सुहासिनी, समधुरभाषिणी, सुखदाम्, स्वप्नदाम् अशी आमुची जी परमदयाळू नमोमाऊली (मित्रों.. बोला, अनंत कोटी सार्कनायक राजाधिराज मंत्रिराज स्वच्छब्रह्म महर्गतासंहारक अच्छेदिनद श्री सच्चिदानंद सद्गुरू नमोमहाराज की जय!) तिनेच हे म्हटले म्हणून बरे झाले!
अन्यथा गेली कित्येक वर्षे आम्ही हे उध्र्वबाहो करून पोटतिडिकेने सांगतो आहोत. परंतु आमचे आणि व्यासांचे दुखणे एकच : न कश्चित् श्रुणोति मे! कोणी ऐकतच नाही!
आता मात्र या समस्त मीडियामोगलांना हे ऐकावेच लागणार आहे.
गोष्ट तशी काही फार अवघड नाही.
म्हणजे त्यांनी काही मीडियाला असे सांगितले नाही, की जरा पेड न्यूजा कमी करा! किंवा माणसे जर तब्बल ४ रुपये (अक्षरी चार रुपये फक्त!) देऊनि सोळा पाने अधिक चारपानी रंगीत पुरवणी विकत घेतात, तर त्यांना वाचण्यासाठी काही मजकूर द्या! ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवा. शब्दकोडय़ांची संख्या वाढवा!
नाही, अजिबात व कदापि नाही! नमोजी अशी बिन-बनियागिरी करणारच नाहीत!
त्यांनी फक्त इतुकेच सुनावले की, जरा मीडियात चार शुभवर्तमाने येऊ द्यात.
जगात पहा किती सुंदर सुंदर, छान छान, गोड गोड, विधायक विधायक चाललेले असते. पण त्याचे प्रतिबिंबही पेपरांत पडू नये?
गतसप्ताही गुवाहाटीच्या त्या सभेत नमोजी म्हणाले, ‘..अशी हजारो शुभवर्तमाने आहेत. परंतु प्रसार माध्यमांत त्यांना जागाच मिळत नाही. सगळ्या नकारात्मक बातम्या देतात हे मीडियावाले.’
आम्ही गेली कित्येक वर्षे हेच तर सांगत होतो. पण तेव्हा कोणी आम्हांस हिंग लावूनही पुसले नाही. आता मात्र पाहा- सगळ्यांचीच कशी धावपळ उडाली आहे!
आमचे पेपरापेपरांतले बहिर्जी नाईक्स सांगतात, की काही दैनिकांनी तातडीने ‘विधायक’ नावाचा बीटच तयार केला असून, तेथे महिला रिपोर्टरांची नियुक्ती करण्याचे घाटत आहे. काहींनी गावोगावच्या बातमीदारांना कळविले आहे की, यापुढे केवळ विधायक बातम्यांनाच कॉलम-सेंटिमीटरानुसार पैसे मिळतील. काही पत्रांतून ‘विधायक’ नावाचा लोगो करण्याच्या आड्डरी सुटल्या आहेत. तिकडे आमुची वैदर्भीय उपसंपादके आणि रिपोर्टरे एकमेकांस पुसून राहिली आहेत की, आजवर आपण विधायकांच्याच बातम्या तर पहिल्या पानी छापून राह्य़लो ना भौ! आता का त्येच्यातच हा लोगो टाकून ठिवायचा का काय?
प्रश्न अगदीच रास्त आहे.
विधायक बातम्या छापायच्या हे खरे; पण त्या असतात कशा, दिसतात कशा, सिंगल कॉलमी असतात की दीडकीत चालवायच्या असतात?.. कोणास नीट पत्ताच नाही.
कसा असणार? सवयच नाही ना, असे काही चांगलेचुंगले छापायची!
पण पत्रकार बंधुभगिनींनो, काळजी नसावी! माध्यमकर्मीची ही अडचण लक्षात घेऊन आम्ही एक सुबक व सुलभ विधायक वृत्तमार्गदर्शिका तयार केली आहे. त्यातील काही विधायक सूचना, सल्ले, तोडगे वानगीदाखल..
