प्रवीण दशरथ बांदेकर – samwadpravin@gmail.com

आज सारंच जग ठप्प झालंय. करोना विषाणूचा हा चमत्कार आहे. सगळे लोक आपल्याच घरांत बंदिवान झाले आहेत. आजपर्यंत कुठल्याच आपदेनं जग थांबलं नव्हतं. अगदी महायुद्धांनीदेखील! किमानपक्षी वृत्तपत्रे तरी सुरू असत. त्यांनाही रोखायचं धारिष्टय़ करोनानं दाखवलं. एकाएकी थांबलेल्या या जगानं माणसाचं जगणंच उलटंपालटं केलं आहे. अखंड गरगरणाऱ्या चक्रात भोवंडून जाणाऱ्या माणसाला क्षणक निवांतपणाची आठवण होतही असे; परंतु ते मिळवण्यासाठी तो थांबायला तयार नव्हता. त्याचं ते स्वप्न होतं फक्त. कधीच पुरं न होणारं. मात्र, निसर्गानं ते सत्यात उतरवायचं ठरवलं आणि एकच हलकल्लोळ माजला. माणसाला सक्तीनं निवांतपण लादून त्याची जणू निसर्गानं परीक्षाच आरंभलीय. तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ? बघूच या. या आव्हानानं माणसं भिरभिरलीयत. काय करावं, हे त्यांना सुचेनासं झालंय. ही कैद असह्य़, जीवघेणी. मरणाच्या सावटाखालची. तिला कसं सामोरं जायचं, कुणालाच कळत नाहीये. जणू करोनापूर्व आणि करोनोत्तर अशी जगाची फाळणी झालीय. सगळंच बदललंय.. बदलतंय.. बदलणार आहे. या सगळ्याकडे सर्जनशील माणसं कसं बघताहेत? त्यांच्या मनांत सध्या कसली खळबळ माजलीय? जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

पण हे एकाएकी सुरू झालं का? की गेली काही वर्षे निसर्ग, पर्यावरण, मानवी जगण्याच्या मुळाशी असलेली काही आधारभूत मूल्ये, संवेदना, आचारविचारांतील नैतिकता अशा कैक गोष्टींपासून आपण दूर जात चाललोय, बेछूट जगण्याच्या कैफात प्रचंड स्वार्थी, आत्मकेंद्री, निर्दयी, संवेदनाहीन बनत चाललोय, त्याची ही परिणती असावी? या दोन्हीचा परस्परांशी काही संबंध असो-नसो, पण सध्या ज्या पद्धतीने या अर्निबध वेगवान जगण्याला खाड्कन ब्रेक लागला आहे, ते पाहता कुठेतरी कधीतरी हे असं काहीतरी होणार आहे असं मात्र राहून राहून वाटत होतं. विवेक आणि संवेदना अद्याप शाबूत असणाऱ्या किमान काही लोकांना तरी याची जाणीव होत असावी.

आज दिनांक अमुक तमुक :

मुंग्या फिरतायत सगळ्या अंगावरून, अंथरुणात, खोलीभर, असं वाटत राहिलं होतं झोपेत. खरं तर झोपेत आहे की जागा, हेही कळत नव्हतं. किती वाजले असावेत, काही कळायला मार्ग नव्हता. अचानकच बाहेरच्या कुठल्या तरी खोलीत मोबाइलची रिंगटोन वाजू लागली. मी डोळे उघडले. बऱ्यापैकी दिसत होतं. दाराकडे बघितलं नि भयंकर दचकलो. एकदम शिसारी आली. बहुधा किंचाळलोही असेन भीतीनं.. आता आठवत नाही. विचित्र काहीतरी दृश्य समोर दिसत होतं. पालीची शेपटी ओढून न्यावी तशी मुंग्या कुणाची तरी बोटं.. हो, बोटंच असावीत.. ओढून नेत होत्या. इकडेतिकडे सगळीकडे खोलीभर मुंग्याच मुंग्या. आणि नुसती बोटंच नव्हेत, अजूनही काहीबाही खोलीबाहेर नेण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता. डोळे, जीभ, मेंदू.. काय काय होतं, कोण जाणे! मी मग घाबरून माझे हात, पाय, डोळे, जीभ, नाक वगैरे अवयव चाचपून पाहायला लागलो. पण काहीच जाग्यावर नसावं बहुतेक. चाचपडताना हाताला काहीच लागत नव्हतं. बापरे! म्हणजे या मुंग्या घेऊन चालल्यायत ते सगळे आपलेच अवयव आहेत की काय? भीतीनं एकदम ओरडावंसं वाटलं. पण आवाजच फुटत नव्हता. नुसतेच घशातून विचित्र आवाज येत राहिले.

माझ्या त्या आवाजांनी जाग आलेली बायको मला उठवत होती. भयंकर धास्तावून जागा झालो. भानावर आल्यावर ते स्वप्नच होतं हे जाणवलं. स्वप्नच खरं, पण किती विचित्र आणि किळसवाणं! ‘काय झालं? कशाला ओरडत होता?’ बायको विचारत होती. पण काय सांगणार होतो मी तिला.. मलाच न समजलेल्या या दु:स्वप्नाविषयी!

दिवसभर डोळ्यांसमोर तीच दृश्यं येत राहिली होती. सारखा त्या स्वप्नाचाच विचार. नक्की काय अर्थ असू शकतो या दु:स्वप्नाचा? एकेक अवयव आपल्यापासून दूर निघून जातोय.. का? कशासाठी? मी काय केलं त्यांचं? निरुपयोगी झाले, निकामी झाले, म्हणून गळून पडले, म्हणून मुंग्या लागल्या, असं काही समजावं का? की हे कसलं भयंकर विघटन होऊ घातलंय म्हणायचं आपल्या शरीराचं? मनाचं?

कधीपासून हे असं सुरू झालंय? आपण बथ्थड होत चाललोय का? की एकेक अवयव मिटवून निष्क्रिय होत जातोय दिवसेंदिवस? म्हणूनच का हे उपयोगात आणत नसलेले अवयव गळून पडतायत? काहीतरी भयंकर विचार करतोय का आपण?

आपण आपल्या बोटांचा सर्जनशील वापर करणं कधीपासून सोडून दिलं? भवताली जे बिघडत चाललंय त्याचा विचार करण्यासाठी आपण आपल्या मेंदूचा शेवटचा वापर कधी केला होता? आपल्या या जिभेने आपण मनातलं सगळं खरंखुरं कधी उच्चारलं होतं? या प्राणप्रिय डोळ्यांनी कधी अनुभवलेला आपला तुकोबा म्हणतो तसा शब्दांच्या आत दडलेल्या सत्याचा उजेड?

..आणि मग या सगळ्याची सुसंगती लागावी असं काहीतरी पुढच्या काही दिवसांतच घडताना दिसू लागलं.

बथ्थड होत जाण्याच्या प्रक्रियेतला कुठला तरी एक किंवा अनेक दिनांक :

दृश्य १ :

डोक्यावर बोचकी, काखोटीला तान्ही पोरं घेऊन मैलोन् मैल चालत घरी निघालेले गरीब कष्टकरी माणसांचे जथ्थेच्या जथ्थे. आपल्याला दिसतायत का ती माणसं? जाणवतंय का काही त्यांच्याविषयी?

तर- काहीच नाही!

दृश्य २ :

दुधाच्या टँकरमध्ये, रुग्णवाहिकेमध्ये, मिळेल त्या वाहनामध्ये दाटीवाटीनं कोंबलेली माणसं. त्यांना खाली उतरवून निर्दयपणे बडवणारे पोलीस. आपण अत्यंत कोरडय़ा मनाने, मेलेल्या नजरेने हेही पाहत राहिलो. आपल्या सुरक्षित जगण्यावर कुठेही, कसलाही ओरखडा उमटू न देता.

दृश्य ३ :

भाजी किंवा किराणा खरेदीसाठी, गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणारे लोक आणि संचारबंदी असताना घराबाहेर पडलेत म्हणून त्यांना हुसकावून लावणारे पोलीस. आपण व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारे पोलीस आणि अशी माणसं यांच्याविषयीचे जोक्स आठवत राहिलो. पुढच्याच क्षणी सगळं विसरूनही गेलो. आपण कशातच फार वेळ गुंतून राहत नाही ते एक बरं आहे, म्हणायचं.

दृश्य ४ :

कुणीएक दाढीवाला बाबा आणि एक अमक्या तमक्या पक्षाचा लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद सुरू आहे. तो बाबा सांगतोय, ‘‘हीच संधी आहे परमेश्वरानं तुला दिलेली. लाभ करून घे. अन्नदान कर, धान्यवाटप कर, मास्क वाट, औषधं वाट. काय वाट्टेल ते कर. पण लोकांच्या नजरेत येईल असं काय ते कर.’’ लोटांगण घालून तो फलाणा लोकप्रतिनिधी म्हणतोय, ‘‘तुम्ही म्हणताय तसंच होईल बाबा! तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत.’’

