच्या पोटात वाढणारा गर्भ आपल्याला नवरात्रातल्या दांडिया खेळण्याचा आनंद घेता यावा म्हणून ती विनायकच्या पोटात काही काळापुरता ठेवून देते. नर-सिंहाच्या या पुराणकथेला विज्ञानाचा आधार देऊन सारंग नवा अर्थ प्रस्तुत करतात; जो स्त्रीच्या धार्मिक शोषणाला थेटपणे विरोध करणारा तर आहेच, पण स्त्री-स्वातंत्र्याची कल्पना, तिचे महत्त्व सांगणाराही आहे. या दोन्ही कथा स्त्रीवादी भूमिकेचे एकमेकाच्या विरोधात जाणारे दोन वेगळे अर्थ समोर ठेवतात. त्यातला दुसरा अर्थ (नारी-सिंह) फुलेप्रणीत स्त्रीवादाच्या जवळ जाणारा आहे.
‘पूर’, ‘हरवलेला दुवा’, ‘पिंजऱ्यातल्या बायका’, ‘चिरंतनाचा गंध’, ‘नारी-सिंह’ या कथा स्त्री-शोषणाच्या केंद्राभोवती फिरताना दिसतात.. तरीही त्यातल्या छटा अगदी सूक्ष्म सामाजिक-आर्थिक-धार्मिक (सांस्कृतिक) स्थित्यंतरांचा प्रवास उलगडून दाखविणाऱ्या आहेत. या कथांमध्ये येणारे चिंतनसुद्धा अधिक विचारवर्धक आहे. ‘मानवजात जिवंत राहण्यासाठी थोडा वेळ पुरुषांची गरज असते म्हणून का आपण स्त्रीवर सर्व जबाबदारी टाकून द्यायची!’ (नारी-सिंह/ पृ. ९५) नारी-सिंहाच्या मृत्यूनंतर तिच्या स्मृती लोकांच्या मनातून पुसून टाकण्याची मोहीम ज्या पद्धतीने सुरू करण्यात आली त्या संदर्भात निवेदक सांगतो..
‘बुद्धासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या लोकांच्या बाबतीत असे प्रयत्न झाले होते. आणि स्त्री-सिंहाच्या बाबतीत ते खूपच यशस्वी झालेत. कारणे उघडच आहेत. सामान्य राक्षसाचे तुकडे करणारा पूर्वीच्या काळचा नरसिंह अजूनही स्मरणात आहे, गौरवला जातो; पण अद्वितीय अशी स्त्री-सिंह मानसिक दबावाच्या कप्प्यात घुसडली गेली. कदाचित केव्हातरी अबोध मनाच्या विसर पडलेल्या खोल भागातून ती उदयास येईल आणि तिच्या गंभीर गर्जनेने जमीन हादरेल. आणि त्या गर्जनेमुळे त्यावेळच्या गर्भवती स्त्रियांचे गर्भ आपोआपच गळून पडतील आणि अर्धेउर्धे जग पुरुषहीन होईल.’ (नारी-सिंह/ पृ. ९६)
तर ‘परदेशातील मृत्यू’ या कथेत मागासवर्गीय गायकवाड या तरुणाचा मृत्यू (रेबीजने) गल्फमध्ये झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील तुच्छतापूर्ण प्रतिक्रिया- ‘हा बॅकवर्ड क्लासचा माणूस भारतात कुठल्यातरी गलिच्छ वस्तीत राहणारा असेल आणि तिथेच त्याला कुत्रं चावलं असेल,’ अशी सराईतपणे येते.. ती भारतातच काय, पण परदेशातसुद्धा शक्य आहे. हे जागतिक दर्जाचे सांस्कृतिक वळण आणि व्यवहार आहे. पण सारंग यानिमित्ताने मकरंदच्या (कथेतल्या) साहय़ाने जे चिंतन प्रस्तुत करतात, ते त्यांच्या भूमिकेचाच भाग बनते. ‘यात तसं वेगळं काय आहे? परदेशात माणसं जातात, ती अशीच जातात. रेबीजचे जंतू घेऊनच जातात. स्वच्छ, निर्मळ अवस्थेत थोडीच जातात?’ (परदेशातील मृत्यू/ पृ. ३०)
मागासवर्गीय तरुण गायकवाडचा मृत्यू भारतातून परदेशात जाणाऱ्या सगळ्या लोकांच्या जगण्याचं प्रतीक बनतो, हे विशेष. ‘बॅरल आणि बोंबिल’ या प्रेमकथेत परशुरामाची पुराणकथा येते. बोंबिल हा परशुरामाचा अतिशय हेकट शत्रू. परशुरामाने त्याला समुद्रात भिरकावला तरी तो वाचला आणि स्थानिक समुद्रातला मासा झाला. ही पुराणकथेकडून लोककथेकडे सरकलेली कथा साहित्य व्यवहारात अडकून त्रस्त झालेल्या सारंगांच्या व्यक्तिमत्त्वाकडे सरकते, आत्मचरित्रात्मक बनते. यानिमित्ताने कथेच्या शेवटाला आलेले चिंतन पाहण्यासारखे आहे..