१. विधायक बातमी म्हणजे काय, हा मोठमोठय़ा पत्रपंडितांना पडणारा प्रश्न होय. परंतु त्याचे उत्तर सोपे आहे. ज्या बातम्या याव्यात असे सर्वाना वाटते, परंतु वाचत कोणीच नाही, त्याला ‘विधायक बातम्या’ असे म्हणतात. (संदर्भासाठी पाहा अथवा वाचा- लोकराज्य मासिक, किंमत- ५ रुपये फक्त.)
२. अपघात, खून, बलात्कार, हाणामारी अशा विघातक बातम्यांमुळे काही वाचकांच्या बालमनावर परिणाम होतो. त्याऐवजी विधायक बातम्याच पहिल्या पानावर छापाव्यात. त्यामुळे वाचकांना रोजचा दिवस ‘अच्छा दिन’ वाटेल व अनेक वैद्यकीय, सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्न निर्माणच होणार नाहीत.
३. तमाम वृत्तपत्रांनी सरकारी भ्रष्टाचाराच्या बातम्या या देशद्रोहीच मानाव्यात. प्रत्येक घोटाळ्यातून संपत्तीचे वितरणच होत असते. या अर्थशास्त्रीय बाजूवर भर देऊन अर्थसाक्षरता वाढवावी.
४. आरटीआय हे मोठे शस्त्र असून त्याचा वापर पत्रकारांनी विधायक माहिती मिळविण्यासाठी करावा. उदाहरणार्थ, नमोजींच्या आदेशामुळे सगळे सरकारी कर्मचारी कसे वेळेवर कामावर येतात, अशा बातम्या प्रसिद्ध कराव्यात.
५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वच बातम्या विधायक असतात, असे कोणीतरी (पक्षी : आम्हीच!) म्हटले आहे. ते योग्य आहे. कारण विधायक व विघातक यात फक्त दृष्टिकोनाचा प्रश्न असतो. त्यामुळे दुष्काळाची बातमी ‘पाण्याची बचत झाली’ अशा पद्धतीने देता येऊ  शकते. फार काय, चोरीची बातमीसुद्धा आपण विधायक पद्धतीने लिहू शकतो. उदा. टिंब. –
चोरांनी घडविले माणुसकीचे दर्शन
घोडेगाव, दि. १० – येथील कापडव्यापारी गोविंद घोडेगावकर यांच्या घरी काल रात्री जबरी चोरी झाली असून, त्यावेळी चोरांनी दाखविलेल्या माणुसकीची सर्व पंचक्रोशीत चर्चा आहे. याबाबतची माहिती अशी की, गोविंद घोडेगावकर यांच्या घरातून चोरांनी दागिने, कपडे, भांडी व रोकड असा वीस हजारांचा ऐवज चोरला; परंतु त्यावेळी त्यांनी कोणालाही मारहाण करून दुखापत केली नाही. चोरांच्या टोळीने दाखविलेल्या या सहृदयतेबद्दल घोडेगावकर कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू ठेवला आहे.
तर मित्रहो, या मार्गदर्शिकेत अशा अनेक सचित्र, साधार, सोदाहरण, सोपपत्तिक गोष्टी आहेत. ही मार्गदर्शिका वाचल्याने एका कार्यकारी संपादकाच्या पेपराचा खप खूप खूप वाढला व मालकाने त्याला पगारवाढ दिली. परंतु मंत्रालयातील एका पत्रकाराने ही मार्गदर्शिका न वाचताच बातम्या लिहिल्या, त्यामुळे त्याला दिवाळी गिफ्टला मुकावे लागले. तेव्हा आजच विकत घेऊन वाचा- सुलभ विधायक वृत्तमार्गदर्शिका! lok14

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
Raj Thackeray Padawa Melava
MNS Gudi Padwa Melava : अमित शाहांच्या भेटीत काय ठरलं? राज ठाकरेंनी शिवतीर्थवरून सांगितला घटनाक्रम, म्हणाले….
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव