|| डॉ. आशुतोष जावडेकर

कॅफे हाऊसच्या उंची काचेच्या तावदानांमधून दिसणारा बाहेरचा पाऊस कुणी बघत नव्हतं. मागे लागलेलं मोहित चौहानचं गाणंही कुणी ऐकत नव्हतं. समोर आलेली कॉफी पिण्याआधी शांतपणे कुणी हुंगत नव्हतं. कोपऱ्यातलं प्रेमिक जोडपं एकमेकांना खेटून सेल्फी घेत होतं. या मधल्या टेबलवर टाय घातलेले दोघे पुरुष शेअरबाजाराची घडामोड आपल्या मोबाइलवर बघण्यात मग्न होते. एक पोक्त जोडपं शिंगं मोडून वासरात यावं तसं या कॅफे हाऊसमध्ये आलं होतं. पण त्या काकूही त्यांच्या शाळेच्या मत्रिणी-व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर लिहीत बसलेल्या! कडेच्या या टेबलवर अरिन इराला हार्ट इमोजी पाठवत बसला होता. तेजस ‘लोकसत्ता’च्या अ‍ॅपवर बातम्या वाचत बसलेला. त्या दोघांच्या फोनमध्ये मुंडी खुपसण्याने वैतागून माहीने म्हटलं, ‘‘अरे, कशाला भेटलो आहोत आज आपण? एकमेकांशी गप्पा मारण्याऐवजी तुम्ही दोघे मगापासून नुसते मोबाइलवर आहात. तुम्ही ना अ‍ॅडिक्ट झाला आहात!’’ माहीने पुन्हा झापलं.

अरिन पटकन् म्हणाला, ‘‘चिल.. काही अ‍ॅडिक्ट वगैरे नाही आहोत. आसपास बघ. सगळेच मोबाइलवर आहेत. आपलं जगणंच असंय.’’

‘‘पण म्हणून ते चांगलं आहे असं नाही!’’ माही उत्तरली. तिला एकदम आठवलं की तिच्या मत्रिणीच्या मत्रिणीने- सानिया भालेरावने- एक पोस्ट नुकतीच टाकली होती. ‘डिजिटल डिटॉक्स’ या विषयावरची. शरीराचा जसा उपवास, तसा समाजमाध्यमांचा उपवास. मेंदूची, मनाची पचनशक्ती पुन्हा सुधारावी म्हणून. तिने ती पोस्ट उकरून काढली आणि मोठय़ाने वाचायला सुरुवात केली. पोस्टमध्ये लिहिलं होतं- ‘‘सर्व सोशल मीडिया बंद ठेवून स्वत:शी संवाद साधणं ही आजच्या काळाची गरज आहे. सतत काही ना काही भासवणं हा आपल्या आयुष्याचा भाग तर बनत नाही चालला आहे ना?’’

तेजस म्हणाला, ‘‘खरंय हे. पटतं बुद्धीला. पण मन ऐकत नाही यार. वाटतं हातात फोन घ्यावासा. आणि खरं सांगू? काय फरक पडेल? आयुष्याची दहा वर्षे या मोबाइलच्या नीलकिरणांमुळे कमी झाली तर ठीक आहे यार. कुणाला जगायचं आहे ऐशी आणि शंभर वर्षे!’’

अरिनला हे ऐकून चांगलाच जोर आला. तो म्हणाला, ‘‘माही, चिल. एक सांग.. आपण तिघे एकही शब्द न बोलता आपापल्या मोबाइलवर आहोत हे खरं. पण त्यात वाईट काय? ते चॅट करतानाही हा सेन्स आहे ना आपल्याला, की आपण एकमेकांशेजारी आहोत, सोबत आहोत. शांत, प्रसन्न आहोत आपण. अजून काय हवं?’’