दिवसाकाठी अशा शंभर क्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत असतात. या खऱ्या असतील किंवा खोटय़ा.. आपणाला दखल घ्यावीशी वाटत नाही. अंगात मुरलेल्या अत्यंत बेफिकीर, अडाणी सवयीने आपण ती क्लिप पुढे सरकवतो. ‘तथास्तू’ म्हणत जगत राहतो.

दृश्य शंभरावं किंवा हजारावं किंवा कितवंही-

‘संपूर्ण देशात त्वरित लॉकडाऊन करण्याचा निर्णय आपल्या माननीय पंतप्रधानांनी घेतल्यामुळे अन्य देशांच्या तुलनेने आपल्या देशात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. हा निर्णय कठोर वाटला तरी तातडीने तो घेण्याची आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता होती. तसे केल्यामुळेच आपण किमान एका सुरक्षारेषेवर अजून आहोत. यामध्ये देशातील काही लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागला असला तरी अंतिमत: देशहितासाठी.. पंतप्रधानांची निर्णयक्षमता, सरकारचा दूरदर्शीपणा, गांभीर्य लक्षात न घेताच घराबाहेर पडणारे समाजद्रोही.. ब्ला ब्ला ब्ला..’

सरकारी पक्षाचा नेता न थकता बोलत राहतो. टीव्हीपुढे निष्क्रिय बसून असलेले आपण तोंड उघडं टाकून अचंब्याने ऐकत असतो. आपल्या कानांवर नुसतेच अर्थहीन शब्द तेवढे आदळत राहतात.

म्हटलं तर हे असं गेले जवळपास पंधरवडाभर सबंध देशभर सुरू आहे. आपल्याला काहीही न करता नुसतं स्क्रीनसमोर बसायला लावणारं! निष्क्रिय तर आपण आधीपासूनच होतो. गेल्या काही वर्षांपासून तसं बनण्याची प्रक्रिया सुरूच झाली होती. विचार करण्याची, कृतिप्रवण होण्याची गरजच उरली नव्हती. आता तर किती सबळ कारणच मिळालं होतं : निष्क्रियपणे जगण्यासाठी.. बथ्थड बनण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करण्यासाठी. अशा परिस्थितीत आपण दुसरं काय करू शकतो याचा कधी विचारही करावासा वाटला नव्हता. आता पुस्तकांशी पुन्हा जोडून घ्यावंसं वाटत नाही. सवयच सुटली आहे. शिवाय आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपसारखं एखादं समाजमाध्यम पुरेसं आहे ती गरज भागवायला. आपण समोरासमोर बसून एकमेकांशी मोकळेपणाने तासन् तास बोलू शकत नाही. तीही सवय मोडून गेली आहे. एकमेकांना मनातलं सांगणारं साधं पत्रही लिहू शकत नाही. कोण करेल तो आऊटडेटेड बावळटपणा? आणि हातानं लिहिणं तर आता शक्यच नाही. आपलं हस्ताक्षर नेमकं कसं आहे, तेही आपण आता विसरून गेलो आहोत. कवितांना चाली लावणं, नवे अर्थ शोधणं, हौसेनं काही पदार्थ करून एकमेकांना खिलवणं किंवा नुसतंच शांत बसून राहणं.. सगळं नष्ट केलंय आम्ही. अशा खूप गोष्टी आहेत. आपल्या जुन्या सवयींपासून आपल्याला दूर नेणाऱ्या, एकटं पाडणाऱ्या. आता आपण पुन्हा मागे वळू शकत नाही, जुन्या दिवसांसारखे कृतिशील होऊ शकत नाही. त्यापेक्षा हे बरं- मेंदू बंद करून स्क्रीनशी जखडवून घेणं.

इतक्या अनपेक्षितपणे सगळ्या देशाचं सगळं चलनवलन असं ठप्प होऊन जाईल हे कुठल्याच ज्योतिषानेही आधी सांगितलं नव्हतं. पण जगभरातून ज्या बातम्या कानावर येतायत त्या थरकाप उडवणाऱ्या आहेत. ज्या वेगाने हे घडत राहिलंय, आणि त्याचे सामाजिक, आर्थिक, मानसिक वगैरे जे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत ते पाहता हा विषाणू जगाचे पार तीन तेरा वाजवणार आहे याची एक दहशतवजा भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांपासून ते देशाचा गाडा हाकणाऱ्या राज्यकर्त्यांपर्यंत सगळेच प्रचंड गोंधळले आहेत. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, विचारवंत, माध्यमे, लेखक, कलावंत सगळे सगळे विलक्षण अस्वस्थ आहेत. सगळ्या जगाच्या दृष्टीनेच ‘टर्निग पॉइंट’ ठरावी अशीच काहीतरी ही घटना आहे.

