||  डॉ. संजय ओक

लेखकावर वाचकांचा शंभर टक्के हक्क असतो. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रतिक्रियेला मी दोन शब्द का होईना, उत्तर लिहितो. त्या दिवशीच्या एका प्रतिक्रियेने मात्र मला अंतर्मुख केले. ‘‘सर, हल्ली तुमच्या लेखांत तुम्ही दिसत नाही. भट्टी जमत नाही. तुम्ही करोना विसरतच नाही.’’ मी नम्रपणे उत्तर देता झालो : करोनाने आपल्या सर्वांच्या आयुष्यावर जे झाकोळ पसरविले आहे, त्यातून नवे कवाड खोलतं करण्यासाठीच या वर्षीचे लेखांक आहेत. त्यांना करोनाची पार्श्वभूमी  आहे. गेल्या वर्षीचं टोचरं शल्य आहे. या वर्षीच्या वस्तुस्थितीची जाणीव आणि ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटी’चे भान आहे. व्हॅक्सिनेशनची उगवती दिशा आहे. आणि छोट्या छोट्या कोपऱ्यांतून येणारा प्रकाशाचा कवडसा शोधावा तसे हरवलेल्या आयुष्यातून जपण्यासारखे क्षण पुन्हा आणण्याची धडपड आहे. खूप काही काटलं-छाटलं गेलंय. आता पुन्हा ‘कलम’ करण्याची वेळ आली आहे.

काहीच चांगलं होत नाही असं वाटायचे दिवस आहेत. शहरं उघडली, पण मनं लॉकडाऊन अवस्थेत आहेत. बातम्यांचे चॅनेल्स आहेत, पण बातम्या कमी आणि भयकथाच जास्त ऐकू येत आहेत. सध्या बातम्या करोनाच्या वाढत्या आकड्यांच्या नाही, तर खून-मारामाऱ्यांच्या, खाडीत पडलेले मृतदेह, नाहीतर विहिरीत पडलेले बिबटे यांच्या. या भीषणतेचेच वास्तववादी म्हणून प्रतिबिंब दाखविणाऱ्या सायंमालिका. जगायचे कशाच्या जोरावर, अशी अवस्था आली आहे. आणि तेव्हाच माझ्यापुरते मी ठरवले- सकारात्मकता पेरत, वाटत जगायचे. फार नवीन, क्रांतिकारी करण्यासाखे नसेना का; जे छोटे छोटे करावयाचे ते भल्यासाठी करायचे. बोलताना सकारात्मक विचार सांगायचा; संघ बांधायचे आणि परताव्याचा विचार न करता कर्म करत जायचे. कौतुक अनपेक्षित स्थळी आणि अज्ञात व्यक्तींकडून मिळते तेव्हा त्याचे अप्रूप अधिक वाटते. कोविडच्या काळात दोन मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. एक कोविडचा प्रतिकार आणि दुसरे नॉन-कोविडचा पुन:स्वीकार. आपण जे काम पूर्वी करत होतो ते आठ-दहा महिन्यांच्या अंतराने चालू केल्यावर अक्षरश: नवनिर्मितीचा आनंद मिळतो. काम तेच असते, पण ते पुन्हा चालू झाले, मला जमू लागले, ही बातमी इतरांना सांगावीशी वाटते.  आयुष्यातली सकारात्मकता ही अशी छोट्या छोट्या गोष्टींमधून तयार होऊ लागते. आणि तिचे सहेतुक सिंचन केल्याशिवाय अपेक्षित मोहोर येणे नाही.

प्रशांत दामले परवा ‘माझा कट्ट्या’वरून गप्पांच्या ओघात म्हणाले की, ‘‘असे ना का नाटकाचे थिएटर निम्मेच भरलेले, दडेनात का हुकमी लाफ्टर चेहऱ्यावरच्या मास्कच्या आड, पण आपण पुन्हा एकदा त्या ५० ७ ५० च्या रंगमंचावर उभे राहिलो आहोत, ही भावनाच अभिनेत्याला जिवंत ठेवायला पुरेशी ठरते.’’  सकारात्मक अशाच लहानसहान बाबींमधून शोधायची आहे. सकारात्मकता व्हॅक्सिनसारखी बाहेरून टोचता येणार नाही. रेमडेसिवीरसारखी मला तिची ड्रीपही लावता येणार नाही. प्राणवायू मी शरीराला बाहेरून देऊ शकतो, सकारात्मकता मला आतून बाहेर उत्सर्जित करायची आहे. ती संसर्गजन्य व्हावी अशी माझी इच्छा आहे.

कोविडने आपल्याला दिलेल्या काही चांगल्या गोष्टींची खूणगाठ बांधावी. कुटुंबाचे दृढ झालेले स्नेहबंध, नव्याने शिकलेले घरकाम, ‘आई कुठे काय करते?’ या प्रश्नाचे नेमके मिळालेले उत्तर, शेजारधर्माची विस्तारलेली क्षितिजे, आपापल्या बिल्डिंग, वाडी-वस्तीच्या अस्मितांचे ध्रुवीकरण, सामाजिक स्वच्छतेचे नव्याने आलेले भान, तंत्रज्ञानाचा ठायी ठायी होणारा वापर या सगळ्या गेल्या वर्षाच्या फलश्रुती आहेत.

एक शहाणासुरता सुरकुतलेला म्हातारा आणि एक अल्लड, अवखळ, नवथर पोर यांची कहाणी ऐका. आजोबा गोष्ट सांगताना म्हणाले, ‘‘माझ्या मनात दोन लांडग्यांचे नेहमी भांडणतंटे आणि मारामारी चालू असते. पैकी एक हिंस्रा, नैराश्यवादी आणि नकारात्मक, तक्रारखोर आहे, तर दुसरा हसरा, धडपड्या, आशावादी, सकारात्मक, साहसी आहे.’’

नातवाने गंभीर मुद्रेने प्रश्न केला, ‘‘आजोबा, या मारामारीत कोण जिंकेल?’’

आजोबा हसले आणि म्हणाले, ‘‘तू ज्याला खाऊपिऊ घालून धष्टपुष्ट करशील तो!’’

sanjayoak1959@gmail.com