‘आणि मी जेव्हा कोवळ्या वयात मृत्यूच्या दाढेत गेलेल्या बोंबीलचा विचार करू लागतो तेव्हा तो मला लढून तग धरणाऱ्या आदिम माणसासारखा वाटतो. हा विचार माझं सांत्वन करतो आणि मी आशा बाळगतो की, ही बोंबिल प्रवृत्ती, ही बोंबिल-ईप्सा जिवंत राहील.’ (बॅरल आणि बोंबिल : एक प्रेमकथा/ पृ. १९)
‘चिरंतनाचा गंध’ हा कथासंग्रहातील प्रत्येक कथा आशयाच्या अनेक वाटा धुंडाळत धुंडाळत सांस्कृतिक व्यवस्थेच्या हमरस्त्यावर येताना दिसते. हा हमरस्ता धर्मशास्त्रानुसार कार्यरत होत असतानासुद्धा सारंग त्यात आपली लाट (६ं५ी) घुसवताना दिसतात. त्यांनी आशा बाळगल्याप्रमाणे यातून एक नवीन रस्ता कदाचित पुढच्या काळात निर्माण होईलसुद्धा.
आपल्या मराठी कथालेखनाला (इंग्रजीतून आलेल्या) वैश्विक पातळीवर लावून धरण्यासाठी सारंगांनी बेकेट- काफ्का- कामू- सार्त् यांना समांतर जाणारा रस्ता तयार केला होता. ‘सोलेदाद’नंतर मात्र त्यांनी या रस्त्यावरचा प्रवास स्वत:हून नाकारला. असे असतानासुद्धा त्यांच्या नावापुढे ‘प्रयोगशील’ हा शब्द पुन:पुन्हा येत राहिला. पुढे हा शब्द त्यांच्यासाठी अडचणीचाच बनला. इतका, की त्यांना स्वत:च्या कथांविषयी असा स्वतंत्र दीर्घ लेख लिहावा लागला. मराठी साहित्यातले हे दुर्मीळ उदाहरण असेल. असे केल्यामुळे त्यांचा मार्ग आणखीनच खडतर बनला. ‘दुबरेध, कठीण, प्रयोग’ असे काही शब्द साहित्य व्यवहारात अनुल्लेखासाठी उपयुक्त ठरत असतात. या प्रकारावर मात करण्यासाठी समर्थकांची, चाहत्यांची गरज असते. सारंगांच्या बाबतीत असे काहीच घडले नाही. ‘सोलेदाद’नंतरची त्यांची कथा प्रयोगमुक्त असतानासुद्धा ती त्याच सराईत राजकीय नजरेनं बघितली गेली. त्यामुळे तिचं ‘सांस्कृतिक मूल्य’ विस्तारले नाही. ‘चिरंतनाचा गंध’मधील सर्व कथा सारंगांच्या कथेचा विकासक्रम दाखवत, आशयाला जवळ करत, ‘गोष्ट आहे’ या प्रकाराजवळ थांबत, एक नवे सर्जन सिद्ध करतात. याच कथासंग्रहातील शेवटच्या कथेची सुरुवात- ‘बेलुवा नावाच्या गावात एक दरोडेखोर राहत होता..’ अशी आहे.
‘चिरंतनाचा गंध’- विलास सारंग, शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे : १११, किंमत : ११० रु.  

जी. के. ऐनापुरे – ginapure62@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 12:25 pm

Web Title: chirantanacha gandh by vilas sarang
Next Stories
1 ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’चे महाकाय शिवधनुष्य
2 ‘अत्रे कट्टा’ नावासारखाच धट्टाकट्टा!
3 ध्यासयोगी डॉ. नागेंद्र
Just Now!
X