पण हे एकाएकी सुरू झालं का? की गेली काही वर्षे निसर्ग, पर्यावरण, मानवी जगण्याच्या मुळाशी असलेली काही आधारभूत मूल्ये, संवेदना, आचारविचारांतील नैतिकता अशा कैक गोष्टींपासून आपण दूर जात चाललोय, बेछूट जगण्याच्या कैफात प्रचंड स्वार्थी, आत्मकेंद्री, निर्दयी, संवेदनाहीन बनत चाललोय, त्याची ही परिणती असावी? या दोन्हीचा परस्परांशी काही संबंध असो-नसो, पण सध्या ज्या पद्धतीने या अर्निबध वेगवान जगण्याला खाड्कन ब्रेक लागला आहे, ते पाहता कुठेतरी कधीतरी हे असं काहीतरी होणार आहे असं मात्र राहून राहून वाटत होतं. विवेक आणि संवेदना अद्याप शाबूत असणाऱ्या किमान काही लोकांना तरी याची जाणीव होत असावी. खाणीत सोडलेल्या साळुंखीला जसं ऑक्सिजन कमी कमी होऊ लागल्याची जाणीव सर्वात आधी होते नि ती जिवाच्या आकांताने किंचाळू लागते, तसं काहीसं अशा द्रष्टय़ा लोकांच्या बाबतही होत असलं पाहिजे. यासंदर्भात मला होझे सारामागो हा पोर्तुगीज लेखक आठवतोय. त्याची ‘ब्लाइंडनेस’ ही नोबेल पुरस्कार मिळवणारी कादंबरी आठवतेय.

करोना विषाणूविषयीच्या जगभरच्या बातम्या कानावर येऊ लागल्यावर अनेकांप्रमाणे मलाही सारामागोच्या या विलक्षण कादंबरीची आठवण आली. काय आहे या कादंबरीत? एका अज्ञात, विचित्र संसर्गजन्य, साथसदृश आजारामुळे कादंबरीतल्या शहरातली सगळी माणसं अकस्मात आंधळी होऊ लागतात. सगळीकडे एकच गोंधळ उडतो. सगळे जीवनव्यवहार ठप्प होऊन जातात. आंधळ्या माणसांना अन्नाच्या शोधात भटकताना अंगावरच्या कपडय़ाची शुद्ध उरलेली नसते. स्वच्छतेची फिकीर नसते. शेजारची व्यक्ती आपली आई, बहीण, मुलगी यापैकी कुणी असू शकते याची पर्वा नसते. सगळं जग पशुपातळीवर येऊन जगत असतं. लवकरच अशी परिस्थिती येते की सगळ्यांना जाणीव होऊ लागते.. सगळीकडे घाण आणि दरुगधीचं साम्राज्य माजलं आहे. हवा प्रदूषित झाली आहे. पाणी संपून गेलं आहे. शिस्त, संयम, विवेक, सुसंस्कृतपणा, जगण्यातली सगळी नैतिकता, सगळं माणूसपणच संपून गेलं आहे. एकमेकांविषयी संशय, भय, क्रूरपणा सर्वत्र भरून राहिलेला आहे. आपण पुन्हा त्या रानटी युगात मागे ढकलले गेलो आहोत.

फारच भीषण आणि अस्वस्थ करणारं चित्र होतं ते. ही कादंबरी पुन्हा वाचणं सोडाच, पण तिची नुसती आठवणही अस्वस्थता वाढवणारा अनुभव आहे. या कादंबरीवर आधारलेला सिनेमा उपलब्ध आहे; पण तो बघण्याचं काही धाडस मला झालं नाही.