एक मिनिट माही थांबली. हा अगदी वेगळा दृष्टिकोन होता. तेजसही विचारात पडला. एका टेबलवर बसून एकत्र गप्पा न मारता मोबाइलमध्ये डोकं खुपसणं, याची त्याच्या पिढीला कितीही सवय असली तरी त्यांना त्याच वेळी मनात आत ही एक छोटी नैतिक चूक आहे अशी जवळजवळ खात्रीच वाटत असते. अरिनच्या पिढीला असं काहीच वाटत नाही, हे एकदम तेजसला जाणवलं. त्याला एकदम असंही जाणवलं, की आपलं वय खरंच वाढतं आहे. एकदम त्याला असंही आठवलं की- हेअर कलर करायला जायचं काम राहिलंच आहे. ते आजच रविवारी करायला हवं. आणि मग पटकन त्याच्याही नकळत तो फोनवर हेअर कलर सर्च करू लागला. माही ते बघत म्हणाली, ‘‘तेजस, त्या मिलिंद सोमणकडे बघ. सगळे केस पांढरे आहेत तरी काय फरक पडतो? आता मोबाइल सोड हा!’’

माही काहीएक निश्चय करून पुढे म्हणाली, ‘‘लेट्स डू धिस. पुढची फक्त २० मिनिटे कुणी फोन उचलायचा नाही हातात. ट्राय तर करू.’’ अरिनला भारी वाटलं. त्याने पटकन् व्हाट्सअ‍ॅप स्टेटस खरडलं- ‘‘वीस मिनिटांसाठी ‘फोन-डिटॉक्स’ करतोय. डू नॉट डिस्टर्ब.’’ तेजसने फोन समोर टेबलवर सायलेंट करून ठेवला. अरिन फोन खाली ठेवणार तितक्यात त्याचं नवं स्टेटस बघून लोकांनी मेसेज केले आणि तो ते वाचू लागला! माहीने कपाळावर हात मारत म्हटलं, ‘‘अऱ्या! तू ना!’’ जीभ चावत अरिननेही पटकन् फोन खाली ठेवला. तिघांचे फोन शेजारी शेजारी टेबलवर होते. माहीचा फ्लॅपवाला. अरिनचा मेस्सीचं कव्हर असलेला. तेजसचा साधा ओप्पोचा. नेहमीचं कामचलाऊ कव्हर असलेला. माही म्हणाली, ‘‘नाटकांमध्येही मोबाइल वाजतात त्याने आजकाल खूप गोंधळ उडालेत. खूप अभिनेत्यांनी नाटक बंद केलं वगैरे बातम्या मी वाचल्यात.’’

‘‘काही लोकांना सायलेंटवर फोन टाकताच येत नाहीत आणि काहींना माजच असतो.’’ तेजसने पुस्ती जोडली. अरिन म्हणाला, ‘‘पब्लिक स्पेसला मोबाइल शांतच ठेवायला हवा, पण सायलेंट ठेवलं की झालं. फोन बघूच नये हे खरं नाही. तेजसदा, हेही लक्षात घे की आता एकाच वेळी पाच कामं करणार आपण सगळे. नाटक बघत असतानाच मी कुणाला तरी कॉलेजचा महत्त्वाचा निरोप पाठवणार. आलेल्या जोकला लाईक करणार, ‘गूगल पे’वर माझं आणि अस्मितेचं दुधवाल्याचं बिल भरणार.’’

‘‘मग तू नाटक कशाला बघायला जाणार रे?’’ माहीने विचारलं.

‘‘नाटकही बघणार ना! जमतं आमच्या पिढीला मल्टीटास्किंग.’’ अरिन म्हणाला. तितक्यात तेजसचा फोन टेबलवर थरथरला. म्हणजे आवाज नाही आला, पण स्क्रीनवर कुणाचं तरी नाव झळकत दृश्य-अदृश्य होत होतं. ‘‘कुणाचा र्अजट तर नाही ना बघतो! टाइम प्लीज!’’ तेजस हसत उत्तरला. त्याने बघितलं तर तो कंपनीचा जाहिरातीचा फोन होता. तेवढय़ातल्या तेवढय़ात अरिनने शिताफीने त्याच्या स्टेटसला पन्नास वू मिळाले आहेत हे तपासून घेतलं. तेजस म्हणाला, ‘‘पण मला पटतं तुझं माही. करायला हवं हे डिटॉक्स. रात्री कुणीतरी चॅटवर भेटतं आणि उगाच झोपायला रोज उशीर होतो. बरं, नंतर जाणवतं की त्या गप्पांमध्येही काही कस नव्हता. वेळ वायाच गेला. अर्थात मी आमच्या ऑफिसमधला जयंत जसा रोज दिवसाला आठ पोस्ट फेसबुकवर टाकतो, असला मूर्खपणा कधीच केलेला नाही.’’

‘‘दिवसाला आठ! चक्!’’ अरिन उद्गारला. माही स्वतशीच विचार करत पुढे बोलली, ‘‘इतकं असुरक्षित वाटत असेल का या लोकांना? सारखं कुणीतरी आपलं कौतुक करतंय, लाईक आणि लव्हचं बटण दाबतंय याची चटक लागत असेल?’’

अरिन म्हणाला, ‘‘हे सगळं खूप नेहमीचं आग्र्युमेण्ट आहे. खूप क्लिशे. माणसांना नेहमीच आवडत आलंय मिरवायला.. शेअर करायला.’’

‘‘पण लिमिट हवी यार! आणि त्यावर अवलंबून तर नाहीच राहायला हवं. तो जयंत शंभर लाईक नाही आले तर अक्षरश: हायपर होतो.’’ तेजस म्हणाला. माही म्हणाली, ‘‘एक्झ्ॉक्ट्ली! स्वत:चा सेल्फ एस्टीम फेसबुकवर का टांगतात माणसं?’’

तेजस तो धागा उचलत म्हणाला, ‘‘पण टांगतात. एकदा तो जयंत मी त्याच्या मित्रांच्या ग्रुपच्या फोटोला लाईक केलं नाही म्हणून माझ्यावरच उचकला. डबा खाताना त्याला मी सांगितलं, बाबा, तुझा आहे भारी ग्रुप. पण सारखे काय तुझ्या ग्रुपचे फोटो टाकतोस? आम्ही नाचू का यार तुम्ही मित्र भेटलात तर!’’ अरिन आणि माही ते ऐकून हसायला लागले. माहीचा फोन तितक्यात खणखणला. तीच फोन सायलेंटवर टाकायला विसरलेली. ‘‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..’’ तेजस हसत म्हणाला. अरिनने माहीची चुळबुळ पाहिली आणि पटकन् खाली स्क्रीनवर नाव वाचलं- ‘‘धीरज.’’  त्याने हलकी शिट्टी वाजवत म्हटलं, ‘‘माही! धीरज! कोण आहे हा?’’ माही चक्क थोडी लाजली! तेजस आणि अरिन उडालेच! त्यांनी अजून काही विचारण्याआधी माहीने नजर चुकवत म्हटलं, ‘‘ते सगळं सांगते पुढच्या वेळेस.’’ अरिनला इतकं हसू आलं. तेजसचा चेहरा शंकेखोर झाला. आता शेवटची पाच मिनिटे राहिलेली.. स्टेटसचे लाईक चेक करायची. अरिनला मधेच बेदम लहर आली, पण त्याने दाबली. एकदा ठरवलं की ठरवलं. माही कॉफीच्या कपात फुंकर मारत या दोघांच्या नजरा चुकवत हसत बसली. तेजस बाहेरचा पाऊस बघायला लागला. मागे मोहित चौहानचं ‘रॉकस्टार’मधलं कव्वालीचं गाणं सुरू झालं. तेजसच्या बोटांनी नकळत ताल धरला. ‘मं हू तुझ में  समाया, तेरे पिछे चला आया’ ..त्याला जयंत आठवला. जयंतच्या समाजमाध्यमातल्या प्रतिमा खऱ्या जयंतमागे जरा आदराने थांबण्याऐवजी तोच वेडा त्या प्रतिमांच्या मागे धावत होता! त्या आभासात सामावत होता!

माही म्हणाली, ‘‘टाइम अप्.’’ वीस मिनिटे झाली. तिघांनी आपापले फोन हातात घेतले. पण का कुणास ठाऊक, पुढची पाचेक मिनिटं तरी त्यांनी आपापल्या फोनकडे नजरा वळवल्या नाहीत. ते आनंदात शेजारी शेजारी शांत बसून राहिले. बाहेर पाऊस निरंतर पडत राहिला. आतलं गाणं जिवाला सुखावत वाजत राहिलं. कॉफी गंधाळत राहिली..

ashudentist@gmail.com