आताची परिस्थिती इतकी विदारक आहे का? नक्कीच नाही. एखाद्या कथा-कादंबरीत वा फिक्शनच्या दुनियेत खूप काही घडलेलं असतं. एखादा लेखक आपल्या अफाट आणि अचाट  कल्पनाशक्तीच्या साहाय्याने अशा असंख्य अतक्र्य गोष्टी घडवून आणू शकतो. फिक्शनमध्ये घडवून आणलेलं प्रत्यक्षात कधी घडत नाही, घडणारच नाही असं जरी म्हणता येत नसलं तरी आपलं पापभीरू मन इतकं नकारात्मक, काळंकुट्ट चित्र कल्पनेतही मान्य करायला तयार नसतं. आपण मान्य केलं नाही तरी परस्परांविषयीचा संशय, भय, संभ्रम वाढवणारं वातावरण, स्वार्थी वृत्ती, देहामनाला घेरून असलेलं बथ्थडपण, सर्जनशील काही करता न येण्यातून आलेली बेचैनी, अस्वस्थता अशा असंख्य गोष्टी आजच्या या परिस्थितीतही दिसून येत आहेत. माणसाचं माणूसधर्म विसरून पशुपातळीवर येणं दोन्हीकडे सामायिक आहे. आणि सामान्य माणसाला कधीही न कळणारा या अशा परिस्थितीमागचा राजकारणाचा क्रूर चेहरा- तोही कसा विसरता येईल?

वाया हे दिस सरती उदास :

हे सुरू झालं, सक्तीने घरी अडकून पडावं लागलं तेव्हा आधी वाटलेलं : बरं झालं, एरव्ही वेळ मिळत नाही, किमान आता तरी आपल्याला मनासारखं लेखन, वाचन, चिंतन करायला संधी आहे. अनेक दिवसांपासून मनात साचून असलेल्या गोष्टींना उत्साहाने सुरुवात केली होती. पण बाहेरच्या जगाकडे कसं दुर्लक्ष करणार होतो? तिथून तर अस्वस्थता वाढवणाऱ्या बातम्या येत राहिल्या होत्या. कुठे अडकून पडलेली हातावर पोट असलेली माणसं, उपासमारीने मरणारी बायकामुलं, विषाणूग्रस्तांची हतबलता, मृत्यूचं तांडव आणि आपण हाती घेतलेल्या बिनसवयीच्या गोष्टींतून जाणवू लागलेला तोच तोपणा, त्यातून येणारा कंटाळा.. अशातच कसाबसा पहिला आठवडा संपला.

दुसरा आठवडा अधिकच निराशा, चिंता वाढवणारा आहे. काही करावंसं न वाटणं, आळस सर्वागाला वेढून राहणं आता सवयीचं बनू लागलंय. मिठा-तेलावरूनही घरातल्या धुसफुशी नकळत वाढू लागल्यात. काही वेळासाठीही नेट स्लो झालं तरी संयम सुटून चिडचिड होऊ लागलीय.

आपण खरोखरच हळूहळू निरुपयोगी, क्रियाहीन, बथ्थड होत चाललो आहोत की काय असं काहीसं मनात येत राहिलंय. हे ते अवयव, मेंदू वापराविना गंजत चाललाय. दिवसभर टीव्ही पाहणं, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरचे मूर्ख विनोद वा अभिनिवेशी चर्चा वाचणं, यातून निष्क्रियता वाढत चाललीय. अशाने खरोखरच डार्विन म्हणतो तसं हे वापरात नसलेले अवयव अगदी मेंदूसकट गळून पडले वा त्यांची कार्यक्षमता कमी झाली तरी नवल नको वाटायला. ही परिस्थिती जगभरच आहे. तर मग अशा परिस्थितीत आपल्या संवेदनेला जवळचे वाटणारे जगभरचे लेखक काय करत असतील? केनयाचा न्गुगी व थिवांग काय करत असेल या दिवसांत? जपानचा हारूकी मुराकामी? तुर्कस्थानचा पामुक? किंवा आपले नेमाडे मास्तर काय करत असतील? उदय प्रकाश? अरुंधती राय? असगर वजाहत?

बाकी लोकांचं जाऊ दे, पण माझ्यात तरी आता प्रत्येक गोष्टीबाबत कमालीची उदासीनता येत चाललीय. जन्मजात कोकणी सवयीला जागून मासे नसतील तर घास उतरू नये अशी परिस्थिती होती कालपरवापर्यंत. पण आता खाण्यापिण्याचाही कंटाळा येऊ लागलाय. कशाला हवेत जिभेचे चोचले? कुठे जायचंय शरीर सजवून? सगळ्याच नैमित्तिक गोष्टींचा प्रचंड कंटाळा येऊ लागलाय. कशासाठी करायच्यात या निर्थक गोष्टी, असं वाटत राहिलंय. आंघोळीचा कंटाळा. दाढी करण्याचा कंटाळा. कपडय़ांना इस्त्री करण्याचा कंटाळा. काहीच करू नयेसं वाटतंय. नदीत जाऊन डुंबावंसं वाटतं चार-दोन तास. कदाचित त्यामुळे डोकं ताळ्यावर येईल. पण कुणालाच पाण्यात उतरू देत नाहीयेत गाववाले व्हायरसच्या भीतीनं. घराबाहेर पडलो तरी संशयानं बघतायत. घरात शिरलो की घरातले बडबडायला लागतात. अशानेही ही निष्क्रियता वाढत जातेय. काहीच करू नये, आपल्यातच मिटून जावं, हेच आता उरलं आहे जगात- असं वाटत राहिलंय.

उत्साहाने पहिले दोन-चार दिवस तुकारामबावाची गाथा घेऊन बसलो होतो. ‘एकाएकी आता असावेसे वाटे, तरीच हे खोटे चाळे केले’ वगैरे वाचून विलक्षण भारावलो होतो. माझ्या परीने अर्थनिर्णयन केलं चार-पाच पानं. मग आणखी असे काही अभंग शोधले. तुकोबाची तगमग, संभ्रमावस्था, आंतरिक कल्लोळ दाखवणारे. आपल्या मनोवस्थेशी जवळ जाणारे. पण आता हळूहळू तेही काम कंटाळवाणं वाटू लागलं आहे. कशातच मन गुंतेनासे झाले आहे. अगदी आपल्या आवडत्या तुकोबातही. खरं तर तुकोबालाही त्याच्या वाटय़ाच्या आयुष्यात अशा जीवघेण्या परिस्थितीतून जावं लागलं होतं. दुष्काळात बाईल, पोटचा पोरगा, व्यापारधंदा, पत, प्रतिष्ठा, लौकिक असं सगळं गमावावं लागलेला तुकोबा या परिस्थितीमुळे आमूलाग्र बदलला. संसारातील फोलपणा, ऐहिक जगण्यातील क्षणभंगुरता जाणवून येताच चिंतनशील तत्त्ववेत्ता आणि कवी बनला.

आपल्यामध्ये, एकूणच आपल्या सगळ्या समाजामध्ये या मृत्यूच्या सावटाखाली वावरत असताना अंतर्मुख होत काही असे बदल भविष्यात संभवतील का? वैयक्तिक आयुष्यात सोडून देऊ; पण सामाजिक, राजकीय, आर्थिक स्तरावर काही नवं, सकारात्मक, धोरणात्मक घडेल असं म्हणायला आशा आहे का? आपले स्वार्थ, स्वत:पुरतंच बघायची वृत्ती, तुच्छतावाद, दांभिकपणा, जगण्यातला उथळपणा, निसर्गाविषयीची बेफिकिरी, सार्वजनिक वर्तनातील बेपर्वाई, अस्वच्छता..  अशा कैक गोष्टी आहेत आपल्या हाडामांसात गच्च रुतलेल्या. त्यातल्या किती सकारात्मक पातळीवर बदलता येतील?

काहीही भाकीत करता येणे अवघड आहे. जगाचं सोडा, स्वत:बाबतही तुकोबासारखं ‘बरे जाले देवा निघाले दिवाळे/ बरी या दुक्काले पीडा केली’ म्हणत स्वत:चा शोध घेत राहणंही यापुढच्या सामाजिक विघटनाच्या दिवसांत शक्य होईल असं वाटत नाही. तरी पण माझं अस्सल भारतीय मन अशी सहजासहजी हार नक्कीच पत्करणार नाही. ‘ओस जाल्या दिशा मज भिंगुळवाणे जीवलग नेणे मज कोणी, अंधाकारापुढे न चलवे वाट लागतील खुंट काटे अंगा’ असं वाटत असतानाच-‘एकला नि:संग फाकती मारग भितो नव्हे लाग चालावया’ असे धीर देत सांगणारा भक्कम वाटाडय़ा आपल्यासोबत असताना आपण तरी का नकारात्मक जगायचं? म्हणूनच संशय, भय, बथ्थडपणा, निष्क्रियता आणि सामाजिक विघटनाचा हा दु:काळ कितीही सोकावला, तरी तुकोबाचा दिवा हातात घेऊन आपल्या असण्याचा शोध घेताना आपणही म्हणू शकतो..

‘एकाएकी आता असावेसे वाटे, तरीच हे खोटे चाळे केले..’